घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभाजपचे नारायणास्त्र नेमके कोणासाठी?

भाजपचे नारायणास्त्र नेमके कोणासाठी?

Subscribe

२०१४ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष निष्क्रिय व नामशेष झाले म्हणून भाजपला मुसंडी मारणे शक्य झालेले आहे. आता भाजपला राजकारणातले आव्हान म्हणून शिवसेनाच शिल्लक आहे. तिला हैराण करण्यासाठी राणे बहुमोलाची कामगिरी भाजपसाठी बजावू शकतात. आतापर्यंत सत्तेबाहेरचे म्हणून राणेंनी सेनेवर हल्ला चढवला आहे, पण भाजपत सहभागी होऊन जेव्हा ते शिवसेनेवर हल्ले करू लागतील, तेव्हा वेगळाच अनुभव येणार आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेला कुठलीही तक्रार करता येणार नाही.

नारायण राणे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात आपला पक्ष विलीन केला. गेल्या काही महिन्यांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या रंगात आल्या होत्या. राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन करणार, असे राणे गेल्या महिनाभरापासून सांगत होते. त्यासाठी अनेकदा राणे यांनी डेडलाईनही दिली होती, पण भाजपकडून राणेंचा पक्षप्रवेश आणि स्वाभिमान पक्ष विलीनीकरणाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत होत्या. मात्र, राणे भाजप प्रवेशाबाबत ठाम होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या भाजप प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला होता. तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडूनही होकार होता, पण तरीही राणेंना रखडवले जात होते. त्याला कारण काय होते? त्याचे मुख्य कारण अर्थातच शिवसेना हे होते. शिवसेना विशेषत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नारायण राणे यांचा छत्तीसचा आकडा आहे. भाजपसोबत युती करणार्‍या शिवसेनेला नारायण राणे हे आपल्या मित्र पक्षातही नको आहेत. अर्थात आपल्या मित्र पक्षांनी काय करावे आणि काय नको याचा अधिकार केवळ मित्र असला तरी शिवसेनेला नाही, पण तरीही जितका दबाव टाकता येईल, तितका सेनेकडून भाजपवर दबाव होता आणि तो साहजिक होता. दुसर्‍या बाजूला भाजपच्या काही नेत्यांचाही राणेंच्या भाजप प्रवेशाला विरोध होता. राणे पक्षात आले तर आपले महत्त्व कमी होईल आणि काही दिवसांनी ते डोईजड होतील, अशी रास्त भीती त्यांना वाटत होती. कारण आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर राणे हे त्याच पद्धतीने वागले आहेत. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाला त्यांचा विरोध होता. असे जरी असले तरी राणे यांचा भाजपत प्रवेश हा भाजपला सुखावणारा नक्कीच असणार आहे.

पहिली गोष्ट म्हणजे मागल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात मोठी बाजी मारलेली असली, तरी कोकणात मात्र भाजपची मोठी पिछेहाट झालेली होती. तेव्हा शिवसेनेने आपले प्राबल्य कोकणात दाखवून दिले. अलीकडेच झालेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत रत्नागिरीत शिवसेनेने एकहाती सत्ता संपादन केली आहे आणि सिंधूदुर्गात राणे यांनी आपला वरचष्मा राखून दाखवला आहे. तेव्हा राणे काँग्रेसमध्येच असल्याने तिथली जिल्हा परिषद काँग्रेसने जिंकली होती, पण जिंकलेल्या उमेदवारांची नोंदणी राणे यांनी मोठ्या चतुराईने काँग्रेसच्या नावाने केलेली नसल्याने, उद्या या सदस्यांनी पक्ष सोडला तरी त्यांच्यावर पक्षांतर विरोधी कायद्यानुसार कारवाई होऊ शकत नाही, पण तिथले काँग्रेसचे नामोनिशाण पुसले जाऊ शकते. राणे यांनी वेगळा पक्ष स्थापन करून सत्तेत सहभाग घेतला, मग भाजपलाही सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेत सोबत घ्यावे लागणार आहे. पर्यायाने तिथे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला आव्हान देणारा पर्याय भाजपच्या हाती येणार आहे. विधानसभेच्या निकालानंतर राज्यात काँग्रेस व      हे दोन्ही पक्ष निष्क्रिय व नामशेष झाले म्हणून भाजपला मुसंडी मारणे शक्य झालेले आहे. तुलनेने राज्यातील राजकारणातले आव्हान म्हणून शिवसेनाच शिल्लक आहे. तिला हैराण करण्यासाठी राणे बहुमोलाची कामगिरी भाजपसाठी बजावू शकतात. आतापर्यंत सत्तेबाहेरचे म्हणून राणेंनी सेनेवर हल्ला चढवला आहे, पण भाजपत सहभागी होऊन जेव्हा ते शिवसेनेवर हल्ले करू लागतील,तेव्हा वेगळाच अनुभव येणार आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेला कुठलीही तक्रार करता येणार नाही. तीन वर्षे सत्तेत राहून शिवसेना भाजपला लक्ष्य करीत असेल, तर त्यात भाजप सहभागी होऊन नारायण राणेही त्याचीच पुनरावृत्ती शिवसेनेबाबतीत करू शकतात. त्याबद्दल भाजपला दोष देता येणार नाही. किंबहुना तोच मोठा राजकीय डाव आहे.

- Advertisement -

राणे हेच काँग्रेसमधील एकमेव आक्रमक नेता शिल्लक होते. त्यांनी पक्ष सोडल्याने आता त्यात दम राहिलेला नाही. त्यामुळे एका बाजूला भाजपचा राज्यातील महत्त्वाचा प्रतिस्पर्धी परस्पर निकालात निघाला आहे. शिवाय आघाडीत येऊन व सत्ता उपभोगून सतावणार्‍या शिवसेनेला तिचेच पाणी पाजण्याची सोय, राणे यांच्या आगमनामुळे होणार आहे. मात्र, अशी काही व्यवस्था असू शकते, असा कोणी राजकीय अंदाज वर्तवला नव्हता. दहा वर्षांपूर्वी राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हाचा त्यांचा उत्साह किंवा आवेश आज शिल्लक राहिलेला नाही, पण अखेरच्या क्षणापर्यंत झुंज देण्याची त्यांची शिवसैनिक प्रवृत्ती मात्र कायम आहे. त्यामुळेच त्यांना सत्तापद बहाल करून शिवसेना विरुद्ध शिवसेना, असा काहीसा विनोदी खेळ भाजपचे चाणक्य खेळू बघत आहेत. यात शिवसेनेच्या दुखण्यावर बोट ठेवण्याचा खरा डाव आहे. नारायण राणे हे सेनेचे जुने दुखणे आहे. अनेक शिवसेना नेते व कार्यकर्ते पक्ष सोडून गेले तरी आज त्यापैकी अनेकांना शिवसैनिक विसरून गेले आहेत. मात्र, नारायण राणे हा त्याला एकमेव अपवाद आहे. राणे यांनीही जुनेपाने विसरून सेनेकडे पाठ फिरवलेली नाही. संधी मिळाली तेव्हा घेऊन किंवा संधी शोधून, शिवसेना नेतृत्वाला बोचकारे काढण्याचे व्रत त्यांनी कायम राखलेले आहे. साहजिकच राणे आता भाजपत दाखल झाले असल्यामुळे शेलार वा सोमय्या यांनी आजवर कशीबशी सांभाळलेली आघाडी राणेंकडे सोपवली जाणार, असाच त्यातला खरा डाव आहे. त्यामुळे सेनेला घरचा अहेर अशीच खेळी भाजप खेळतो आहे, पण तितकेच नाही तर राणे भाजपत दाखल झाल्यामुळे पाताळयंत्री राजकारणाला आरंभ होऊ शकेल. मागल्या तीन वर्षांत शिवसेनेत नाराजी वा आमदार फुटू शकतात, अशा अनेक वावड्या उठत राहिल्या व आजसुद्धा उठत असतात. त्यात लुडबुड करण्याची खरी कामगिरी राणेंना सोपवण्याची खेळी यात असू शकते.

यातली एक बाब अजून कोणी लक्षात घेतलेली नाही. राणे भाजपत दाखल झाल्यामुळे सेनेच्या नेत्यांशी त्यांचा आता उघड संबंध येणार आहे. शिवसेना ते सहन करणार आहे काय? तिथे एकत्र बसणार्‍या मंत्र्यांशी राणे यांचाही संपर्क होणार आहे. मागल्या तीन वर्षांत सत्तेत सहभागी होऊन जे धोरण शिवसेनेने सत्तेवर आसूड ओढण्यासाठी चालविले होते, त्याची चव शिवसेनेलाच चाखायला लावणे हा यातला खरा डाव आहे. सहकारी व कार्यकर्त्यांना चुचकारून जवळ घेणे वा फोडणे यात राणे कायम वाकबगार राहिले आहेत. अन्यथा बाळासाहेबांच्या हयातीत इतके आमदार वा शिवसैनिक आपले अनुयायी करणे, अन्य कोणाला कधी साधलेले नव्हते. साहजिकच आता राणे भाजपत दाखल झाल्यामुळे त्यांचा नेम सतत नाराज दुखावलेल्या शिवसैनिकांकडे असणार आहे. काँग्रेस सोडताना त्यांनी शिवसेनेत काही आमदार पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत असल्याचे सांगितले. त्यात फारसे तथ्य नसेल, पण तशी शक्यता असेल तर त्यांना आपणच जवळ करून सेनेला शह देऊ; अशी त्यातली खरी गर्भित धमकी आहे. त्याचा उहापोह त्यांनी केलेला नाही किंवा माध्यमातही त्याविषयी फारशी चर्चा झालेली नाही. सतत धमक्या देऊनही सेना नेतृत्वाला सत्तेतून बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्याचा अर्थ पक्षात सर्वकाही आलबेल आहे, असे म्हणता येत नाही. आतापर्यंत त्याचा नेमका फायदा भाजपा घेऊ शकला नसेल, पण राणे यांचा त्यासाठीच वापर करून घेण्याची खेळी या नव्या व्यवस्थेमध्ये नसेल, असे कोणी म्हणू शकत नाही. किंबहुना त्यासाठीच राणे यांना भाजपत घेण्यात आले आहे. भाजप-सेना युती सत्तेत येणार असा राजकीय अंदाज आहे. त्यातही भाजप हा मोठा भाऊ असणार, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे सत्तेची सूत्रे खर्‍या अर्थाने भाजपकडे असणार आहेत. अशा परिस्थितीत मागील वेळेप्रमाणे सेनेकडून भाजपला कोंडीत पकडण्याच्या चाली रचल्या जातील. त्यावर भाजपकडे एकच अमोघ अस्त्र असेल ते म्हणजे नारायणास्त्र…

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -