घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआगी इतकीच गैरसमजाची दाहकता !

आगी इतकीच गैरसमजाची दाहकता !

Subscribe

गेल्या वर्षभरात ज्या लसीची प्रतीक्षा समस्त भारतीयांनी केली ती कोरोना प्रतिबंधक लस गेल्या शनिवारपासून कोरोना योद्ध्यांना द्यायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण भारताची कोलमडलेली आरोग्य आणि अर्थव्यवस्था यांना या लसीने चालना मिळणार आहे. त्यामुळे लोक ही लस घेण्यासाठी उत्सुक असतील, असा समज निर्माण झाला होता. पण, लसीकरणाला प्रारंभ झाला तसतसा अडचणींचा पटही उलगडला जाऊ लागला. अडचणींचे हे चक्र भेदणे आरोग्य व्यवस्थेला आता जिकरीचे होत आहे. लस येऊन जेमतेम आठवडा उलटत नाही तोवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला गुरुवारी भीषण आग लागली. सीरममध्ये कोविशिल्ड लसीचे उत्पादन घेतले जात असल्यामुळे आगीच्या वृत्तानंतर प्रत्येकाच्याच काळजात धस्स झाले. परंतु, बीसीजी लसीचे उत्पादन ज्या ठिकाणी सुरू होते त्या इमारतीला आग लागल्याचे काही वेळानंतर स्पष्ट झाले. त्यात कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरू असलेले ठिकाण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आणि सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. ही आग नक्की कशामुळे लागली, याचा तपास आता पोलीस यंत्रणा करेलच. या आगीसारखीच दाहकता लसीकरणाच्या गैरसमजानेही पसरवली आहे.

या गैरसमजामुळे लसीकरणाला प्रतिसादही कमी होत आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून ज्यांनी काम केले त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. परंतु, सुमारे ३० टक्के कर्मचारी या लसींपासून दूर पळण्याचा प्रयत्न करताहेत. कुणी म्हणतेय, या लसींमुळे ताप येतो, कोणी म्हणते या लसींमुळे नपुंसकत्व येईल तर कुणी म्हणते या लसींमुळे कोरोनाला निमंत्रण दिले जाईल. या लसींमुळे दुसरा घातक आजार होऊ शकतो, चेहरा अर्धांगवायूने लुळा पडतो, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या रोखण्याचा कट या माध्यमातून रचला जातोय. कुणी त्यात हराम आणि हलालला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकेच नाही तर लस घेतल्याने महिलांना दाढी येते इतक्या हास्यास्पद गैरसमजावरही जाहीरपणे चर्चा होते हे विशेष. लस घेतल्यानंतर संबंधितांना त्रास झाल्याने अमुक एका हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण दाखल असल्याचेही दावे केले जातात. प्रत्यक्षात अशा घटना घडल्याचे अद्यापतरी समोर आलेले नाही. महत्वाचे म्हणजे अशा अफवांवर आरोग्य कर्मचारी विश्वास ठेवताहेत. त्यामुळे लसीकरणाचा प्रतिसाद ठिकठिकाणी घटत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

आरोग्य कर्मचारीच जर लसीकरणाबाबत भीती बाळगणार असतील तर मग सर्वसामान्यांनी कुणाकडे पहावे? इलेक्ट्रॉॅनिक्स माध्यमांमधील ‘फुटेज’चा अतिरेकही गैरसमज पसरवण्यास कारणीभूत ठरत आहे. लसीकरणाची बातमी दाखवताना वारंवार भलेमोठे इंजेक्शन टोचणारा डॉक्टर आणि इंजेक्शन टोचल्यानंतर सुरा खुपसल्यागत हावभाव करणारे नागरिक वारंवार दाखवण्यात येतात. त्यातून भीती निर्माण होत आहे. लस घेतल्यानंतर थोडाफार ताप येणे, लस घेतलेल्या जागी सूज येणे किंवा तो भाग दुखणे असा त्रास होऊ शकतो. या बाबी सर्वसाधारण आहेत. त्यात खूप गंभीर काही घडले असे समजायचे कारण नाही. गोवर, देवी व तत्सम लसीकरणानंतरही काही कालावधीसाठी ताप येत असतो. अर्थात अशा प्रकारचे गैरसमज केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरत आहेत. विविध देशांमध्ये धार्मिक तेढ आणि राजकीय अस्थिरता याचा थेट परिणाम लसीबाबतच्या विश्वासार्हतेवर होत असल्याचा निष्कर्ष ‘लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’ च्या अभ्यासात समोर आलेला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोना लसीकरणाबाबत अनेक खुलासे केले आहेत. लसीकरणामुळे कोविड-१९ होतो का, असाही प्रश्न त्यांना अनेक ठिकाणी विचारण्यात आला आहे. वास्तविक ही लसच कोरोना व्हायरसवर प्रक्रिया करून बनलेली आहे. त्यामुळे ती घेतल्यावर कोविड-१९ हा आजार होऊ शकतो असा सर्वसामान्यांचा समज होणे स्वाभाविक आहे. यावर आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘कोविडची लस घेतल्यावर कोविड १९ आजार होणार नाही. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी मृत कोरोना विषाणूच्या स्पाईक प्रोटीनमधील अंश घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. पण, म्हणून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होईल असे म्हणता येत नाही. उलट या रोगाबद्दल रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण होऊन रोगापासून बचाव होतो.

- Advertisement -

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे २८ दिवसांच्या आत नव्या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. पहिला डोस आज घेतला आणि दोन महिन्यांनी दुसरा डोस घेतला तर त्याचा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांच्या आत दुसरा डोस घेणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असेल. गर्भवती किंवा बाळ अंगावर पिणारे असेल तर अशा महिलेने लस घेऊ नये असे नियमात म्हटले आहे. त्यामुळे काही बहाद्दरांनी लसीवरच संशय घेणे सुरू केले आहे. पोलिओ, गोवर, देवीसारख्या रोगांमध्ये लसीकरण प्रभावी ठरल्याची उदाहरणे आपल्याला इतिहासात दिसून येतात. लसीकरणामुळे लस घेणार्‍याचा रोगापासून बचाव होतोच, पण त्यासोबत सामूहिक रोगप्रतिकार शक्ती वाढण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडते. परंतु, गैरसमजामुळे आजारांचे उच्चाटन होण्यास विलंब होतो. तसे कोरोनाच्या बाबतीत होऊ नये. सुरक्षितता आणि लसीचा प्रभाव या निकषांची तपासणी केल्यानंतरच लसीच्या वापराला देशात अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूट लस उत्पादनाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सीरमच्या दाव्यानुसार, ही लस कोरोनाच्या नव्या प्रकारच्या संक्रमणावरही प्रभावी ठरणार आहे. संशोधकांच्या मते विषाणूमध्ये फार कमी प्रमाणातच बदल झाले आहेत, त्यामुळं ही लस या नव्या प्रकारावरही प्रभावी ठरेल. सुरक्षिततेची हमी मिळाल्याशिवाय अशा लसींच्या वापराला परवानगीच मिळत नाही, असे डॉ. तात्याराव लहानेदेखील सांगतात. इंग्लंडमध्ये जो नवीन विषाणू आला आहे त्यावर मात करण्यासाठीदेखील ही लस प्रभावी ठरणार आहे. ही लस तयार करताना त्यात प्रोटीनचा वापर होतो. इंग्लंडमधील नवीन विषाणूत केवळ एस प्रोटीनमध्ये बदल झाला आहे. बाकीचे प्रोटीन हे कोव्हिड १९ चेच आहेत. ही लस शरीरात गेल्यावर टी सेल तयार करते. दुसरा डोस दिला जातो, तेव्हा ती प्री मेमरी सेल तयार करते.

जसे पोलिओ, टीबीसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसी प्रभावी ठरल्या त्याच पद्धतीने नवीन कोविशिल्ड लसही प्रभावी ठरणार आहे. भारताची लोकसंख्या लक्षात घेता एका कंपनीला इतक्या सार्‍या लसी उपलब्ध करुन देता येणार नाहीत. परंतु काळजीचे कारण नाही. भारतात लसींच्या चाचण्या सुमारे सहा कंपन्यांकडून घेण्यात येत आहेत. शिवाय परदेशातही असंख्य कंपन्या चाचण्या घेत आहेत. कोविशिल्डप्रमाणेच कोवॅक्सिन ही लस कोरोना उच्चाटनासाठी संजीवनी ठरणार आहे. कोवॅक्सिन लस भारतातच विकसित करण्यात आली आहे. या कोवॅक्सिनमध्ये अ‍ॅडजव्हंट हा घटक मिसळला आहे. या घटकामुळे लसीची क्षमता अधिकच वाढेल. ही लस घेतल्यानंतर शरीरात ज्या अँटिबॉडीज तयार होतील त्या अधिक काळापर्यंत कोरोनापासून संरक्षण देतील. त्यामुळे गैरसमजाची ही लागण कमी होणे सार्‍यांसाठी हितकारक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -