घरफिचर्समायमहानगर ब्लॉग‘ब्रॅण्ड’ आर्यन अन् समुपदेशन व्हाया एनसीबी

‘ब्रॅण्ड’ आर्यन अन् समुपदेशन व्हाया एनसीबी

Subscribe

स्टार आर्यनला कॉर्डिला क्रूझ प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यापासून या ड्रग्स प्रकरणाला एक मोठे ग्लॅमर मिळालेले आहे. अर्थात बॉलिवुडच्या किंग खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण सर्वाधिक प्रसिद्धीच्या झोतात आहे. आर्यनच्या जामिनाच्या निमित्ताने गेले अनेक दिवस हे प्रकरण चर्चेचा विषय ठरते आहे. पण एकूणच प्रकरण जामिनापुरते मर्यादित नाही. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सुरू असलेले आर्यनचे समपुदेशन ही आणखी एक बाजू या संपूर्ण प्रकरणात समोर आली आहे. एक चांगला नागरिक होण्याचे त्याने एनसीबीसमोर मान्य केले आहे. गल्लीबोळातून ते आंतरराष्ट्रीय धारेदोरे असणार्‍या ड्रग्सच्या व्यसनाला रोखण्यासाठी समाजासोबत राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीही तितकीच महत्वाची आहे. व्यसनाच्या विळख्यातून आजची तरुणाई वाचवली तर उद्याचा समाज चांगला आणि जबाबदार होईल.

आर्यन खानचे समुपदेशन करण्यासाठी नशाबंदी मंडळाच्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. या समुपदेशनानंतर मी चांगला माणूस होईन, असे आश्वासन आर्यनने दिले आहे. समाजात एक चांगले स्थान मिळवेन आणि समाजापुढे आदर्श निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही आर्यनने संस्थेपुढे कबूल केले आहे. खरे तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काम करताना अनेकदा तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठीचे आमचे व्हिजन असल्याचे स्पष्ट केले आहे. पण आता या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. एनसीबीला काही सामाजिक संघटनांनीही वेळोवेळी मदत केली आहे. पण या संपूर्ण प्रकरणात राजकीय अँगल आल्याने या तरुणाईला व्यसनमुक्त करण्याच्या मुद्यावर अजूनही कोणीच बोलत नाही. त्यामुळेच संपूर्ण प्रकरणात एनसीबीच्या तपासावर विविध प्रकारे संशय घेण्यात आला आहे.

एखादे स्टारकिड टार्गेट करणे एवढेच एनसीबीसारख्या तपास यंत्रणांचे लक्ष्य नाही. एव्हाना आपण एनसीबी आर्यनच्या जामिनाच्या युक्तीवादाच्या निमित्ताने काय बोलतो हेदेखील लक्षात घ्यायला हवे. एनसीबीने आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये काही गोष्टी प्रकर्षाने मांडलेल्या आहेत. ते म्हणजे आर्यनचे सेलिब्रिटी किड म्हणून समाजातील स्थान. समाजातील प्रभावशाली व्यक्तीचा मुलगा म्हणून आर्यनचे प्रकरण का महत्वाचे आहे, याबाबतचा युक्तीवाद एनसीबीच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळेच समाजात अशा स्टार किड्सच्या मुलांच्या बाबतीत समाजात चुकीचा संदेश जाऊ नये यासाठीचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी बाजू एनसीबीच्या वतीने मांडण्यात आली. या प्रकरणात कठोर शासन व्हावे हीदेखील एनसीबीची एक बाजू होती. त्यासाठी ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आर्यनला शिक्षेची मागणी केली होती.

- Advertisement -

अर्थात, या प्रकरणात एनसीबीच्या युक्तीवादानंतरही आर्यनला जामीन मिळेल. पण समाजात चुकीचा संदेश जायला नको हा एनसीबीचा खटाटोपही समजून घ्यायला हवा. अशा प्रकरणात एका बड्या स्टार किडला शिक्षा झाली तर समाजात या प्रकरणाचा प्रभाव नक्कीच वेगळा पडू शकतो ही गोष्ट एनसीबीला बरोबर माहितेय. त्यामुळेच एनसीबीने हे प्रकरण लावून धरले आहे. रिया चक्रवर्तीनंतर आर्यन खान हे इंडस्ट्रीतील ड्रग्सचा पर्दाफाश करणारे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रकरण आहे. याआधीही एनसीबीने श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण यासारख्या नावाजलेल्या चेहर्‍यांना चौकशीला बोलावले होते. पण आर्यनच्या प्रकरणात मात्र एनसीबीने कसून चौकशी करत संपूर्ण प्रकरणात बाजू लावून धरली आहे. पण समाजातील सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींना याचा दणका बसावा म्हणजे सर्वसामान्यांमध्ये अशा नशा करण्यासाठीच्या शिक्षेची दहशत असेल असाच मानस एनसीबीनेही व्यक्त केला होता.

व्यसनासाठी सहज उपलब्ध असलेले अमली पदार्थ हे एखाद्या ठिकाणी चुन्याची किंवा तंबाखूची पुडी मिळावी तसे उपलब्ध आहे. अनेकदा या ड्रग्समुळे आहारी जाणारी तरुणाईही आपण समाज म्हणून सभोवताली पाहतो, पण ते रोखण्यासाठी आपण काहीच प्रयत्न करत नाही. अन्यथा शहरांपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर हे नेटवर्क कधीच कनेक्ट झाले नसते. अनेकदा डोळ्यासमोर या गोष्टी घडूनही आपण या गोष्टी रोखण्यासाठी प्रयत्न करत नाही हे आपलेच अपयश आहे. गल्लीबोळातील टपर्‍यांपासून ते शाळा महाविद्यालयात सर्रासपणे विकले जाणारे आणि सहज उपलब्ध होणारे ड्रग्जचे नेक्सस आपण समाज म्हणूनही उलथवून लावण्याची आपली तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळेच ज्या पद्धतीने तरुणाई या सगळ्या व्यसनांच्या आहारी गेली आहे, ती वेळीच रोखण्याची तितकीच जबाबदारी समाजाची आहे, त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही.

- Advertisement -

मुुंबईसह राज्य पातळीवर काम करणार्‍या संस्थांमध्ये महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचा उल्लेख टाळून जमणार नाही. समाजात नशाबंदीसाठी या मंडळाने वेगवेगळे प्रयोग राबविले आहेत. त्यामध्ये व्हॅलेंटाईनच्या दिवशी ‘जोडीदार मज निर्व्यसनी हवा’, या घोड्यावर स्वार तरुणीचा संदेश खूपच गाजला. तरुणाईला व्यसनमुक्तीची शपथही या मंडळाकडून दिली जाते. विशेष म्हणजे आयुष्यातील जोडीदार हा निर्व्यसनी असावा हेच रुजवण्याचे काम नशाबंदी मंडळाकडून केले जाते. आर्यन खानच्या प्रकरणातही नशाबंदी मंडळ सक्रीयपणे काम करत आहे. तरुणाईने समाजात चांगले स्थान मिळवावे आणि समाजात आदर्श निर्माण करावा हेच उद्दिष्ट मंडळाने ठेवले आहे. आर्यन खानच्या प्रकरणात त्याचे समुपदेशन केल्यानंतर आर्यननेही चांगली व्यक्ती बनण्याचे मान्य केले आहे. समाजात चांगली व्यक्ती म्हणून स्थान निर्माण करून एनसीबी समोरही आदर्श निर्माण करेन, असे आश्वासन आर्यनने नशाबंदी मंडळाला दिले आहे.

एनसीबीनेही आर्यनचे काऊंसिलिंग केली आहे. स्पिरीच्युअल आणि पुनर्वसन या दोन्ही पद्धतीने एनसीबीने या आठही आरोपींच्या बाबतीत काऊंसिलिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये धार्मिक गुरूंच्या मदतीने या आरोपींचे समुपदेशन केले आहे. या संपूर्ण प्रकरणात आरोपींचे समुपदेशन करण्यासाठी इस्कॉन मंदिरातील धर्मगुरूंचीही मदत घेण्यात आली आहे. तर इतर धर्मगुरूंचीही मदत घेण्यात आली आहे. जेणेकरून या विळख्यातून या आरोपींनी बाहेर पडावे आणि आपल्या आयुष्यात सुधारणा करावी, असा उद्देश आहे. त्यामुळेच एनसीबीनेही कोर्टाच्या पलीकडे जाऊन असाही प्रयत्न केला आहे. अनेकदा धार्मिक पुस्तके देऊनही तरूणाईचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंनी स्पष्ट केले आहे. तसेच तरूणाईला देश सेवेसाठी वळण्यासाठी मदतीला घेतले जाते. त्यांना देशासाठी काय सेवा देता येईल हे सांगितले जाते. ही तरुणाई मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याकडून श्रमदानही करून घेण्यात येते. अनेकदा अनाथ किंवा गरीब मुलांसाठी काम करण्यासाठीही या मुलांचे मन वळवण्याचे काम एनसीबीकडून करण्यात येते.

या समुपदेशनाचा फायदाही अनेकांनी बोलून दाखवल्याचेही एनसीबीचे अधिकारी सांगतात. अनेकदा तरुण आपण व्यसनाधीनतेकडे वाहत गेल्याचे कबूल करतात. अनेकांचा ड्रग्सच्या आणि नशेच्या विळख्यातूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न असतो. त्यापैकी अनेक तरुण हे चुकीच्या मार्गाला गेल्याचेही कबूल करतात. त्यामुळेच समुपदेशन हे वेळीच मिळणे गरजेचे असल्याचेही कॉर्डिलिया ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपींनीही कबूल केले आहे. एकूणच एनसीबीने राबवलेल्या मोहिमेत चांगला प्रतिसाद देतानाच ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी ही तरुणाई प्रयत्न करत असल्याचेही एनसीबीचे अधिकारी सांगतात. काऊंसिलिंगचा परिणाम म्हणजे योग्य वेळी तरुणाईला चुकीच्या मार्गावरून मुख्य प्रवाहात आणणे हा असतो. त्यामुळेच क्रूझ प्रकरणातील लांबलेली कोठडी आणि जामिनाचा रखडलेला प्रश्न हा एकूण प्रकरणातच या तरुणाईच्या चांगली व्यक्ती बनण्यासाठीच्या प्रयत्नासाठीचे एक पाऊल आहे. त्याला राजकीय आरोप आणि प्रत्यारोपांची जोड देण्यापेक्षा या व्यक्तींचा प्रभाव उर्वरित समाजावर कशा पद्धतीने चांगला पडू शकतो यासाठीचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.

एरव्ही जाती धर्माचे आणि जेंडर सेल हे ज्या पद्धतीने राजकीय पक्षात पहायला मिळतात. त्यानुसारच नशा मुक्तीसाठीचा एखादा सेल हा राजकीय पक्षात असयला हरकत नाही हे यानिमित्ताने सांगावेसे वाटते. समुपदेशनाचा सर्वात उत्तम गुण कोणता असेल तर तो राजकीय पक्षात. मोठ्या प्रमाणात समाजात वावर असणारी ही राजकीय मंडळी आपल्या सभोवताली दिसणार्‍या तरुणाईसाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असा एखादा छोटा सेल नक्कीच तयार करू शकतात. राजकीय मते मिळतील तेव्हा मिळतीलच, पण समाजात चांगले आणि जबाबदार नागरिक घडवणे हे सगळ्यांच्याच हिताचे आहे. पुढची पिढी चांगली होंण्यासाठी राजकीय पक्षांनीही पुढाकार घ्यायला हवा. कारण तेच त्यांचे उद्याचे मतदार आहेत.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -