Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग आपला शत्रू, आपल्यातच जन्मला!

आपला शत्रू, आपल्यातच जन्मला!

Related Story

- Advertisement -

सध्या पाकव्याप्त काश्मिरची भूमी भारत कधी परत घेणार, असा एक विचार अनेकांच्या मनात घोळतो आहे आणि त्याचवेळी भारतीय काश्मिरात होणार्‍या घातपात व जिहादी हिंसाचाराने अनेकांना व्यथित केले आहे. सहाजिकच आपण असे हतबल का आणि अमेरिका वा इस्त्रायल यासारखे देश इतके स्वयंभू कशाला, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्याचे कारण सोपे आहे. उपरोक्त दोन्ही देश खरेच स्वयंभू आहेत आणि त्यांना राष्ट्रप्रेम व राष्ट्रवाद ही निरूपयोगी बाब वाटत नाही. उलट भारतात आता तेच दोन शब्द हास्यास्पद मानण्याला बुद्धिवाद समजले जाते. त्यापैकी इस्रायल तर इवला देश असून त्याला चहूबाजूंनी शत्रू देशांनीच घेरलेले आहे आणि कायम युद्धस्थितीतच जगावे लागलेले आहे. हिंदुस्तानची फाळणी निदान दाखवायला अधिकृत होती. पण पॅलेस्टाईनची फाळणी अरब आणि ज्यू यांच्या तुंबळ लढाईने झाली आणि आजही अनेक अरब देशांनी इस्रायलचे अस्तित्व मान्य केलेले नाही.

आपण शस्त्रबळाने इस्रायल नामशेष करू, अशी त्यांची भूमिका होती आणि अजूनही ती मागे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे देश समाज व राष्ट्र म्हणून टिकून रहायचे, तर कायम युद्धसज्ज रहाणे ह्यालाच इस्त्रायलचा कारभार असे मानले जाते. परिणामी हल्ला झाला किंवा नुसती तशी शक्यता वाटली; तरी इस्रायलच्या फौजा थेट शेजारी अरब देशांवर हल्ले करून त्यांना नामोहरम करीत असतात. उलट तशीच परिस्थिती असून भारत मात्र शेजारी पाकिस्तान ह्या विभक्त देशाकडून होणार्‍या हल्ल्यांना फक्त उत्तर देतो किंवा त्यावरून वाताघाटी करीत असतो. हा भयंकर फरक आहे व त्याची किंमत सैनिकांचे नागरिकांचे रक्त सांडून मोजावी लागत असते. मग भारत इस्रायलप्रमाणे आधीच हल्ला करून पाकला नामोहरम कशाला करीत नाही? मागल्या दोन-तीन पिढ्यातील भारतीयांना सतावणारा असा हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर इतिहासापेक्षाही भारतीय भूमिकेत व राजकीय विचारधारेत सामावलेले आहे.

- Advertisement -

तब्बल 182 वर्षापूर्वी म्हणजे 1838 साली अब्राहम लिंकन यांनी इलिनॉय राज्यातील स्प्रिंगफिल्ड येथील विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना अमेरिकेचा शेवट कुठल्या आव्हानातून होऊ शकेल, यावर केलेले भाष्य प्रसिद्ध आहे. ते नंतरच्या काळात अमेरिकेचे अध्यक्षही झाले. कदाचित आजच्या उदारमतवादी अमेरिकनांनाही ते आठवत नसावे. अन्यथा तो जगातला महाशक्ती म्हणून गणला जाणारा देश कोरोनाने इतका हतबुद्ध झालेला दिसला नसता, किंवा चीनला नुसत्या पोकळ धमक्या देतांना बघायला मिळाला नसता. त्यापेक्षा भारताची परिस्थिती अजिबात वेगळी नाही. कारण कोणालाच लिंकन यांच्या शब्दांचे स्मरण राहिलेले नाही, किंवा त्यातला स्वतंत्र राष्ट्रांना दिलेल्या उपदेशातला आशय लक्षात राहिलेला नाही. लिंकन म्हणाले होते, ‘अमेरिकेला कुठून धोका संभवतो? युरोप, आफ्रिका व आशियाच्या सर्व सेना एकत्रित होऊन नेपोलियन बोनापार्टसारख्या कर्तबगार सेनापतीच्या नेतृत्वाखाली चाल करीत आला. त्यांच्या पाठीशी पृथ्वीतलावरची सर्व साधनसामुग्री असली आणि त्यांनी अटलांटीक महासागर ओलांडला; तरी त्यांना हजारो वर्षे लढूनही ओहायो नदीतले घोटभर पाणीही पिता येणार नाही.

कारण आपण स्वातंत्र्यप्रेमी स्वयंभू समाज व राष्ट्र आहोत. मग आपल्यावर तशी पाळी कधी व कुठून येऊ शकते? आपला पराभव किंवा विनाश आपल्यालाच ओढवून आणावा लागेल. आपला शत्रू आपल्यातूनच जन्मावा लागेल. स्वतंत्र माणसांच्या समाजाचा विनाश त्यांच्यापैकीच लोक घडवून आणत असतात. त्यांना बाहेरचा कोणी कधी संपवू शकत नाही, त्यांचा पराभव करू शकत नाही.’ हे शब्द लिंकन यांनी नवजात राष्ट्रातल्या अमेरिकनांसाठी बोलले असले तरी ते कुठल्याही स्वतंत्र समाज व राष्ट्रासाठी तंतोतंत लागू होतात आणि आजची हतबल अमेरिका त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. कारण इतकी परावलंबी अमेरिका तिथल्याच उदारमतवादी अमेरिकन राजकीय नेत्यांनी व धोरणांनी बनवलेली आहे. भारताची परिस्थिती वेगळी कशी असेल?

- Advertisement -

आपल्याला प्रश्न पडतो, इवला इस्रायल पाच बलदंड अरब राष्ट्रांना पुरून उरतो आणि एकदा आवेशात आला, मग त्यांना नामोहरम करूनच थांबतो. इस्रायली हल्ले इतके भेदक असतात, की पुढली दोनचार वर्षे तो शेजारी अरब देश पुन्हा कुरापत काढण्याची हिंमतही करीत नाही. मग भारत पाकव्याप्त काश्मिरात पाकला असा धडा का शिकवू शकत नाही? भारतापाशी इस्रायलच्या शंभर पटीने अधिक सेनादल वा शक्तीशाली अस्त्रे शस्त्रे आहेत. मग दुबळा पाक भारताला वाकुल्या कशाला दाखवू शकतो? त्याचे उत्तर डाव्यांच्या वागण्यातून मिळते. त्यांनीच काश्मिरच्या ़फुटीरवादाचे जाहीर समर्थन चालविले आहे. कालपरवा पुलवामा हंदवारा येथे चकमकी झाल्या आणि त्यात काही भारतीय सैनिक अधिकारी शहीद झाले. त्यांना साधी श्रद्धांजली वाहायला कोणीही डावा पुढे आला नाही. पण त्याच काश्मिरात 370 कलम हटवल्यामुळे नागरिकांना कसे हलाखीचे गुलामीचे जीवन जगावे लागते, त्याचे याचा गलबला मात्र डावे करू शकतात.

तशा आशयाची छायाचित्रे व पुस्तक पाकिस्तानच्या पुढाकाराने प्रकाशित झाले आहे. त्यालाच पुलित्झर पारितोषिक मिळाल्यावर डाव्यांनी त्याची पाठ थोपटलेली आहे. थोडक्यात, ज्यांनी भारतासाठी व काश्मिरसाठी रक्त सांडले त्यांच्याविषयी तुच्छता आणि जे राजरोस गद्दारीची भूमिका हिरीरीने मांडतात, त्यांचा गुणगौरव भारतात इतक्या उजळ माथ्याने होऊ शकतो. हे खरे दुखणे आहे, त्याचे उत्तर वा त्यावरचा उपाय सेनादल वा शस्त्रास्त्रांमध्ये नाही. ते दुखणे इथल्या धोरण, राजकारणात सामावलेले असून आजवरच्या कारभारातून हे भारतीय पराभूत मानसिकतेमध्ये प्रस्थापित झालेले आहे. दुखणे पाकिस्तानात नसून लिंकन म्हणतात, तसे भारतीय बुद्धीमध्ये रुजलेले व जोपासले गेलेले आहे. उपाय इथे व त्यावर करणे आवश्यक आहे.

काश्मिरात चकमकीत मारला गेलेला रियाझ नायकू याच्या गद्दारीचे उदात्तीकरण आपले संपादक व अभ्यासक माध्यमे करतात. तसे करताना राष्ट्रवादाला उन्माद ठरवले जाते आणि त्यातून राष्ट्रप्रेमाची भावना मारली जात असते. पाकच्या जिहादी हिंसाचाराविषयीचा तीव्र संताप बोथट होऊन गेला आहे आणि आपोआप सेनादलाचे मनोबल खच्ची करण्यात आलेले आहे. इथे काश्मिरातील जनतेला आपल्याच अशा बुद्धीवादी लोकांनी भारताच्या विरोधात उभे केले आहे आणि पाकिस्तान त्याचा फायदा उठवित असतो. त्यांचा बंदोबस्त करायला गेलेल्या सैनिक वा जवानांच्या बाजूने इथला कायदा वा न्यायालयेही उभी रहात नाहीत.

मग शस्त्रे व साधने हातात असून उपयोग काय? सेनेच्या शस्त्रास्त्रे व सैनिकाच्या हातातील हत्याराला कायद्याचे समर्थन धार देत असते आणि उदारमतवाद नावाच्या आपल्यातल्याच मूठभरांनी ती धार बोथट करून टाकलेली आहे. इस्रायलमध्ये ते होऊ शकलेले नाही. म्हणून त्यांची एक कोटीहून कमी असलेली लोकसंख्या वा काही लाखांपुरती मर्यादित सेनाही शेजारी अरब देशांना भारी पडू शकते. तिथला कोणी शहाणा वा बुद्धीमान नेता बालाकोट हवाईहल्ला व सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेत नाही. इस्रायलची ताकद त्याच्या ठाम भूमिकेत सामावलेली आहे. भारतापाशी अधिक मोठी संख्या व ताकद नक्की आहे. पण तिचे शत्रू समोर सीमेपार नसून इथेच आपल्यात वसलेले वा मिसळलेले आहेत. उजळ माथ्याने भारताच्या पाठीत वार करीत आहेत आणि तरीही प्रतिष्ठित म्हणून जगू शकतात.

- Advertisement -