कोरोना नंतरची ‘अस्पृश्यता’!

corona fear image

‘आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही’ हा संवाद ऐकून तुमचे कान विटले असतील ना. कोरोना आल्यापासून तीन महिने कुणालाही फोन लावला तरी हीच कॉलरट्यून ऐकायला मिळायची. पण तुम्ही कितीही प्रबोधन करा. लोकं त्याच्या नेमकं उलटं करतात. कोरोनाच्या काळात सरकार सांगत होतं, सोशल डिस्टसिंग पाळा. खरंतर सरकारने फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, असं सांगायला हवं होतं. कारण ज्या विभागात कोरोना रुग्ण आढळतो तेथील रहिवाशी रुग्णाच्या परिवारापासून सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) ठेवायला सुरुवात करतात. हे सामाजिक अंतर नुसतं अंतर नाही, त्यात एक प्रकारची हीन वागणूक आहे. जी कदाचित अस्पृश्यतेत मिळायची. थोडं हार्श वाटेल, पण माझा अनुभव वाचल्यानंतर हे शीर्षक कितपत योग्य ते तुम्हीच ठरवा. (बरं यात सन्मानीय अपवाद नक्कीच आहेत. मी फक्त मला आलेला अनुभव नमूद करतोय.)

तर थोडक्यात सांगतो. माझ्या घरात ११ जून रोजी माझे बाबा आणि तीन वर्षांची माझी मुलगी कोविड पॉझिटिव्ह निघाले. तत्पूर्वी बाबांना श्वसनाचा त्रास सुरु झाल्यामुळे ९ जून रोजीच त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केलं होतं. ११ जून रोजी दोघांचे रिपोर्ट आल्यानंतर मुलीलाही नायरमध्ये माझ्या पत्नीसहीत (केअर टेकर म्हणून) दाखल केलं. माझ्या घरात दोन रुग्ण आढळल्यानंतर बीएमसीने क्वारंटाईन प्रक्रिया पूर्ण केली. पण मला रुग्णालयात बाबांकडे जाण्यावाचून पर्याय नव्हता. ११ जूनच्या रात्री बाबांनाही नायरमध्येच हलविण्यात आलं. दोन्ही रुग्ण एकाठिकाणी असल्यामुळे मला त्यांच्याकडे बघणं सोप्प झालं होतं. तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ये-जा करत होतो. तोवर शेजारचे विचारपूस करत होते. पण आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून मी माझी कोविड टेस्ट करुन घेतली आणि फसलो. कारण त्यानंतर मी कोविड सेंटरमध्ये दाखल झालो आणि माझ्या घरच्यांना शेजारधर्माचा अत्युच्च अनुभव यायला सुरुवात झाली.

कोरोनाने होत्याचं नव्हतं केलं….१ जून रोजी मुलीचा वाढदिवस होता. मुलीच्या हट्टापायी घरच्या घरी केक बनवूण वाढदिवस साजरा…

Posted by Kishor Gaikwad on Sunday, June 28, 2020

१५ जून रोजी मी कोविड सेंटरमध्ये दाखल झालो. १६ जून रोजी माझ्या बाबांचे निधन झाले. कोरोनाची भीती आहेच. त्याच्या संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. पण हे प्रयत्न कसे असावेत? त्याला माणुसकीचा चेहरा असावा का? हे प्रश्न समाज म्हणून मला महत्त्वाचे वाटतात. मी बाबांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यानंतर थेट कोविड सेंटरमध्ये दाखल झालो. त्यामुळे घरी काय परिस्थिती आहे, याची भनकही बायको आणि आईने मला लागू दिली नाही. का तर मला उगाच टेन्शन नको. घरी आल्यानंतर मला खरी परिस्थिती समजली आणि मी अनुभवही घेतला.

तुम्ही सोशल मीडियावर कोरोनातून बरे झालेल्यांचे टाळ्यांनी स्वागत केल्याचे काही व्हिडिओ पाहिले असतील. असे व्हिडिओ व्हायरल करण्याची खरंच गरज आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोरोनाचा रुग्ण चिंतेतून बरा होतो. माझ्या बाबतीत मात्र उलटं घडलं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी जेव्हा चाळीत आलो तेव्हा लोक पटापट घरात शिरले. काही जण मला लांबून बघत होते, जसं काय कोरोनाचा रुग्ण ते पहिल्यांदाच बघत होते. घरी गेल्यावर आईचे सांत्वन कसे करायचे? बायकोने एवढ्या हिंमतीने घर सांभाळले, तिला थँक्स बोलायचे होते. पण आई आणि बायकोने एवढ्या दुःखाच्या प्रसंगातही चाळीतल्या लोकांनी जो मानसिक त्रास दिला त्याचा पाढा वाचला आणि पुन्हा या लोकांशी आपण बोलायचं नाही. याची शपथच दिली.

१६ जूनला वडिलांचे निधन झाल्यापासून चाळीतल्या एकाही व्यक्तीने दाराच्या बाहेर उभे राहून का असेना पण चौकशी केली नाही. एकटा ब्रिजेश गुप्ता ज्याच्याशी मी फार बोललो नव्हतो त्याने त्या रात्री आम्हाला मदत केली आणि आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. पण शेजारचे, ज्यांच्याबरोबर ३५ वर्ष मी राहिलो त्यांनी मात्र पाठ फिरवली. संकट काळात नातेवाईक हे लांब असतात. पण शेजारचे सर्वात आधी धावून येतात, असं म्हटलं जातं. पण कोरोनाच्या भीतीने अनेक ठिकाणी माझ्यासारखाच अनुभव अनेकांना आलेला आहे. २५ जून रोजी मला डिस्चार्ज मिळाला. पण अद्यापही चाळीतल्या एकानेही येऊन मी घरी कसा आलो? मी बरा झालो आहे की नाही? याची विचारपूस केलेली नाही. उलट आमच्या दारातील दहा फुटांचे अंतर जलद गतीने कसे पार करता येईल? याची स्पर्धाच लागलेली मला दिसून आली. यानंतर माझ्या आई आणि बायकोने दहा दिवस काय त्रास भोगला याची मला जाणीव झाली.

१५ जूनला माझ्या मुलीला नायरमधून डिस्चार्ज मिळाला होता. तेव्हापासून आई, बायको आणि मुलगी घरात एकट्या होत्या. टेक्निकली बीएमसीने त्यांना क्वारंटाईन केले होते. त्यामुळे बाहेर जाण्याची सोय नव्हती. अशावेळी लहान मुलीला दूध कसे मिळणार? त्याबद्दल कोणीही विचारणा केली नाही. जेव्हा कचरा टाकण्यासाठी किंवा दूध घेण्यासाठी बायको बाहेर पडायची तेव्हा चाळीतले लोक पटापटा दरवाजा बंद करायचे. आई किंवा बायको पास झाल्यानंतर मागून लगेच दारात सॅनिटायझरचा सडा घातला जायचा. वैयक्तिक कुणीही काहीही बोलत नसले तरी या सर्व कृती मनाला क्लेष देणाऱ्या होत्या.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर मला वाटलं आता आम्ही बरे झालो आहोत. वडिलांच्या निधनाला १२ दिवस होऊन गेले, आमच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. याचा अर्थ आम्हाला आता कोरोना नाही. त्यामुळे लोकांची वागणूक बदलेल. मात्र माझी अटकळ फोल ठरली. लोक स्वतःहून बोलायला तयार नाहीत. अजूनही आमच्या घरातल्या अस्तित्त्वामुळे त्यांना आपोआप कोरोना होईल, ही धास्ती त्यांच्या वागण्यातून दिसून आली. एकाबाजूला नातेवाईक, दूरवरचे मित्र लॉकडाऊनच्या नियमांमुळे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नसताना, एक शेजारीच रुग्णाच्या कुटुंबियांना आधार देऊ शकतात. लांबून का असेना पण नावापुरती विचारपूस केल्यानंतर हायसं वाटतं. पण कोरोनाने माणुसकीचा विकृत चेहरा या काळात दाखवून दिला.

दुसरं एक उदाहरण देतो. चाळीतच अशी वागणूक मिळतेय का? तर ते खरं नाही. उच्च शिक्षित सोसायट्यांमध्ये देखील हीच गत आहे. मी ज्या कोविड सेंटरमध्ये होतो, तिथे माझ्या बाजूच्याच बेडवर एक ६६ वर्षीय कोविड रुग्ण होते. त्यांना कोरोना डिटेक्ट झाल्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात १२ दिवस उपचार घेतले. कोणतीही लक्षणे नसल्यामुळे त्यांना घरी सोडलं. मात्र सोसायटी अडून बसली. जोपर्यंत निगेटिव्ह रिपोर्ट आणत नाहीत, तोपर्यंत सोसायटीत यायचे नाही. दोनदा रिपोर्ट केला तरी पॉझिटिव्हच आला. प्रायव्हेट हॉस्पिटलचं बिल वाढत होतं. म्हणून त्यांनी बीएमसीच्या कोविड सेंटरमध्ये येण्याचा निर्णय घेतला. आमच्याबरोबर राहताना या ६६ वर्षीय आमच्या मित्राने आम्हाला बरीच हिंमत दिली. त्यांना साधा खोकलाही नव्हता. लक्षणे नसतानाही काही दिवस रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोच. हे माहीत असून देखील सोसायटी त्यांना घ्यायला तयार नव्हती. शेवटी बीएमसीच्या कोविड सेंटरमध्ये त्यांनी आणखी दहा दिवस काढले आणि त्यानंतर बीएमसीचे प्रमाणपत्र घेऊन ते घरी गेले.

सन्मानीय अपवादांबद्दल मी बोललो. नक्कीच परिस्थिती एकदमच नकारात्मक नाही. काही लोक कोरोनाची भीती बाजूला ठेवून मदतीला पुढे येतात. आमच्या शेजारी राहत नसलेला आणि ज्याच्याशी मी फार जास्त बोलत नसलेल्या ब्रिजेश गुप्ता नामक एका मित्राने माझ्या आईला वडिलांचे निधन झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आणण्याची मोठी मदत केली. शेजाऱ्यांनी नाकारले तरी बाहेर असलेल्या दुकानदाराने कोणताही भेदभाव केला नाही. जे हवं ते सामान दिलं. रोकडे पैसे घ्यायला देखील कुचराई दाखवली नाही. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

कोरोनानंतरची अस्पृश्यता हे माझे विधान कदाचित मला आलेल्या कटू अनुभवावरून असेलही. पण त्याची आजची तात्कालिक दाहकता तेवढीच टोकदार आहे. तुम्हाला थेट तोंडावर काही बोललं जात नाही. पण कृतीतून तुम्ही कुणीतरी वेगळे, शापित आहात हे कुत्सितपणे दाखवून दिलं जातं. आपण क्वारंटाईन असल्यामुळे बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरचे कुणी आपल्याकडे येऊ शकत नाही. या परिस्थितीत शेजारधर्माची ही अस्पृश्य वागणूक मनाला बोचणारी नाही तर काय?