Blog: निश्चित सांगतो… मनसे-भाजप युती होणार

modi raj
राज ठाकरे पुन्हा २०१४ च्या लाईनवर

एकदा प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘बिझनेस कम फ्रॉम अपॉर्च्युनिटी’. व्यवसाय हा संधीतून येत असतो. राजकारणात देखील तेच आहे. मतं आणि सत्ता ही संधीतूनच येत असते. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता हीच परिस्थिती आहे. यात मनसेला आपली संधी शोधून मते आणि सत्ता दोन्ही मिळवायची आहेत. त्यासाठी आगामी काळात मनसे-भाजप एकत्र येणार हे निश्चित सांगतो… (निश्चित सांगतो, असं वाक्य राज ठाकरे आपल्या भाषणात वारंवार उच्चारत असतात त्यावरून हे निश्चित सांगतो)

९ फेब्रुवारीला मनसे राज्यातील पाकिस्तान आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढणार आहे. सध्या देशात सुरू असलेल्या सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील पार्श्वभूमीवर या मोर्च्याला विशेष महत्व आहे. त्यात आता मनसेने हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्याने हा मोर्चा देशपातळीवर यशस्वी करण्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहेत. या मोर्च्याद्वारे राज्यातील राजकारणात मनसेला आपली जागा निर्माण करायची आहे. या आधी मनसेचा महाराष्ट्रातील राजकारणात आणि निवडणुकांत मनसेचा मित्र असा कोणताही पक्ष नव्हता. (परप्रांतियांविरोधातील भूमिकेमुळे कदाचित मनसेशी मैत्री करणे इतर पक्षांना परवडणारे नव्हते) परंतु, आता मराठी ते हिंदुत्व असा प्रवास करणाऱ्या मनसेला राज्यात सध्या एकाकी असलेला भाजप नवा मित्र म्हणून खुणावू लागला आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या जवळ जावून मनसे आता भाजपसोबत जाण्यास अनुकूल वातावरण तयार करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तशी तयारी देखील सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीला टोकाचा विरोध करून देखील आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भाजपला पाठिंबा देण्याची संधी सोडताना दिसत नाहीत.

आगामी काळात होणाऱ्या मैत्रीसाठी पूरक वातावरण निर्मिती करण्यासाठीच ही मनसेची रणनिती आहे. याआधी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे मुंबईतील महत्वाचे नेते आशिष शेलार यांची चर्चा झाल्याची अशी ब्रेकींग न्यूज होती. तसेच माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज यांच्यात बैठक झाली होती. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहता मनसे-भाजपचे आता नवे समीकरण होऊ घातले आहे, अशीच चर्चा आहे. ही चर्चा अगदी सामान्य मतदार देखील करताना दिसत आहेत. राज्यात जर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे भिन्न विचारसणीचे पक्ष जर सत्तेसाठी समविचारी होत असतील तर आता राज ठाकरेंनी भाजपचे व्हिडिओ न लावता भाजप-मनसेचे ‘Aesthetic Vision’ मांडले तर नवल वाटू नये. किंबहुना येत्या काळात अगदी मुंबई पालिकेच्या निवडणुकीपासून ते अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही भाजप-मनसेची नवी युती जन्माला येणार देखील आहे. याला काही महत्वाची कारणे आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीला पर्याय नाही

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वातंत्र्यानंतरच्या सुरूवातीच्या काही वर्षात काँग्रेसची मोनोपॉली सोडली तर एकहाती सत्ता मिळवणे कोणत्याही पक्षाला शक्य झालेले नाही. याला कारणेही बरीच आहेत. आजच्या घडीला राज्यात मुख्य पक्ष आणि इतर छोटे असे बरेच आहेत. त्यामुळे स्पर्धा देखील वाढत आहे. त्यात स्थानिक पातळीवरील समीकरणे वेगळी असतात. मतदारसंघात प्रत्येक नेत्याने आपला ब्रँड बनवल्याची देखील उदाहरणे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एक पक्ष म्हणून तुम्ही जर एखादे व्यापक व्हिजन या राज्यात मांडले तर एकंदर त्या व्हिजनवर अभ्यास करून ती तळागाळापर्यंत पोहोचवणारी एक फळी तुमच्याकडे हवी. त्यात पहिल्यांदा तुमचे कार्यकर्ते नंतर मतदारांची परिपक्वता आणि अभ्यास यावर तुमच्या व्हिजनाचे मतांमध्ये रूपांतर होते. राज ठाकरे यांनी आधी ब्लू प्रिंटद्वारे एकहाती सत्ता आणि नंतर सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले असले तरी आपले उमेदवार नेमके का निवडून येत नाही आहेत? याची नेमकी उकल आता त्यांना झाली आहे. पक्षाला वाढवण्यासाठी बाळासाहेबांनी जे जे प्रयत्न केले ते ते राज ठाकरे करताना दिसणार आहेत. त्यांनाही आता हे एकहाती सत्तेचे स्वप्न सोडून देऊन अगदी वॉर्डपासून ते खासदारकीच्या मतदारसंघापर्यंत युतीतून येणाऱ्या मतांची बेरीज करावी लागणार आहे.

‘हीच ती वेळ’संधीचं सोनं करण्याची

शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ म्हणत भाजपशी काडीमोड करत मोठी जोखिम पत्करत सत्ता स्थापन केली. शिवसेनेने सत्तेसाठी आपली संधी शोधली. अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी मनसेची जवळीक होत आहे, असे पाहून शिवसेनेने आपला सत्तास्थापनेचा डाव साधला. त्या संधीचे सोने होणार की नाही? यावर शिवसेनेचे भवितव्य ठरेल. परंतु, राज ठाकरे यांना आता त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करण्याची नामी संधी आहे. भाजपशी युती करून पक्षाला आणि कधी विचारांना त्या पद्धतीने ‘मोल्ड’ करून त्यांना आपली जागा बनवावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाची वाटचाल ‘जमलेल्या माझ्या मराठीपासून हिंदू’पर्यंत झाली आहे. मनसेचा गेल्या १३ वर्षांतील प्रवास पाहता तो उतरत्या क्रमाचाच राहिला आहे. याला अनेक कारणे असतील. परंतु, प्रखर प्रांतिक आणि भाषिक अस्मिता मांडणाऱ्या पक्षाला जेव्हा यश येताना दिसले नाही तेव्हा मनसेने आपली जागा बनवण्यासाठी हा नवा मार्ग स्वीकारला आहे.

मतदारांची स्मरणशक्ती कमी

आता अनेकजण म्हणतील राज यांनी मोदींना लक्ष्य केलंय. परंतु, हे ही लक्षात घेतले पाहिजे की एकमेकांना टोकाचा विरोध करणारे शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता एकमेकांसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे भाजपशी संधान बांधण्यात राज यांना तितके कठीण जाणार नाही. परंतु, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र प्रचार करून सेना-भाजपने एकमेकांशी फारकत घेतलेली आहे. त्यात मतदारांच्या कौलाला तेवढ स्थान नव्हतं. आता त्याच हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन शिवसेना हिंदुत्वापासून कशी दूर गेली आहे आणि आम्हीच आता कैवारी आहोत हाच मनसेचा यापुढील प्रचाराचा मुद्दा असणार आहे. तसेच भाजपकडून मनसे अगदी टोकाचा विरोधक आणि ‘नैसर्गिक मित्र’ व्हायला देखील वेळ लागणार नाही. एकदा प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘बिझनेस कम फ्रॉम अपॉर्च्युनिटी. व्यवसाय हा संधीतून येत असतो. राजकारणात देखील तेच आहे,मते आणि सत्ता ही संधीतूनच येत असते. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता हीच परिस्थिती आहे. यात मनसेला आपली संधी शोधून मते आणि सत्ता दोन्ही मिळवायची आहेत. त्यासाठी आगामी काळात मनसे-भाजप एकत्र येणार हे निश्चित सांगतो.