Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग भोंगा ज्याच्या त्याच्या अस्तित्वाचा!

भोंगा ज्याच्या त्याच्या अस्तित्वाचा!

Subscribe

लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीच धार्मिक मुद्यांना हात घातला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. कुणी अयोध्येला जात असेल तर तो काही राष्ट्रीय विषय होत नाही, असा टोला लगावत पवार यांनी राज ठाकरे यांनाही खडे बोल सुनावले आहेत.

शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा लाभलेला महाराष्ट्रात राजकीय भोंग्यांचे आवाज दिवसागणिक डेसिबलच्या सर्वच मर्यादा तोडून कर्कशपणे वाजू लागले आहेत. काही महिन्यातच होणार्‍या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर 2024 ची लोकसभा आणि त्यानंतर होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय भोंगे आता चढ्या आवाजात महाराष्ट्रभर घुमू लागले आहेत. त्यामुळे अवघा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता राजकीय भोंग्यांच्या आवाजाने त्रासून जाऊ लागली आहे. सत्ता गेल्यानं भाजप चवताळली आहे. ईडीची पिडा मागे लागल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. त्यातूनच भाजप-शिवसेनेतील राजकीय संघर्ष शिगेला पोचला आहे. या संघर्षांची झळ आपसूकच राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोसावी लागत आहे. आपल्या अस्तित्वासाठी धडपड करत असलेल्या राज ठाकरेंनी भोंगा, हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

शिवसेनेशी वैयक्तिक वादापोटी किरीट सोमय्या आणि राणा दाम्पत्याने शिवसेनेविरोधात आघाडी उघडली आहे. त्यातूनच महाराष्ट्रात राजकीय भोंग्यांचे आवाज सर्व मर्यादा तोडून मोठ्या आवाजात सुरू झाले आहेत. देशात आणि महाराष्ट्रात अनेक प्रश्न बिकट झाले आहेत. इंधन दरवाढ आणि महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. केंद्र सरकारने उज्जवला योजनेतून खेड्या-पाड्यात घराघरात मोफत गॅस देऊन स्वतःची पाठ थोपटण्याचं काम केलं. पण, आता गॅस सिलिंडरचे दर एक हजारांहून अधिक झाल्यानं खेड्यापाड्यातील घराघरात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. कोरोनाने लाखोंचे रोजगार, व्यवसाय गेले आहेत. केंद्र सरकार इंधन दरवाढ आणि महागाई रोखण्यात अपयशी ठरले आहे.

- Advertisement -

विरोधात असताना महागाई आणि इंधन दरवाढीवर काँग्रेस आघाडीच्या सरकारला सातत्याने धारेवर धरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी आता याविषयावर बोलायला तयार नाहीत. ओबीसींचा प्रश्न सुटावा यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकार मदत करताना दिसत नाही. सत्ता आली तर चोवीस तासात ओबीसींना आरक्षण देऊ अशी घोषणा करणार्‍या भाजपच्या नेत्यांना खरोखरच महाराष्ट्रातील जनतेची काळजी असती तर सत्तेची वाट न पाहता हा प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवले असते. राज्य सरकारला मदत केली असती, पण तसे होताना दिसत नाही. एसटी कामगारांच्या प्रश्नातही भाजपनं केलेलं राजकारण लपून राहिलेलं नाही. संपकरी ज्या मागण्या करत होेते, त्या मागण्या सत्तेवर असताना भाजपने सपशेल नाकारल्या होत्या. आता सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणार्‍या एसटी कामगारांच्या संपाचं भाजपनं राजकारणचं केलं.

देश, राज्यात विविध पातळ्यांवर गंभीर स्थिती असताना महाराष्ट्रात मात्र भोंग्यांचं राजकारण तापवलं जात आहे. भोंगे, हनुमान चालीसा, अयोध्येला जाणे असे विषय राष्ट्रीय समस्या असल्यासारखे वापरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणण्याचं काम सध्या भाजप, मनसे आणि राणा दाम्पत्यांकडून सुरू आहे. ही मंडळी इंधन दरवाढ, महागाई, रोजगार, सध्या सुरू असलेली पाण्याची बिकट समस्या यावर आपले भोंगे वाजवताना दिसत नाहीत. महाराष्ट्रातील जाणकार जनतेला मूर्ख बनवण्याचं काम राजकीय नेत्यांकडून सुरुच आहे. भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी त्यांनी राज ठाकरेंना हाताशी धरलं आहे. आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरेंना टेकू हवाच होता.

- Advertisement -

भाजपच्या माध्यमातून हा टेकू मिळाल्यानं मनसेचं इंजिन भोंगा वाजवत फिरू लागलं आहे. शिवसेनेमुळे राजकीय अस्तित्व धोक्यात आलेल्या किरीट सोमय्यांच्या हाती केंद्रातील भाजपने भोंगा दिला आहे. सोमय्यांचा भोंगा त्यामुळे दिवसभर वाजत राहतो. शिवसेनेचे आनंदराव अडसुळांनी जात प्रमाणपत्राला आव्हान दिल्याने खासदार नवनीत राणा यांची खासदारकी तसंच राजकारणही धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हनुमान चालीसा पठणाचं निमित्त करून त्यांनी थेट मातोश्रीवर धडक देण्याचा प्रयत्न केला. अर्थात राणा दाम्पत्यालाही भाजपचीच फूस आहे, हे काही लपून राहिलेलं नाही. दुसरीकडे, ईडीची पिडा पाठी लागल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. मुंबई महापालिकेची सत्ता जाईल, अशी भीतीही शिवसेनेला वाटू लागली आहे. त्यामुळेच किरीट सोमय्या आणि राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. हादरलेल्या शिवसेनेच्या आक्रमक प्रतिक्रीयांमुळे सोमय्या आणि राणा दाम्पत्याला नको तितकं महत्व वाढवण्याचं काम होत आहे.

लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीच धार्मिक मुद्यांना हात घातला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. कुणी अयोध्येला जात असेल तर तो काही राष्ट्रीय विषय होत नाही, असा टोला लगावत पवार यांनी राज ठाकरे यांनाही खडे बोल सुनावले आहेत. पवार यांच्यासारख्या जाणकार नेत्यानं केलंलं भाष्य महाराष्ट्रात भविष्यात जातीय दंगली भडकू शकतात, असंच सूचित करतं. याआधी भोंगा, हनुमान चालीसावरून राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनीही जातीय दंगे होण्याची भीती व्यक्त केली होती. म्हणूनच राज्य सरकारच्या अपयशावर बोलणं अधिक गरजेचं असताना लोकांच्या धार्मिक भावनांना हात घालून महाराष्ट्राला वेठीस धरलं जात नाही ना, याचा सारासार विचार आता भोंगे वाजवणार्‍यांनी केला पाहिजे. विनाकारण भोंगे वाजवणार्‍यांना अवास्तव किती महत्व द्यायचं याचाही विचार प्रसारमाध्यमांनी केला पाहिजे. किरीट सोमय्या यांच्यासोबत मुंबईतील प्रसारमाध्यमांचा ताफा सोबत असतो.

सोमय्या जातील तिथं तिथं हा ताफा त्यांची सोबत करत असतो. त्यामुळे स्थानिक पत्रकारांशी सोमय्या फटकून वागत असल्याबद्दलची नाराजी आहे. राणा दाम्पत्य हनुमान चालिसाचं पठण करण्यासाठी अमरावतीहून मुंबईत येतं. खरं तर राणा दाम्पत्यानं अमरावतीत दिवसरात्र हनुमान चालीसा पठण केलं तर कुणाचीही हरकत नाही. तसंच कोर्टानंही त्यांना सुनावलं होतंच. पण, मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण ही भाजपचीच फूस असल्याचं लपून राहिलेलं नाही. राजकारणासाठी हनुमान चालीसा पठण करून सर्वसामान्यांना काहीच उपयोग नसताना, हा काही गंभीर प्रश्न नाही तरीही मीडियाचा ताफा त्यांच्यासाठी तैनात असतो. भ्रष्टाचार संपला पाहिजे, तो करणार्‍यांना चव्हाट्यावर आणलंच पाहिजे. सोमय्या आणि राणा दाम्पत्याने उचलेले किती प्रश्न सर्वसामान्यांशी निगडित आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन प्रश्न सुटून त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे आहेत का, याचा विचार टीआरपी वाढवण्याची धडपड करत असलेल्या मीडियानेही करायला हवा. एकंदरीत महाराष्ट्रातील राजकीय भोंग्यांचे आवाज सध्या डेसिबलच्या मर्यादा तोडून वाजत आहेत. त्यावर जनतेतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ती अधिक तीव्र होण्याआधीच भोंगे वाजवणार्‍यांना काळजी घेण्याची गरज आहे.

- Advertisment -