घरफिचर्समायमहानगर ब्लॉगया जगात अचानक असं काही घडत नाही...

या जगात अचानक असं काही घडत नाही…

Subscribe

In politics, nothing happens by accident. If it happens, you can bet it was planned that way.

अमेरिकचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांचे हे कथन दोनच दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले होते. याचा संदर्भ त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये केले नसले तरी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या दिेलेल्या राजीनाम्याबाबत ते होते, हे उघड होते. राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही. तसे घडले असल्यास, तशा प्रकारे ते नियोजितच होते, हे पैज लावून सांगू शकतो, अशा अर्थाचे ते ट्वीट खूप काही सांगून जाणारे होते.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे वरचेवर नॉट-रिचेबल होणे, 2019ची पुनरावृत्ती करत ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चा या सर्व पार्श्वभूमीवर राजीनाम्याचा हुकमी एक्का शरद पवार यांनी वापरला का? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर होकारार्थीच येते. कारण याची नांदी 11 एप्रिल 2023 रोजी झाल्याचे जाणवते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या दिवशी शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तेव्हा कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर, तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही, असे दोघांकडूनही स्पष्ट करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, हे सर्व स्पष्टपणे आणि जाहीरपणे मांडण्याऐवजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातून मांडण्यात आले. त्यापाठोपाठ पक्षातील ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपाचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय? अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय? असे दोन प्रश्न उपस्थित केले होते. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी, जिल्हास्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो, असा तर्कही या ठाकरे गटाने मांडला होता.

- Advertisement -

शरद पवार यांनी 2 मे रोजी राजीनाम्याची घोषणा केली होती आणि त्यावेळी त्यांचे भाषण लिहून आणले होते. असे कधी होत नाही. म्हणजे त्यांच्या भावनिक आवाहनाचा व राजीनाम्याचा मसुदा त्यांनी काळजीपूर्वक तयार करून आणला होता व त्यानुसार त्यांनी सर्व काही केले, असे ठाकरे गटाने म्हटले होते. खासदार संजय राऊत हे ठाकरे गटापेक्षा पवार यांचे जास्त निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे ‘सामना’तील या सर्व उल्लेखांमागील मथितार्थ समजून घेणे गरजेचे आहे.

पवारांकडून बाळासाहेबांचाच फंडा
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी देखील 1992मध्ये असाच राजीनाम्याचा डाव टाकून शिवसेना संघटनेवरील पकड घट्ट केली होती. त्यावेळी गटबाजी होत असल्याची चर्चा सुरू होती. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत असल्याच्या घोषणेनंतर त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी कथित बंडखोरांविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्यावर बाळासाहेबांनी सज्जड दम देत ती आपली माणसे आहेत, असे सांगत गटबाजीवर अंकुश ठेवला.

हाच फंडा शरद पवार यांनी यावेळी वापरला. त्याचबरोबर अजित पवार हे जमिनीवर काम करणारे आहेत. ते फार माध्यमस्नेही नाहीत. हा स्वभावातला फरक आहे. त्यामुळे असे गैरसमज पसवले जातात, असे सांगून त्यांनी अजित पवार यांना चुचकारले असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

प्रसिद्ध लेखक रणजित देसाई यांच्या ‘राधेय’ या पुस्तकात एक प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण दोन दिवस कर्णाच्या अंग राज्यात मुक्कामाला होता. त्याची माहिती कर्ण दुर्योधनाला देतो. ‘ते कामरूपदेशी तपश्चर्येला गेले होते, परतताना त्यांनी अचानक इथं वास्तव्य केलं.’ यावर दुर्योधन हसतो आणि म्हणतो, ‘या जगात अचानक असं काही घडत नाही. आपल्याला मागचा-पुढचा काही संदर्भ माहीत नसतो, म्हणून ते अचानक भासतं.’

या सर्व राजीनामा नाट्याची गोळाबेरीज हीच दिसते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -