Eco friendly bappa Competition
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग मराठी भाषेला अशा साहित्य संमेलनांची गरज ती काय?

मराठी भाषेला अशा साहित्य संमेलनांची गरज ती काय?

Subscribe

शेकडो वर्षानंतरही ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा वाचली जाते. त्यासाठी कुठली संमेलने भरवावी लागली नाहीत. पुल, अत्रे, खांडेकर, सावरकर यांच्या पुस्तकांच्या स्वस्त आवृत्या काढाव्या लागल्या नाहीत. साने गुरूजी कुठल्या विचारांचे होते, म्हणून त्यांची मराठी वाचली जात नाही. त्यांनी लिहिले ते साहित्य त्या काळातच नव्हेतर पुढल्या अनेक पिढ्यांनाही वाचनीय व बोधप्रद वाटले; म्हणून आजही वाचले जात असते. त्यांनी कार्यशाळा भरवून लेखक तयार केले नाहीत. त्यांचे बोट धरून अनेक पिढ्या साहित्यिक उदयास आले आणि त्यातून मराठीची जोपासना झालेली आहे.

साहित्य संमेलन आणि वाद ही काही जुनी गोष्ट नाही. विशेषत: केंद्रात अथवा राज्यात जेव्हा हिंदुत्ववादी सरकार असते तेव्हा तर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून वाद रंगवण्यात अहमहमिका सुरू होते. यावेळीही फारसे काही वेगळे घडलेले नाही. साहित्य संमेलनात जावेद अख्तर या संपूर्ण हयात मुंबईत काढूनही मराठी येत नसलेल्या हिंदी चित्रपटाची गाणी आणि पटकथा लेखकाला बोलावण्यात आले. अर्थात अख्तर येणार म्हणजे ते केंद्रातील मोदी सरकारवर दुगाण्या झाडणार हे निश्चित होते. राज्य सरकारबद्दल मात्र बोलणार नाही. कारण राज्यात कथित सेक्युलर आहे. हा वाद क्षमतो न क्षमतो तोच साहित्य संमेलनात सरस्वती पूजन न केल्याचा वाद रंगला. सरकारी पैशावर होणारे ही साहित्य संमेलन सर्वसामान्यांच्या भावना, इच्छा आकांक्षा पायदळी तुडवण्यासाठीच होतात का असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. हे आताच नाही तब्बल वीस वर्षांपूर्वी त्याचा मुहूर्त झालेला होता. तेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार होते आणि प्रथमच कुठलाही वाडगा घेतल्याशिवाय मराठी साहित्य संमेलनाला सरकारने मोठी रक्कम दिलेली होती. राज्य मराठी आहे, तर त्याच्या खर्चासाठी साहित्यिकांना वाडगा घेऊन फिरायला लागू नये, म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भरघोस सरकारी अनुदान देण्याचा आग्रह धरला होता. तोपर्यंत अशा सोहळ्याला जितके सरकारी अनुदान मिळत होते, त्याच्या दुपटीने पैसे वाढवून बहुधा २५ लाख रुपयांची एकरकमी देणगी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी दिलेली होती. त्यांनीच पुढाकार घेऊन दादर वाचनालयाला त्यात यजमान होण्यासाठी पुढे केलेले होते. मग मनोहर जोशींनाच दादरकर म्हणून त्याचे स्वागताध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पुढे आलेला होता. तर त्यावरून पुरोगामी कुजबुज सुरू झाली. तिचा इतका गवगवा झाला, की संमेलनात राजकारण नको म्हणत गदारोळ सुरू झाला. त्यापूर्वी अनेकदा राजकारणी नेते व मंत्रीही संमेलनात सहभागी झालेले होते व स्वागताध्यक्षही झालेले होते. पण असला वाद कधी उकरून काढण्यात आलेला नव्हता. कारण तोपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसचेच राज्य होते आणि मंत्री वगैरे काँग्रेसचेच असायचे. म्हणजेच युती सरकारच्या काळात साहित्यिक अस्मिता पुढे करून शिवसेनेला अपशकून करण्याचा अट्टाहास चालला होता. त्यासाठी मग आयुष्यभर समाजवादी कविता लिहिलेले संमेलनाध्यक्ष वसंत बापट यांच्यावरही ब्राह्मण असल्याचे आरोप झाले. अशावेळी आपल्या शैलीने प्रत्याघात करायलाच प्रसिद्ध असलेल्या शिवसेनाप्रमुखांनी जोरदार उत्तर दिले होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री स्वागताला नको असेल तर सरकारने देऊ केलेली अनुदानाची रक्कम परत घ्यावी, असे खडे बोल ऐकवले होते.

शिवसेनेचे मनोहर जोशी व ते मोठ्या रकमेचे अनुदान इतका कळीचा मुद्दा झाला, की तथाकथित पुरोगामी साहित्यिकांनी शिवाजी पार्कच्या साहित्य संमेलनावर बहिष्कार घालून दोन पर्यायी संमेलने भरवली होती. त्यापैकी एक उच्चभ्रू सवर्ण पुरोगामी लोकांचे होते आणि दुसरे पिछड्या दलित वगैरे साहित्यिक सहभागी असलेल्यांचे विद्रोही साहित्य संमेलन झालेले होते. त्या धारावीतील विद्रोही संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. य. दि. फडके होते आणि नंतरच्या काळात तेही मूलप्रवाहातील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तेव्हा अशा पुरोगाम्यांची टांगलेली तलवार त्यांच्यावरही कोसळली होती. त्यामुळे अशा चालबाजीच्या मागचा कुटिल हेतू पहिल्यापासून स्पष्ट आहे. असे लोक राजकीय तिरस्कार व मत्सराने भारावलेले काही वैफल्यग्रस्त राजकारणी असून साहित्यिक प्रांत हा त्यांनी बळकावलेला प्रदेश आहे. मग असे लोक नयनतारा, जावेद अख्तर वगैरे लोकांना अकारण मोठे महत्व देऊन सामान्यांच्या गळ्यात मारण्याचा उद्योग करत असतात. नेहरूवादच साहित्य संस्कृती असा आभास निर्माण करत असतात. कारण नेहरूंनी सत्ता हाती आल्यावर त्यांच्या टाकावू साहित्यासाठी अनुदाने व पैशाची बेगमी करणार्‍या संस्था उभ्या केलेल्या आहेत. अन्यथा ज्यांनी लिहिलेले कोणी विकत घेऊन वाचणार नाही, त्यांचे रद्दी लिखाण सरकारी खर्चाने छपाई करून फुकटात ग्रंथालयांना अनुदानित खर्चाने पुरवठा करण्याची गरज भासली नसती. आजवर साहित्य अकादमी नावाच्या संस्थेने कोणाला पुरस्कार दिले, त्याची यादी सांगितली गेली आहे. पण त्यांची साहित्यसेवा किंवा वाचकांमधील अशा साहित्यिकांची लोकप्रियता कधी सांगितली जात नाही. हा सगळा पुरोगामी भामटेगिरीचा उजळमाथ्याने चाललेला भुरटा व्यवहार आहे. त्यात मूठभर नावाजलेले लेखक घ्यायचे आणि बाकी आपल्या भामट्यांची रद्दी छापायची असा खेळ आजवर चालला आहे.

- Advertisement -

जनतेचा पैसा मौजमजा करण्यासाठी निर्धास्तपणे वापरणार्‍यांनी कधी त्याचा हिशोब त्या जनतेला दिलेला आहे? ‘पुरोगामी महाराष्ट्र’ असली भाषा प्रतिदिन वापरणार्‍या या लोकांनी कधीतरी सामान्य मराठी जनतेच्या मनाची चाचपणी केली आहे काय? आपापल्या मूठभर लब्धप्रतिष्ठितांच्या टोळ्या बनवून सरकारी वा शेठजींच्या अनुदानावर पुख्खा झोडणार्‍यांना आपल्या अशा बदमाशीची कधी लाज तरी वाटली आहे काय? त्यांना कुठल्या वाचकाने वा जनतेने कुठला पुरस्कार दिला आहे काय? त्यांच्या अनुदानित नसलेल्या पुस्तक वा ग्रंथाचे कोणी आवडीने वाचन केलेले आहे काय? सरकारी पैसा व त्याच्या आधारावर आपले थोतांड चालवणार्‍या टोळ्याचा मस्तवाल खेळ; असाच हा प्रकार होऊन बसला आहे, ज्या राजकारण्यांच्या नावाने हे लोक कायम गळा काढतात, त्यांच्यापेक्षा अशा अनुदानित साहित्यिकांचा भ्रष्टाचार किंचित वेगळा आहे काय? एकूणच मराठी साहित्य संमेलन हे कुठल्याही गल्लीतल्या गणेशोत्सव किंवा शिवजयंतीपेक्षा वेगळे राहिलेले नाही. पण त्याविषयी सहसा बोलले जात नाही. कारण त्याची जाणीव असलेल्या कुणाला इतक्या सफाईदारपणे मराठी वा कुठल्याही भाषेत आपला संताप व्यक्त करता येत नसतो. सामान्य माणूस कृतीवीर असतो. तो शब्दवीर नसल्याने त्याला शब्दात व्यक्त होता येत नाही. पण अशा दांभिक सोहळे वा उत्सवापासून चार हात दूर रहावे आणि आपली सामान्य बुद्धी शाबुत राखावी; इतके त्या सामान्य मराठी माणसाला नेमके कळत असते. म्हणूनच दिवसेंदिवस अशी संमेलने वा दांभिक सोहळ्यांपासून सामान्य माणूस दुरावत गेलेला आहे. नाशिकमध्ये ओस पडलेल्या संमेलनाची गर्दी ही साहित्यिक अभिमानात सामावलेला आहे. तसाच तो त्यांच्या स्वयंभूतेमध्ये सामावलेला आहे. साहित्यिक लेखक खराच स्वतंत्र व स्वयंभू असेल तर त्याने लिहिलेल्या व बोललेल्या प्रत्येक शब्दाचा आशय वाचकाला नेमका कळत असतो. त्यातल्या प्रामाणिकतेला तोच नागरिक तितक्याच आस्थेने प्रतिसादही देत असतो. पण त्यात थोडी जरी दांभिकता दिसली-जाणवली, तर सामान्य माणूस त्यातून अंग काढून घेतो. आजकालची साहित्य संमेलने म्हणजे नुसते दिखावू सोहळे बनून गेले आहेत. म्हणूनच त्यापेक्षा लालबागच्या राजाकडे गर्दी वाढली आहे.

ज्यांना दादा कोंडके हा अभिजात कलाकार वाटत नाही, असे लोक संमेलनात मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करायला जमा होतात. ज्या गावंढळ माणसाने मराठी चित्रपट बघायला अमराठी माणसांना चित्रपटगृहात खेचून आणले; त्याला यांच्या कलानिर्मितीमध्ये स्थान नाही. ज्या माणसाने अलिकडल्या कालखंडात मराठी भाषा बोलून लक्षावधी लोकांना ऐकायला भाग पाडले व त्यांच्या मनावर राज्य केले; त्या बाळासाहेबांची भाषा गलिच्छ म्हणून हे लोक नाके मुरडत राहिले. त्यांच्याकडून कुठल्या मराठी भाषेची जोपासना होऊ शकते? जी भाषा सामान्य मराठी माणसालाच उमजत नाही, इतकी क्लिष्ट असते; असे लिखाण करणार्‍यांचा गोतावळा मराठीचे संवर्धन कसे करणार? अशाच लोकांची मांदियाळी जिथे जमा होत असते, तिथे मराठी भाषेवर प्रेम करणार्‍यांचे काय काम? आज सोशल माध्यमातून हजारो लोक ब्लॉग लिहितात. फेसबुक वा तत्सम माध्यमातून अखंड लिहिले जात असते आणि कोट्यवधी लोक जगभर वाचत असतात. त्या मराठी भाषेला अशा संमेलनाच्या शुश्रुषागृहाची, बालवाडीची आता गरज उरलेली नाही. संमेलनाच्या अध्यक्षापेक्षाही सामान्य फेसबुकी लेखकाला आजकाल अधिक मराठी लोक वाचत असतील, तर संमेलनाची महत्ता किती शिल्लक राहील? त्या सोशल माध्यमापेक्षाही अधिक सकस व आशयघन लिहिता आले, तरच संमेलनवादी लेखकांचे महत्व शिल्लक राहू शकेल. कारण कुठलीही भाषा मूठभर शहाणे निर्माण करू शकत नसतात, की तिची जोपासना करू शकत नसतात. बोलणाराच भाषेचे संवर्धन करत असतो आणि त्याला बोलण्याइतकी सोपी वाटेल, तशीच भाषा कालौघात टिकून रहात असते. खड्डे वा चिखलातून वाट काढत रक्तबंबाळ होत वाटचाल करणार्‍याच भाषा जगात टिकून राहिल्या आहेत आणि मराठी त्यापैकीच भाषा आहे. तिला अशा लाचार संमेलनातून वा उधारीच्या पैशातून सोहळे साजरे करून जगवण्याची गरज नाही. शेकडो वर्षानंतरही ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा वाचली जाते. त्यासाठी कुठली संमेलने भरवावी लागली नाहीत. पुल, अत्रे, खांडेकर, सावरकर यांच्या पुस्तकांच्या स्वस्त आवृत्या काढाव्या लागल्या नाहीत. साने गुरूजी कुठल्या विचारांचे होते, म्हणून त्यांची मराठी वाचली जात नाही. त्यांनी लिहिले ते साहित्य त्या काळातच नव्हेतर पुढल्या अनेक पिढ्यांनाही वाचनीय व बोधप्रद वाटले; म्हणून आजही वाचले जात असते. त्यांनी कार्यशाळा भरवून लेखक तयार केले नाहीत. त्यांचे बोट धरून अनेक पिढ्या साहित्यिक उदयास आले आणि त्यातून मराठीची जोपासना झालेली आहे. त्यांना कुठले आविष्कार स्वातंत्र्याचे झेंडे खांद्यावर घेऊन, अजेंडा पुढे करावा लागला नाही. तेच मराठी भाषेचे संवर्धक होतेच. पण मराठीचे असे शिलेदार होते, की त्यांच्यासमोर सत्ताधारी वा राजकारणी अरेरावी करू शकले नव्हते. साहित्य मेळे वा संमेलनांना भव्यदिव्य करणारी रोषणाई त्यांच्या प्रतिभेत होती. त्यासाठी सेट लावावे लागत नव्हते, की सजावटी कराव्या लागत नव्हत्या. लेखकांना, आमंत्रितांना खाऊपिऊ घालणारी संमेलने भरवली जात नव्हती. तर तिथे जमणार्‍या साहित्य रसिकांना पोटभर समाधान मिळणारी पंगत वाढली जात होती. आज जेवणावळी व खानावळी झाल्यासारखी संमेलने भरवण्यासाठी यजमान शोधले जात असतील तर संमेलनात गर्दीसाठी सलमान खान वा अमिताभ बच्चन यांनाही अगत्याने बोलवावे. मग तिकडे गर्दी कशाला झाली नाही, असे शोकमग्न होण्याची नामुष्की येणार नाही.

- Advertisement -

 

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -