घरफिचर्समायमहानगर ब्लॉगलसीकरणाचा वेग आणि कोरोनाला ब्रेक!

लसीकरणाचा वेग आणि कोरोनाला ब्रेक!

Subscribe

2020 हे संपूर्ण वर्ष आपण कोरोनाच्या दहशतीत घालवले. मृत्यूच्या भीतीने प्रत्येकाने नियम पाळत कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवलं. यामुळे डिसेंबर 2020 पर्यंत कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवल्याचे चित्र होते. पण जानेवारी महिन्यात देशातच नाही तर इतर देशांमध्येही कोरोना लशींच्या चाचण्यांच्या अंतिम टप्प्याला सुरूवात झाली. त्यानंतर लस बाजारात आल्याने कोरोनाची उरली सुरली धास्तीही जनतेमधून कमी झाली. यामुळे आता कोरोना आपलं काहीच वाकडं करू शकत नाही असा भ्रम लोकांमध्ये निर्माण झाला. मग मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही कमी झाला. त्यामुळे नव्या वर्षात कोरोनाने नव्याने उसळी घेतली आहे. त्याला रोखणे आता सर्वस्वी आपल्याच हातात आहे. कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवण्याची गरज आहे. तरच कोरोनाला ब्रेक बसेल.

कोरोना आणि त्यामागून येणारा लॉकडाऊन हा तसा आपल्यासाठी आता नवीन राहिलेला नाही. गेले वर्षभर याच कोरोनाच्या चक्रात आपण जगतोय. यामुळे देशात उसळलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला बरेच जण सिरियसली घेताना दिसत नाहीत. म्हणूनच आजच्या तारखेला देशात 24 तासात 1 लाखाहून अधिकजण पॉझिटीव्ह आहेत. त्यातील पन्नास हजार तर एकट्या महाराष्ट्रात आहेत. ही गंभीर बाब असून सध्या जरी राज्य सरकारने नागरिकांच्या पोटापाण्याचा विचार करत मिनी लॉकडाऊन जाहीर केला असला तरी लोकांचे बेशिस्त वर्तन पाहता हा मिनी लॉकडाऊन संपूर्ण लॉकडाऊनमध्ये केव्हाही बदलू शकतो असे चित्र सध्या दिसत आहे.

2020 हे संपूर्ण वर्ष आपण कोरोनाच्या दहशतीत घालवले. मृत्यूच्या भीतीने प्रत्येकाने नियम पाळत कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवलं. यामुळे डिसेंबर 2020 पर्यंत कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवल्याचे चित्र होते. पण जानेवारी महिन्यात देशातच नाही तर इतर देशांमध्येही कोरोना लशींच्या चाचण्यांच्या अंतिम टप्प्याला सुरूवात झाली. त्यानंतर लस बाजारात आल्याने कोरोनाची उरली सुरली धास्तीही जनतेमधून कमी झाली. यामुळे आता कोरोना आपलं काहीच वाकडं करू शकत नाही असा भ्रम लोकांमध्ये निर्माण झाला. मग मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही कमी झाला. संसर्गाच्या भीतीमुळे गर्दीपासून लांब पळणारे नागरिक आता गर्दीतच वावरू लागल्याचे दृश्य दादर भाजी मार्केटपासून दिल्लीतल्या गल्लीपर्यंत दिसू लागले आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात कोरोनाचा विस्फोट झाला असून गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गाची जी परिस्थिती होती तीच आज पुन्हा उद्धभवली आहे. त्याचे खापर प्रत्येकवेळी सरकारवर न फोडता जनतेनेच बेशिस्त वर्तन करून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला आहे.

- Advertisement -

यामुळे येणार्‍या प्रत्येक बर्‍या वाईट घटनांसाठी तुम्ही आम्हीच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही. मास्क वापरण्याचा लोकांना विसर पडल्याने त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी मुंबईत बीएमसीने मार्शल नेमले. पण उलट त्यांनाच काहीजणांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. काय म्हणायचं याला. आज त्याची किंमत प्रत्येकाला मोजावी लागत आहे. कोरोना कालही होता आणि आजही आहे. तो वरचेवर जरी साध्या सर्दी खोकल्यासारखा वाटत असला तरी तो सगळ्यांसाठीच सौम्य नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हंटलं जातं ते कोरोनालाही लागू आहे. यामुळे वर्षभरापासून कोरोनाचा सामना करतोय तेव्हा काही झालं नाही तर आता काय होणार या भ्रामक विचारातून प्रत्येकाने बाहेर यायला हवं. कमीत कमी कोरोनाबद्दलचा फाजील आत्मविश्वास बाळगू नये. कोरोनावरील लस आणि रेमडेसिविरसारखी औषधे जरी आज बाजारात आली असली तरी तुमची आमची प्रकृती ही वेगवेगळी आहे. तो कोरोनातून बरा झाला म्हणजे मी पण होणार असा अतार्कीक विचार करणे म्हणजे स्वत:च्या जिवाशी खेळणे आहे.

अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या आणि महासत्तेच्या स्पर्धेत असलेल्या चीनलाहा हाच फाजील विश्वास नडला आहे. यामुळे आजही अमेरिका,चीन, जर्मनी, ब्राझिल व इतर युरोपिय देशांमध्ये कुठे कोरोनाची दुसरी तर काही ठिकाणी तिसरी लाट आली आहे. पुन्हा मृत्यूचे तांडव बघावं लागतं की काय या विचाराने येथील देशवासीयांची झोप उडाली आहे. त्यांनीही त्याच चुका केल्या ज्या आज आपण करत आहोत. यामुळे काही देशांना नाईलाजाने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करावा लागला आहे. यामुळे अनेकजणांच्या नोकर्‍या गेल्या तर काहीजण देशोधडीला लागले आहेत. आज पुन्हा वर्षभराने घड्याळ उलट धावतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येत सध्या देशात महाराष्ट्र अव्वल आहे. गेल्या वर्षीही देशात कोरोनाचा महाविस्फोट हा महाराष्ट्रातच झाला होता. त्यावेळी कोरोना सर्वांसाठी नवीन होता. त्यावरील औषधे नव्हती. यामुळे कोरोनाशी कसा लढा द्यायचा हे वैद्यकीय विश्वापुढे मोठे आव्हान होते. पण तरीही डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचार्‍यांनी जीवावर उदार होेऊन रुग्णसेवा केली. यात देशात शेकडो आणि जगभरात हजारो डॉक्टरांचा बळी गेला.

- Advertisement -

तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांचेही कोरोनामुळे प्राण गेले. त्यावेळी आपण सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. आताही विशेषत: मुंबईतील कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबई पोलिसांचे सहाय्य मागितले. सरकारने लोकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, त्याला रोखता यावा, म्हणून लोकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. अत्यावश्यक असेल तर घरातून बाहेर पडावे, गर्दी टाळावी, पण तरी बरेचसे लोक अतिउत्साह दाखवत असतात. आम्ही एका ठिकाणी फार वेळ थांबणार नाही. आमच्याकडे असलेली वाहने घेऊन फिरत राहणार, असा काही जणांचा पवित्रा असतो. त्यात पुन्हा काही जण मास्क वापरत नाहीत, तसेच मास्क घातले असले तर ते व्यवस्थित नाकावर नसते. मास्कचा योग्य वापर न करणार्‍या बरेच लोक अशा लोकांना दंड करण्यासाठी तैनात केलेल्या मार्शल्सशी हुज्जत घालताना दिसतात. तसेच केवळ हौस म्हणून फिरणार्‍यांना पोलीस अडवितात, तेव्हा असे लोक पोलिसांशी भांडण करतात. अत्यावश्यक सेवेतील लोकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी आहे. अशा रिकाम टेकड्या भटक्यांना रोखणे हे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्यामुळे एका बाजूला पोलिसांना आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरावे लागत आहे, त्याच वेळी लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

कोरोनायोद्धांचे कौतुक करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. पण आता मात्र पुन्हा तेच सुरू झाले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. रुग्णालयात बेड अपुरे पडत आहेत. कोरोनारुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. तेथेही बेड अपुरे पडत आहेत. व्हेंटीलेटरचीही संख्या कमी असून कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आता आलेली दुसरी लाट ही अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता तर मोठ्या संख्येने लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत आहे. जी धोकादायक आहे. काही राज्यांमध्ये कोरोनामुळे बालकांचाही मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. जी धोक्याची घंटा आहे. कोरोनाची ही वक्रदृष्टी अजून किती दिवस बालकांवर राहील हे सांगणे तज्ज्ञांनाही अशक्य झाले आहे.

त्यातच आपल्याकडे लसीकरणाबाबत हवी तशी जागरुकता झालेली नाही. कोविशिल्ड घ्यावी की कोव्हॅक्सिन यातच आपण अडकलोय. डॉक्टर वारंवार सांगत आहेत की दोन्ही लसींचे परिणाम सारखेच आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतीही लस घेऊ शकता. पण लस घेतल्यानंतर लोक मरत असल्याच्या बातम्याच आपल्याकडे रंगल्याने देशात लसीकरण किती टक्के यशस्वी होईल ही पण शंका आहे. पण जर लसीकरणामुळे कोरोना कसा नियंत्रणात येईल हे जनतेला सांगितले तर त्यामुळे लोकांच्या शंकेचे निरसन होऊ शकेल. कारण सध्या तरी लसीकरणाशिवाय पर्याय नाहीये. पण तो फक्त ज्येष्ठांसाठी व पंचेचाळीशी ओलांडलेल्यांसाठी नसावा तर सगळ्याच वयोगटातील नागरिकांसाठी असणे आवश्यक आहे. कारण आता तर तिशीच्या आतील तरुणांनाही कोरोना लागण होत असून या वयोगटातील कोरोनामृतांचा आकडाही वाढत आहे.

त्यासाठी सरसकट लसीकरण होणे गरजेचे आहे. सोसायट्यांमध्ये कॅम्प लावूनही लसीकरणाचा वेग वाढवता येणं शक्य आहे. सध्या देशातील काही भागात लसीकरणाचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे परदेशात लस पाठवण्याला थोडा ब्रेक देऊन आपल्याच माणसांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. तरच देशातून कोराना संपू शकतो. अन्यथा पहिली, दुसरी, नंतर तिसरी आणि चौथी कोरोनाची लाट हा खेळ सुरूच राहील. यात देशाचीच नाही तर तुमची व आमचीही प्रगती खुंटून जाईल यात शंकाच नाही. राज्य सरकारने केलेला लॉकडाऊन हा सर्वांच्या हिताचा आहे. यापुढे आपल्याला न्यू नॉर्मल ही जीवनशैली अवलंबावी लागणार आहे. कोरोनाचा सामना करत आपल्याला जीवन जगावे लागणार आहे, त्यासाठी सरकारकडून जे नियम करण्यात येत आहेत, त्याचे आपण पालन करणे आवश्यक आहे. मास्क इज मस्ट हे आपण लक्षात ठेवायला हवे. त्याचा आळस करून चालणार नाही. तरच आपण कोरोनाचा यशस्वीपणे सामना करू शकू आणि नव्याने भरारी घेऊ शकू.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -