Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सॅनिटायझर?

पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सॅनिटायझर?

कोरोना कधीच गेला नव्हता. पण मधल्या काळात जीवाच्या भीतीने का असेना, पण लोकांनी राज्य सरकार व पालिकेने ज्या काही सूचना दिल्या त्या तंतोतंत पाळल्या. यामुळे कोरोना नमला खरा. पण तो कधीच गेला नव्हता. नुसत्या भारतातच नाही तर जगाच्या कोणत्याही देशातून तो कधीच गेला नाही. तो होता पण आपण फक्त योग्य काळजी घेत त्याच्याबरोबर जगायला शिकलो. पण आता आपल्यालाच आपल्याच शिस्तीचा विसर पडलाय. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून फक्त नावापुरताच उरलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आता मास्क आणि सॅनिटायझर वापरायचे की, पुन्हा लॉकडाऊन ओढवून घ्यायचा ते आपणच ठरवायचे आहे.

Related Story

- Advertisement -

31 डिसेंबर 2020 च्या मध्यरात्री 12 च्या ठोक्याला संपूर्ण जगाने 2021 चं जोरदार स्वागत केले. पण त्याचबरोबर संपल बाबा एकदाच कोरोनाच वर्ष असं म्हणत सुटकेचा नि:श्वासही टाकला. कारणही अगदी तसंच होतं. 2020 च्या फेब्रुवारीपासून भारतासह अनेक देशात थैमान घालणारा कोरोना डिसेंबरला नियंत्रणात आल्याचं चित्र निर्माण झालं आणि अख्खं जगं हळूहळू का असेना पण रिलॅक्स झालं. अमेरिकेपासून भारतापर्यंत सगळ्यांचीच जगण्याची लढाई पुन्हा सुरू झाली. माणसं माणसात मिसळली. बेफिकीरी वाढली. तोंडावरचे मास्क हनुवटीवर लटकायला लागले. सॅनिटायझरचा वापर लोक विसरले आणि घात झाला. इतक्या महिन्यांनंतर थंडावत असलेला कोरोना पुन्हा चवताळला. कधी ट्रेनच्या गर्दीतून तर कधी बसच्या धक्काबुक्कीतून तर विकेंड पार्ट्या, पिकनिकमधून आणि बाजारातून तो थेट पुन्हा आपल्या उंबरठ्यापर्यंत आलाय. तर काही जणांच्या थेट घरात गेलाय. 14 दिवस त्यांना आता पुन्हा बंदिस्त व्हावं लागेल. तर काहीजणांना रुग्णालयं गाठावं लागेल. व्हेंटिलेटर आहेत. पण श्वास घेताच येईल याची आता शाश्वती नाही. कारण आता अवतरलेला कोरोना जे रुपडं बदलून आलायं ते अधिकच घातक आहे.

मुंबईसारखी शहरं तर त्याच्या टार्गेटवरच आहे. जिथे गर्दी तिथे कोरोना येणारंच हे आपल्याला वर्षभरापूर्वीच माहीत झालंय. म्हणूनच तर देशात लॉकडाऊन झाला. कधीही न थांबणारी मुंबईसारखी शहरं कोरोनाच्या धास्तीने घरात बंदीस्त झाली होती. कामकाज ठप्प झाल्याने उपासमारीने तळमळणारे मजूर याच कोरोनाच्या धास्तीने हजारो किलोमीटर पायी चालत पोराटोरांना घेऊन गावी निघून गेले. तर काहीजणांनी रस्त्यातच प्राण सोडले. तर काहीजणं रेल्वेखाली चिरडले गेले. काहीजण घरात बसून वेडे झाले. हातात काम नाही याच विचाराने अनेकांना नैराश्याने ग्रासले. ज्यांना त्यातून निघणं शक्य झालं. ते जगले. ज्यांना रितेपणाचा तो ताण सहन नाही झाला त्यांनी स्वत:चा जीव तर घेतलाच पण बायका पोरांचे हाल नको म्हणून त्यांनाही यमसदनी पाठवले. तर काहीजणांच्या जवळच्या लोकांना कोरोनानेच नेले. अख्खं वर्षच कोरोनाने गिळंकृत केलं. तर डॉक्टर, नर्से, आरोग्य कर्मचारी व पोलीस जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करत होते. यात कैक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पोलिसांना कोरोनाने गिळंकृत केलं.

- Advertisement -

पण केवळ शोक व्यक्त करण्यापलिकडे आपण मात्र काहीच केलं नाही. कोरोना योद्धा म्हणून त्यांना गौरवले जरी असले तरी त्यांनी गमावलेल्या जीवाचं काय? त्यांचा जीव आपल्यासाठी गेलाय हे का विसरतोय आपण. आपला जीव वाचवण्यासाठी ते लढले कोरोनाबरोबर. जसे जवान लढताहेत देशाच्या सीमेवर. पण ते युद्ध आपण बघू शकत नाही. पण कोरोनाचे युद्ध आपण प्रत्येकाने बघितलंय. अनुभवलंय. आज शोधून अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. ज्याने कोरोनामुळे ओळखीच कोणीच गमावलेलं नाहीय. कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात नेतानाचा तो अ‍ॅम्बुलन्सचा सायरनचा आवाज ऐकला की आजही धडधडायला होतं. कितीही आठवायचं नाही ठरवलं तरी डोळ्यासमोर ते प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले कोरोनाचे मृतदेह येतातच. त्यानंतर त्यांच्या आप्तस्वकियांनी फोडलेल्या हंबरड्याचा आवाज आजही कानात घोंघावतो. पण म्हणतात ना काळानुसार काही गोष्टींचा विसर पडतो. तसंच चित्र आता पुन्हा बघायला मिळतंय.

कोरोना कधीच गेला नव्हता. पण मधल्या काळात जीवाच्या भीतीने का असेना, पण लोकांनी राज्य सरकार व पालिकेने ज्या काही सूचना दिल्या त्या तंतोतंत पाळल्या. यामुळे कोरोना नमला खरा. पण तो कधीच गेला नव्हता. नुसत्या भारतातच नाही तर जगाच्या कोणत्याही देशातून तो कधीच गेला नाही. तो होता पण आपण फक्त योग्य काळजी घेत त्याच्याबरोबर जगायला शिकलो. पण आता आपल्यालाच आपल्याच शिस्तीचा विसर पडलाय. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून फक्त नावापुरताच उरलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. सद्य:परिस्थिती पाहता आपल्याच गलथानपणाने आणि फाजील आत्मविश्वासाने आपलाच घात केला असं म्हणणं अतिशोयक्ती ठरणार नाही. कारण जसजशी बाजारात कोरोनावरील औषधे आली. देशविदेशात कोरोनावरील लसी तयार होऊ लागल्या. तसंतशी माणसं बिनधास्त झाली. कोरोनातून बरे होणार्‍यांचा आकडा पाहून आपण रोज खूश होतो. कोरोना बिरोना काही नाहीये. सब छूट. फक्त साधा सर्दी खोकला.

- Advertisement -

काढे घेतले, गरम पाणी प्यायलं की कोरोना जातो. त्यातच आता रेमडेसिविर सारखी औषध-इंजेक्शनही आली आहेत बाजारात. त्यामुळे आपण बिनधास्त झालोय. त्यातच दिवसागणिक कोरोनामुक्तांचा आकडा वाढतोय व मृतांचा आकडा घटतोय. त्यामुळे कोरोनाची धास्ती आता लोकांमध्ये नाही. हे विनामास्क गर्दीत फिरणारे बघून समजतं. तर काहीजणांना ते राजकारणही वाटतं. त्यामागे अनेक कारणं आहेत आणि प्रत्येक कारणांमागे प्रत्येकाची आपआपली मतेही आहेतच. यामुळेच संपूर्ण 2020 मधले सण उत्सव घरात बसून साजरे करणारे अतिहौशी नागरिक डिसेंबर महिन्यानंतर मात्र सुटलेत. कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र समोर असल्याने राज्य सरकारनेही अटी शर्थी शिथिल केल्या. लोक एका गावातून दुसर्‍या गावात तर जाऊ लागलीच. पण पिकनिक पार्ट्यांच्या नादात परदेशवार्‍याही काही बड्यांनी घडवल्या. त्याचे फोटो इन्स्टावर टाकले. जे आपण मनापासून लाईक केलं. पण त्यांना कोरोनाची जराही आठवण करून दिली नाही. कारण आपणही कोरोनाला विसरलोय. यामुळे लोकांना अधिकच चेव चढला. गेला कोरोना असाच समज लोकांनी करुन घेतला.

मग काय नंतर राजकाऱण्यांनी मंदिरं, मशिद खुली करायला भाग पाडलं. लोक खूश झाले. सगळं पूर्वपदावर येत असल्याचीच ही नांदी असल्याचा फिल सगळ्यांना आला. मग काय लग्न समारंभात 50 च्या जागी शेकडो माणसं मागच्या दाराने यायला लागली. बघता बघता संभाव्य धोका ओळखून अटींवर मुंबईची लाईफलाईनही सुरू झाली. बस् आम्हाला हेच हवं होतं. कारण जर कोरोना असता तर ट्रेन सुरुच झाली नसती. असा समज अनेकांनी करून घेतला. मास्क तोंडाच्या ऐवजी खिशात कोंबून लोक गर्दी समारंभात मिरवू लागली. जानेवारीत तर बायांचं उत्सव प्रेम उफाळून आलं. हळदी कुंकूचे कार्यक्रम रंगले. लग्नातल्या हळदीत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवत लोकांनी मास्क न लावताच ताल धरले. सॅनिटायझरच्या ऐवजी दारूच्या बाटल्या खिशात ठेवलेले फोटोही व्हायरल झाले. आपण सगळ्यांनी त्याखाली कॉमेंट्स करत ते एन्जॉय केले. पण कोरोनाचं काय त्यावर कोणीच काही बोलले नाही आणि कोणी सांगितलेही नाही. आता मात्र चित्र बदलतंय. आपल्याच निष्काळजीपणाची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे.

पुन्हा कोरोनाचा उद्रेक आपल्याला परवडणारा नाही. पुन्हा लॉकडाऊन म्हणजे तेच टेन्शन, गरीबांची तिचं अन्नान दशा, तेच हाल, तोच काळ, अ‍ॅम्ब्युलन्सचा तोच भयानक सायरन, निर्मनुष्य रस्ते. बेकारी. त्यामुळे आलेले नैराश्य, नैराश्यातून होणार्‍या आत्महत्या, हत्या, अत्याचार, अन्याय….काय हवंय नक्की आपल्याला आपल्यालाच ठरवावं लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधताना तेच विचारलंय..त्यामुळे वेळीच शहाण्यासारखं वागायला हवं.

पुढचे संकट टाळण्यासाठी मास्क नियमित वापरायला हवा, सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला हवेत. सुरक्षित अंतर ठेवून लोकांशी संवाद साधायला हवा. उगाच गर्दीत घुसणे टाळायला हवे. पिकनिक पार्ट्यांना जरा आराम द्यायला हवा. अतिहौशीपणावर नियंत्रण ठेवायला हवं. कारण नियंत्रण हाच कोरोनावरील उपचार आहे. नाहीतर कोरोना तर अनियंत्रित होईलच. पण पुन्हा तसंच जगणं कठीण होईल. वेळीच सावध व्हायला हवं. कारण फेब्रुवारी संपत आलाय. कोरोना वाढतोय. जम्बो कोविड सेंटरमध्ये पुन्हा साफसफाई सुरू झाली आहे. व्हेंटिलेटरचे मेन्टेनन्स चेक केले जात आहेत. पीपीई किटच्या ऑर्डर वाढत आहेत. चित्र उलटायला लागलंय. लॉकडाऊनलाही 20 मार्चला वर्ष होतंय. ते वाढता कामा नये. हे आता आमच्या तुमच्या हातात आहे.

- Advertisement -