मुद्दे नसलेली आगळी-वेगळी निवडणूक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आणखी दोन दिवसांनी त्याचे निकाल जाहीर होऊन जनतेच्या मनाचा कौल समजणार आहे. मतदारांनी ईव्हीएमवरील त्यांच्या पसंतीच्या चिन्हासमोरील बटण दाबून निर्णय घेतला आहे; परंतु महाराष्ट्रातील राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी खरेच मतदारांच्या अपेक्षांप्रमाणे या निवडणुकीत प्रचार केला का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. या निवडणुकीचा प्रचार आतापर्यंत झालेल्या सगळ्याच निवडणुकांपेक्षा वेगळा होता. मुख्य माध्यमांबरोबरच या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यात आला हे त्याचे वैशिष्ठ्य असले तरी विरोधकांकडून सरकारविरोधात रान पेटवणे म्हणतात, असे वातावरण या संपूर्ण निवडणुकीत राज्यभर असे दिसले नाही.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सातार्‍यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात सभा घेऊन भाजपचे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेले भाषण माध्यमांमध्ये कौतुकाचा विषय झाला. तसेही शरद पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केलेल्या तक्रारीपासूनच त्यांनी व त्यांच्या पक्षाने व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेवटपर्यंत ते त्यांच्या पाठीराख्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यात यशस्वी ठरल्याचे दिसले. एवढ्या उतारवयात एकेका दिवसांमध्ये घेतलेल्या सभा असतील वा त्यांच्या पायाला झालेल्या जखमा, हा या निवडणुकीतील एकूण सहानुभूती व कौतुकाचा विषय झाला. पवार हे कर्करोगासारख्या असाध्य आजारातून बाहेर पडून सक्रिय राजकारणातील त्यांचा वावर हा कौतुकाचा व प्रेरणेचा विषय निश्चित आहे, यात काहीही शंका असण्याचे कारण नाही. त्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी घेतलेल्या अनेक दूरदृष्टीच्या निर्णयांमुळे महाराष्ट्र व देशातील कृषीक्षेत्रात अनेक क्रांतीकारी बदल झाल्याचा इतिहास असून त्यांचे योगदान अजून तरी या देशात कुणी नाकारलेले नाही, परंतु प्रत्येक राजकीय व्यक्तीचा एक कालखंड असतो व त्यानंतर तो वारसा पुढच्या पिढीकडे बहाल करायचा असतो.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे पुढील पिढीकडे हस्तांतरीत होतील, असे मानले जात होते. मात्र, ही संपूर्ण निवडणूक शरद पवार यांनीच एकहाती सांभाळली. त्यासाठी वय, आजारपण व आरोपांची ढाल करून सत्ताधार्‍यांवर शरसंधाण करण्यात आले. त्यात ते बर्‍यापैकी यशस्वी झाले असल्याचे दिसून येते. ग्रामीण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला त्याचा चांगला फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ते सोडून दुसरे राज्यस्तरीय नेतृत्व नसल्याचेही स्पष्ट झाले. या निवडणुकीत तर महाराष्ट्रातील काँग्रेस अत्यंत गलितगात्र झाल्याची दिसून आली. काँग्रेससाठी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन दिवसांमध्ये घेतलेल्या पाच सभा वगळल्या तर कुणाही नेत्याने राज्यभर सभा घेतल्याचे दिसले नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पत्रकार परिषदेतून प्रचार केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री व वर्तमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कुठेही राज्यभर प्रचार करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातच थांबणे पसंत केले. यामुळे पक्षाच्या अनेक उमेदवारांना पक्षाकडून कुठलेही पाठबळ मिळाले नसल्याचे दिसले. काँग्रेसचे नेते यांनी मात्र, या पडझडीत आपले ठरावीक गड राखण्यातच धन्यता मानली आहे.

मागील पाच वर्षे भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत राहूनही भाजपवरच टीकेची झोड उठवणारी शिवसेना प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी हतबल व असहायक असल्याचे चित्र दिसले. मागील निवडणुकीत चार-पाच जागांवरून युती तुटण्यापर्यंत ताणल्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने सत्तेत सहभाग घेतला. मात्र, पाचही वर्षे सरकारविरोधात भूमिका घेण्यातच धन्यता मानली. संघटना बांधणीपेक्षा सरकारविरोधात बोलणे म्हणजे पक्ष चालवणे अशी भूमिका घेऊन सरकारची अडवणूक करणारी शिवसेना प्रत्यक्ष जागावाटपात असहाय झाल्याचे जाणवले. जागावाटपाची कुठलीही बोलणी न करता भाजपने देऊ केलेल्या जागा निमूटपणे स्वीकारणार्‍या उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या पक्ष कार्यकर्त्यांची माफी मागण्यातच धन्यता मानली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठरावीक ठिकाणी उमेदवार देऊन सक्षम विरोधी पक्षासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी मोजक्या ठिकाणी सभा घेऊन सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांनी मतदारांना आत्मचिंतन करणारे मुद्दे उपस्थित केले असले तरी एका निवडणुकीनंतर दुसर्‍या निवडणुकीतच दिसणार्‍या राज ठाकरे यांचे संघटन कमकुवत झाल्याचेच या निवडणुकीत दिसले.भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच महाराष्ट्रात महायुती २२० जागा जिंकणार असल्याचा नारा दिला. त्यासाठी विरोधकांमधून येऊ शकणार्‍या दिग्गजांसाठी दरवाजे खुले केले. युतीच्या जागावाटपातील मतदारसंघांनुसार काही भाजपात तर काही शिवसेनेत गेले. लोकसभा निवडणुकीतील यश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी – गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभांच्या बळावर ही विधानसभा जिंकता येईल, असा आत्मविश्वास असला तरी महाराष्ट्रातील सामाजिक समीकरणाचा विचार करून मतदारांना पर्यायच उरणार नाही, अशा पद्धतीने रणनीती आखली. तसेच इतर राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या सभांचा बार उडवून त्यांनी वातावरण निर्मिती केली.
प्रत्यक्ष प्रचारात विरोधी पक्षांनी सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडून मतदारांवर प्रभाव पडेल, असे काहीही प्रचारात केले नाही.

मुख्यमंत्र्यांनी समोर पहिलवान नसल्याचे सांगितल्यावर पवार यांनी हातवार्‍यांद्वारे अशांबरोबर कुस्ती खेळत नसतो, असे उत्तर दिले. राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांना इतकी वर्षे गवत उपटत होता का, असा सवाल विचारण्यापलीकडे प्रचाराची पातळी उंचावली नाही. एकमेकांवर टीका करण्यापलीकडे विरोधी व सत्ताधारी पक्षांना या निवडणुकीत काहीही साधता आले नाही. राष्ट्रवादीचे अजित पवार असो वा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना अनावर झालेले अश्रू अनेक वर्षे मतदारांच्या स्मरणात राहतील. निवडणूक हे लोकशिक्षणाचे माध्यम समजले जाते, पण या निवडणुकीत वंचित आघाडी असो वा कथित पुरोगामी पक्ष यांनी कुठलेही नवे मुद्दे मतदारांसमोर मांडले नाहीत वा आम्ही पर्याय असल्याचेही दाखवले नाही. त्यामुळे या निवडणुकीतील प्रचारात कुठलाही जोश नसल्याने अत्यंत निरस पद्धतीने निवडणूक पार पडली आहे. आता मतदार या निवडणुकीकडे कसे बघतात, हे निकालातूनच कळणार आहे, तोपर्यंत वाट पाहुया.