Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग आनंदघन होऊन बरसणारे कविवर्य वसंत बापट!

आनंदघन होऊन बरसणारे कविवर्य वसंत बापट!

कविवर्य वसंत बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष रविवारी 25 जुलैपासून सुरु होत आहे. या निमित्ताने रुईया कॉलेजमधील त्यांच्या विद्यार्थ्यांनी सरांविषयी व्यक्त केलेल्या या भावना...

Related Story

- Advertisement -

चार वर्ष म्हणजे 1965 ते 69 या काळात मी रुईया कॅालेजमध्ये होते. ती चार वर्ष म्हटलं तर झंझावती पण अतिशय आनंदाची होती… मोठे परांजपे, वसंत बापट, सरोजिनी वैद्य, प्रभुराम जोशी हे आवडते प्राध्यापक. पहिली देान वर्ष लांबून शिकवणारे हे शिक्षक बीएच्या दोन वर्षात जवळचे झाले ते स्नेह आणि माया ह्या धाग्यांमुळे. बापट सर शिकवत तर सुंदर, पण.बोलता बोलता विनोद, कोपरखळ्या, धडाधड कवितांवर कविता आणि स्वत:च्या कवितांसह बालक वींच्या, बोरकरांच्या, कुसुमाग्रजांच्या, पाडगांवकर, विंदांच्या कविता अशा काही अंदाजात शिकवत की अजूनही ते सारे आठवले की मन पिसारा होऊन हवेत तरंगू लागते.

.विनोद, आठवणी, नकला, कोपरखळ्या. मजाच मजा. सरांमुळे रुईया कॅालेज.हे आमच आनंद घर होत. लहान मुलाचं पाळणा घर असतं तसंच… बीएच्या दोन वर्षात सरांनी आमच्या मराठी विषय घेतलेल्या मुलामुलींच्या दोन सहली आयोजित केल्या.एक गोव्याला आणि दुसरी अजंठा वेरूळला. या दोन सहलींमध्ये आम्ही वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, बा. भ बोरकर, वा.ल. कुळकर्णी, ग. दि. माडगुळकर या मराठी साहित्यामधल्या देवादिकांना भेटलो. बाजी प्रभूसारखं आता मी सुखाने मरतो.’ असं म्हणण्याचे ते कृतार्थ दिवस होते. कवि अनिल आणि नाथ पै हे दोघे निमंत्रित पाहुणे म्हणून रुईया कॅालेजमध्ये आले होते. काय ती जगावेगळी माणसं. नाथ पै यांचे मंत्रमुग्ध करणार ते भाषण आणि व्यक्तिमत्व आणि अनिलांची ती ऋषितुल्य मूर्ती. गोव्याच्या सहलीत बाहेर गावाहून परत येणारे बा.भ. बोरकर आमच्यासाठी .. ‘सरीवर सरी आल्या ग’ गायले होते.

- Advertisement -

पाडगांवकर, करंदीकर आणि बापट सर भेटले की कॅाले मधले तीन वात्रट मित्र भेटावे तसे ते एकमेकांची मस्करी करत. तो खट्याळपणा अविस्मरणीय.

किती म्हणुन आठवणी. बापट यांच्यामुळे आमचे ते चिरतरुण दिवस होते. एक कवी, कलावंत आणि प्राध्यापक म्हणून सरांचे आम्ही ऋणी आहेत. कलेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रातलं त्यांच स्थान अभूतपूर्व होतं. त्यांच्या मुळे गावोगावी जाऊन मराठी साहित्याच्या आणि कलेच्या क्षेत्रातले रथी महाराथी भेटले. सरांचे स्थान कलेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात अपूर्व होते. गोव्याच्या सहलीत याचा प्रत्यय आला. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी यांचे मोठे आदरातिथ्य आम्हाला लाभले. कोजागिरीच्य रात्री समुद्रात डुंबलो.. मग साक्षात जितेंद्रअभिषेकींचे स्वर्गीय गायन… सहलीत मुलांच्या बरोबरीने वात्रटपणा, भन्नाट विनोद, नकला.. ‘ देतां किती ते घेशी दो कराने ‘ अशी ती गोव्याची सहल. सरांचं ‘ बारा गावचे पाणी ‘ वाचताना, दख्खन राणी ही कविता ऐकताना, शिकवताना जीभेवर सरस्वती नाचत असताना, भारत दर्शनचा प्रयोग बघताना, ते आणि पाडगांवकर, करंदीकर. अवखळपणा करत असताना, बोरकरांची ‘तुझे वीजेचे चांदपाखरु’ म्हणत असताना, नाथ पैंवर जीव ओवाळून टाकताना आणि .मी अमेरीकेला निघाले तेव्हा निरोप देताना, ‘येवढी का तुला सुपारी लागली?’ म्हणताना आणि

- Advertisement -

‘विस्मृती’ मध्ये शेवटी म्हणणारे…
माझा कोट तुझ्या खांद्यावर
शाल तुझी अन् माझ्या देही
चुकलो का मी पुन्हा? सांग मग
कशी भासली थंडी नाही?
– संध्या कर्णिक

सरांची आणि माझी भेट नक्की कधी, कशी आणि का झाली ते आता नक्की आठवत नाही. मी 1969 साली रुईया कॉलेजमध्ये इंटर सायन्सला प्रवेश घेतला. पहिले सहा महिने अभ्यास सोडून वक्तृत्व, नाटक, समूह गीत अशात मी जास्त वेळ घालवला. कदाचित त्यामुळे त्यांच्याशी ओळख झाली असेल. त्याशिवाय माझे वडील आणि सर हे एकाच वेळी एसपी कॉलेजमध्ये शिकत होते आणि एकमेकांना ओळखत होते आणि माझा पुण्यातून आलेला मित्र किशोर हा त्यांचा पुतण्या होता त्यामुळे पण असेल. पण आमचे खरा स्नेह जुळला तो ऑक्टोबर 1969 मध्ये गेलेल्या मराठी वाङ्मय मंडळाच्या गोव्याच्या सहलीत. 24 मुली, सहा मुलं, तीन प्राध्यापक (वसंत बापट, प्रभुराम जोशी आणि सदानंद रेगे), एक एसटी बस आणि तिचा ड्रायव्हर हे सर्व एका अदभूत यात्रेतले सहप्रवासी होते. त्यातून मी पाहिलं ते सरांचं एक वेगळंच रूप. रसिक, दिलदार, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे आणि अतिशय उच्च दर्जाचे आयोजक. त्या आठ दिवसांचा पूर्ण कार्यक्रम सरांनी इतका काटेकोर आणि विचारपूर्वक ठरवला होता.

कुठे जेवायचं, कुठे राहायचं, कोणाला भेटायचं, कोणत्या प्रेक्षणीय गोष्टी पाहायच्या, विद्यार्थ्याना कोणते अविस्मरणीय अनुभव द्यायचे, या सगळ्याचा पूर्ण विचार करून आखलेली ही सहल होती. त्यातून सरांचे सर्वत्र पसरलेले आणि उच्च स्थानी असलेले मित्र! आम्हाला वि. स. खांडेकरांच्या घरात बसून त्यांच्याशी बोलता आलं. बा. भ. बोरकरांच्या कविता वाचनाचा आनंद सावंतवाडी एसटी स्टॅन्डच्या हॉलमध्ये बसून घेता आला, प्रभाकर कारेकरांची मैफल त्यांच्या समोर बसून ऐकता आली. प्रतापगडाच्या तुळजा भवानीच्या देवळात बापट सरांनी लिहिलेली जय अंबे जगदंबे आरती त्यांच्या खड्या आवाजात म्हटलेली आठवून अजून अंगावर कांटा येतो. कोजागिरीच्या रात्री गोव्याच्या प्रसिद्ध कळंगुट बीचवरती आम्हा सर्वांबरोबर सरांनी मस्ती केलेली आठवते. महाबळेश्वरच्या तलावात बोटी भाड्याने घेऊन चांदण्यारात्री सर्वांनी हसत, गात काढलेला वेळ आठवतो.

सरांचे आणि माझे नाते जुळले याचे कारण त्यांची विद्यार्थिनी चंदा कुलकर्णी आणि माझा 1974 साली प्रेमविवाह झाला. चंदाच्या कुटुंबाशी सरांचे अगदी घरोब्याचे संबंध. त्यामुळे एका परीने मी त्यांचा जावई झालो. 1976 मध्ये सर आणि नलूताई अमेरिकेच्या दौर्यावर आले होते त्यावेळी ते आमच्या घरी ते एक आठवडा राहिले होते. त्यावेळची माझी आठवण म्हणजे एक सुप्रसिद्ध कवी याहूनही जास्ती आम्हा दोघांवर मनापासून प्रेम करणारी एक वडीलधारी व्यक्ती अशीच आहे. त्यावेळी गप्पा मारताना मी त्यांना सहज म्हटलं सर, तुम्हाला आठवणार नाही, पण चंदाची आणि माझी पहिली ओळख तुम्हीच रुईयामध्ये करून दिली. त्यांची प्रतिक्रिया असं का? आता मी मुंबईला गेलो की चंदाच्या आई वडिलांकडे जाऊन त्यांची मनापासून क्षमा मागतो!

वास्तविक मी भौतिक शास्त्राचा विद्यार्थी. सरांशी संबंध एक प्रसिद्ध आणि प्रतिभावंत कवी आणि गीतकार आणि आमच्या कॉलेज मधले प्राध्यापक या पलीकडे येण्याचं काहीही कारण नव्हतं. पण ऋणानुबंधाच्या या गाठीने माझं छोटंसं आयुष्य समृद्ध केलं. आता जेव्हा केव्हा जा सांग लक्ष्मणा, अजून त्या झुडूपांच्यामागे ही गाणी ऐकतो, बिजली हातात घेतो त्यावेळी सरांची प्रतिमा डोळ्यापुढे येते आणि मन आनंदाने भरून जातं…
– रवी आठले

1969 मध्ये मुबई च्या रुईया कॉलेज मध्ये फर्स्ट इयर आर्टस् ची विद्यार्थिनी म्हणून मी प्रवेश केला. रुईयामधले मराठीचे प्राध्यापक वसंत बापट ह्यांच्याशी सर्वांचे लाडके सर म्हणूनच ओळख झाली. माझी ताई तेव्हाची रोहिणी कुळकर्णी, मुंबई विद्यापीठामध्ये मराठीचे सुवर्ण पदक मिळवणारी सरांची पहिली विद्यार्थीनी. त्यामुळे एक-दोन वर्ष ताईचे सर म्हणून आमच्या घरी येऊन गेल्याच पण मला आठवतय. आम्ही सर्व मैत्रिणी सरांचं भारावून टाकणार शिकवणं मंत्रमुग्ध होऊन ऐकत असू. सरांचं रुबाबदार व्यक्तिमत्व आम्हाला खूपच आवडणार होतं. कॉलेजमध्ये नाट्य स्पर्धेसाठी तुझे आहे तुजपाशी मधला प्रवेश बसवला होता. त्यात कलाकारांच्या निवडीसाठी सर होते आणि मला गीताची भूमिका मिळाली. त्यामुळे पहिल्या वर्षी माझा त्यांच्याशी जास्त परिचय झाला. पुढे मी पण बीएला मराठी घेतल. त्याच्या आधी फक्त मराठी कादंबर्या वाचण्या पर्यंतच माझी मजल होती. पण त्या दोन वर्षात सरांमुळे मला कवी आणि त्यांचं काव्य यांची खरी ओळख झाली. झेंडूची फुले, मर्ढेकरांच्या कविता ह्या सरांच्यामुळे मला आनंद देऊन गेल्या. संतकाव्याचा आस्वाद मला सरांच्यामुळे घेता आला. 1970 मध्ये सरांनी मला राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात भारत दर्शन या कार्यक्रमात भाग घ्यायला येशील का? म्हणून विचारल तेव्हा मी तर पूर्ण भांबावून गेले.

अर्थात त्यांनी आणि सुधाताई वर्दे यांनी घरी येऊन माझ्या आई वडिलांची परवानगी घेतली आणि मी चेंबूरच्या टाटा इन्स्टिटयूटमध्ये एक महिना कॅम्पला गेले. यापूर्वी माझा राष्ट्रसेवादलाशी ना कधी माझा संबंध होता किंवा ना कोणाशी ओळख होती. एक सर सोडून मला कोणीही माहित नव्हतं. माझ्या आई-वडिलांनी सुद्धा मला सरांच्या विश्वासावर कॅम्पला पाठवून दिले. कॅम्पमध्ये माझ्या लक्षात आले की ते सर्वांचेच वसंतकाका होते. माझे पण ते वसंतकाका कधी झाले ते मला समजलंच नाही. त्या कॅम्पमध्ये आम्ही खूप मेहेनत केली. दिवसाचे 10 तास आम्ही नाचत असू. पण वसंतकाकांच्या मुळे आम्हाला खूप जगावेगळे अनुभव आले. भारत दर्शनला संगीत सलील चौधरी यांचं होतं. मग काय! सलिलदादा जातीने हजर असायचे. कोळी नृत्याच्या गाण्यासाठी गावातले कोळी यायचे आणि बरोबर ताज्या पापलेटचं कालवण करून आणायचे. कार्यक्रम पूर्ण बसल्यावर भारतभर गावोगावी आमचे कार्यक्रम व्हायला लागले.

भारताचा इतिहास नृत्यानाट्यातून मांडलेला आणि देशभरची लोकनृत्य पण सादर केली होती. जोडीला वसंतकाकांचं तेजस्वी आणि दमदार निवेदन त्यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायचे. दौर्यावर आमचे दिवस खूप खेळीमेळीचे आणि आनंदाचे होते. पण वसंतकाकांची शिस्त जबरदस्त असायची. कार्यक्रम वेळेवर चालू झालाच पाहिजे. त्यांना मुलगी नव्हती पण आम्ही सार्या त्यांच्या मुलीच होतो. 1974 मध्ये रवी आणि मी लग्न करून अमेरिकेला आलो. रवीची आणि माझी ओळख पण वसंतकाकाने करून दिली होती. माझ्या आयुष्यावर आणि जडण-घडणी वर वसंतकाकांचा खूप मोठा प्रभाव आहे. राष्ट्र सेवादलाच्या कलापथकामुळे सुधाताई -अनुकाका वर्दे आणि लीलाधर हेगडे या असामान्य आणि समाजकार्यात झोकून देणार्या मोठ्या व्यक्तींशी माझं एक वेगळच नातं जुळले. झेलम परांजपे आणि स्मिता पाटील या सारख्या कलावंत मैत्रिणींच्या खांद्याला खांदा लावून मला स्टेजवर नाचायला मिळालं. कलापथकाच्या संस्कारांमुळे आज मी सुद्धा समाजकार्याचा खारीचा वाटा घेऊ शकले. त्यांच्यामुळे रवी माझ्या आयुष्यात आला. वसंतकाकांचं माझ्यावर खूप मोठं ऋण आहे.

– चंदा कुलकर्णी

- Advertisement -