घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग जातश्रेष्ठत्वाने पछाडलेल्या नीलमताई...

जातश्रेष्ठत्वाने पछाडलेल्या नीलमताई…

Subscribe

प्रा. सुषमा अंधारे

(अ)प्रिय ताई,

- Advertisement -

काही माणसं पदांमुळे मोठी होतात… काही पदं माणसांमुळे मोठी होतात… पण काही माणसं निव्वळ माणसांमुळे मोठी होतात. तुम्ही यातल्या पहिल्या प्रकारातल्या… तुमचे अनेक किस्से महिला पदाधिकारी सांगायचे, तेव्हा मला त्यांचा राग यायचा. वाटायचं, एका विद्वान बाईला निष्कारण बदनाम केलं जातंय.

लातूरच्या संघटिका चालक मामी दोन महिन्यांपूर्वी डोळ्यांत पाणी आणून म्हणाल्या, नीलमताईंनी मला प्रेसमध्ये बसू दिलं नाही. अपमानित केलं. तर पुण्याच्या स्वाती ढमाले यांना तुम्ही गाडीत बसू दिलं नाही. तर सोलापूरच्या संघटिकेला मुंबई बंगल्यावर washroom वापरण्यास मज्जाव केला. शिल्पकार राजेंद्र आल्हाट यांच्या एका प्रदर्शनात उद्घाटनाला गेल्यावर हातात कात्री देतो का, म्हणून त्याला डाफरून डाफरून बोललात. अमरावतीची पोलीस पत्नी वर्षा भोयरने तुमच्याकडे मदत मागितली, पण जात बघून इग्नोर केले.

- Advertisement -

तुमच्या स्वश्रेष्ठत्व अन् अहंकाराचे अनेक किस्से… म्हटलं तर वरवर खूप साधारण वाटणारे, पण म्हटलं तर जातश्रेष्ठत्वाने पछाडलेले. भांडवली व्यवस्थेच्या विरुद्ध विचार मांडता-मांडता तुम्ही स्वतःच त्या व्यवस्थेचा भाग कधी झालात, हे तुम्हालाच कळले नाही.

स्त्रीआधार केंद्राचा गवगवा करत अनेक पदं, पुरस्कार अन् माया जमा करणाऱ्या तुम्ही खेळाडू महिलांबद्दल अवाक्षराने ही बोलला नाहीत. कृषी कायदा आंदोलनात चिरडलेल्या शेतकऱ्यांबद्दल ब्र शब्द काढला नाही. ही केवढी मोठी शोकांतिका म्हणायची…!

तुम्हाला आठवतं का, जाधवर ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटच्या विद्यार्थी संसद कार्यक्रमात 2018 साली मी आपल्याला भेटून शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्या कार्यक्रमात खडसेसाहेबही होते. तेव्हा आपण तो विषय झुरळासारखा झटकून दिला होता. तेव्हाही आपला अहंकार आणि जातश्रेष्ठत्व वाद मला कळायला हवा होता. पण मग पुढे अनेक लोक भेटत राहिले. सागर माळकर, मदन गाडे, कितीतरी…

अगदी मागील वर्षीही माझा प्रवेश तुम्हाला अजिबात आवडला नव्हता. अन् हे माझ्याही आधी सन्मानीय वरिष्ठांनी हेरले होते. म्हणूनच प्रवेशाच्या दिवशीच तुमचा उल्लेख त्यांनी खाष्ट सासू असा केला. हे सगळं लिहिण्याच कारण तुम्ही माझा द्वेष करताना, त्याची कारणं जातीय अधिक होती.

सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील मुलगी स्वकर्तृत्वाने उभी राहणे तुम्हाला न मानवणारे होते. तुम्हाला राजकीय जन्म प्रकाश आंबेडकर यांनी दिला, पण समोर संधी दिसताच तुम्हाला त्यांचाही विसर पडला. काल, शुक्रवारी तुम्ही केलेला उल्लेखही तुमच्यातला काठोकाठ भरलेला जातीय विखार सांगणारा होता.

तुम्ही भलेही कितीही पदे भोगली (हो भोगलीच, भूषवली नाही) असतील, पण माणूस म्हणून तुम्ही कमालीच्या भणंग आणि कफल्लक आहात. कारण ना तुम्ही कुणाला मदतीचा हात देऊ शकता, ना कुणाचा उत्कर्ष बघू शकता, ना उपकारकर्त्याची जाणीव ठेवू शकता.

तुम्ही राहता त्या मॉडेल कॉलनी, शिवाजी नगरमध्ये ना साधी एक शाखा काढू शकलात, ना एखादा नगरसेवक निवडून आणू शकलात. महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा वकूब नसताना ज्या पक्षाने एवढं दिलं, तो पक्ष आणि कुटुंब संकटात असताना, सत्तेसाठी पळ काढला.

पण कुठलेही सत्तास्थान नसताना आमच्यासारखे निष्ठावान ठामपणे मातोश्रीसोबत निकराची झुंज देत आहेत अन् तुमच्यासारखे खुर्च्या टिकवण्यासाठी छळकपट करणाऱ्यांची भाटगिरी करत आहेत.

मॅडम म्हणूनच तुमच्या पक्षप्रवेशाच्या वेळी एकही सटरफटर काय तुमच्यासारखा सो कॉल्ड सुद्धा एकही माणूस तुमच्यासोबत दिसला नाही. यावरूनच आयुष्यात तुम्ही पैसा आणि पदं खूप कमावली, पण माणूसकी नाही हे स्पष्ट होते. ठाकरेंचा एक माणूस आपल्याकडे घेतला याचा शिंदेंना कदाचित आसुरी आनंद होईल, पण तुम्हाला घेण्याचा त्यांना एकही मत वाढवण्यासाठी म्हणून फायदा नक्कीच होणार नाही.

म्हणूनच तुम्ही धोरणी राजकारणी असू शकाल, पण माणूस म्हणून भणंग आणि कफल्लक आहात..!!

(लेखिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या आहेत.)

- Advertisment -