घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअब्दुलजींच्या सतारीचे झंकार...

अब्दुलजींच्या सतारीचे झंकार…

Subscribe

शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमधील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मनावर घेतले तर महाराष्ट्रात ते शिवसेना आणि भाजपच्या युतीचा पूल बांधू शकतात, असे म्हटले. त्यांच्या त्या विधानामुळे मुुंबई महानगरपालिकेसह अनेक महापालिका आणि विविध पातळ्यांवर यावर्षी होणार्‍या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार हे काही शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत, त्यामुळे युतीविषयी बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असे म्हटले आहे.

महाविकास आघाडीतील एक मंत्री अशा स्वरुपाचे विधान करत असल्यामुळे त्याला महत्व आलेले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यापुढे जात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री होऊ शकतात. कारण त्या अप्रत्यक्षपणे कामकाज पाहत असतात, असे सांगितले. सत्तार यांच्या विधानाला अगदीच टुकार ठरवताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अब नया है ओ, त्यांना शिवसेनेतल्या आतल्या गोष्टी माहीत नाहीत, असे म्हणत उडवून लावले. कारण अब्दुल सत्तार हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, त्यांनी २०१९ साली शिवसेनेत प्रवेश केला.सत्तार यांचे विधान प्रातिनिधीक स्वरुपाचे आहे. कारण भाजप आणि शिवसेनेमध्ये असा वर्ग आहे, ज्यांना भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी, असे वाटत आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार हे काही मोठे नेते नाहीत.

- Advertisement -

कुणी तरी मोठ्या नेत्याने तसे विधान केले असते तर त्याला महत्व असले असते, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. पण राजकारणात एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे, संघटनेच्या आत काय चालले आहे किंवा कार्यकर्त्यांची काय भावना आहे, याविषयी संघटनेचे मोठे नेते कधीच बोलत नाहीत. त्याची वाच्यता संघटनेतील दुसर्‍या, तिसर्‍या फळीतील नेते करत असतात. काही वेळा मोठे नेते या छोट्या नेत्यांच्या माध्यमातून आपली मते, इच्छा-आकांक्षा, संदेश व्यक्त करून त्याचे काय पडसाद उमटतात ते पाहत असतात. त्याचा अंदाज घेऊन मग पुढील पावले उचलतात. त्याचे पडसाद जर का, चांगले उमटले नाहीत, तर मग त्यांचे ते वैयक्तिक मत होते, असे बोलून तो विषय बंद केला जातो. जसे भाजपमध्ये नारायण राणे यांनी केलेली काही विधाने ही जेेव्हा पक्षाला त्रासदायक ठरतात, तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. पण त्यांचे ते वैयक्तिक मत असले तरी ते निरर्थक आहे, अशातला भाग नसतो.

भाजप आणि शिवसेना यांनी खरे तर २०१९ ची विधानसभा निवडणूक युतीमध्ये लढवली होती. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपने युती तोडून निवडणूक लढवली होती. कारण त्याच वर्षी लोकसभेची निवडणूक झालेली होती, त्यात नरेंद्र मोदींच्या करिश्म्यामुळे भाजपला केंद्रात प्रथमच बहुमत मिळाले होेते. देशात मोदींची लाट होती. त्यामुळे आता महाराष्ट्रात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत आपण संधीचा फायदा घेऊन यावेळी मुख्यमंत्रीपद भाजपला मिळवायलाच हवे, असा महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांचा निर्धार होता. कारण १९९५ साली जेव्हा शिवेसना-भाजप युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. त्यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर यावेळी आम्हाला मुख्यमंत्रीपद हवे असा आग्रह भाजपने धरला, पण शिवसेना त्यासाठी काही केल्या तयार झाली नाही. त्यावेळी मोठा पेच निर्माण झाला होता.

- Advertisement -

राज्यात सरकार स्थापन होत नव्हते, ही संधी साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसशी असलेले मतभेद बाजूला ठेवून त्यांच्याशी आघाडी केली आणि राज्यात सत्ता स्थापन केली. ती सत्ता पुढे १५ वर्षे टिकली. पण २०१४ च्या मोदी लाटेमुळे राज्यातील भाजप नेत्यांमध्ये नवी शक्ती संचारली होती. त्यामुळे त्यावेळी भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही जोर लावलेला होता. त्यामुळे शिवसेनेसोबतची २० वर्षांची युती तोडण्यात आली. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झालेले होते. त्यामुळे भाजपने सावध पवित्रा घेत, शिवसेनेवर टीका केली नाही.

पण शिवसेनेने मात्र भाजपवर टीका करताना हातचे काही बाकी ठेवले नाही, कारण त्यांना असे वाटत होते की, आपण भाजपविरोधात टोकाची भूमिका घेतली तर त्या पक्षाचा आणि आमचा काही संबंध राहिला नाही, असे जनतेच्या लक्षात येऊन ते आपल्याला बहुमत देतील; पण तसे काही झाले नाही. त्यामुळे सगळा जोर लावून जो निकाल अपेक्षित होता तो काही आला नाही. त्यामुळे काय करावे असा पेच शिवसेनेसमोर निर्माण झाला होता. त्यावेळी भाजपचे १२२ आमदार निवडून आले होते, तर शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले होते. दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले; पण ही अशी अवस्था झालेली होती. त्यावेळी भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यांना प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने तांत्रिक पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेची मनधरणी करून त्यांना सत्तेत सोबत घेतले.

पुढे मुंबईसह ठाणे, डोंबिवली आणि इतर काही पालिकांमध्ये शिवसेना-भाजपने पुन्हा युती केली. इतकेच नव्हे तर पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यानंतर महाराष्ट्रातील सत्तेबाबत भाजपला शंका वाटू लागली. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेशी पुन्हा जवळीक सुरू केली. भाजप हा जरी राष्ट्रीय पक्ष असला तरी शिवसेनेकडे मराठी माणूस हा मुद्दा आहे. त्या मराठी माणसाला दुखावता येत नाही, त्यामुळे शिवसेनेला सोबत घेतले पाहिजे, हे भाजपला माहीत आहे. त्यामुळेच शिवसेनेसोबत युती करण्यात आली. त्याचवेळी अडीच अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद असे दोन्ही बाजूंकडून ठरले, अशी चर्चा होती. कारण यावेळी नेमकी चर्चा काय झाली, कुणी कुणाला काय वचन दिले, हे कळायला मार्ग नाही. कारण उद्धव ठाकरे यांचे मत आहे की, भाजपने आम्हाला मुख्यमंत्रीपद देण्याचे वचन दिले, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे, आम्ही असे वचन दिलेच नाही, असे म्हणणे आहे.

त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांचे हे असे मिलना आणि बिछडना, वेळोवेळी राज्यातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस हे अब्दुल सत्तार यांचे विधान उडवून लावत असले तरी त्यात त्यांना नवी आशाही दिसत आहे. त्यात पुन्हा रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सत्तार यांनी म्हटले आहे. खरे तर महाराष्ट्र हा देशात पुरोगामी मानला जातो; पण अजूनही राज्यात महिला मुख्यमंत्री झालेली नाही. उद्धव ठाकरे हे अनपेक्षितपणे जसे मुख्यमंत्री झाले, तशाच रश्मी ठाकरे या उद्या मुख्यमंत्री झाल्या तर त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण अब्दुलजींनी सतार छेडली आहे, त्यांचे झंकार उमटू लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -