जागोजागी ट्रॅप !

Subscribe

मनसेने बृजभूषण सिंह यांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा पुणे जिल्ह्यातील मावळ येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेतील फोटो ट्विट करून सिंह यांना शरद पवार यांनीच रसद पुरवल्याचा प्रचार सुरू केला आहे. पण, याहीपेक्षा ट्रॅप हा विषय आता महत्वाचा आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सध्या सुरू असलेल्या अनेक ट्रॅपची म्हणूनच चर्चा सुरु झाली आहे.

हनी ट्रॅप हा प्रकार सर्वसामान्यांच्या तसा माहितीतला. पण, राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करण्यामागे ट्रॅप असल्याचा गौप्यस्फोट करून राजकारणातही ट्रॅप असतात, हे उजेडात आणलं आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय ट्रॅपची चर्चा सुरू न झाल्यास नवल. हिंदुत्वाची भगवी शाल अंगावर घेतल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंगा आणि हनुमान चालीसाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशातलं वातावरण ढवळून टाकायला सुरुवात केली. अवघ्या काही दिवसातच राज ठाकरे राजकीय पटलावर प्रसिध्दीच्या झोतात आले होते. पण, अयोध्या दौर्‍यावरून त्यांच्या झंझावातालाच ब्रेक लागला. उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाणप्रकरणी माफी मागत नाहीत, तोपर्यंत राज ठाकरेंना उत्तर प्रदेशात पाय ठेऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतला आहे.

इतकंच नाही तर त्यांनी अयोध्येत माफी न मागता येऊनच दाखवावं, असंच अप्रत्यक्षरित्या आव्हानही राज ठाकरेंना दिलं. त्यामुळे 5 जूनचा दौरा रद्द करण्याची नामुष्की राज ठाकरेंवर आली. तिकडे बृजभूषण सिंह आव्हान देत असताना राज ठाकरेंनी मात्र मौन धारण केलेलं होतं. बृजभूषण सिंह भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार. त्यामुळे ब्रजभूषणची भाजपमधून कानउघडणी होऊन दौर्‍याचा मार्ग सुकर होईल, अशी काहीशी अपेक्षा कदाचित राज ठाकरे करत असल्यानेच मौन बाळगून त्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला वेळ घेतला असावा. भाजपने मौन धारण करत एकप्रकारे राज ठाकरे यांना धक्काच दिल्याची आता चर्चा आहे. या धक्क्यामुळेच की काय पुण्यातील सभेत नेहमीचे राज ठाकरे पहावयास मिळाले नाहीत. एकंदरीत त्यांचा भाषणाचा कल अगदी सावध होता.

- Advertisement -

जोरदार आणि दाबून बोलणारे ठाकरे या सभेत दिसलेच नाहीत. अयोध्या दौरा ट्रॅप होता, असं सांगणार्‍या ठाकरेंनी ठाकरे शैलीत कुणाचाही समाचार घेतला नाही. नाव न घेता त्यांनी हा ट्रॅप शरद पवार यांनीच लावल्याचं सांगितलं. तसंच भाजपबद्दलची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. पण, उघडपणे काही बोलण्याचं धाडस ठाकरे या सभेत दाखवू शकले नाहीत. गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले झाले, त्याबद्दल कोण माफी मागणार, असा संताप व्यक्त करत त्यांनी भाजपबद्दलची नाराजीही व्यक्त केली. पण, ठाकरेंच्या पुण्याच्या सभेत जोश दिसला नाही.

आता मनसेने बृजभूषण सिंह यांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा पुणे जिल्ह्यातील मावळ येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेतील फोटो ट्विट करून सिंह यांना शरद पवार यांनीच रसद पुरवल्याचा प्रचार सुरू केला आहे. पण, याहीपेक्षा ट्रॅप हा विषय आता महत्वाचा आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सध्या सुरू असलेल्या अनेक ट्रॅपची म्हणूनच चर्चा सुरु झाली आहे. अर्थातच भाजपमधूनच असे ट्रॅप गेल्या काही महिन्यांपासून लावले जात असून त्यात महाविकास आघाडीतील काही नेते अडकत असल्याचंही दिसून येत आहे. या ट्रॅपची सुरुवात पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यापासूनच झाली असंच जाणकारांचं मत आहे. आपल्या टीव्ही चॅनलवरून अर्णव सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच लक्ष्य करताना दिसत होते.

- Advertisement -

अर्णव यांनी तर अनेकदा मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत पदाचा अवमान केला होता. अर्णव यांचे पत्रकार 8 सप्टेंबर 2020 ला मुख्यमंत्र्यांच्या रायगड जिल्ह्यातील फार्म हाऊसमध्येही घुसले होते. या ट्रॅपमध्ये राज्य सरकार अडकलं होतं. पुढे 4 नोव्हेंबर 2020 ला अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामींना त्यांच्या मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती. हे अटकनाट्य त्यावेळी चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर टीव्ही टीआरपी स्कॅमप्रकरणात अर्णबसह त्यांच्या काही सहकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे ट्रॅपमध्ये अडकलेल्या राज्य सरकारला टीकेचाही सामना करावा लागला होता.

त्यानंतरचा ट्रॅप गाजला तो तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या साठ्याने देशभर खळबळ उडाली होती. याप्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह काही पोलिसांचा सहभाग असल्याचं समोर आलं. त्यानंतर याप्रकरणात ठाण्यातील हिरेन मनसुख या व्यापार्‍याचीही हत्या झाली होती. त्यामुळे 18 मार्च 2021 रोजी राज्य सरकारने परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती. त्यामुळे परबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लेटरबॉम्ब फोडला होता. देशमुख यांनी शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझेला दिल्याचा आरोप करण्यात आल्याने यात केंद्राने थेट हस्तक्षेप करून ईडी अनिल देशमुखांच्या मागे लावली. त्यातून देशमुखांना ईडीने गेल्या नोव्हेंबरमध्ये अटक केली. तेव्हापासून देशमुख तुरुंगातच आहेत.

हा प्रकार घडल्यानंतर ट्रॅपमध्ये अडकलेल्या राज्य सरकारने परबीर सिंह यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. पण, सिंह काही राज्य सरकारच्या हाती लागले नाहीत. सीबीआयकडे तपासाची मागणी केलेल्या सिंग यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा देत राज्य सरकारकडून तपास काढून सीबीआयकडे दिला. त्यामुळे आता केंद्र सरकारचाच हात डोक्यावर असल्याने सिंह राज्य सरकारच्या तावडीतून बचावले आहेत. त्यामुळे सिंंह यांना भाजपकडून मदत झाल्याचं समोर आलं असून हाही भाजपचाच ट्रॅप होता का, हा सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न आहे. समीर वानखेडेच्या ट्रॅपमध्ये फसून मंत्री नवाब मलिकांना तुरुंगात जावं लागलं. किरीट सोमय्यांच्या ट्रॅपने शिवसेना हतबल झाल्यासारखीच आहे. ठाकरे कुटुंबियांसह संजय राऊतांच्या मागे कटकटी लागल्या आहेत.

सोमय्यांनी आता अनिल परबांना आपलं लक्ष्य केलं आहे. राज्य सरकारला विशेषतः शिवसेनेला डोकेदुखी ठरत असलेल्या सोमय्यांना केंद्र सरकारने झेड प्लस सिक्युरिटी देऊन मैदानात सोडलं आहे. म्हणूनच हाही भाजपचाच ट्रॅप असल्याची शंका घेतली जात आहे. दुसरीकडे, ट्रॅप लावण्यास मदत केल्याने प्रत्येकालाच त्याची किंमत मोजावी लागली हेही तितकंच खरं आहे. अर्णब गोस्वामी, परमबीर सिंह, कंगणा रणौत, राणा दाम्पत्य यांच्या मागे राज्य सरकारने पोलिसांचा ससेमिरा लावून दिला आहे. किरीट सोमय्या यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. असं असलं तरी ट्रॅप लावून राज्य सरकारला अडचणीत आणण्यात भाजप यशस्वी होताना दिसत आहे. म्हणूनच एखाद-दुसर्‍याचा बळी गेला तरी फरक पडत नसल्याचं भाजपचं सुचक मौन खूप काही सांगतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -