सांस्कृतिक दहशतवादाचा अभिव्यक्तीवर हातोडा!

राजकीय भूमिका घेतल्याने अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह या चॅनेलवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. विविध मुद्यांवर किरण माने हे समाज माध्यमांवर व्यक्त होत असतात. ते राजकीय भूमिका समाजमाध्यमांवर मांडत असतात. त्यामुळे काही लोक त्यांच्यावर नाराज आहेत, असं प्रॉडक्शन हाऊसकडून सांगण्यात आल्याचं किरण माने म्हणाले. अशा पद्धतीने एखाद्या कलाकाराने राजकीय भूमिका मांडल्या म्हणून त्याला मालिकेतून काढून टाकणं हे केवळ धक्कादायक नाही तर हा एक सांस्कृतिक दहशतवाद आहे.

गेल्या काही काळापासून राजकीय, सांस्कृतिक दहशतवाद वाढला आहे. एखाद्या खेळाडूने राजकीय, सामाजिक भूमिका घेतली की त्याला टार्गेट केलं जात आहे. कलाकाराने भूमिका घेतली तर त्याच्या हातातून काम काढून घेतलं जातं. कलाकाराचं राजकीय मत असू शकतं. तो जर त्याचं मत मांडत असेल आणि ते आपल्याला, आपल्या विचारधारेला मान्य नाही म्हणून एखाद्या चॅनेलने काढून टाकणे हे अतिरेकी कारवाई सारखं आहे. आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे. कलाकार वैयक्तिक आयुष्यात स्वतंत्र विचारांचा असतो.

त्याच्या वैयक्तिक राजकीय भूमिकेशी चॅनेलला काहीच देणंघेणं नसावं. त्याच्या व्यक्तिगत विचारांवर चॅनेल कोणाच्यातरी दबावाखाली येऊन अशी कारवाई करत असेल तर वाईट आहे. सांस्कृतिक दडपशाही नवी नाही. तालिबानी विचारांना आपण हसतो, पण त्यासारख्या घटना आपल्या देशात घडताहेत याबद्दल सोयीस्कर मौन बाळगलं जातं. त्याविरोधात एखादा कलाकार भूमिका मांडत असेल तर त्याच्याविरोधात कारवाई केली जाते. गेल्या काही वर्षापासून विरोधी विचार म्हणजे देशद्रोह ही भावना देशभरात प्रखर झाली. आणि अनेकांना देशद्रोही ठरवण्यात आलं आहे.

कोणताही विरोधी विचार आम्ही ऐकून घेणार नाही, ही हुकूमशहा मनोवृत्ती यातून दिसते. स्टार वाहिनीवर किंवा त्या मालिकेच्या निर्मात्यावर, कोणता दबाव आणला गेला, की पुढील घटना वाईट होतील, या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलले, याची कल्पना नाही. पण एखाद्या कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या केल्यासारखं आहे. भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं, अशी बेताल वक्तव्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत, अभिनेते विक्रम गोखले यांनी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत, अभिनेते विक्रम गोखले यांनी स्वातंत्र्याबद्दल केलेली वक्तव्ये, यानंतर त्यांच्याविरोधात कोणत्या चॅनेलने, प्रोड्यूसरने कारवाई केली नाही. करुही नये.

त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वांनी स्वीकार करावा. पण त्यांनी त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला हेदेखील आपल्याला मान्य करायला हवं. पण किरण माने यांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केलेला नाही. त्यांच्या समाजमाध्यमांमधील पोस्ट पाहिल्या तर कळेल. पण त्यांनी भूमिका घेतली म्हणून त्यांना मालिकेतून काढून टाकणे हे वाईट आहे. ते जे काही लिहितात त्यात कायद्याने चुकीचे, खोटे, बदनामीकारक काही असेल तर त्याचा प्रतिवाद करा अथवा कोर्टात खेचा. पण मतभिन्नतेच्या मुद्यांवर शिक्षा म्हणून एखाद्याच्या पोटावर लाथ मारणे हा केवळ सांस्कृतिक दहशतवाद आहे. आणि तो उखडून काढावाच लागेल.

मराठी चित्रपटसृष्टीविषयी परखड बोलायचं झालं तर एकूणच मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टी आजही परंपरागत सनातनी वर्चस्वाखाली आहे. काही छुपे तर काही उघड असतात. स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटणे किंवा आपल्या हिताला जपण्यात चूक नाही. पण त्याचा अर्थ कणाहीन होणे बिलकूल नाही. मराठी कलाकार भूमिका घेतच नाहीत. आता कुठे किरण मानेंनी त्यांच्या भूमिका मांडल्या तर त्यांच्याकडून काम काढून घेतलं. राजकीय, सामाजिक भूमिका हे तामिळ कलाकार स्पष्टपणे मांडतात. त्यात मग पा रंजीत, प्रकाश राज, सिद्धार्थ, स्वरा भास्करसारखे कलाकार रोखठोक आणि जाहीर भूमिका मांडतात. त्यांना समाजमाध्यमांवर जोरदार ट्रोल केलं जातं. घाणेरड्या शब्दांत, बलात्काराच्या, अत्याचाराच्या, हत्येच्या धमक्या दिल्या जातात. मात्र, आजही ते कलाकार त्यांची भूमिका मांडण्यात धजावत नाहीत. मात्र, मराठी कलाकार, बॉलिवूड कलाकार हे राजकीय, सामाजिक भूमिका मांडायची झाली की मूग गिळून गप्प बसतात.

शरद पोंक्षेंसारखा कलाकार महात्मा गांधींच्या मारेकरी गोडसेचं उदात्तीकरण करतो. त्यानंतर कंगना, विक्रम गोखले स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांचा अवमान करतात. मात्र, त्यांच्यावर कोणी कारवाई केली नाही. चंद्रशेखर गोखले नावाच्या एका चारोळी करणार्‍या स्वयंघोषित साहित्यिकाने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर जातीवाचक टीपण्णी केली. पण त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली दिसत नाही. किरण मानेंना मालिकेतून काढून टाकणे ही एक प्रकारची हुकुमशाहीच आहे. त्या वाहिनीला नक्की भीती कशाची? त्यांना व्यवसाय मिळणार नाही? त्यांच्यावर कारवाई होईल? नक्की कशाची? अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाहिनीलादेखील आहे. पण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा व्यापार करत आहेत. व्यापार बंद पडेल या भीतीने त्यांनी मानेंनाच बाजूला केले, हे सारासार विचाराला पटणारे नाही. पण आता जिथे तद्दल व्यवसाय आणि त्याला लागून आलेले उत्पन्न हेच जीवनाचे ब्रीद होेऊन बसलेल्यांना नीतीमत्तेचे धडे कुणी द्यावे.

किरण माने यांनी भूमिका मांडली म्हणून त्यांना दिलेली वागणूक यावर राजकीय नेत्यांनीदेखील व्यक्त व्हायला हवं. महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. हे राज्य लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांचं आहे. राज्यात स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचं महाविकास आघाडी सरकार आहे. त्यांनी यावर बोलायला हवं. कोणतीही राजकीय भूमिका घेणं, व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे. किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल, तर हे अन्यायकारकच आहे.

आणि त्यावर राजकीय व्यक्तींनीदेखील बोलायला हवं. एक राजकीय शक्ती सेलिब्रिटींवर दबाव आणून देशातील शेतकर्‍यांविरोधी किंवा मोदी समर्थनाच्या अजेंड्यावर बोलायला भाग पाडते. मविआ सरकारने ठामपणे किरण मानेंच्या पाठीशी उभे राहावं आणि सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाकावं. महाराष्ट्रात असली दडपशाही चालू देऊ नये. संविधानाच्या चौकटीत आपलं मत व्यक्त करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. एखादी विचारसरणी लादण्यासाठी पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जात असेल तर तो सरकारने खपवून घेऊ नये. पुरोगामी महाराष्ट्राला एक समृद्ध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहे. यापूर्वीही विविध कलाकारांनी राजकीय वक्तव्ये केली, सरकारविरोधात भूमिका घेतली, पण म्हणून काही त्यांना चित्रपट किंवा मालिकेतून काढले नाही.

राजकारण हे आपल्या, आपल्या आईवडिलांच्या, आपल्या मुलाबाळांच्या जगण्याची किंमत ठरवतं. आपण खात असलेली डाळ, भात, मासे, मटण, चप्पलची किंमत, रुग्णालयातील बिलं, औषधांच्या किमती, पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किमती..सगळं सगळं राजकीय निर्णयांवर ठरतं. ते दुर्लक्षून चालणार नाही. जो माणूस छाती फुगवून सांगतो, की राजकारण लै बेकार म्हणून मी त्यावर बोलत नाय तो माणूस मूर्ख असतो. एखाद्या शक्तीला, आपल्याला काम मिळणार नाही या भीतीने भूमिका मांडायचं थांबवू नका. ज्या ज्या वेळी राष्ट्र संकटात असेल तेव्हा पुरक राजकीय, सामाजिक भूमिका कलाकारांना घ्याव्याच लागतील. कलाकारांना फॉलो करणारे लाखो लोक असतात. त्या राजकीय, सामाजिक भूमिका लाखो लोकांपर्यंत पोहोचत असतात. याबाबतीत दक्षिणेकडच्या कलाकारांना मानले पाहिजे. कमल हसन, सिद्धार्थ, प्रकाशराज, सूर्या, मारी सेल्वराज, पा. रंजीत हे स्वत: पुढे येऊन राजकीय, सामाजिक भूमिका घेतात.

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बदलात सहभागी होतात. मराठीत अशी भूमिका घेणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. याचा अर्थ इथे अजूनही सांस्कृतिक दबाव एका विशिष्ट वर्गाचाच आहे. त्यांच्या नेत्यांच्या, पुढार्‍यांच्या विरोधात बोलले की असा दबाव सर्व बाजूंनी टाकला जातो. हा दबाव कमी करण्यासाठी असे अनेक किरण माने तयार करावे लागतील. हा सांस्कृतिक दहशतवाद संपवावा लागेल. पडद्यावर भूमिका रंगवणारे नट आणि वास्तविक आयुष्यात ठोस भूमिका घेणारे नट असा योग आजच्या वर्तमानकाळात दुरापास्तच. त्यात तामिळ कलाकार घेत असलेली भूमिका आणि त्यापाठोपाठ किरण माने यांनी घेतली भूमिका यामागे सर्वांनाच ठामपणे उभं रहावं लागेल. किरण माने त्यांच्या भूमिकेवर अद्याप ठाम आहेत. मी इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती, असं म्हटलं आहे. मग आता ही दहशत कोणी निर्माण केली? आणि का केली गेली? याची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील. आणि या सांस्कृतिक दहशतवादाला रोखावं लागेल.