अरुण फडके गेले, मराठी शुद्ध लेखनाचे २४ कॅरेट सोने हरपले

arun phadke
'शुद्धलेखन तुमच्या खिशात' या पुस्तकाचे लेखक अरुण फडके

आज दुपारी अडीचची वेळ. पत्रकारिता अभ्यासक्रमाचा ऑनलाईन वर्ग सुरू होता आणि अचानक सोशल मीडियावर बातमी झळकली. अरुण फडके गेले… क्षणभर सुन्न झालो. कोण होते अरुण फडके सर… मन नकळत भूतकाळात गेलं.
२००७ किंवा त्यापूर्वीचा काळ असावा… खिशात मावेल असे एक ‘शुद्धलेखन तुमच्या खिशात’ या नावाचे एक छोटेखानी पुस्तक बघण्यात आले. या पुस्तकात मराठीतील सातत्याने वापरले जाणारे पण आपल्याला हमखास चकवा देणारे शब्द दिलेले होते. काळाच्या ओघात आपण काही शब्द चुकीचे कधी लिहायला लागलो हे आपल्यालाही कळले नाही असे असंख्य शब्द त्यापुढे ✖️ अशी चुक या अर्थाची फुली व योग्य शब्दापुढे ✔️ अशी बरोबरची खूण केलेले शब्द त्यात होते. पुढे जेव्हा कधी दुकानात हे पुस्तक दिसले, त्या प्रत्येकवेळी या पुस्तकाच्या दहा पाच प्रती विकत घेऊन अनेकांना भेट म्हणून दिल्या.

२०१२ पासून संगमनेर महाविद्यालयात पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला. तेव्हा पुणे विद्यापीठाने दिलेल्या सात विषयांखेरीज मराठी भाषा हा आठवा जास्तीचा विषय मी माझ्या पातळीवर सुरू केला. अर्थात या विषयाची निम्म्याहून अधिक मदार अरुण फडके सरांच्या दोन पुस्तकांवर होती. याचा फायदा असा झाला की इतरांना शिकवता शिकवता मीच मराठीतील शब्दांच्या वापराबद्दल आग्रही झालो. माझं मराठी पूर्वीपेक्षा अधिक बरं होत गेलं. त्यामुळे आयुष्यात एकदाही भेट न झालेल्या या गुरुबद्दल मनात प्रचंड कृतज्ञतेची भावना आहे.

फडके सर मुळचे ठाण्याचे. घरचा मुद्रणालयाचा व्यवसाय. त्यामुळे मुद्रण तंत्रज्ञानाचा डिप्लोमा करून त्यांनी याच व्यवसायात प्रवेश केला. १९८७ नंतर छपाई व्यवसायातही संगणकीकरण झालं. अनेक लोक संगणकावर अक्षर जुळणी करू लागले. मराठी शुद्धलेखनाशी फारसा संबंध नसलेले अनेक लोक या व्यवसायात आले. शुद्धलेखन या विषयावर सोप्या, सुटसुटीत पुस्तकाची गरज निर्माण झाली. फडके सरांनी याविषयावर काम सुरू केले आणि ६ जानेवारी २००१ रोजी मराठी भाषेतला पहिला शुद्धलेखन कोश तयार झाला. डॉ. सरोजिनी वैद्य, पु. भागवत, डॉ. गं. ना. जोगळेकर अशा दिग्गजांनी फडके सरांचे काम येणाऱ्या पिढ्यांच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे, यावर या कार्यक्रमात भाष्य केलं.
खूप गाजावाजा झालेलं एकविसावं शतक सुरू झालं होतं फडके सरांनी काळाची गरज ओळखून मराठी शुद्धलेखन या विषयावर कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. मुद्रितशोधन आणि संपादन कौशल्य याविषयावर साठ तासांचा अभ्यासवर्ग घ्यायला सुरुवात केली.

फडके सर मागच्या पाच सहा वर्षांपूर्वी नाशिकला स्थायिक झाले होते. सप्टेंबर २०१७ मध्ये अचानक पोटात दुखायला लागले म्हणून नाशिकलाच तपासणी केली असता कर्करोगाचे निदान झाले. मुंबईत टाटा हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा खात्री करून झाल्यावर उपचार सुरू झाले. केमोथेरपी आणि इतर औषधे सुरू होती. थोडे बरे वाटले की सरांच्या मराठी शुद्धलेखनाच्या कार्यशाळा सुरू व्हायच्या.

सर फेसबुकवर बऱ्यापैकी सक्रिय असायचे. त्यांना एखाद्या शब्दाबद्दल शंका विचारली की त्यावर ते सविस्तर पोस्ट टाकायचे. अनेकजण असेच का? भाषेतील शुद्ध अशुद्ध या संकल्पनांविषयी विचारायचे पण सर ठामपणे भूमिका घ्यायचे आणि अमुक शब्द असाच लिहायचा हे ठासून सांगायचे. पण पावणेतीन वर्षे कर्करोगाशी लढा देणाऱ्या फडके सरांची लढाई आज संपली.

सध्या मराठी शाळा, मराठी साहित्य, मराठी भाषा यावर सगळीकडे मोठी चर्चा सुरू आहे. प्रमाण मराठी भाषा शिकवणारी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत. अशा काळात फडके सरांसारखे व्यक्तिमत्व माझ्यासारख्या अनेक भाषाप्रेमींना आपल्यामागे हिमालयाप्रमाणे ठामपणे उभे असल्यासारखे वाटायचे. पण आज अचानक सर गेल्याची बातमी आली.

भाषा प्रवाही असते, बोली भाषेसारखा गोडवा कशातच नाही, हे मला शंभर टक्के मान्य आहे. पण आपल्या भाषेतील विशिष्ट शब्द कसा लिहायचा यावर अधिकारवाणीने बोलणारी माणसे आता दुर्मिळ झाली आहेत. ज्यांच्याकडे भावी पिढ्या घडविण्याचे काम आहे, अशा अनेक शिक्षकांना भाषेबाबत किमान पातळीवर शिकवणारे लोकही दुर्मिळ होत चालले आहेत. अशावेळी मराठी भाषेच्या शुद्धलेखनातील २४ कॅरेट सोने हरपले अशीच माझी भावना आहे.

फडके सर तुम्ही आणि मी कधीच भेटलेलो नाही. पण कॉर्पोरेट क्षेत्रात काम करीत असूनही मागच्या अनेक वर्षात माझ्या बॅगेत लॅपटॉप सोबत तुमचे ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ हे पुस्तक अनिवार्य असायचे. आजही आहे. शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे, हे तुमचे ब्रीद घेऊनच गेली काही वर्षे काम करतोय. आपण लिहीत असलेला प्रत्येक शब्द प्रत्यक्ष डोळ्याला दिसल्याशिवाय मनातही उच्चार करायचा नाही. असं आता आम्हाला कोण बजावून सांगणार. सर तुमच्या जाण्याने येणाऱ्या पिढीत मराठी भाषेत काही वेगळे करू पाहणाऱ्यांची मोठी हानी झाली आहे हे नक्की. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली…


लेखाचे लेखक डॉ. संतोष खेडलेकर हे साहित्यिक आहेत.