देशभक्त क्रांतिकारक रासबिहारी बोस

प्रत्येक गटात एक तरी बंगाली असायचाच. त्यामुळे रासबिहारींना या सर्वांशी संबंध ठेवणे सुलभ गेले. 1912 च्या मध्यास त्यांनी बंगाल-चंद्रनगरला जाऊन बॉम्ब व बॉम्ब साहित्य आणि अनेक तरुण क्रांतिकारक जमविले. बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हाइसरॉयवर बॉम्ब टाकण्याची योजना आखली.

रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त होते. त्यांचा जन्म 25 मे 1886 रोजी झाला. विद्यार्थीदशेतच ते चंद्रनगरच्या तरुण क्रांतिकारी गटात सहभागी झाले. श्रीष घोष व अमरेंद्र चटर्जी यांनी त्यांना क्रांतिदीक्षा दिली. मुलगा शिकत नाही म्हणून वडिलांनी पुढे त्यांना सिमल्याला आणले. घरीच इंग्रजी व टंकलेखन शिकविले. दोन्हीत चांगली प्रगती झाल्यावर आपल्याच छापखान्यात चिकटवून दिले. स्वतंत्र वृत्ती व क्रांतीकडे ओढा असल्यामुळे घर सोडून दूर डेहराडूनला जंगल खात्यात रासबिहारींनी नोकरी धरली. त्या वेळी बंगालच्या अनेक शहरांतून त्याचप्रमाणे बनारस, दिल्ली, लाहोर इ. शहरांतून क्रांतिगट कार्यरत होते.

प्रत्येक गटात एक तरी बंगाली असायचाच. त्यामुळे रासबिहारींना या सर्वांशी संबंध ठेवणे सुलभ गेले. 1912 च्या मध्यास त्यांनी बंगाल-चंद्रनगरला जाऊन बॉम्ब व बॉम्ब साहित्य आणि अनेक तरुण क्रांतिकारक जमविले. बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हाइसरॉयवर बॉम्ब टाकण्याची योजना आखली. 22 डिसेंबरला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे भारताची राजधानी सुरू करणार होते. आदल्या दिवशी रासबिहारी डेहराडूनहून व त्यांचे मित्र बसंतकुमार लाहोरहून दिल्लीला आले. एका क्रांतिकारक मित्राकडे दोघेही उतरले. दुसर्‍या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हाइसरॉयसाहेबांवर बसंतने बॉम्ब फेकला.

हार्डिंगना गंभीर इजा झाली. पुढे रासबिहारींनी पुरविलेल्या बॉम्बच्या साहाय्याने व बसंतकुमारच्या मदतीने लाहोर गटाने खळबळ उडवली. अनेक भाषांवर प्रभुत्व, गुप्ततेच्या नियमांचे काटेकोर पालन, चाणाक्षपणा, हजरजबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी असल्यामुळे रासबिहारी पुढे काही महिने पंजाब, बनारस, चंद्रनगर येथे राहिले. शेवटी जून 1915 मध्ये ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले. तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी क्रांतिकार्य चालू ठेवले. अशा या महान क्रांतिकारकाचे 21 जानेवारी 1945 रोजी निधन झाले.