घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमातोश्री ते सिल्वर ओक !

मातोश्री ते सिल्वर ओक !

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पुतण्या राज ठाकरे यांचे बंड शमवण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही. दुसर्‍या बाजूला, अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा अचानक राजीनामा देऊन व्यक्त केलेली उद्विग्नता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले निवासस्थान असलेल्या ‘सिल्वर ओक’वर शांत केली. मातोश्रीपासून सिल्वर ओकपर्यंत भावबंदकीच्या उसळलेल्या लाटा म्हणूनच विचार करायला लावणार्‍या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांनी आपले पंख कितीही पसरले आणि लोकांवर आपला प्रभाव निर्माण केला तरी पवार आणि ठाकरे घराण्यांचा महाराष्ट्राच्या समाजमनावर असलेला पगडा नाकारता येत नाही. राष्ट्रीय पक्षाचे केंद्रस्थान दिल्लीत असते, पण जेव्हा महाराष्ट्रासंबंधी काही निर्णय घ्यायचे असतात, त्यावेळी त्या दोन घराण्यांना विश्वासात घ्यावे लागते. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आज जरी राज्यात बहुमताची भाषा करून शिवसेनेला दूर ठेऊ पाहत असला तरी त्यांना पहिल्यांदा महाराष्ट्राची सत्ता शिवसेनेशी केलेल्या युतीमुळेच मिळाली आहे. कारण जेव्हा राज्यात भाजप उभा राहण्यासाठी धडपडत होता, त्यावेळी त्यांना एकहाती काँग्रेसशी म्हणजेच पवारांशी भिडणे सोपे नव्हते. त्यामुळेच त्यांना पवारांना टक्कर देणार्‍या बलशाली नेत्याची गरज होती. ते नेतृत्त्व त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने मिळाले. पुढे शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले आणि ते पाच वर्षे टिकले ते बाळासाहेबांमुळेच हे मान्य करावे लागेल.

पवार आणि ठाकरे यांची विचारसरणी आणि राजकीय पक्ष भिन्न असले तरी त्यांचे पूर्वीपासून घरोब्याचे संंबंध आहेत. ‘मातोश्री’ हे ठाकरेंचे तर ‘सिल्वर ओक’ हे पवारांचे मुंबईतील निवासस्थान आहे. मातोश्रीचे दर्शन विविध कारणांमुळे अनेक वेळा प्रसारमाध्यमांवरून होत आलेले आहे. बाळासाहेब हयात असताना विविध क्षेत्रांतील लोक आपल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा एखाद्या क्षेत्रात मोठे यश मिळवल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर जात असत. त्यामुळे मातोश्री बरेच वेळा प्रकाशझोतात आलेली आहे, पण सिल्वर ओक हे पवारांचे निवासस्थान पवारांच्या स्वभावासारखेच रहस्यमय राहिलेले आहे. पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर एकादी खासगी बैठक झाली, अशी बातमी कधी तरी ऐकिवात येते. या व्यतिरिक्त सिल्वर ओकविषयी फारशी माहिती कुणाला मिळत नाही.

- Advertisement -

सिल्वर ओक प्रसारमाध्यमांपासून नेहमीच दूर राहिलेले आहे, पण नुकतीच अशी घटना घडली की, सिल्वर ओक अगदी झळझळीत प्रकाशझोतात आले. शिखर बँक घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात शरद पवार यांचे नाव आले. त्यानंतर शरद पवार यांनी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात भेटीला जाऊन त्यांचा पाहुणचार घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सगळी तयारी केली. सकाळपासून दक्षिण मुंबईतील पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी प्रसारमाध्यमांची प्रचंड गर्दी झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाणे टाळावे, अशी विनंती मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पवारांना भेटून केली. आता पवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावेळी प्रथमच बराच वेळ आणि बारकाईने पवारांचे निवासस्थान सिल्वर ओक लोकांना दिसले.

पवारांचे आजवरचे राजकारण पाहिले तर त्याचे स्वरूप हे अळीमिळी गुपचिळी अशा स्वरूपाचे राहिलेले आहे. आपल्या राजकीय हालचालींबद्दल ते कधीही कुणाला सुगावा लागू देत नाहीत. त्यांच्या मनात काय चालले आहे, हे त्यांच्या चेहर्‍यावर कधीच दिसत नाही. मागे पुण्यात पवारांचा सपत्नीक मुलाखतीचा कार्यक्रम होता. सुधीर गाडगीळ मुलाखत घेत होते. त्यांनी पवारांच्या पत्नी प्रतिभाताईंना विचारले, तुम्हाला तरी पवारांच्या चेहर्‍यावरून त्यांच्या मनात काय चालले आहे ते कळते का, त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. शरद पवारांच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम नागपुरात झाला होता. त्यावेळी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक विशेषांक काढण्यात आला होता. त्यात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी पवारांची कन्या सुप्रियाताई यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्या वीस वर्षांच्या होत्या. त्यांना एक प्रश्न विचारला होता. तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल काय वाटते? त्यावर त्या म्हणाल्या, ‘माय डॅड इज मोस्ट अनप्रेडिक्टेबल’. पवारांच्या अगदी सोबत असलेल्या त्यांच्या घरातल्यांची ही स्थिती आहे, तर इतरांबद्दल काय बोलणार? शरद पवार हे नेहमीच आपल्या अनप्रेडिक्टेबिलिटीसाठी (अनिश्चितता) ओळखले जातात. बाळासाहेब ठाकरे हे जाहीर सभांमधून विविध उपमा देऊन पवारांची खिल्ली उडवत असत, पण खासगीत त्यांना शरदबाबू असेच म्हणत. त्याला कारण पवारांची अनप्रेडिक्टेबिलिटी होती.

- Advertisement -

२७ सप्टेंबरचा दिवस पवारांच्या ईडी कार्यालयात भेटीला जाण्यावरून गाजला आणि संध्याकाळी त्याला एक चमत्कारिक वळण मिळाले. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन ते नॉट रिचेबल झाले. ते कुणालाच शोधून सापडेनासे झाले. अजित पवार दुसरा पक्ष काढणार असेही पतंग उडू लागले. दुसरा दिवस उजाडला. सकाळी सिल्वर ओकवर अजित पवार आले. तिथे शरद पवारांसोबत त्यांची ‘चर्चा’ झाली. त्यानंतर अजित पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये स्वत: येऊन पत्रकार परिषद घेतली. तडकाफडकी राजीनामा दिला त्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली. खरे तर ती त्यांनी शरद पवारांची मागितलेली जाहीर माफी होती, हे सुज्ज्ञांना सांगण्याची गरज नाही. शरद पवारांचा वारसदार कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे हा प्रश्न वेळोवेळी विचारण्यात येतो. शरद पवारांनी अजून कुणाचेही नाव जाहीर केलेले नाही.

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार पराभूत झाला. शरद पवारांचा नातू पहिल्याच वेळी पडतो, याचे अनेकांना आश्चर्य वाटले. त्या गोष्टीचा धक्का अजित पवार यांना जास्तच बसला. चव्हाण सेंटरमध्ये अजित पवारांना जो हुंदका फुटला, त्यामागे हा धक्का तर नव्हता ना, अशी शंका आल्यावाचून राहत नाही. साहेब आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत, असे अजित पवार यांना वाटत असले तरी त्यांना राज ठाकरे यांच्यासारखे बंड करून वेगळा पक्ष काढण्याचे धाडस आजवर झालेले नाही. कारण पवारांची अनप्रेडिक्टेबिलिटी. त्यात पुन्हा राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर आज त्यांची काय अवस्था झालेली आहे ते अजित पवारांना दिसत आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, पवारांच्या राजकारणाला सहकार क्षेत्राचा पाया आहे. सहकारातून राज्यात अनेक उद्योग उभे करण्यासाठी त्यांनी चालना दिली. त्यांच्या संयुक्त कुटुंबातही हेच सहकाराचे तत्व दिसून येते. त्यांच्या भावांनी एक एक क्षेत्र वाटून घेतले आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात मोठा झाला. त्यांची भाऊबंदकी कधीच उफाळून आली नाही. अजित पवार की, सुप्रिया सुळे हा प्रश्न असाच सहकाराने पुढील काळात सोडवला जाईल, असे वाटते. कारण ‘सहकारातून उद्धार’, याच तत्वावर पवार घराणे चालत आलेले आहे. ठाकरेंना ते जमले नाही. हाच ठाकरे आणि पवार घराण्यातील फरक आहे. ‘मातोश्री’ला भाऊबंदकी शमवता आली नाही, पण ‘सिल्वर ओक’ने ती शांत केली.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -