घरफिचर्समायमहानगर ब्लॉगएन डी पाटील : मुद्दे अनेक, नेतृत्व एक!

एन डी पाटील : मुद्दे अनेक, नेतृत्व एक!

Subscribe

राज्याच्या पुरोगामी चळवळीमध्ये एनडी पाटलांच्या निमित्ताने एक मोठे नेतृत्व महाराष्ट्राने गमावले. राज्यातील अनेक विषय, मुद्दे आणि विविध वर्गांसाठी एनडी पाटलांचे नेतृत्व एक प्रकारे आदर्श, असे होते. सत्ता कुणाचीही असो, अन्याय झालेल्या समाजाबद्दल जाब विचारणारा एक तळागाळाचा आवाज म्हणून एनडी पाटलांचे नेतृत्व हे हमखास मानले जायचे. सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला हा आवाज एनडी पाटलांच्या जाण्याने कायमचा शांत झाला आहे. असे असले तरी सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची तळमळ दीर्घकाळ प्रोत्साहन देत राहील.

महाराष्ट्रात वीज वितरण सेवा देणारी कंपनी म्हणजे महावितरण. राज्यातील वीज वितरण क्षेत्रातील कंपन्यांच्या कारभाराचे ऑडिट, राज्यातील वीजदर निश्चिती, शेतकर्‍यांचा विजेचा दर अशा अनेक नियामक विषयावर राज्य वीज नियामक आयोग (एमईआरसी) सुनावणी घेते. एमईआरसीच्या सुनावणीत ग्राहक प्रतिनिधींमध्ये विजेच्या विषयावर बोलायला उभे राहणारे असे हमखास ठरलेले एक नाव म्हणजे प्रा. एन. डी. पाटील. राज्यातील शेतकर्‍यांच्या मुद्यांवर अतिशय तळमळीने आणि पोटतिडकीने अभ्यासपूर्ण सादरीकरण हे त्यांच्या संभाषण कौशल्याचे विशेष होते. त्यामुळे एमईआरसीच्या सुनावणीत एन.डी. पाटील सरांचे सादरीकरण प्रभावी ठरायचे. अत्यंत मुद्देसूद आणि मोजक्या शब्दात अर्ध न्यायिक संस्था असलेल्या एमईआरसीसमोर बोलताना शेतकर्‍यांची बाजू मांडताना एखादी खिंड लढवावी असाच त्यांचा पवित्रा असायचा. राज्यातील शेतकर्‍यांचे विषय मांडण्यासाठी एमईआरसीच्या सुनावणीला ते न चुकता हजर रहायचे हे विशेष.

तत्कालीन राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी व्ही. पी. राजा हे निवृत्त सनदी अधिकारी होते. वीज कायद्याचा आणि विषयांचा त्यांचा अभ्यास आणि विषय तसेच भाषेवरील प्रभुत्वही तितकेच तगडेच. त्या तुलनेत एनडी पाटीलही आपले म्हणणे अस्खलीत इंग्रजीतच आयोगापुढे मांडायचे. शेतकर्‍यांचे प्रतिनिधीत्व करणारा नेता अशी ओळख असली तरीही शेतकर्‍यांची बाजू लढवताना कोणताही मुद्दा सुटणार नाही असा कटाक्ष असायचा. अनेकदा शेतकर्‍यांच्या वीजबिल दुरूस्तीचा वाद असो, वीज जोडणीचा मुद्दा असो वा नव्या वीज जोडणी देण्याचा विषय असो, अत्यंत तळमळीने ते आपले म्हणणे मांडायचे. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून अनेकदा शेतकर्‍यांच्या विषयावर पाठपुरावा करताना ते अत्यंत तळमळीने बोलायचे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षात महावितरणच्या वीज बिलांचा कारभार चव्हाट्यावर आला होता. महावितरणने विजेची बिले ही शेतकर्‍यांना फुगवून दिली होती. अनेक ठिकाणी वापरायला पाणी नसतानाही शेतकर्‍यांना दणकून वीज बिले आली होती. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, जनता दल (सेक्युलर) आणि एनडी पाटील यांनी शेतकर्‍यांना वाढीव आलेल्या वीज बिलाची पोलखोल राज्य वीज नियामकाच्या सुनावणीत केली होती. त्यानंतरच आयोगाला या वीज बिलातील चुकांची दखल घेऊन महावितरणला आदेश द्यावे लागले. त्यानंतरच महावितरणला वीज बिल दुरूस्तीसाठीची मोहीम राज्यभर राबवावी लागली. महावितरणच्या कारभाराचा पर्दाफाश करणारे हे प्रकरण ठरले. अगदी फडणवीस मुख्यमंत्री असतानाही वीज बिल दुरूस्तीच्या मुद्यावर तसेच वीज जोडण्या देण्याच्या मुद्यावर एनडी पाटील यांच्या नेतृत्वात मंत्रालयासमोर मोर्चा निघाला होता. या मोर्चाची दखल राज्य सरकारने घेतली होती. तसेच महावितरणला दुरूस्तीचे आदेशही दिले होते.

इ.स. 2004-05 मध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर आम्ही संयुक्तरीत्या राज्यात सुरू झालेल्या सिंगल फेजिंग योजनेला एनडी पाटलांच्या महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन तसेच जनता दल आणि महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेने विरोध केला. या सिंगल फेजिंगच्या प्रकरणात संयुक्त याचिका दाखल करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करत ही याचिका जिंकली. त्यामुळे ग्राहकांवरील 900 कोटी रुपयांचा बोजा टळला, अशी आठवण महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे सांगतात. शेती पंप व विशेषतः उपसा सिंचन योजनांचे वीजदर मर्यादित रहावेत यासाठी त्यांनी सातत्याने आंदोलने व चळवळी केल्या.

- Advertisement -

इ.स. 2006 मध्ये शेती पंप वीज ग्राहक व यंत्रमागधारक यांच्या पोकळ थकबाकी विरोधात एनडींच्या नेतृत्वाखाली मंत्रालय गार्डन गेटसमोर आम्ही 11 दिवस ठिय्या आंदोलन केले. 11 व्या दिवशी बुधवारी संपलेली मंत्रिमंडळ बैठक सरकारला पुन्हा सुरू करावी लागली. संपूर्ण पोकळ थकबाकी रद्द करावी लागली. एनडी यांनी उभारलेल्या चळवळीमुळेच शेतकर्‍यांच्या वीज बिलांमध्ये हजारो कोटी रुपयांची बचत झालेली आहे. या अनेक आठवणी आम्हाला सातत्याने प्रेरणा देत राहतील, असेही होगाडे सांगतात. पूर्ण अभ्यासासह त्यांचा प्रत्येक विषयावर दबदबा असायचा. वयाच्या नव्वदीतही शेतकर्‍यांच्या वीज प्रश्नी त्यांचे नेतृत्व नोंद घेण्यासारखे होते. अतिशय अभ्यासपूर्ण भाषण हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. आताच्या राजकारण्यांना एक आदर्श असे नेतृत्व म्हणता येईल.

गोरगरीब आणि वंचितांच्या वतीने बोलणारा आवाज हरपला. विद्यार्थी संघटनेत काम करत असल्यापासून कॉम्रेड पानसरे आणि एन. डी. पाटील हे आमचे आदर्श राहिले आहेत, अशी आठवण कॉम्रेड गोविंद पानसरे यांची मुलगी मेघा पानसरे यांनी सांगितली. विद्यार्थी चळवळीत एनडींच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो. तसेच अनेक आंदोलनात सहभागी झालो. कॉम्रेड पानसरे गेल्यानंतर त्यांच्या खुनाबाबत पाठपुरावा करण्याचे काम पाटील यांनी केले. या पाठपुराव्याच्या निमित्ताने अनेक पत्रे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली. राज्यात विवेकवाद्यांच्या ज्या हत्या झाल्या, त्याविरोधात बोलणारे नेतृत्व म्हणजे एन.डी. पाटील होते. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर प्रत्येक महिन्याला निर्भय मॉर्निंग वॉक आयोजित करण्यात येई. या मॉर्निंग वॉकला ते सगळ्यांच्या आधी हजर व्हायचे.

एका कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी एनडी सरांबद्दलची कृतज्ञता मांडताना म्हटले होते की, आज आम्ही उभे आहोत त्यामागे एन. डी. पाटील सरांच्या विचारांचा आधार आहे. सत्यशोधकी वारसा चालवणारी फारच मोजकी माणसे महाराष्ट्रात असतील. अनेक वेळा प्राध्यापकांच्या सभेत ते म्हणायचे की, ‘तुम्ही विज्ञानाचे प्राध्यापक असाल आणि घरात सत्यनारायण घालत असाल, तर मी कुलगुरू झाल्यास तुमच्या विज्ञानाच्या पदव्या काढून घेण्याची शिफारस करीन.’ या पद्धतीची त्यांची वैचारिक भूमिका आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्यांनी असणं, ही स्वाभाविक गोष्ट आहे. शनिशिंगणापूरच्या आंदोलनाच्या वेळी ते आमच्याबरोबर नगरला उपोषणासाठी तीन दिवस बसले होते. त्यांच्या यापेक्षाही दोन महत्वाच्या गोष्टी मला जाणवतात.

एक म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातल्या सक्यशोधकी चळवळीची अतिशय चांगली मांडणी ते करतात. रूढार्थाने विठ्ठल रामजी शिंदे हे सत्यशोधक नाहीत, पण त्यांचे विचार किती संपन्न होते, यांचं चांगलं भान त्यांच्यामुळे कार्यकर्त्यांना येतं. दुसर्‍या बाजूने जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण यांच्या विरोधात ते लढत असल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळींची नाळ ही व्यापक परिवर्तन चळवळीशी कशी जोडली गेली पाहिजे, हेही समजतं. यादृष्टीने फ्रेंड, गाईड अ‍ॅण्ड फिलॉसॉफर या भूमिकेमध्ये एनडी सर सतत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लाभले आहेत, अशी कृतज्ञता डॉ. नरेंद्र दाभोळर यांनी व्यक्त केली होती. महाराष्ट्राची सत्यशोधकी परंपरा पुढे नेणारे चार मोहरे, त्यामधला शेवटचा दुवा आज निखळला अशी प्रतिक्रिया हमीद दाभोळकरांनी व्यक्त केली.

सीमा प्रश्नाच्या मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेली एनडी पाटील आणि बाळासाहेबांची आठवणदेखील सगळा लढा डोळ्यासमोर उभा करणारी अशी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात की, लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एनडी आघाडीवर होते. सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी ब्र काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने एनडी उभे राहिलेच म्हणून समजा. अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता. एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकर्‍यांच्या लढ्यात उतरत. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनीही एनडी पाटील यांची आठवण सांगितली आहे.

एकूणच राज्यातील शेतकर्‍यांचा विजेचा मुद्दा असो, अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय असो, सीमा प्रश्नावरील आंदोलन असो वा विधिमंडळ सभागृहातील अभ्यासपूर्ण सादरीकरण असो, एनडी पाटील यांनी आपल्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा परिचय दिला. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला वेळोवेळी प्रेरणा देणारे असे आहे. सोशल मिडियाच्या जगामध्ये रस्त्यावर उतरून रस्त्यावरच्या लढाईतून प्रशासनाला जेरीस आणणारे असे नेतृत्व एनडी पाटलांच्या निमित्ताने महाराष्ट्राने अनुभवले.आताचे मुद्दे आणि विषय जरी बदलले असले तरीही नव्या पिढीसमोर संघर्षाचा त्यांचा आदर्श राहणार आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -