ढिसाळ व्यवस्थेच्या धोकादायक शहरात…

ठाण्यात वाहनांना आगी लागण्याचे प्रकार वाढले आहेत. व्यक्तीगत वादातून सोसायटीच्या आवारातील किंवा रस्त्यावर लावलेल्या वाहनांना आग लावली जात आहे. या आगींमुळे जवळपासची इतर वाहने आणि दुकानेही भस्मसात झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. ठाण्यातील खुल्या डीपींना आग, कचर्‍याला आग, झाडांच्या बुंध्याला आग लावून झाडांना जिवंत जाळले गेल्याची घटना घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथे नुकतीच उघडकीस आली.

ठाणे शहर, तालुका परिसरातील अनेक इमारतींची उभारणी करताना सुरक्षा नियमांचा उडालेला बोजवारा हा नवा विषय नाही. नेहमीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्याआधी हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. उल्हासनगर, नालासोपारा, अंबरनाथ, कल्याण डोंबिवली, अगदी ठाण्यातील अग्निशमन दलाच्या नियमांना हरताळ फासून इमारती उभ्या राहिल्या आहेत. भिवंडी, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरातील झोपडीवजा चाळींमध्ये राहाणारे रहिवासी धोक्याच्या सावटाखालीच राहात आहेत. बेकायदा उभारलेली बांधकामे, झोपडपट्ट्या, चाळींमध्ये राहाणार्‍यांना या नरकात रहाण्यासाठी हतबल करण्यासाठी येथील व्यवस्था कारणीभूत आहे. क्लस्टर, स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहताना ठाणे शहर आणि तालुक्यातील अस्ताव्यस्त वाढलेल्या वस्त्यांचे करायचे काय….हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न दरवर्षी यंत्रणांकडून चर्चिला जातो. एखादी इमारत कोसळून अनेकांचे जीव गेल्यावर त्यातील गांभीर्य यंत्रणांच्या ध्यानात येते. पावसाळा येण्याआधी या धोकादायक इमारतींवर नोटीस चिकटवण्याचे सोपस्कार अधूनमधून केले जातात आणि आपले कर्तव्य पार पाडल्याचे समाधान व्यक्त केले जाते. स्फोटकांच्या शहरात राहणारे नागरिकही अशाच खोट्या समाधानात नाईलाजाने जगत असतात, भळभळत्या वेदनेला आनंदाचे नाव दिल्याने दुखणं थांबत नसतं. मात्र ही बेपर्वाईची ठिणगी आपल्याही वस्तीत, इमारतीत, घरापर्यंत कधीही पोहचू शकते. हा वणवा पेटण्यापूर्वीच वेळच्या वेळी तो नियंत्रणात आणायला हवा, उदासीनतेच्या या आगीची धग वेळीच आटोक्यात यायला हवी.
ठाणे किंवा अगदी मुंबईतही रेल्वेस्थानक परिसराला लागून पदपथावरच खाद्यपदार्थ विक्री केले जातात, हे पदार्थ अनेकदा आरोग्यास हानीकारक ठरतात, मात्र हे पदार्थ ज्या रस्त्यावरच बनवले जात असताना त्यासाठी लागणारा सिलिंडर रस्त्यावरच ठेवलेला आढळतो. त्याला खेटूनच माणसांची पदपथावर ये-जा सुरू असते, चहाच्या टपरी, वडापावच्या गाड्या, ऑम्लेटपावच्या गाड्या रस्त्यावरच लावल्या जातात. ठाण्यात या गाड्यांना लागूनच एसटी, वाहनांची येजा सुरू असते. त्यामुळे अपघाताचा धोका असतोच. मुंबई आणि ठाण्यातील झोपडपट्टी, चाळवजा वस्त्यांमध्ये रस्तेच नसल्याने अग्निशमन दलाचे वाहन पोहचणे अवघड होऊन बसते. त्यामुळे हानी वाढते, पावसाळ्यात स्थिती आणखी धोकादायक होते.

ठाण्यात वाहनांना आगी लागण्याचे प्रकार वाढले आहेत. व्यक्तीगत वादातून सोसायटीच्या आवारातील किंवा रस्त्यावर लावलेल्या वाहनांना आग लावली जात आहे. या आगींमुळे जवळपासची इतर वाहने आणि दुकानेही भस्मसात झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. ठाण्यातील खुल्या डीपींना आग, कचर्‍याला आग, झाडांच्या बुंध्याला आग लावून झाडांना जिवंत जाळले गेल्याची घटना घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथे नुकतीच उघडकीस आली. याशिवाय लिफ्टच्या डक्टमध्ये लागलेली आग, हॉस्पिटल्समध्ये आगीच्या घटना वाढल्या आहेत. ठाण्यातील डंपिंग ग्राऊंडवर आगी लावल्या जातात किंवा लागतात. उन्हाळ्यात या घटना वाढत आहेत. डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्‍यातून वायू उत्सर्जन झाल्यावर त्या ठिकाणी वाढत्या तापमानामुळे आग लागते. अनेकदा या आगी जाणीवपूर्वक लावल्या जातात. भिवंडी आणि परिसरातील गोदामे पेट घेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. भिवंडी अंबरनाथमध्ये कारखान्यात आगी लागण्याच्या घटनांमागे संशयाचा धूर आहे. अनेकदा विम्याच्या रकमेसासाठी अशा आगी जाणीवपूर्वक लावल्या जात असल्याचा आरोप होतो. मात्र या आगींमुळे मानवी जीविताला कमालीचा धोका निर्माण झाला आहे. ठाण्यातील भिवंडी परिसरातील गोदाम, कंपन्या आणि कारखान्यांना आग लागण्याच्या घटना नव्या नाहीत. ठाण्यातील या भागात रोज एखाद दुसरी आगीची घटना घडते. मात्र त्यात जीवितहानी झालेली नाही, असं समजून या ज्वालाग्राही ठिकाणांकडे साळसूद दुर्लक्ष केले जाते. स्थानिक प्रशासन, नागरी यंत्रणा, सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणा, अग्निशमन दल आदी विभागांचे होणारे दुर्लक्ष भविष्यातील मोठ्या दुर्घटनेची चाहूल असते.

आपल्या देशात किंवा राज्यात एकूणच सुरक्षासाधने आणि अग्निसुरक्षेबाबत कमालीची उदासीनता आहे. ठाण्यासारख्या ठिकाणी बेकायदा इमारती आणि बांधकामे उभारली जात आहेत. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली तर वसई विरार भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वस्त्या, वसाहती उभारल्या गेल्या आहेत. या वस्त्यांमध्ये अग्निशमन यंत्रणांच्या नियमांना दिलेली बगल धोकादायक आहे. यात स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांंमधील कर्मचारी तसेच बिल्डर लॉबी यांचे हितसंबंध आहेतच. इमारत उभी करताना इमारतीच्या आवारात अग्निशमन दलाचा बंब जाऊ शकेल एवढी जागा मोकळी ठेवणे बंधनकारक आहे. इमारतीमध्ये आपत्काळात बाहेर पडण्याचा मार्ग, अग्निशमन जलवाहिनीची यंत्रणेची निगा आणि दुरुस्ती महत्वाची आहे. परंतु बांधकाम व्यावसायिक आणि सहकारी सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांनाही मोठी दुर्घटना झाल्यावर जाग येते. भिवंडी, ठाणे तसेच उल्हासनगरसारख्या ठिकाणी आणि झोपडपट्ट्यांमधील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये अग्निशमन दलाचे वाहन पोहचणे जवळपास कठीण आहे. कंत्राटदार आणि स्थानिक नेत्यांच्या संगनमताने सुरू असलेली रस्त्यांची न संपणारी कामे, आपत्काळातील अग्निशमन, रुग्णवाहिका, पोलिसांची मदत वेळेवर न पोहचवण्यात भर घालतात. रस्त्यावरील अतिक्रमणे त्यात भर घालतात. नागरी जगण्यातील हे प्रकार एवढे अंगवळणी पडलेले आहेत की, हे असंच असतं, हे नागरिकांनी गृहीत धरलेलं असतं आणि हे धोकादायक जगणं जगण्याचा भाग बनवलेलं असतं.

नागरी वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी वडापाव, चायनीसच्या नावावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या असतात. लॉकडाऊन काळात बेरोजगारी वाढल्याने त्यांची संख्या वाढलेली आहे. या ठिकाणी वापरले जाणारे गॅस सिलिंडर अनेकदा घरगुती वापरातील एलपीजी असल्याचे स्पष्ट होते. एलपीजीच्या व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठीचे निकष वेगवेगळे आहेत. मात्र हे प्रकार कायमच नियम डावलून सुरू असतात. रस्त्यावरील हे सिलिंडर स्फोटकांपेक्षा कमी धोकादायक नसतात. कित्येक ठिकाणी गॅस एजन्सींची कार्यालये आणि सिलिंडर्सची गोदामे निवासी इमारतींच्या खालच्या गाळ्यात बनवण्यात आलेली असतात. या सिलिंडर्सवर रहिवाशांची घरे असतात. रोजच्या वापरातील गॅस सिलिंडरच्या बाबतीत राबवले जाणारे हे ढिसाळ धोरण मोठ्या दुर्घटनांना कारण ठरू शकते. हाच प्रकार थोड्याफार फरकाने वीज यंत्रणेच्या बाबतही पाहायला मिळतो. ठाणे जिल्ह्यातील बेबंदपणे वाढणार्‍या नागरी वस्त्या याही आगीच्या धोक्यांना आमंत्रण देणार्‍या आहेत. उल्हासनगरसारख्या ठिकाणी गल्लीबोळात बेकायदा कारखाने चालवले जातात. वस्ती अनधिकृत, व्यवसाय बेकायदा आणि वीज चोरी करून चालवले जाणारे उद्योग असा हा त्रिकोण असतो. वीज चोरीमुळे आगीचा धोका वाढतो, याशिवाय धोकादायक डीपी, नादुरुस्त वीजतारांमुळे स्थिती भयानक होते. बेकायदा वस्त्यांमध्ये असलेल्या दाटीवाटीच्या घरांमध्ये जीर्ण झालेल्या इमारतीतील एखाद्या कोपर्‍यात विजेचे मीटर वायरी लोंबकळलेल्या अवस्थेत आढळतात. वीज चोरी हा मूलभूत अधिकार असल्यासारखी स्थिती या ठिकाणी असते. वीज यंत्रणांचे अधिकारी कारवाईसाठी गेल्यावर त्यांनाच उलट धमकावले जाते, ही परिस्थिती नेहमीचीच असते.

ठाणे परिसरातील ग्रामीण भागातील दवाखान्यांमधील आरोग्य आणि अग्निशमन यंत्रणेचा बोजवारा हा स्वतंत्र विषय आहे. ठाणे शहर परिसरात उंचच उंच इमारती उभ्या राहात आहेत. अशा परिस्थितीत हायड्रॉलिक शिडी, बदलत्या काळानुसार अत्याधुनिक अग्निशमन उपकरणांची गरज आहे. उपलब्ध साधनांमध्ये अग्निशमन, बचावकार्य करणे हे या दलातील जवानांचा धोका वाढवणारे आहे. आगीची एखादी मोठी घटना घडल्यावर जाग येणार्‍या सरकारी यंत्रणा, धावपळ करणारे बचाव अधिकारी, सभागृहांमध्ये होणारी राजकीय आरोप-प्रत्यारोपांची चर्चा, माध्यमांवर झळकणार्‍या तात्पुरत्या दिवसाच्या बातम्या हे चित्र कमालीचे उदासवाणे आहे. ठाणे जिल्ह्यात क्लस्टर, झोपडपट्टी पुनर्विकास, मेट्रो असे मोठे प्रकल्प राबवले जात आहेत. विकासाचे हे लोण जवळपासच्या तालुका आणि ग्रामीण परिसरातही पसरत आहे. हे होत असताना सरकारी सुरक्षा यंत्रणांच्या मंजुरीच्या प्रश्नांचे गांभीर्य भ्रष्ट व्यवस्थेत कुणालाही राहिलेले नाही. या स्फोटकांच्या साठ्यांवर ही नवी शहरे उभारली जात आहेत. घर, इमारतींच्या बाल्कनीजवळून हाय व्होल्टेज वीज तारा जाणे आता धोकादायक राहिलेले नाही. रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या रस्त्यावरील टपर्‍यांवरील ज्वालाग्राही सिलिंडर्सच्या लाल तांबड्या रंगांचा धोका आता कुणालाही वाटत नाही. त्याच रस्त्यावरू वेगाने ये-जा करणारी इंधन टाकी भरलेली वाहने, ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारे टँकर्सचा धोका नागरिकांच्या अंगवळणी पडलेला आहे. आपली शहरं ही ढिसाळ व्यवस्थेच्या एका मोठ्या धोकादायक कधीही फुटू शकणार्‍या तापलेल्या सिलिंडर्सवर वसवली जात आहेत. विकासाची ही सूज आहे त्याला बाळसं किंवा सदृढतेचं नाव देणं म्हणजे आपली आपणंच फसवणूक करून घेण्यासारखं आहे. किती सरकारे आली आणि गेली, अधिकारी आले, गेले मात्र ही स्थिती आहे तशीच आहे.