Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग एक खोटं अन् बारा खोटारडे..!

एक खोटं अन् बारा खोटारडे..!

Subscribe

आर्यन खानच्या अटकेच्या निमित्ताने पुढे येत असलेल्या एकेका गोष्टींमुळे यंत्रणा किती पोखरली आहे, याची जाणीव देशवासीयांना व्हायला हरकत नाही. काहीजण काळ सोकावेपर्यंत ते मान्य करत नाहीत. वानखेडेप्रकरणात भाजपच्या नेत्यांची अडचण तशीच झाली आहे. सत्तेच्या स्पर्धेत ते योग्यायोग्यतेची पडताळणीही करत नाहीत. सत्तेला बदनाम करण्यासाठी अधिकार्‍यांच्या मस्तवालपणालाही ते सलाम ठोकत आहेत. त्यांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. एक खोटं अन् बारा खोटारडे उघडे पडले आहेत.

क्षेत्र कोणतंही असो, खरं दाखवण्यासाठी एक खोटं पुढे आणलं तर पुढच्या सार्‍या गोष्टींना खोट्याचाच आधार घ्यावा लागतो. तो फार काळ यश देत नसतो. आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा तो एक घातक मार्ग मानला जातो. सातत्याने खोटं बोलत अखेर खड्ड्यात पडण्याची वेळ येते. राज्यात सुरू असलेल्या आर्यन खान याच्या अटकेनंतर नार्कोटिक ब्युरो कंट्रोलच्या पश्चिम विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासमोर असाच खड्डा निर्माण झाला आहे. आपला बचाव करण्यासाठी स्वत: वानखेडे यांनी, त्यांचे वडील, पत्नी क्रांती रेडकर, एनबीसीचे वकील आणि महाविकास आघाडी सरकारपुढे अडचणींचा डोंगर उभा करू पाहणार्‍या राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी हा खड्डा खोदून ठेवला आहे. खोटेपणाची हद्द पार करूनही ही मंडळी थांबायचं नाव घेत नाहीएत.

एकेक गोष्ट बाहेर पडू लागल्यावर त्यांना खोटेपणाची जाणीव होईल, असं वाटत होतं. पण सूंभ जळाला तरी सुधारण्याचं नाव ही मंडळी घेत नाहीत. सार्‍या देशात प्रकरण चर्चीलं जात असताना असला बेबनाव टिकू शकत नाही, याची जाणीव या मंडळींना झाली नाही, असं थोडंच आहे? त्यातून सुटका होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यामुळेच ही मंडळी एकामागोमाग खोटेपणाचा आसरा घेत गेली आणि स्वत:च त्यात अडकली. अनावधानाने खोटेपणा आला की त्यात सुधारण्याला वाव असतो. पण जाणीवपूर्वक केलेल्या खोटेपणात सुधारण्याची संधीच नसते. त्यासाठी मग शास्ती हा एकच पर्याय शिल्लक राहातो.

- Advertisement -

आर्यन खानच्या अटकेच्या निमित्ताने पुढे येत असलेल्या एकेका गोष्टींमुळे यंत्रणा किती पोखरली आहे, याची जाणीव देशवासीयांना व्हायला हरकत नाही. काहीजण काळ सोकावेपर्यंत ते मान्य करत नाहीत. वानखेडेप्रकरणात भाजपच्या नेत्यांची अडचण तशीच झाली आहे. सत्तेच्या स्पर्धेत ते योग्यायोग्यतेची पडताळणीही करत नाहीत. सत्तेला बदनाम करण्यासाठी अधिकार्‍यांच्या मस्तवालपणालाही ते सलाम ठोकत आहेत. त्यांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. वानखेडे स्वत:ला मराठी असल्याचं सांगत होते तोवर भाजप आणि त्या विचाराचे लोक मराठी माणसाला न्याय दिला पाहिजे, असे गळे काढत होते. त्यांनी काहीही केलं तरी त्याचं या मंडळींना काहीच वाटत नव्हतं. पण मूळ मुद्दा पुढे आला आणि वानखेडेंच्या खोटेपणाचा बुरखा फाटला तेव्हा आता करायचं काय, असं त्यांना झालं.

गेल्या काही महिन्यांपासून उठसूठ पत्रकार परिषदांचा मारा करणारे भाजपच्या किरीट सोमय्यांपासून भातखळकरांपर्यंत आणि राम कदमांपासून बावनकुळ्यांपर्यंत सगळ्यांचीच गोची झाली आहे. ओढूनताणून वानखेडेंना वाचवण्याचा हास्यास्पद प्रयत्न या नेत्यांनी करून पाहिला. नाही म्हणायला खोट्याचं खरं करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही करून पाहिला. सरकार अधिकार्‍यांना नाहक त्रास देत असल्याचा आव त्यांनी आणला. भाजप नेत्यांनी खोटेपणाची हद्द केव्हाच ओलांडली आहे. पण मान्य करणार ते भाजपचे नेते कसले? भाजप नेते आपल्या मागे असल्याने आपलं कोणीही वाकडं करणार नाही, अशा मानसिकतेत वानखेडे आणखी चुका करत गेले.

- Advertisement -

ज्यांच्यासाठी आपण हे करतो, त्यांच्या कारनाम्यांची माहिती भाजपला नाही, असं नाही. याच कारनाम्यांच्या माध्यमातून राज्यातल्या सरकारला बदनाम करता आलं तर ती संधी का दवडायची? तेच तर भाजपच्या नेत्यांना हवं आहे. यामुळेच स्वपक्षाचा उपाध्यक्ष मनीष भानुशाली, त्याचा पाठीराखा आणि पक्षाशी संबंधित किरण गोसावी हा कॉर्डेलियावरील छाप्यात आर्यनची गचांडी धरताना आढळून आला. तेव्हा नार्कोटिक सेलचे पश्चिम विभाग प्रमुख समीर वानखेडे यांनी त्यांना एनसीबीचे खबरे असल्याचं सर्टिफिकेट देऊन टाकलं. खबर्‍यांना अशा कारवाईत थेट भाग घेता येत नाही, हे सांगायचं जसे वानखेडे विसरले तसे ते मनीष आणि किरणही विसरले. खोटेपणाचा कहर तर त्याहून पुढे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला.

भाजपचा मुंबईतील पदाधिकारी मनोज कंभोज यांचा मेहुणा असलेल्या ऋषभ सचदेव याला मोकळं सोडल्यानंतर फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मुलालाही सोडलं असं ठोकून दिलं. त्यांना तो पार्थ पवार असल्याचं कोणी सांगितलं आणि तीच री नाव न घेता त्यांनी ओढली. वास्तविक तो हुबेहूब पार्थसारखा दिसणारा एक गुजराती तरुण होता. यामागे वानखेडेंनी केलेल्या कारवाईला योग्य ठरवण्याचा प्रयत्न होता. पुढे तर या पार्टीला महाविकास आघाडी सरकारने संमती देऊन अमली पदार्थांच्या रॅकेटला प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांनी केला. जो आरोप पुढे खोटा ठरला. राज्यचं काय पण केंद्रानेही अशी परवानगी या रेव्ह पार्टीला दिलेली नाही, हे स्पष्ट झालं. पण रेटून बोलल्यावर ते खरं वाटतं. म्हणून वाहिन्यांनी याची खातरजमा न करताच त्याला प्रसिध्दी दिली. आर्यनला ताब्यात घेण्यात आलं तेव्हा त्याच्याकडे अंमली पदार्थ मिळाले, त्याने त्याचं सेवन केलं होतं, असं जाहीर करण्यात आलं. पुढे चार्जशीटमध्ये याचाही उल्लेख नव्हता, हे न्यायालयात झालेल्या सुनावणीतून स्पष्ट झालं. खोटेपणा कसा करावा याचे हे धडेच होते जणू.

आता तर कार्डेलियावरील रेव्ह पार्टीत सापडलेल्यांचा एनसीबी अधिकार्‍यांबरोबरील संबंधांचा विषय अधिकच गंभीर बनू लागला आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना अडवण्यासाठी काही दलाल हातात हात घालून पार्टीत सहभागी झाले होते. राज्य मंत्रिमंडळातील मत्सव्यवसाय मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या पार्टीत यावं, म्हणून अनेक प्रयत्न झाले. सुदैवाने अस्लम तिथे गेले नाहीत. अन्यथा आज जे घबाड बाहेर आलं ते येऊ शकलं नसतं. आणि अमली पदार्थांच्या तस्करीला साथ दिल्याचा आरोप करत सरकारला बदनाम करण्याची नामी संधी भाजपला मिळाली असती. १३०० जणांमध्ये केवळ आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट हे दोघेच सापडतात, हे संशयास्पद तर आहेच, पण त्याहून ते आश्चर्यकारकही आहे. अशा बड्या धेंडांच्या नातलगांना ताब्यात घ्यायचं, त्यांना जामीन मिळणार नाही, याची तजवीज करायची आणि यातून बक्कळ कमाई करायची हा एनसीबीच्या कारभाराचा नवा फंडा म्हटला तर आश्चर्य वाटायला नको.

हे मनसुबे उधळले गेले त्याला कारण ठरले ते मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री नवाब मलिक. त्यांनी खोटेपणाचा पुरता पर्दाफाश केला आणि भाजप नेत्यांसह समीर वानखेडेही एक्पोज झाले. यानिमित्ताने समीर वानखेडे किती नीतीमान आहेत, याची जोरदार चर्चा सुरू आहे. मराठी म्हणून त्यांना पाठिंबा देणारे मलिक यांना अक्षरश: शिव्या देत होते. भाजपच्या मुंबई विभागीय पक्षप्रमुख मंगलप्रभात लोढा यांनी ठरल्याप्रमाणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि अधिकार्‍यांना धमकावल्याप्रकरणी नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. भाजप नेत्यांच्या उफराटेपणाची ही हद्दच होती. ज्या समीर वानखेडे आणि त्यांच्या पिळावलीने कंबरेचं डोक्याला गुंडाळूनही त्यांना जराही दोष न देणार्‍या या मंडळींसाठी चालून आलेली संधी वाया गेली. सुशांतसिंह प्रकरणात त्यांच्या हाती काहीही लागलं नाही.

अ‍ॅन्टालिया स्फोटक प्रकरणात काही हाती लागत नाही, पालघरच्या साधू हत्याकांडात काही लागलं नाही. उलट खंडणीचे अनेक आरोप झालेल्या परमबीर सिंह यांच्यासाठी या मंडळींचे गळे अबोल झाले. अनिल देशमुख बेपत्ता असल्याबाबत आरोळ्या ठोकणारे हे नेते परमबीर यांच्याबाबत मात्र सूचक मौनी बनलेत. आता वानखेडे खरे की मलिक याचा फैसला करण्याची वेळ आली आहे. जन्मतारखेचा दाखला खोटा, निकाह खोटा, लाडाने दाऊद हाक मारण्याचा प्रकार खोटा, सारं काही गौडबंगालात मोजावं, असं आहे. प्रभाकर साईल आणि शेखर कांबळे या दोन पंचांनी घेतलेला स्टॅण्ड वानखेडेंच्या काळ्या कृत्यांना सलामीच देत आहे. एका नायजेरियन व्यक्तीकडे ड्रग्ज मिळाल्याच्या पंचनाम्यावर आणि क्रूझवरील पार्टीतील कथित ड्रग्स प्रकरणातील पंचनाम्याच्या कोर्‍या कागदावर आपल्या सह्या घेतल्याचे आरोप प्रभाकर साईल आणि शेखर कांबळे यांनी केले आणि एका खोट्यात बारा खोटारडे उघडे पडलेले देशाने पाहिले.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -