घरफिचर्समायमहानगर ब्लॉगवानखेडेजी, संशयाचं भूत उतरलंच पाहिजे...!

वानखेडेजी, संशयाचं भूत उतरलंच पाहिजे…!

Subscribe

एनसीबीचे संचालक म्हणून समीर वानखेडे यांनी उघड केलेल्या प्रकरणांचा मोठा बोलबाला झाला. यामुळे सिंघम नामक चित्रपटात शोभणारी उपाधी त्यांना मिळाली. चित्रपटातील असल्या तरी अशा उपाध्या घेणार्‍या अधिकार्‍यांकडे त्याच नजरेने पाहिलं जातं. आता ही छबी टिकून ठेवण्याची जबाबदारी त्या अधिकार्‍यानेच घ्यायची असते. कोणी तिला काळवंडण्याचा प्रयत्न करणार असेल तर जशास तसं उत्तर देण्याची तयारीही त्याच अधिकार्‍याने घेतली पाहिजे. दुर्दैवाने समीर वानखेडे यांनी ते केलं नसल्याने संशयाचं भूत त्यांच्या मागे लागले आहे.

कोणाही विषयी कुठलीही चर्चा होणं, हे चांगलं लक्षण आहे. पण ती चर्चा नकारात्मक असेल तर ती लक्षणं चांगली नाहीत. गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक कंट्रोल ब्यूरोचे प्रमुख समीर वानखेडे यांच्याविषयी निर्माण झालेलं संशयाचं भूत उतरवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. इतक्या तरुण वयात उच्च पदावर जाऊन पोहोचलेल्या उमद्या वयाच्या या अधिकार्‍यावर आक्षेपी आणि संशयास्पद टिप्पणी येत असताना त्यांनी स्वत: आणि त्याच्या खात्याने मूग गिळून बसणं हे व्यवस्थेला परवडणारं नाही. वानखेडे हे सचोटीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. एनसीबीतील सिंघम म्हणूनही त्यांचा बोलबाला आहे. पण मधल्या काळात त्यांच्याविषयीच्या चर्चांनी वानखेडे यांची प्रतिमा काळवंडू लागलीय, हे मान्यच करावं लागेल.

एखाद्या अधिकार्‍याच्या कर्तबगारीवर त्याला पुरस्कृत केलं जातं. समीर वानखेडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. यामुळे त्यांचा मानमरातब खूप वाढला. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बर्‍याचअंशी पक्का झाला. एनसीबीचे संचालक म्हणून त्यांनी उघड केलेल्या प्रकरणांचा बोलबालाही तितकाच झाला. यामुळे सिंघम नामक चित्रपटात शोभणारी उपाधी त्यांना मिळाली. चित्रपटातील असल्या तरी अशा उपाध्या घेणार्‍या अधिकार्‍यांकडे त्याच नजरेने पाहिलं जातं. आता ही छबी टिकून ठेवण्याची जबाबदारी त्या अधिकार्‍यानेच घ्यायची असते. कोणी तिला काळवंडण्याचा प्रयत्न करणार असेल तर जशास तसं उत्तर देण्याची तयारीही त्याच अधिकार्‍याने घेतली पाहिजे. दुर्दैवाने समीर वानखेडे यांनी ते केलं नसल्याने संशयाचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसलं आहे.

- Advertisement -

पोलीस दलातील सरळ अधिकारी म्हणून ज्यांचा सर्वदूर लौकिक आहे. कोणालाही न बधणारे म्हणून वानखेडे मुंबईत सुशांत सिंग प्रकरणानंतर विशेष चर्चेत आले. सुशांत सिंग प्रकरणात महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न भाजपच्या स्थानिक नेत्यांनी करून पाहिला. पोलिसांकडील चौकशी सीबीआयकडे देण्यासाठी न्यायालयाला कामाला लावलं गेलं. देशात लोकशाहीच्या नावाखाली विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा सत्ताधारी भाजपने २०१४ पासून चंगच बांधला आहे. सत्ताधार्‍यांच्या या कृतीला दुर्दैवाने देशातील न्याय व्यवस्थेने, सीबीआय, ईडी आणि आयकर विभागातील अधिकार्‍यांनी पूरक भूमिका घेत विरोधकांना ठेचण्याचा पध्दतशीर प्रयत्न केला. वानखेडेंकडील नार्कोटिक कंट्रोल ब्यूरो यापासून चार हात दूर होती. मात्र सुशांत सिंग प्रकरणाच्या तपासात या विभागानेही हातचं राखून तपासाची दिशा राखली.

यातून केंद्राच्या आखत्यारातील इतर संस्थांप्रमाणेच वानखेडेंच्या नेतृत्वातील अधिकारी राज्यातील सत्तेच्या विरोधात खतपाणी घालण्याचं काम करत आहेत, असं दिसू लागलं. या प्रकरणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जाऊ लागलं आणि त्यांच्या चौकशीचा फार्स करण्यात आला तेव्हा नार्कोटिक विभागही दिल्लीच्या ‘नादी’ लागल्याचं चित्र स्पष्ट झालं. खरं तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची घाई करत न्याय व्यवस्थेनेही आपला ‘बाणा’ दाखवून दिला. या प्रकरणात वानखेडेंच्या हाती हाती काहीच लागलं नाही. रिया चक्रवर्तीला ताब्यात घेत त्यांनी तिच्या आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरांवर छापे टाकले आणि प्रकरणाचं गाभीर्य भलतच वाढवलं. हे सारं होत असताना भाजपचे नेते सातत्याने आदित्य ठाकरेंवर कारवाईची आणि त्यांच्या अटकेची मागणी करत होते. केंद्रातल्या सरकारकडून हे पध्दतशीर घडवून आणलं जात असल्याचं एव्हाना शेंबडं पोरही बोलून दाखवत असताना उच्चशिक्षा विभूषित वानखेडेंना हे कळू नये, याचं अजब वाटणारच.

- Advertisement -

नव्याने कॉर्डेलिया या क्रूझवर कारवाई करताना सचोटीच्या समीर वानखेडे यांच्या टीमवर संशयाचं मळभ जमलं आहे. वानखेडे यांचे खबरे पक्के असतात असा बोलबाला करणार्‍यांना या खबर्‍यांमध्ये एखाद्या पक्षाचा नेता असतो, हे कोणालाच माहिती नव्हतं. खबरे नावाची संज्ञा ही कधी आरोपीला पकडण्याच्या भानगडीत पडत नसते. खबर्‍यांना टिकवण्यासाठी प्रयत्नाच्या काय खस्ता खाव्या लागतात, हे वानखेडेंना माहिती नाही? खबरे टिकून राहावेत, त्यांची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचू नये, यासाठी पोलीस किती गुप्तता राखतात, हे वानखेडेंना चांगलं ठावूक असावं. असं असताना कॉर्डेलियावर ड्रग्ज येणार आहेत, अशी खात्रीशीर खबर देणारा भाजपचा पदाधिकारी शाहरुखच्या आर्यनची गचांडी कसा पकडू शकतो, त्याच्या बरोबर सेल्फी काढू शकतो? फुटेजमध्ये दिसणारी मनीष भानुशाली ही व्यक्ती एनसीबीची नाही, असं सांगणार्‍या वानखेडेंनी संबंधितांविरोधी काय कारवाई केली, हे अजून बाहेर आलेलं नाही.

नोकरीच्या निमित्ताने बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा फरार के.सी. गोसावी नावाचा इसम वानखेडेंच्या नेतृत्वातील नार्कोटिक ब्यूरोच्या कार्यालयात कसा हुंगू शकतो? एनसीबीचा अधिकारी म्हणून कॉर्डेलियात आर्यनबरोबर सेल्फी काढत असतानाही कारवाईसाठी वानखेडे कोणाच्या आदेशाची वाट पाहात आहेत? असले बदमाश एनसीबीचे साक्षीदार असतील तर, दुर्दैवच म्हटलं पाहिजे. पोलिसांना हवी असलेली व्यक्ती एनसीबीच्या कार्यालयात येत असतानाही सिंघम वानखेडेंना ती दिसत नसेल, असं थोडीच आहे? या दोघांच्या कृत्याची दखल घेतली जाऊ नये, म्हणून भाजपचे तमाम नेते पुढे येऊन एनसीबीची तळी उचलतात हे या विभागाला कसं काय चालतं? इतकं होऊनही एनसीबीचे अधिकारी ब्र बोलत नाहीत, हे कमालीचं आहे. घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तरं देतानाही अधिकारी मूळ मुद्याला बगल देत असतानाचं पाहिल्यावर विभागाच्या अधिकार्‍यांच्या एकूणच मानसिकतेची जाणीव व्हायला वेळ लागत नाही.

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ९ हजार कोटींचे अंमली पदार्थ उतरूनही त्याचा छडा ज्या खात्याला लावता आला नाही त्या एनसीबीने मुंबईत केलेल्या कारवाईचा केलेला बाऊ हा महाराष्ट्रद्रोहाचा दुसरा अंक आहे, हे लक्षात यायला वेळ लागत नाही. भाजपचा तो ठरलेला कार्यक्रम आहे, हे वानखेडेंना ठावूक नाही, असं थोडीच आहे? यामुळेच आता मुंद्रा बंदरातील कारवाईचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठीच कॉर्डेलियातील कारवाईचा फार्स करण्यात आल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. एका कर्तव्य कठोरतेचा शिक्का बसलेल्या वानखेडेंसारख्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालील विभागावर घेतला जाणारा आक्षेप कदापि खपवून घेता कामा नये. बाप दाखव नाही तर श्राध्द घाल… अशा पध्दतीने आक्षेपांना तोंड देण्याची जबाबदारी वानखेडे यांनी घ्यायला हवी होती.

त्यांनी हे न केल्यामुळेच ते भाजपच्या कंपुसाठी काम करताहेत की काय, अशा संशयाने जागा व्यापली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी घेतलेले आक्षेप योग्य नसतील, तर त्या आक्षेपांना जशास तसं उत्तरं देण्याची जबाबदारी ही वानखेडे यांचीच आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता तर ज्या कॉर्डेलियात अंमली पदार्थ सापडले असं सांगणार्‍या वानखेडेंच्या टीमला आर्यनने ड्रग्ज घेतलं वा बाळगलं हे ही दाखवता आलेलं नाही. यामुळे आर्यन हा खरा आरोपी आहे की आणखी कोण याविषयीची शंका अधिकच गडद झाली आहे. असल्या शंकांमधूनच वानखेडे यांचे फोन तपासण्याची मागणी पुढे येणं आणि कॉर्डेलियातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी न्यायालयात केली जाणं हे वानखेडेंसारख्या कर्तव्याच्या जाणकार समजल्या जाणार्‍या अधिकार्‍याच्या आजवरच्या कामावर पडलेलं पाणी होय… असले आक्षेप टाळायचे असतील तर संशयाचं भूत वानखेडेंनाच उतरवावं लागेल, हेच खरं.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -