माशी कुठे शिंकली!

संपादकीय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा तूर्तात स्थगित केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सभा घेतली आणि लोकांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक शंकाकुशकांचे निरसरण करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात मनसैनिकांसाठी ट्रॅप लावण्यात आला होता. तिथे गेल्यावर संघर्ष निर्माण झाला असता तर अनेक मनसैनिकांना अटक करून त्यांच्यावर खोटे खटले टाकून त्यांना तुरुंगात सडवण्यात आले असते. हे मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले असते. परिणामी मुंबई आणि महाराष्ट्रात मनसेचा प्रभाव कमी झाला असता. हा एक ट्रॅप होता म्हणून आपण अयोध्येच्या दौर्‍यावर जाणे टाळले. या भाषणात राज ठाकरे म्हणाले की, मी अयोध्येला केवळ श्रीराम दर्शनासाठी जाणार नव्हतो, तर मुलायम सिंह सरकारने बाबरी मशीद पाडण्यासाठी गेलेल्या अनेक कार सेवकांना ठार केले आणि त्यांची प्रेते शरयू नदीत तरंगत होती. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी जाणार होतो. राज यांचा हा तर्क थोडा अजब वाटत आहे.

कारण राज ठाकरे यांच्या दौर्‍याची सुरुवातीला जंगी तयारी करण्यात येत होती. त्यानंतर बृजभूषण सिंह नावाचे एक खासदार उठतात आणि उत्तर भारतात राज ठाकरे यांच्या विरोधात मोर्चे काढतात, त्यांच्याविषयी हवी तशी वक्तव्ये करतात, पण त्या एका खासदाराला योगी आदित्यनाथ आवरू शकत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आवरू शकत नाहीत, अशी कुठली अलौकिक शक्ती त्या खासदाराच्या अंगी आहे हेदेखील आश्चर्यकारक आहे. कारण महाराष्ट्रात राज ठाकरेे भाजपला पोषक ठरणारी भूमिका घेतात. त्याचे योगी आदित्यनाथ समर्थन करतात, म्हणजे मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम राज ठाकरे महाराष्ट्रातून देतात आणि त्याची प्रथम अंमलबजावणी योगींनी उत्तर प्रदेशात केली. त्यामुळे नक्कीच राज ठाकरे यांच्या नावाचा राष्ट्रीय पातळीवर बोलबाला झाला.

राज यांच्या अयोध्या दौर्‍याला अधिकच बळ मिळाले, पण माशी इथेच शिंकली. कारण राज ठाकरेंना महाराष्ट्राबाहेर मिळणारा प्रतिसाद हा भाजपला रुचणारा नाही. त्यांना राज ठाकरे यांच्याशी सलगी हवी आहे, पण महाराष्ट्रात आणि तीही शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी आणि शक्य असेल तर नष्ट करण्यासाठी. त्यामुळेच त्यांना राज जवळचे वाटू लागले असावेत, पण राज यांचा महाराष्ट्राबाहेर विस्तार व्हावा किंवा राज यांचे बाळासाहेब ठाकरे व्हावेत ही त्यांची इच्छा नाही. कारण ते बाळासाहेब ठाकरे झाले तर आपल्याला त्यांच्या आज्ञेत कसे राहावे लागते आणि मुख्यमंत्रिपदावर कसे पाणी सोडावे लागते याचा अनुभव भाजपच्या नेत्यांनी घेतलेला आहे. भाजपवाल्यांना जो अनुभव शिवसेनेच्या बाबतीत आलेला आहे, तोच त्यांना पुन्हा मनसेच्या बाबतीत घ्यायचा नाही, पण त्यांना मनसेचा आपल्या कामासाठी उपयोग करून घ्यायचा आहे.

भाजप आपल्याला मुख्यमंत्रिपद देत नाही म्हणून शिवसेनेने अकल्पित महाविकास आघाडीत प्रवेश केला, पण याचसोबत शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष होण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केलेला होता. इतकेच नव्हे तर काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही आपले उमेदवार उभे केले, पण त्यांना त्यात यश येताना दिसत नाही. महाराष्ट्रात जशी शिवसेना मनसेचे अनुकरण करते, तसेच शिवसेनेप्रमाणेच आपणही राष्ट्रीय पातळीवर विस्तार करावा, अशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची इच्छा असावी, अन्यथा तसे पाहू गेल्यास अयोध्या दौरा आणि श्रीराम दर्शन हा काही राज ठाकरे यांचा विषय नव्हता. कारण राज ठाकरे यांनी आपला पक्ष स्थापन करताना त्याचे नाव ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ असे दिले.

मला माझ्या महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे कार्य करायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सत्ता माझ्या हातात द्या, असे सांगितले, पण आता पाहिले तर राज ठाकरे हे अयोध्या दौर्‍याच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर आपला प्रभाव पाडू पाहत आहेत असे दिसत आहे. महाराष्ट्रात सुरुवातीला भाजप हा शिवसेनेच्या मदतीने वाढला, पण पुढे त्यांना राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व मिळाल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील त्यांच्या मनातील शतप्रतिशत भाजपची भावना उफाळून आली. त्यामुळे त्यांनी युती तोडली आणि बहुमतासाठी मोहीम उघडली, पण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 सभा घेऊनही भाजपला महाराष्ट्रात बहुमत मिळाले नाही. शिवसेना भाजपपासून दूर गेल्यानंतर भाजपवाल्यांना महाराष्ट्रात शतप्रतिशत भाजपसाठी मनसेची गरज आहे.

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. दुसर्‍या बाजूला प्रादेशिक असलेले शिवसेना आणि मनसे यांचे प्रमुख नेते राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपचे तेही एक दुखणे आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसे यांच्यात अटीतटीची स्पर्धा आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना संपवण्याची भाषा करीत आहेत, पण गोम अशी आहे की या दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांचा पिंड एकच आहे. तो आहे मराठी माणूस. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील सत्तास्पर्धेचा भाजपला वापर करून घ्यायचा आहे. त्यामुळेच त्यांनी राज यांच्या अयोध्या दौर्‍याचे समर्थन सुरू केले होेते, पण राज यांच्या दौर्‍याला विरोध करणार्‍या फक्त एक खासदाराला ते आवरू शकले नाहीत. त्यांच्या अयोध्या दौर्‍याची सुरुवात बराच काळ आधीपासून सुरू झालेली होती. काही हजार मनसैनिक राज ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाणार होते. त्यासाठी उत्तर प्रदेशला जाणार्‍या अनेक एक्स्प्रेस रेल्वेगाड्या बुक करण्यात येणार होत्या. त्यासाठी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांचे सरकार पुढाकार घेणार होते.

म्हणजे योगी सरकारच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या जंगी दौर्‍याची तयारी करण्यात येत होती. राज ठाकरे यांनी अयोध्येला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी जाण्याचे ठरवल्यानंतर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी आपणही अयोध्या दौर्‍यावर जाणार, असे घोषित केले. ठाकरे बंधूंमधील भांडणाचा भाजपला वापर करून घ्यायचा आहे. त्यांचा प्रभाव वाढणार नाही याचीही त्यांना दक्षता घ्यायची आहे. त्याची सूत्रे केंद्रीय नेतृत्वाकडून हलत आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांसाठीही मुख्यमंत्रिपद नाकारण्यात आले आणि आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा बारगळवण्यात आला. हे राज यांनाही कळले असावे, म्हणूनच त्यांनी आपल्या भाषणात सवाल केला की, मला माफी मागायला सांगणार्‍यांनो, गुजरातमधून उत्तर भारतीयांना हाकलून दिल्याबद्दल कुणाला माफी मागायला सांगणार आहात?