घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअयोध्यावारीला बंधूप्रेमाचे वलय अपेक्षित !

अयोध्यावारीला बंधूप्रेमाचे वलय अपेक्षित !

Subscribe

शिवसेनेने आपला राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याच्या आकांक्षेने अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करण्यास सुरुवात केली, पण त्यांच्या उमेदवारांना डिपॉझिटही वाचवता आले नाही. दुसर्‍या बाजूला शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेला सुरुवातीला लोकांनी प्रतिसाद दिला, पण अलीकडच्या काळात निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारांना डिपॉडिट्सही वाचवणे मुश्किल होऊन बसले आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राज ठाकरे अयोध्येला श्रीरामांच्या दर्शनाला जाणार आहेत. खरे ठाकरे बंधूंनी राम आणि लक्ष्मण यांच्यासारखे एकत्र राहून आपली जनमानसातील डिपॉझिट्स मजबूत करायला हवीत.

निवडणुकीत कुठल्याही पक्षाचा उमेदवार काही मतांनी पराभूत झाला तर त्याविषयी फारसे काही बोलले जात नाही, पण जर का त्याचे झिपॉझिटच जप्त झाले तर मात्र त्याच्या ‘लोकप्रियतेबद्दल’ उलटसुटल चर्चा होते. निवडणुकीत उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणे हा कमीपणा मानला जातो. कारण त्यावरून त्या उमेदवारासोबत त्या पक्षाचीही जनमानसात प्रतिमा खालावत असते. त्यामुळे एकवेळ पराभव झाला तरी परवडला पण डिपॉझिट जप्त होण्याची वेळ तरी येऊ नये, यासाठी उमेदवार आणि त्याचा पक्ष प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रातील ठाकरे घराणे हे भूमीपुत्रांच्या हक्कांसाठी लढणारे म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील मराठी माणसांना म्हणजेच इथल्या भूमीपुत्रांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. राज्यात काँग्रेसची सत्ता होती, त्यांचेही नेते हे मराठीच होते, पण ते नेते राष्ट्रीय पातळीवरच्या त्यांच्या नेत्यांच्या सूचनांनुसार काम करत असत, आपण भूमीपुत्रांचा विषय घेतला तर, आपल्यावर प्रादेशिकतेचा शिक्का बसेल अशी भीती त्यांना वाटत होती. त्यामुळे महाराष्ट्रीतील भूमीपुत्रांचे प्रश्न, महाराष्ट्राची अस्मिता याला सेक्युलरवादाचा बुरखा चढवून त्यात झाकून ठेवले.

या सेक्युलरवादाच्या बुरख्यात इथल्या भूमीपुत्रांची घसुमट होत असे. ती घुसमट व्यक्त करण्यासाठी त्यांना शिवसेनेचे व्यासपीठ मिळाले. शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक भूमीपुत्र असलेल्या तरुणांच्या मनातील न्यूनगंड दूर झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे झुंजार नेतृत्व आणि शिवसेनेचे हक्काचे व्यासपीठ यामुळे त्यांच्यातील उपेक्षितपणाची भावना दूर होऊन त्यांच्यामध्ये नवे चैतन्य निर्माण झाले. अल्पशिक्षित आणि भाजी विकणारे, भुर्जीपाव विकणारे, रिक्षा चालवणारे असे अनेक तळागाळातील भूमीपुत्र शिवेसेनेच्या माध्यमातून पुढे आले. आपण कधी आमदार, खासदार, मंत्री होऊ हे त्यांनी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते. ते शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना मिळाले. शिवसेनेच्या माध्यमातून अंगात हिंमत असलेला मराठी माणूस श्रीमंतही झाला. पुढे शिवसेनेची भाजपसोबत युती झाली आणि १९९५ साली राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. बरीच वर्षे पालिका पातळीवर असलेली शिवसेना प्रथमच राज्यपातळीवर आली होती. त्यावेळी त्यांचे बरेच आमदार निवडून आले होते. सुरुवातीला केवळ मराठी माणसांसाठी असलेल्या शिवसेनेला हे लक्षात आले की, महाराष्ट्रातील मराठी माणूस हा विविध विचारसरणींमध्ये विभागला गेलेला आहे. त्यामुळे त्यांची एकत्रित मते आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळे राज्यात केवळ मराठी माणसांच्या जीवावर एक हाती सत्ता येणे अवघड आहे. तसेच आपल्याला वरची पातळी गाठता येणार नाही. शिवसेनेचा मूळ पाया हा मुंबईत आहे. तिची स्थापनासुद्धा मुंबईत झाली. मुंबईत मराठी लोकांची संख्या मोठी असली तरी मुंबई हे एक बहुभाषिक शहर आहे. इथे देशाच्या विविध भागातून लोक येत असतात. त्यात पुन्हा मुंबईत उद्योगधंद्यात मग अगदी रस्त्यावर पाणीपुरी विकणार्‍या उत्तर भारतीयापासून ते मोठ्या कंपन्यांचे मालक हे अमराठी लोक असतात. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणेही आवश्यक होते.

- Advertisement -

सुरुवातीला शिवसेनेने दक्षिण भारतीयांचे मुंबईतील अतिक्रमण आणि दादागिरीविरोधात ‘बजाव पुंगी हटाव लुंगी’चा नारा दिला. पण नंतरच्या काळात त्यांना तो आक्रमकपणा आवरता घ्यावा लागला. कारण शिवसेनेचा विस्तार करायचा असेल तर मुंबईतील बहुभाषिकांना आपल्या पंखाखाली आणणेे आवश्यक होते. त्यामुळे केवळ मराठी माणसांपुरती असणार्‍या या संघटनेचा विस्तार करण्यासाठी व्यापक विचारसरणीची गरज होती. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्वाचा विषय हाती घेतला. शिवसेना ही मुळात हिंदुत्व मानणारी संघटना असली तरी त्यांचा मूळ विषय हा मराठी माणूस आणि त्याचे न्याय हक्क हा होता. पण पुढे भाजपसोबत आपला विस्तार होण्यासाठी त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका जाहीर केली. त्यामुळे प्रथम शिवसेनेची उत्तर भारतीय सेना स्थापन झाली. त्यातून उत्तर भारतातील मुंबईस्थित लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आता तो अगदी गुजराती लोकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वतीने गुजराती माणसांची अधिवेशने आयोजित करण्यात येत आहेत.

भाजप आणि शिवसेनेने युतीच्या माध्यमातून काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविरुद्ध टक्कर देत आपला प्रभाव वाढवला. पण पुढे भाजपसोबत आपलाही विस्तार झाला पाहिजे म्हणून शिवसेनेचे लक्ष हळूहळू महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेचे उमेदवार बाहेरच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये उतरवण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी बिहार, गुजरात राज्यांमध्ये असे प्रयत्न झाले, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण तरीही शिवसेनेने आपली जिद्द सोडली नाही. पुढे नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवर येऊन केंद्रात भाजपची बहुमताची सत्ता आली तेव्हा एडीएमधील घटक पक्षांची भाजपला तशी गरज उरली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांना महत्व देणेही कमी केले. इतकेच नव्हे तर भाजपने महाराष्ट्रात आजवर युतीत असलेल्या शिवसेनेला छोट्या भावाच्या भूमिकेत जाण्यासाठी भाग पाडणे सुरू केले, पण त्याला शिवसेना राजी नव्हती. महाराष्ट्रात काहीही झाले तरी शिवसेना नंबर वन असेल, अशी शिवसेनेची भूमिका राहिली. आज त्यांना जे मुख्यमंत्रीपद मिळाले आहे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे, ते अशाच जिद्दीतून शक्य झाले आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी ‘मी मुंबईकर’ ही मोहीम राबवली, पण त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. पुढे त्यांनी शिवसेनेचा विस्तार देश पातळीवर करण्यासाठी आपली हिंदुत्ववादी भूमिका व्यापक करताना इतर राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे केले, यथाशक्ती त्यांचा प्रचार केला. त्यात प्रामुख्याने ज्यांना भाजपने तिकीट नाकारले असे लोक होते. कारण तोपर्यंत भाजप हा शिवसेनेचा कट्टर स्पर्धक आणि विरोधक झाला होता. त्यामुळे अन्य राज्यांमध्ये विधानसभेच्या जागा लढवताना आपल्याला जिंकता आले तर ठिक, पण त्याचसोबत भाजपची मते कमी करून त्यांचे नुकसान करता येईल, त्यांना धक्का देता येईल, असा त्यात हेतू होता. त्यात अंशत: शिवसेनेला यश आलेही, पण त्यांना स्वत:चे उमेदवार काही निवडून आणता आले नाहीत. त्यांना त्यांची डिपॉझिट्सही गमवावी लागली. आता शिवसेना पश्चिम बंगालमधील विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे. तिथे त्यांना काही अनुभव येतो ते येणार्‍या काळात दिसेल.

एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची राज्याबाहेरील अशी स्थिती आहे. तर दुसर्‍या बाजूला राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्रात वेगळी अवस्था नाही. राज ठाकरे यांनी आपली घुसमट होत आहे, असे सांगून शिवेनेतून बाहेरची वाट धरली आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला. या पक्षाला सुरुवातीला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांचे तेरा आमदार निवडून आले. पण पुढे मात्र मनसेला निवडणुकीच्या राजकारणात उतरती कळा लागली. राज्य पातळीवर त्यांची सत्ता येणे तर दूरच पण प्रचंड गर्दी खेचणारे राज ठाकरे आपले उमेदवार निवडून आणण्यात अपयशी ठरू लागले. अलीकडच्या काळात तर मनसेच्या उमेदवारांना डिपॉझिट्स वाचवणेही अशक्य होऊन बसले आहे. खरे तर दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रात आपली संघटित ताकद लावली असती तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते. पण एक बंधू आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी अन्य राज्यांमध्ये आपली ताकद आजमावताना आपल्या पक्षाच्या उमेदवारांची डिपॉडिट्स वाचवण्यात अपशयी ठरत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात आपल्या होम पिचवर राज ठाकरे यांना आपल्या पक्षाच्या उमदेवारांची डिपॉडिट्स वाचवणे अशक्य होत आहे. खरे तर दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रात एकत्र येऊन आपल्या संघटित शक्तीचा आविष्कार घडवायला हवा.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -