घरफिचर्समायमहानगर ब्लॉगनवनेतृत्वाच्या यशाचा गुलाल!

नवनेतृत्वाच्या यशाचा गुलाल!

Subscribe

राज्यातील 106 नगरपंचायतींपैकी 99 जागांवरचे निकाल बुधवारी घोषित झाले. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा मुकाबला पाहिला तर एकत्र दिसणारं संख्याबळ भाजपच्या समोर खूपच घसघशीत वाटत आहे. पण त्याच एकत्रित यशाची विभागणी केली तर मात्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं आजच्या निकालांवरून स्पष्ट झालेलं आहे. दुसर्‍या क्रमांकावरचं स्थान हे भाजपला मिळालेलं आहे. आणि राज्यात ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत तो पक्ष चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक कार्यकर्ते तिथल्या समस्या, स्थानिक विषय आणि गावपातळीवरचे हिसाब-किताब यावरच लढवल्या जातात. त्याचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसने खूपच कौतुकास्पद अशी बाजी मारलेली आहे. याचं कारण 26 महिने राज्याची सत्ता हाती असणार्‍या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने नेमका मोक्यावर चौका मारलेला आहे.

गावोगावच्या मतदारराजाने युवावर्गाच्या पाठीमागे उभे राहत नवनेतृत्व उदयाला आणण्याचा विचार केला आहे. ही राज्याच्या राजकारणासाठी एक सकारात्मक गोष्ट आहे. या विजयाच्या जल्लोषात उल्लेख करावा लागेल, मग तो सांगलीच्या कवठेमहाकाळमधल्या रोहित पाटील या 23 वर्षीय तरुणाचा. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. उर्फ आबा पाटील यांचा चिरंजीव रोहित पाटीलच्या नेतृत्वाखाली कवठेमहाकाळ नगरपंचायतीमधल्या 10 जागा दणदणीतरित्या जिंकल्या आहेत. पाय जमिनीवर ठेवून साधेपणानं राजकारण करण्याचं बाळकडू रोहितला आपल्या आई-वडिलांकडूनच मिळालंय. राजकारणात, प्रचाराच्या रणधुमाळीत वावरताना रोहितवर व्यक्तिगतरित्या खालच्या पातळीवर टीका झाली. स्वकीय आणि विरोधी या दोघांना त्याने मोठ्या कौशल्यानं उत्तरं तर दिलीच, पण राजकीय विजयातून विरोधकांना करारा जवाबही दिला.

- Advertisement -

त्याचवेळी शेजारच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातार्‍यामध्ये मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांना पराभवाची चव चाखावी लागली. अहमदनगरच्या कर्जतमध्ये मात्र रोहित पवार यांनी केलेल्या कामाला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्थानिक पातळीवर आता ‘फक्त कामाचं बोला’ असा संदेश जणू या निवडणुकीच्या निकालातून जनतेने दिला आहे. जी गोष्ट सातार्‍यात शशिकांत शिंदे यांची तीच गोष्ट औरंगाबादमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची. अब्दुल सत्तार यांनी दानवेंवर कडी केली आहे. कोकणात दापोली मंडणगड याठिकाणी पक्षाला डोळे वटारुन दाखवणार्‍या माजी मंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम या पितापुत्रांना हात चोळत बसावं लागलं आहे. या ठिकाणी सेनेची सरशी झाली आहे.

राज्यभरात झालेल्या 106 नगरपंचायतीच्या विजयाचं विभागवार विश्लेषण केलं तर ठरल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात पंधरापैकी सात ठिकाणी राष्ट्रवादी मराठवाड्यात 23 पैकी भाजपला सात, राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, सेनेला चार असे बलाबल आहे. कोकणात 17 नगरपंचायतीच्या जागांवर सेनेनं चार, राष्ट्रवादीने पाच, भाजपने तीन अपक्ष आणि काँग्रेसने एकेक आणि त्रिशंकू तीन अशी स्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रातील 13 नगरपंचायतीत शिवसेनेची तीन, तर भाजपची चार ठिकाणी सरशी झाली आहे. राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या तर एका जागेवरची स्थिती त्रिशंकू आहे. विदर्भात मात्र काँग्रेसने 29 पैकी 12 जागांवर विजय मिळवलेला आहे. त्याखालोखाल भाजपने सहा जागा मिळवत काँग्रेसला आव्हान दिलेय.

- Advertisement -

तीन ठिकाणी राष्ट्रवादी, दोन ठिकाणी अपक्ष आणि पाच ठिकाणी त्रिशंकू अशी स्थिती असली तरी विदर्भात शिवसेनेला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागलेय. नगरपंचायती किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका या प्रामुख्यानं ज्या पक्षांचं सरकार राज्यात असतं त्या पक्षाची सरशी होते, असा एक साधारण निरीक्षणाचा भाग असतो. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी विनाकारण हुरळून तर जायला नकोच, पण या निवडणुकांमध्ये आपलं नेमकं कुठे चुकलं हे बघण्याची संधी या निमित्तानं सगळ्याच राजकीय पक्षांना मिळालेली आहे. मोठ्या नेत्यांच्या या निवडणुका छोट्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर लढवल्या जात असल्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांना आपापली राजकीय उट्टं काढून घेण्याची उत्तम संधी साधली नसती तरच नवल. उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे किंवा गिरीश महाजन असतील, मराठवाड्यात रावसाहेब दानवे किंवा अब्दुल सत्तार असतील, सिंधुदुर्गात वैभव नाईक किंवा नितेश राणे असतील अथवा दापोलीत रामदास कदम आणि अनिल परब असतील या प्रत्येकानेच आपापली शक्ती पणाला लावत आपापल्या राजकीय दंड बैठका तपासून घेतल्या आहेत.

राज्यात सगळीकडेच मोठे नेते भांडतात आणि स्वतःच्या सोयीसाठी एकत्र येतात. अशा स्वरूपाचं एक वातावरण स्थानिक कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय बनत चाललंय. सामान्य नागरिकांची मात्र त्यांच्या समस्या आणि अडचणी यांच्याशी झुंजताना पुरेवाट होतेय. अशा स्थितीमध्ये तरुणांमधून जे नवनेतृत्व उदयाला येत आहे त्याबद्दल आश्वासक चित्र निर्माण होईल असे हे निकाल आहेत. त्यामध्ये मग सांगलीचा रोहित पाटील असेल किंवा कर्जतचा रोहित पवार, हिंगण्यातले समीर मेघे असोत अथवा सिंधुदुर्गचे आमदार नितेश राणे असू द्यात. तरुणांनी आता सकारात्मक आणि विकासाचेच राजकारण करायला हवं, अशी जोरदार मागणी गाव पातळीवरून सुरू झाल्याचं बघायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. कारण तळागाळातील ही तळमळ बरेच काही सांगून जात आहे.

गेले 26 महिने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. या काळात विरोधी पक्षाची भूमिका भाजपला बजावावी लागते आहे. एकहाती सत्तेची सवय झालेल्या भाजपच्या नेतृत्वाला स्थानिक पातळीवरचे सत्ताकांक्षी कार्यकर्ते थोपवून ठेवणं ही एक वेगळीच कसरत मोठ्या नेत्यांना करावी लागत होती. राज्यातलं भाजप नेतृत्व त्यामध्ये यशस्वी झालं आहे, असं म्हणायला वाव देणारा आजचा हा निकालाचा दिवस आहे. सातार्‍याचे शशिकांत शिंदे किंवा दापोलीचे रामदास कदम असोत, जालन्याचे रावसाहेब दानवे असोत किंवा मुक्ताईनगरचे एकनाथ खडसे. वयाने ज्येष्ठ आणि अनुभवाने मोठे असले आणि त्या जोरावर ते माध्यमांचे कॅमेरे दिसताच ज्या पद्धतीची मल्लीनाथी सकाळ-संध्याकाळ करत असतात ते पाहिल्यानंतर कंटाळलेल्या सामान्य नागरिकांना आता तरुण नेतृत्वामध्ये एक आशेचा किरण दिसू लागलेला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार अथवा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या मोठ्या नेत्यांनी तरुणाईला व्यापक संधी देण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि स्वकियांचा विरोध पत्करून जर एखादा रोहित पाटील आपली छाप सोडणार असेल किंवा चार-चार पिढ्या राजकारणात असूनही पाय जमिनीवर ठेवतारा रोहित पवार चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणत झपाझप काही गोष्टी शिकत असेल तर सर्वोच्च पदांवर बसलेल्या ठाकरे आणि पवार यांनी अचूक वेळेला नेमक्या युवा नेत्यांना योग्य प्रमाणात वाव देण्याची गरज आहे. कारण या निवडणुका जशा स्थानिक पातळीवर छोट्या कार्यकर्त्यांमध्ये लढल्या जातात तसंच त्या निवडणुकांनंतर राज्याच्या राजकीय पटलावर भरण्यासाठीचे पुढच्या पिढीचे रंग याच निवडणुकांमधून मान्यवरांच्या हाती लागणार आहेत. त्यादृष्टीनं या निवडणुका आणि त्यांचे निकाल राज्यासाठी खूपच महत्वाचे आणि नवी दिशा दाखवणारे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -