घरफिचर्समायमहानगर ब्लॉगक्रिकेट पंढरीच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय!

क्रिकेट पंढरीच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय!

Subscribe

2000 साली मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अत्यंत विचारपूर्वक पाऊल ठेवणार्‍या शरद पवारांनी गेल्या 22 वर्षांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं (आयसीसी) अध्यक्षपदही भूषवलं. आयसीसीच्या अध्यक्षपदावर बसणारे शरद पवार हे पहिले मराठी भाषिक नेते आहेत. आपण काय स्वरूपाचं शिखर गाठलंय हे पवारांना उत्तमरित्या कळलेलं आहे आणि त्यामुळेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पीच त्यांना काही केल्या सोडायचं नाहीय. गेली बावीस वर्षं ते या ‘पंढरीचा विठ्ठल’ म्हणून प्रत्येकालाच आपल्या चरणाशी लीन व्हायला भाग पाडतायत, पण आता याच विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय. या खोटारड्या बडव्यांच्या पाठीवर जोपर्यंत ‘विठ्ठला’चा सोटा बसणार नाही तोपर्यंत क्रिकेटची चंद्रभागा प्रदूषितच राहणार आहे.

मुंबई ही भारतीय क्रिकेटची पंढरी आहे. या शहरात क्रिकेटचा खेळ सुरू झाल्याला 172 वर्षं झाली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाऊणशे वर्षांचा इतिहास आहे. एकापेक्षा एक 90 दर्जेदार क्रिकेटपटू देशाला देणार्‍या या शहराच्या क्रिकेटचा रुबाबदारपणा संपूर्ण देशभरात कुठेही पाहायला मिळणार नाही. गेल्या 30-32 वर्षांत या संघटनेने फक्त भरभराटच पाहिलीय. यातल्या 22 वर्षांतला उत्कर्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अधिपत्याखाली झालेला आहे.

2000 साली मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अत्यंत विचारपूर्वक पाऊल ठेवणार्‍या शरद पवारांनी गेल्या 22 वर्षांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं (आयसीसी) अध्यक्षपदी भूषवलं. आयसीसीच्या अध्यक्षपदावर बसणारे शरद पवार हे पहिले मराठी भाषिक नेते आहेत. आपण काय स्वरूपाचं शिखर गाठलंय हे पवारांना उत्तमरित्या कळलेलं आहे आणि त्यामुळेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पीच त्यांना काही केल्या सोडायचं नाहीय. यासाठी गेली बावीस वर्षं ते या ‘पंढरीचा विठ्ठल’ म्हणून प्रत्येकालाच आपल्या चरणाशी लीन व्हायला भाग पाडतायत.

- Advertisement -

शरद पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये येण्याआधी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी हे एमसीएचे अध्यक्ष होते. जोशी जाऊन पवार येणार यादरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनवर राजकारणी नको असा कल्ला काही क्रिकेटपटूंनी केला होता. पण शेवटी व्हायचं तेच झालं. शरद पवार एमसीएच्या साडेतीनशे मतांचा पक्का अभ्यास करून निवडून आले. आणि त्यांनी मुंबईच्या क्रिकेटला अशा पद्धतीने भारून टाकलं की ज्याचं नाव ते. मनोहर जोशी अध्यक्ष असताना त्यांनी किंवा त्यांचे सर्वेसर्वा असलेल्या स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी क्रिकेटच्या कारभारात किंवा खेळाडू निवडीच्या प्रक्रियेत कोणत्याही स्वरूपाची लुडबुड केली नाही किंवा आपल्या राजकीय मावळ्यांनाही ते करु दिलं नाही. पवारांनीदेखील तोच रिवाज कायम ठेवला. किंबहुना, पवारांनी त्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत क्रिकेट इंप्रुमेंट कमिटीची (सीआयसी) स्थापना केली. पवारांचे मित्र असलेल्या माधव आपटे यांना पहिले अध्यक्ष होण्याचा मान मिळालेल्या माजी खेळाडूंचा सहभाग असलेल्या या समितीमार्फत क्रिकेट विषयक सुधारणांचे निर्णय घेतला जाऊ लागले.

शरद पवारांनी आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत क्रिकेटच्या सोयीसुविधा वाढविण्यामध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडली. त्याचवेळी त्यांनी मुंबईच्या क्रिकेटचं मोठ्याप्रमाणात व्यावसायीकरण करण्याचा घाटही घातला. अर्थात मैदानी क्रिकेटमधल्या अनेकांना हे व्यावसायिकीकरण काळाच्या ओघात खुणावत होतं. त्यामुळे त्यांनाही सक्षम नेतृत्वाचा शोध घ्यायचा होता. पवारांच्या रूपाने ते मिळालं आणि मुंबईच्या क्रिकेटची आणि क्रिकेटपटूंची मानसिकताही बदलून गेली. 2015 साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्या.लोढा समिती बनवण्यात आली. न्या. लोढा समिती झाल्यानं क्रिकेट संघटनांमधली राजकारण्यांची उपस्थिती सकृतदर्शनी कमी झाली होती. पण त्याच वेळेला राजकारण्यांनी त्यांच्या बगलबच्यांच्या माध्यमातून या संघटनांवर आपली पकड पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवली आहे. याचं कारण पूर्वी हे राजकारणी निर्णय घ्यायचे त्या निर्णयासाठी ते जबाबदारही होते. त्याउलट आता मात्र राजकारण्यांना अभिप्रेत असलेलेच निर्णय घेतले जातात. त्याची जबाबदारी मात्र या राजकारण्यांवर येत नाही.

- Advertisement -

उलट त्यातून एखादी गोष्ट चुकली तर नामानिराळे राहण्यासाठी राजकारणी तयार असतात. एमसीएमध्ये आधी शिवसेनेचा प्रभाव. त्याचं कारण स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मतदानासाठी येणारे वेगवेगळे कार्यालयं आणि कंपन्यातून येणारे पदाधिकारी मतदार, त्यानंतर पवारांच्या आगमनानंतर स्वतः पवारांनीच 22 यार्डच नव्हे तर 72 यार्ड व्यापून टाकले. ( हे मी इतक्यासाठीच म्हणतोय की जितेंद्र आव्हाड, सचिन आहिर, प्रसाद लाड हे पवारांचे शागीर्द असले तरी पवारांनी त्यांना कुठे घुसखोरी करु दिली नाही) पवारांच्याच काळात काँग्रेसच्या काही नेत्यांनी एमसीएत चंचुप्रवेश केला. त्यात विलासराव देशमुख, नारायण राणे यांच्यासारखी मंडळी होती. विलासराव देशमुख अध्यक्ष झाले तरी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना असोसिएशनमध्ये घुसवण्याचा आणि हुल्लडबाजी आचरटपणा करु देण्याची मोकळीक दिली नव्हती.

जो परवा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून शहाआलम यांनी करून पाहिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अमोल काळे आणि आशिष शेलार यांचे खासमखास समजणारे संजय नाईक हे सध्या असोसिएशनमधल्या महत्वाच्या पदांवर आहेत. पद कोणतंही असलं तरी निर्णय प्रक्रिया मात्र पवारांचीच असते. मग संघटनेमधल्या लोकपालाचं पद असू द्या किंवा मुंबई प्रेमियर लीगच्या अध्यक्षपदी वर्णी कोणाची लावायची याचा फैसला असू द्या, पवार बोले एमसीए चाले, असाच माहोल आहे. पवारांनी संघटना श्रीमंत केली, पदाधिकारी आणि मतदारांच्या खिशात लक्ष्मी खेळवली, असोसिएशन सोयीसुविधांनी सज्ज केली, पण त्याच वेळी स्वाभिमानाच्या कसोटीवर मात्र अनेकांना गरीब करुन टाकलं. हा दोष एकट्या पवारांचा नाही. आपण स्वाभिमानाने गरीब व्हायचंच हे आधीच बहुतेकांनी ठरवून टाकलंय. आणि त्यामुळेच एमसीएचं कामकाज दिवसागणिक कठीण होऊन जाईल.

आयपीएलमुळे भारतातल्या क्रिकेटपटूंना वारेमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. सहाजिकच असोसिएशनमध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशांची आवक झाली हे पाहता संघटनात्मक राजकारण आणि एक दुसर्‍यावर शिंतोडे उडवण्याच्या प्रयत्नांनी क्रिकेटचा खेळ हा जेंटलमन मंडळींचा आहे हेच बरेचजण विसरून गेलेत. काही वर्षांपूर्वी एका मोठ्या दैनिकात एमसीएमध्ये 25 हून अधिक क्लब असणार्‍या एका पदाधिकार्‍याच्या माध्यमातून मुंबई क्रिकेटमध्ये मनगटशाही आणि टोळ्यांचा वरचष्मा वाढेल असं मी म्हटलं होतं. त्यामुळे खंडीभर क्लब गाठीशी असणार्‍या पदाधिकार्‍यांनी त्या दैनिकाचं कार्यालय गाठला होतं आणि आकांडतांडव केलं होतं. मी जे वीस वर्षांपूर्वी मांडलं ते पंधरा दिवसांपूर्वी असोसिएशनमध्ये वास्तवात उतरलं. लोकायुक्तांकडे सुनावणीसाठी हजर राहून बाहेर पडल्यावर दोन तरूण आणि सुशिक्षित पदाधिकार्‍यांनी एकमेकांचा बकोट पकडून परस्परांना कमालीची शिवीगाळ आणि धमक्या दिल्या होत्या.

यातील एकाच्या पाठी वडिलांची संघटनेतही पुण्याई आहे तर दुसर्‍याच्या पाठी राजकीय नेते गॉडफादर म्हणून उभे आहेत. नेहमीच गटातटाचे राजकारण होत आलेला आहे. गटातटाचे राजकारण चालते, पण म्हणून थेट एक दुसर्‍याला धमक्या देऊन उचलून नेण्यापर्यंतची भाषा कधीही केली गेली नव्हती. आता ही भाषा करणं आणि करून मिळवणं आज जणू काही शिष्टाचार झाल्यासारखे वारे असोसिएशनमध्ये वाहू लागलेले आहेत. हाच शिष्टाचार मिरवण्यासाठी पदाधिकारी धादांत खोटे बोलतात आणि या खोटं बोलण्याची परिसीमा इतकी वाढलेली आहे की आता कारकिर्दीच्या एव्हरेस्ट पार करून गेलेल्या पवारांनाही टेकडीवरच्या खुजा लोकांशी खर्‍याखोट्याच्या स्पष्टीकरणासाठी चर्चा करावे लागते.

बीएमसीमधल्या अनेकांनी सभ्यता शिष्टाचार सुशिक्षितपणा, सुसंस्कृतपणा जणूकाही खुंटीला टांगूनच ठरवून टाकलंय. याचा फटका इतर छोट्यामोठ्या मंडळींना तर बसतोच आहे, पण त्याहीपेक्षा तो नुकताच पवारांना बसला. एका गुजराती सदस्याने शरद पवार यांच्याबद्दल अ‍ॅपेक्स समितीमध्ये असलेल्या एका पदाधिकार्‍याबरोबर मोबाईलवरून संवाद साधताना अत्यंत असंस्कृत भाषेचा आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. हे संभाषण ऐकणार्‍या सदस्याने ते रेकॉर्ड केलं आणि संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांना याची ऑडिओ क्लिप पाठवली. त्यानंतर पवारांनी या सदस्यांना बोलावून काटेवाडीचा राग दिला. पवारांच्या संतापाला पारावार उरला नव्हता, त्यामुळे एमसीचा हा ज्येष्ठ गुजराती सदस्य दातखिळी बसून जागेवर पडणं बाकी राहिलं होतं.

क्रिकेटचा खेळ असू द्या किंवा त्यातलं राजकारण, फार काळ खोटं बोलू शकत नाही. कारण तुमच्या खर्‍याखोट्याचा फैसला हा एकदा तुमच्या स्कोरकार्डवर होत असतो किंवा तुमच्याकडे असलेल्या सदस्यांच्या पाठबळावर होतो. मात्र गेल्या काही वर्षांत इथल्या पदाधिकार्‍यांमध्ये कमालीचा खोटारडेपणा बोकाळला आहे. ही मंडळी तो कोणासमोरही प्रकट करायला बिलकुल मागेपुढे पाहत नाहीत. 19 मार्चला सर्वसाधारण सभा करण्याकरता हिशेब वितरित करण्यात आलेले होते. तरी काही मंडळींनी पवारांकडे जाऊन हिशेब तयार नसल्यामुळे जीएमपुढे करण्याची गळ घातली. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तर वेगळी होतीच, पण त्याच वेळी एजीएमपुढे ढकलणे हे काही पवारांना शक्य झालं नाही.

कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे करता येणार नाही, अशा स्वरूपाची सूचनावजा गोष्ट पवारांचे असोसिएशनमध्ये कान आणि डोळे असलेल्या आणि निवृत्तीनंतरही प्रत्यक्ष सेवेपेक्षा अधिक पट लाभ मिळवणार्‍या सीएस नाईकांनी पवारांच्या लक्षात आणून दिले. पण तरीही काही मंडळी खोटं बोला, पण रेटून बोला अशा पद्धतीत वावरत आहेत. सध्या अ‍ॅपेक्स समितीत असलेल्या एका महाशयांनी चंद्रशेखर नाईक यांच्याविरोधात तक्रार केली. संघटनेच्या सर्वात महत्वाच्या पदावर बसून नाईकांनी एमसीएच्या हितात बाधा आणल्याच्या या तक्रारीनंतर पवारांनी डोळे वटारले. आणि असोसिएशनच्या लोकपाल, चेन्नई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती विजया ताहिलरामाणी यांनी सीएस नाईकांच्या बाजूने निर्णय दिला.

सध्या एमसीएमध्ये खूपच अनागोंदी माजली आहे. याचं कारण इथल्या पदाधिकार्‍यांनी प्रशासकीय कामात केलेले गोंधळ, घोटाळे आणि गैरव्यवहार, खोटारडेपणा. या सगळ्यातून पापक्षालनासाठी हे लोक ‘मोठ्या साहेबांचं’ नाव छातीठोकपणे घेऊन मोकळे होतात. साहाजिकच संबंधितांवर दबाव आणला जातो किंवा येतो तरी एकूणच काय पंढरीच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे. खोटारड्या बडव्यांच्या पाठीवर जोपर्यंत ‘विठ्ठला’चा सोटा बसणार नाही तोपर्यंत क्रिकेटची चंद्रभागा प्रदूषितच राहणार आहे. म्हणूनच क्रिकेटच्या पंढरीतल्या विठ्ठलाने आपल्या कमरेवरचे हात सोडून क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या कल्याणासाठी सोटा हातात घेण्याची गरज आहे. तरच क्रिकेटच्या पंढरीतली दिंडी अविरत सुरू राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -