घरफिचर्समायमहानगर ब्लॉगयुद्धनौकांच्या जलावतरणात माझगावचा डंका !

युद्धनौकांच्या जलावतरणात माझगावचा डंका !

Subscribe

माझगाव ड्राय डॉकचे काम 1774 मध्ये पूर्ण झाले. या गोदीचे प्रवेशद्वार कसारा बेसिनच्या दिशेने होते आणि ते भरती ओहोटीनुसार नियंत्रीत केले जायचे. हा निमुळता भाग असल्याने इथे फार जहाजांची गर्दी करता येत नव्हती. त्यामुळे ही जागा केवळ जहाज दुरूस्तीसाठीच वापरात होती. पुढे 1804 मध्ये रुस्तुमजी मानेकजी वाडीया यांनी जहाज बांधणीच्या कामासाठी हे डॉक ताब्यात घेतले.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने गेल्याच आठवड्यात एक अनोखा इतिहास रचला. एकाच दिवशी दोन युद्धनौकांचे जलावतरण माझगाव डॉक इथे करण्यात आले. देशाच्या नौका बांधणी क्षेत्रातील असे पहिल्यांदाच घडले. ब्रिटिश काळापासून ते आतापर्यंत माझगाव डॉकमध्ये असंख्य व्यापारी जहाज, युद्धनौका आणि पाणबुड्यांची बांधणी झालेली आहे. त्यांचे जलावतरणदेखील याच डॉकमधून करण्यात आले. परंतु एकाच दिवशी दोन युद्धनौकांचे जलावतरण होणे ही घटना विरळाच.

विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशिका ‘सुरत’ आणि ‘निलगिरी’ श्रेणीतील फ्रिगेट ‘उदयगिरी’ या दोन युद्धनौकांचे एकत्रित जलावतरण करत माझगाव डॉकने देशाच्या नौकाबांधणी क्षेत्रात नवा अध्याय लिहिला. याचे कारण म्हणजे या दोन्हीही युद्धनौका अत्यंत भव्य आणि अत्याधुनिक आहेत. यापैकी ‘सुरत’ ही युद्धनौका १६३.२० मीटर लांब व ७,३३० टन वजनाची आहे. तर, ‘उदयगिरी’ ही युद्धनौका १४९.०२ मीटर लांब व ६,६७० टन वजनाची आहे. एवढे मोठे आव्हान लीलया पेलत माझगाव डॉकने दर्जात कुठलीही कसूर न ठेवता आपले कर्तव्य चोख बजावले. पुढील काही काळ असंख्य किचकट चाचण्यांचे अडथळे पार करून या युद्धनौका भारतीय नौदलाच्या बेड्यात सामील होतील. त्यावेळी माझगाव डॉक लिमिटेडच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा रोवला जाईल.

- Advertisement -

भारतात आजघडीला डझनच्या वर नौका बांधणी डॉक आणि कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकी विशाखापट्टणम येथील हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड, कोची येथील कोची शिपयार्ड लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही नौकाबांधणीच्या क्षेत्रातील अत्यंत विश्वासाची आणि तितक्याच आदराची नावं आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली ही परंपरा माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. च्या तंत्रज्ञांनी कायम राखली आहे. भारतीय नौदल व तटरक्षक दलाला आजवर शेकडो युद्धनौका एमडीएलने तयार करून दिल्या आहेत. पाणबुड्यांच्या निर्मितीत कंपनीचे विशेष कौशल्य आहे. यामुळे फ्रेंच कंपनीच्या सहकार्याने तयार होणार्‍या अत्याधुनिक स्कॉर्पिअन पाणबुड्यांची उभारणी इथेच सुरू आहे. त्याशिवाय निलगिरी, विशाखापट्टणम, शिवालिक श्रेणीतील युद्धनौका बांधण्याचाही एमडीएलला खूप अनुभव आहे. त्यातील काही युद्धनौका बांधणीचे कामही सुरू आहे.

एमडीएलने नौदलाच्या आगामी गरजा भागवण्यासाठी नवीन वेट बेसिनसह, पाणबुडी विभाग असेंब्ली वर्कशॉप आणि गोलियाथ क्रेनसह इतर सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी जवळपास 1 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. पाणबुडी विभागात दोन समर्पित समांतर पाणबुडी असेंब्ली लाईन्स ऑपरेशन्ससाठी पूर्णपणे तयार आहे. या असेंब्ली लाईन्ससह, एमडीएलकडे कोणत्याही वेळी 11 पाणबुड्यांचे बांधकाम करण्याची क्षमता आहे. एमडीएल हे भारतातील असे एकमेव शिपयार्ड आहे ज्याने दोन भिन्न तंत्रज्ञानासह पारंपारिक पाणबुड्या यशस्वीरित्या तयार केल्या आहेत. त्यात जर्मन एसएसके श्रेणीतील पाणबुड्या तसेच फ्रेंच स्कॉर्पिअन श्रेणीतील पाणबुड्यांचा समावेश आहे. 220 मीटर लांब, 45 मीटर रुंद, 39 मीटर उंच असलेल्या कार्यशाळेतून एमडीएलचे काम चालते, त्याशिवाय, कार्यालय भवन व इतर कार्यशाळांचाही समावेश आहे.

- Advertisement -

एमडीएलमध्ये प्रकल्पनिहाय कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाते. हे कर्मचारी सहसा आयटीआय, फिटर श्रेणीतील असतात. एक प्रकल्प किमान 4 ते 6 वर्षे चालतो. प्रकल्प संपला की कर्मचार्‍यांचे कंत्राट संपते. त्यानुसार जसजसे प्रकल्प हाती येतात त्याप्रमाणे काम वाढत जाते. सध्या एमडीएलच्या हाती फारशी मोठी कामे नसली, तरी नौदलासोबत सातत्याने नवनव्या प्रकल्पांवर बोलणी सुरूच असते. माझगाव डॉक आणि एमडीएलचा इतिहासही अतिशय रंजक असा आहे. मुंबईच्या सात बेटांपैकी एक असलेल्या माझगाव बेटाजवळ सुरूवातीपासूनच एक निमुळती खाडी होती. त्यालाच माझगाव क्रिक असे म्हटले जायचे. सद्यस्थितीत त्यालाच कसारा बेसिन म्हटले जाते. ही बेसिन सुरूवातीपासूनच खूप खोल होती. या निमुळत्या खाडीतून लहान मोठी जहाजं सहजतेने ये-जा करू शकत होते.

मुंबईच्या बेटांवर सर्वात पहिल्यांदा पाय ठेवला तो पोर्तुगीज व्यापार्‍यांनी. पोर्तुगीज व्यापारी 1507 मध्ये सर्वात पहिल्यांदा माहीम बेटावर आले. इथे व्यापारउदीम करण्याच्या हेतूने बस्तान बसवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी माहिमच्या किल्ल्याचा ताबा 1534 मध्ये मिळवला. आजही हा किल्ला भग्नावस्थेत उभा आहे. 1534 पर्यंत मुंबईची सातही बेटे पोर्तुगीज व्यापार्‍यांच्या ताब्यात आली होती. परंतु व्यापारासाठी मुंबईची सातही बेटे फारशी अनुकूल वाटत नसल्याने पोर्तुगिजांनी 1661 मध्ये आपल्या ताब्यातील हा किल्ला राजकन्येच्या लग्नात इंग्लंडच्या दुसर्‍या चार्ल्सला हुंडा म्हणून भेट दिला. सन १६६८मध्ये ब्रिटिश सरकारने मुंबई बेटांवरील सर्वाधिकार ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यानंतर खर्‍या अर्थाने मुंबई बंदराच्या विकासाला सुरुवात झाली. जहाजांच्या दुरुस्तीसाठी ड्राय डॉक आवश्यक असल्याने १६८६ मध्ये ड्राय डॉक बांधण्याची सूचना ईस्ट इंडिया कंपनीला करण्यात आली. त्यासाठी 1६९० मध्ये वेट डॉकला मंजुरी मिळाली. तर १७४८ मध्ये डॉकयार्डच्या बांधकामांना सुरुवात झाली.

दुसरीकडे जहाजांचा वावर वाढू लागताच जहाज बांधणीसाठी ही जागाही अपुरी पडू लागली. 300 टन क्षमतेच्या जहाजांच्या बांधणीसाठी ड्राय डॉक अर्थात कोरड्या गोदीची पुन्हा आवश्यकता भासू लागली. त्यासाठी माझगाव परिसराचा विकास करण्याचे ठरवण्यात आले. माझगाव ड्राय डॉकचे काम 1774 मध्ये पूर्ण झाले. या गोदीचे प्रवेशद्वार कसारा बेसिनच्या दिशेने होते आणि ते भरती ओहोटीनुसार नियंत्रीत केले जायचे. हा निमुळता भाग असल्याने इथे फार जहाजांची गर्दी करता येत नव्हती. त्यामुळे ही जागा केवळ जहाज दुरूस्तीसाठीच वापरात होती. पुढे 1804 मध्ये रुस्तुमजी मानेकजी वाडीया यांनी जहाज बांधणीच्या कामासाठी हे डॉक ताब्यात घेतले. जहाजाांच्या डागडुजीसोबतच जहाजांची निर्मितीही त्यांनी इथे सुरू केली. टिकवूडच्या जहाजांची निर्मिती करून ते खेचून बॉम्बे डॉकमध्ये घेऊन जायचे. अशा प्रकारच्या जहाजबांधणीत त्यांनी चांगलेच कौशल्य प्राप्त केले होते.

कालांतराने माझगाव डॉक परिसर दोन यार्डांच्या माध्यमातून विकसित झाला. ज्याला आज नॉर्थ यार्ड आणि साउथ यार्ड असे संबोधले जाते. इथे जहाजबांधणीचा व्यापार करण्याच्या उद्देशाने पेनिनसुलर अँड ओरिएंटल नॅव्हिगेशन कंपनी (पीएनओ) यांनी मुघल ड्राय डॉक भोडपट्ट्यावर घेण्याचे ठरवले. व्यापारात स्थिरावल्यानंतर पीएनओने 1874 मध्ये या डॉकचे मालक मकुल्लाचे शेख यांच्याकडून ही जागा ताब्यात घेतली. व्याप वाढल्यावर मुंबईतही आपले एक डॉक असावे असे पीएनओला वाटले. परंतु नव्याने जागा मिळवणे अवघड असल्याने त्यांनी मुघल ड्राय डॉकचा विस्तार करण्याचे ठरवले. माझगाव ड्राय डॉकच्या उत्तर पश्चिमेकडे एक त्रिकोणी प्लॉट रिची ड्राय डॉकच्या नावाने त्यांनी विकसित केला आणि त्याला जोडला. अशा रितीने नॉर्थ यार्डमध्ये माझगाव डॉक आणि रिची ड्राय डॉक असे दोन डॉक तयार झाले. तर मुघल डॉकला दक्षिण डॉक म्हणून ओळखले जाऊ लागले. खोलगट असल्याने इतक्या जुन्या डॉकचा वापर आजही पाणबुडी बनवण्यासाठी होतो, हे विशेष.

पुढे कंपनीचा व्यवसाय घसरणीला लागल्यामुळे पीएनओला माझगावच्या दोन यार्डांना सांभाळणे कठीण जाऊ लागले. त्यामुळे त्यांनी साउथ यार्ड द ब्रिटिश इंडिया नॅव्हिगेशन कंपनीला विकले. या कंपनीला बीआय असे म्हटले जाते. त्यानंतर नॉर्थ यार्ड पीएनओ आणि साउथ बीआय सांभाळू लागले. दोन्ही कंपन्यांमधील निकोप स्पर्धा वाढीस लागली. त्यातच पहिल्या विश्वयुद्धाने जोर धरल्यावर युद्धनौका, संरक्षण सामुग्रीची मागणी प्रचंड वाढल्यामुळे नॉर्थ यार्ड, साउथ यार्ड, रिची ड्राय डॉक आणि मुघल डॉकचे कंपनी सरकारच्या आदेशानुसार एकत्रिकरण करण्यात आले. या यार्डांच्या नियंत्रणासाठी 1915 मध्ये माझगाव डॉक कंपनीची स्थापना करण्यात आली. दुसर्‍या विश्वयुद्धादरम्यान तर माझगाव डॉकचा वापर पॅसेंजर लाईन जहाजांचे रुपांतर युद्धनौकांमध्ये करणे, रुग्णालये जहाज बांधणे यासाठी मोठ्या प्रमाणात झाला. माझगाव डॉक ब्रिटिश नौसेनेचे महत्वाचे अंग बनले. दुसर्‍या विश्वयुद्धाच्या काळात बॉम्बहल्ला, टॉरपिडो हल्ल्यात उद्धवस्त झालेल्या ब्रिटिश नौसेनेच्या जहाजांची पुनर्बांधणीही येथेच व्हायची.

दुसर्‍या विश्व युद्धाच्या समाप्तीनंतर पुन्हा माझगाव डॉकच्या हातातील कामे कमी होत गेली. त्यानंतर 1948 मध्ये नॉर्थ यार्डाची काही जमीन महिंद्रा अँड महिंद्राला भाडेपट्ट्यावर देण्यात आली. तर 1953 मध्ये सिंदिया वर्कशॉप लिमिटेडला नॉथ यार्ड आणि साऊथ यार्डमधील त्रिकोणीपट्टा भाडेपट्ट्यावर देण्यात आला. 1957 मध्ये पी अँड ओ आणि बीआयचे विलीनीकरण पूर्णपणे माझगाव डॉक प्रा. लि या ब्रिटिश व्यवस्थापनाअंतर्गत करण्यात आले. 1950 आधी आणि नंतरही ही कंपनी देशाच्या जहाज बांधणीच्या गरजा भागवत होती. स्वातंत्र्यानंतर भारतीय नौसेनेला बळकटी देण्याची गरज भासू लागताच माझगाव शिपयार्ड लिमिटेडचे नाव अतिशय ठळकपणे पुढे आले. भारत सरकारने भविष्यातील भारतीय नौसेनेच्या गरजांचा वेध घेण्यासाठी रघु रमैया समितीची स्थापना केली होती. या समितीने देशातील सर्व शिपयार्डांची पाहणी, चाचपणी करताना जहाज बांधणी, दुरूस्तीच्या दृष्टीने प्रचंड क्षमता असलेल्या एमडीएलची प्रामुख्याने शिफारस केली.

या शिफारसीनंतर 13 मे 1960 मध्ये सार्वजनिक उपक्रमांतर्गत भारत सरकारने कंपनीचे अधिग्रहण केले. त्यावेळी एमडीएलच्या ताब्यात 32.65 एकर क्षेत्र होते. युद्धनौका तयार करण्यासाठी जास्त जागेचा विचार करता बॉम्बे पोर्ट ट्रस्टशी बोलणी करून 1963 मध्ये कसारा बेसिन ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कसारा बेसिनचे खोलीकरण करून त्याचे रुपांतर भविष्याच्या दृष्टीने उत्कृष्ट वेट बेसिनमध्ये करण्यात आले. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. ने भारतीय नौदलासाठी 23 ऑक्टोबर 1968 मध्ये आयएनएस निलगिरी ही पहिली फ्रिगेट युद्धनौका बनवली. या युद्धनौकेचे जलावतरण इंदिरा गांधी यांच्या उपस्थितीत झाले होते. तेव्हापासून हा प्रवास अव्याहत सुरूच आहे. युद्धनौका, पाणबुड्या कामे अतिशय किचकट असतात. इलेक्ट्रिक, वायरिंग, अभियांत्रिकी कामे करण्यात एमडीएलचे कर्मचारी वाकबगार झाले आहे. अरबी, मुघल, मराठ्यांच्या राजवटीत, पुढे पारसी, ब्रिटिश कंपनीच्या काळातही स्थानिकांनी येथील जहाज बांधणी क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान दिले आहे.

माझगाव डॉक लिमिटेड ही कंपनी सध्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयांतर्गत येते. भारतीय नौदलासाठी युद्धनौकांच्या रुपात एकाहून एक सरस रत्ने घडवणार्‍या एमडीएलला केंद्र सरकारकडून ‘मिनीरत्न’ चा दर्जा मिळालेला आहे. या युद्धनौकांच्या जलावतरण कार्यक्रमात बोलताना माझगाव हे नाव कसे पडले, याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपले मत मांडले. ‘मत्स्य गाव’वरून माझगाव हे नाव पडल्याचे सांगितले जाते. पण माझ्यासाठी हे ‘माझं गाव’ आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. नौकाबांधणी क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला माझगाव हे खर्‍या अर्थाने माझं गाव वाटत असेल हे नक्की.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -