घरफिचर्समायमहानगर ब्लॉगढिश्यकॅव्ह..ढिश्यकॅव्ह...!

ढिश्यकॅव्ह..ढिश्यकॅव्ह…!

Subscribe

नचिता महातरे कपाळावरचा घाम टिपत टिपतच हाश्श हुश्श करत ऑफिसात पोहोचली. अगदी रिसेप्शन लॉबी जवळ जाऊनच शिला वाकडे तिची वाट बघत येरझाऱ्या घालत होती… तिला बघताच नचिता म्हणाली, अगं वसईला ब्रिजवरुन उतरेपर्यंतच दोन मिनिटांसठी चर्चगेट फास्ट चुकली. मध्येच एक अंधेरी लागली, त्यानंतर पुन्हा चर्चगेट म्हणून उशीर झाला गं…सर आलेत ना? कुठे आहेत? धर लवकर टिफीन, बोलव त्यांना..उशीर झाला, भुकेले असतील ना…’

घरातलं कुणी सख्खं हक्काचं कुणी काळजी करणार नाही अशी आलेल्या प्रत्येक सरांची काळजी कशी घ्यायची यात तर नचिता मॅडम भलतीच तरबेज. त्यामुळेच तर ती ‘मम्मा’ म्हणून तिला आवडणाऱ्या पोरा-बाळींची काळजी घेतेय. अशाच काळजी पोटी तिने आणलेल्या गरमागरम टिफिनची बॅग शिला वाकडेकडे सोपवून ती वॉशरुम कडे धावली. चेहऱ्यावर पाण्याचा भपकारा मारुन हातातल्या जुनाट, कळकट टरकीशच्या लेडीज नॅपकीननं चेहरा पुसतच डबा खायला सगळे एकत्र आले. मोहनलाल दशमुखे हा धनेशसरांचा कार्यालयीन दत्तू…सरांचे कान भरणं हेच त्याचं प्रोफाइल. मॅडम आणि सरांना हवं नको ते बघायला ऑफिसात आणि बाहेर सदैव तत्पर. त्यानं जेवेपर्यंत दोनवेळा धनेशसरांच्या कानाला लागून घेतलंच. सरांनीपण होकारार्थी मान हलवून त्याला संमती दिली…कारण सरांनाही फार काही येतं अश्यातल्या भाग नाही. धनेश सर फिल्ड रिपोर्टर असले तरी टनेल कव्हरेज मध्ये मात्र पटाईत. हां, मात्र तो टनेल दौरा तेलगीवाल्या आर्मस्ट्रॉंग सायबाचा हवा… आता च्यायनलवाल्या ‘बाबा’ची पिलावळ म्हणून गेले ते दिवस गेले म्हणा! पण रिपोर्टर ते नंबर वन यातला फरक ज्यांना कळत नाही त्यापैकी एक म्हंजे धनेश सुरावत. सरांना आवडतात पण तशीच खुजी मंडळी. अश्या सगळ्या खुजांनी हात ओले करुन घेतले. ही पंगत पाहिली की आपल्याला वाटेल हे सगळं मिळून मिसळून उठबस करणं चांगल्या समाजासाठी चाललंय. अर्थात हा ‘चांगला’ समाज याच सहा-आठ जणांचा बनलाय ह्याची ब्रेकिंग समजायला मात्र ‘आखाडा’ टिव्हीवाल्यांना काही आठवडे लागले…

- Advertisement -

ही जेवणावळीची दृश्यं बघून ऑफिसात बरंच गॉसिप सुरु आहे. पण सर मात्र मॅडमच्या प्रेमळ डब्यात अस्से काही अडकलेत की विचारु नका. सरांना मॅनेजमेंट येत नाही आणि नचिता मॅडमला टेलिप्रॉम्प्टर वाचण्यापलिकडे काहीच येत नाही…अहो,असं आम्ही नाही म्हणत. हवं तर कृष्णकुंजवाल्या सायबांना विचाराना…त्यांनी मॅडमची फाडलेली लक्तरं आजही युट्युब वर लोंबताना दिसतायत. जाणकार सांगतात, सायबांनी आजपर्यंत एवढं कुणालाच फाडलं नाही. पण तरी मॅडम काही बौद्धिक दृष्ट्या सुधारत नाही. पण दरवर्षी मॅडमचं लक्ष्मीदर्शन न चुकता होतं. याला कारण अंगचा प्रेमळपणा…

त्याचं झालं असं, कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये अनेकांनी ‘वर्क फ्रॉम होम’ केलं. पेपर बंद, च्यायनलं बंद. तरी धंदा करायला हवा. मग तीस जणांना चॅनेलच्या आतच कोंडण्यात आलं. आणि तिथूनच कामकाज सुरू झालं. ज्यांना कोण कोण होते तर सगळे रंजले गांजले. त्यांच्याबरोबर एकच सगळ्यात कामाचा माणूस होता. तो म्हणजे एचआर मॅनेजर संजय कुमार. गेली बारा वर्ष हा माणूस इमानेइतबारे काम करतोय. त्यामुळे सगळ्या कंपनीचा याच्या वर भारी विश्वास… आधीच्या आणि आताच्याही मॅनेजमेंटचा. तो काही सहकाऱ्यांना घेऊन लॉकडाऊन झाल्यापास्नं तळघरात थांबला आणि तिथेच थांबून कुणालाही घरी जाऊ न देता च्यॅनेलचं काम सुरु झालं.

- Advertisement -

खरंतर मिडीयाकर्मींच्या तपासणीच्या पहिल्या यादीत काहीजण पॉझिटिव्ह सापडले. पण त्यातून काही धडा न घेणाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना जनावरांसह कोंडलं आणि परिणाम व्हायचा तोच झाला. १७ जण पॉझिटिव्ह झाले. धनेश सर, नचिता मॅडम आणि त्यांची बच्चाकंपनी घरात आणि चैनलातली छोटी-मोटी मजूर मंडळी कोरोनाच्या जबड्यात…असा सगळा माहौल झाला. जे पॉझिटिव्ह झाले त्यांना ते ज्या ज्या भागात राहतात तिथल्या क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आलं. काहींना घरीच ठेवण्यात आलं. पण सहा दिवसांनंतर पण या लोकांची धनेश सुरावतांनी साधी चौकशी पण केली नव्हती. अगदी संजय कुमारनाही त्यांनी फोन केला नव्हता. आता सांगा याला टीमचा लीडर म्हणायचा का डिलर…?

अंधेरीच्या हाय महाराष्ट्र च्यॅनेल मध्ये एका स्टुडिओ कॅमेरामनने कोरोनाची देणगी दिली. आणि दुसऱ्याच दिवशी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी ऑफिस सील केलं. संपादक प्रशांत साठेंसह सगळ्यांच्या टेस्ट झाल्या. काही महिलाही पॉझिटिव्ह झाल्या.आजही ते च्यॅनल बंद आहे. मग लोअर परेलच्या ह्या आलटून पालटून अव्वल होणाऱ्या च्यॅनलला सुरु ठेवून मुंबईला आणि गरीब कर्मचाऱ्यांना कोण मृत्युच्या दाढेत लोटतंय? महापालिका, की सुरावत आणि त्यांचे चट्टे पट्टे? नचितासह तीन-चार जणांच्या घरी सेट अप लावण्यात आलाय. का तर ते नचिताला पर्यायानं धनेश सरांनाही प्रिय आहेत. एकाला एक न्याय दुसऱ्याला तिसराच न्याय. हे मानवी स्वभावानं सर्वत्र थोड्याफार प्रमाणात सुरु असतं. पण मॅडमला गिफ्टस देणारे, तिच्या मागे पुढे सतत स्नेहाळपणे मम्मा मम्मा करणारेच सुरक्षित राहू शकतात. बाकीच्यांना एकतर पळवून लावलं जातं किंवा मानसिक छळाला सामोरं जावं लागतं. इथल्या मेकअप रुममध्ये जी कट- कारस्थानं शिजतात ती अल कायदाच्या छळ छावणीतही शिजत नाहीत. याच सगळ्यांमुळे सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असतानाही या ‘चांगल्या समाजासाठी’ काम करणाऱ्यांची प्रवृत्ती मात्र निव्वळ सडकछाप… त्यामुळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्रीय कुटुंबातील त्यांची प्रतिमा खूपच भडक… बटबटीत आणि बाजारु… म्हणूनच इथे फिल्डवरुन स्टोरी आली रे आली की रिपोर्टरनं कितीही जीव जाळला असला तरी पीसीआर मध्ये आणि डेस्कवर बाजारबुणग्यांची चर्चा रंगते हाऊ-मचची! याच लालची पणाने निरपराध गरीब कर्मचारी नाहक मृत्युच्या दाढेत गेलेत.

कोरोना वरकरणी साधा दिसला तरी जीवघेणाच आहे. त्याहीपेक्षा जीवघेणी आहे बातमीदारांची दुनिया… पहिला पॉझिटिव्ह ठरला कळव्यात अमर नारकर. उपचार घेऊन १४ दिवसांनी घरी आल्यावर त्याला च्यॅनलच्या डेस्कावरुन दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर विचारणा झाली ‘आज काय देतोयस’? त्याच्या कुटुंबीयांना हा खूप मोठा धक्का होता. पण तावदार मिशांचे मालक राजन पार्लेकरांनी त्याला जाऊन उघड्या डोळ्यांनी बघणंही टाळलं. विभाग प्रमुख गणोबा ठाकरेंनी तर स्वत:ला गच्चीकुमारच करुन टाकला होता. कष्टाचं- धोक्याचं रिपोर्टिंग बाकीच्यांना आणि दिल्लीत जी स्टोरी नॅशनलला तिची पीटीसी द्यायला गच्चीकुमार गणोबा… मग ऋषी कपूर गेल्याच्या स्टोरीचं लाईव्ह द्यायचं असेल किंवा ‘राष्ट्रीय’ स्वारस्याची कोविड हॉस्पिटलची बातमी. ब्युरोचीफ हजर! ही ह्या सगळया मिडितल्या ‘इंदोरी बाबा’च्या चट्ट्यापट्यांची एकच स्टाईल… कळपाने रहा आणि लूटमार वाटून खा.

हे सगळं अमानुष आहे. अमानवीय आहे. कारण यातून कधीही भावनांचा स्फोट होऊ शकतो. शनिवारी, एका वाहिनीच्या ओबी व्हॅनवर असलेल्या संपादक आणि प्रमुख अॅन्कर्सच्या फोटोला एक पत्रकार जोरजोरात शिव्यांची लाखोली वाहत होता. का तर त्याच्या सुरु असलेल्या अमानवीय छळामुळे…तो हे करत होता. समोर संपादक आणि चट्ट्यापट्टृयांना प्रत्यक्षात तो शिव्या देऊ शकत नव्हता. का तर नोकरीची गरज आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. पण अशा पिचलेल्या मंडळींचा कडेलोट झाला तर कुणाच्या तावदार मिश्या तरी जळतील नाहीतर धनेश- नचिता सारख्यांच्या आशांना चूड लागेल…कारण ही मंडळी करत असलेल्या चुका त्यांच्याच लक्षात येत नाहीयत. त्यांच्या डोळ्यांवर पदाची धुंदी चढलीय… त्यातून अती झालंच की एखादा माथेफिरू यातूनच उठेल आणि म्हणेल, सर, चुकीला माफी नाही…ढिश्यकॅव्ह! ढिश्यकॅव्ह!

@बातमीवाला…!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -