घरफिचर्समायमहानगर ब्लॉगवतनदारांच्या विळख्यात महाराष्ट्र माझा!

वतनदारांच्या विळख्यात महाराष्ट्र माझा!

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर असे लक्षात येईल की, महाराष्ट्र हा वतनदारांच्या विळख्यात सापडलेला आहे. राजकीय नेत्यांच्या रुपाने निर्माण झालेले हे वतनदार महाराष्ट्राची स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी पिळवणूक करताना दिसत आहेत. जेव्हा भाषेच्या आधारावर राज्यांच्या स्थापनेची सुरुवात झाली तेव्हा सर्व मराठी भाषिकांचे एक राज्य असावे, या उदात्त भावनेने संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यासाठी काही वर्षे सातत्याने लढा द्यावा लागला. त्यासाठी महाराष्ट्रातील जाणकार बुद्धिवाद्यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केले. त्यामागे मराठी भाषा आणि मराठी माणसाचा विकास ही समर्पित भावना होती. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या या लढ्यात १०७ आंदोलकांना आपले प्राण अर्पावे लागले. पोलिसांच्या गोळ्या त्यांना आपल्या छातीवर झेलाव्या लागल्या. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या मागे हे नवीन राज्य राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ठ्या अधिक प्रगल्भ व्हावे ही अपेक्षा होती. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रीदाचा कार्यभार स्वीकारल्यावर महाराष्ट्र विविधांगाने प्रगती करेल यासाठी पावले उचलली. त्यांनीच तयार केलेल्या पायवाटेने काही वर्षे महाराष्ट्राची वाटचाल सुरू होती. त्यावेळी काँग्रेस पक्ष हा मोठा होता.

इतर पक्षांची राज्यात सत्तेत येण्याइतकी ताकद नव्हती. काँग्रेसमध्येही गटतट होते. त्यांच्यात सत्तासंघर्ष चालत असे. पण पक्ष म्हणून ते एकत्र असत. पण काळ जसजसा पुढे सरकत राहिला, तशी परिस्थिती बदलत गेली. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राजकीय पक्षांची संख्या वाढू लागली आणि त्यांच्यामध्ये तटीतटीची सत्तास्पर्धा सुरू झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर काँग्रेस पक्ष सत्तेत आला. त्याच पक्षाचे जास्त मुख्यमंत्री होते. पण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे दिल्लीतील श्रेष्ठींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना भूमिका घ्यावी लागत असे. काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर आपले लक्ष केंद्रित करत असे, अशा वेळी त्यांचे प्रादेशिक लोकांकडे म्हणजेच भूमीपुत्रांकडे दुर्लक्ष होत असे. भूमिपुत्रांना त्यांच्या राज्यात पहिली संधी मिळायला हवी, अशी भूमिपुत्रांची अपेक्षा होती. महाराष्ट्र प्रगत राज्य असल्यामुळे आणि मुंबई ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे विविध राज्यांमधील लोक इथे कामाधंद्यासाठी येत असतात. त्यांच्या शिरकावामुळे भूमिपुत्रांचे हक्क डावलले जात होते. मुळात संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती हीच येथील भूमीपुत्र मराठी माणसाच्या विकासासाठी झालेली होती, असे असताना त्यांची उपेक्षा होऊ लागली. त्यातून शिवसेनेची १९६६ साली निर्मिती झाली.

- Advertisement -

मराठी तरुण-तरुणींना प्राधान्याने रोजगार मिळावेत, यासाठी शिवसेनेने रस्त्यावरची आंदोलने केली. त्याचा फायदा होऊन अनेक आस्थापनांमध्ये नोकर्‍या मिळाल्या. पुढे शिवसेनेने राजकारणात उतरून निवडणुका लढवल्या. १९८० साली केंद्रात जनता पार्टीचा फियास्को झाल्यानंतर त्यात सहभागी असलेल्या जनसंघाच्या नेत्यांनी वेगळ्या भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची मदत घेऊन त्यांनी आपला विस्तार करायला सुरुवात केली. राज्यात कम्युनिस्ट पक्षाची ताकद होती, पण ती कामगार क्षेत्रापुरती मर्यादित होती. त्यामुळे राज्यात सत्तेत येण्याएवढे बळ त्यांच्याकडे नव्हते. काँग्रेसमधून बंडखोरी करून शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी वेगवेगळे पक्ष स्थापन केले, वेगवेगळे प्रयोग केले, पण ते फार काळ टिकले नाहीत. पवारांना पुन्हा काँग्रेसच्या वळचणीलाच जावे लागले. शिवसेना आणि भाजप राज्यात आपला विस्तार करत होते, पण स्वबळावर राज्यात आपल्याला सत्ता मिळणे अवघड आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी हिंदुत्वाच्या आधारावर १९८९ मध्ये युती केली. या युतीचे सरकार १९९५ साली राज्यात सत्तेत आले.

काळ पुढे सरकत होता. अनेक वर्षे पक्षामध्ये आणि पक्षासाठी काम केलेल्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा अधिक टोकदार आणि बळकट होऊ लागल्या होत्या. त्यातून आपल्याला मुख्य पदापासून डावलले जातेय हे लक्षात आल्यावर छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले. पुढे शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यावर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पुढे त्यांना बाजूला करून नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. पुढे आपल्याला मुख्यमंत्रीपदी पुन्हा येण्यापासून दूर ठेवण्यात येत आहे, हे जाणवल्यावर राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आले होते. ते काँग्रेसने पुढे कधीच पूर्ण केले नाही. आता राणे भाजपप्रणित खासदार असून ते शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने बोचरी टीका करत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरे यांना निश्चित करण्यात आले. त्यातूनच राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा पक्ष ९ मार्च २००६ रोजी स्थापन केला.

- Advertisement -

शरद पवार हे मूळचे काँग्रेसचे आहेत. बरेचदा काँग्रेसमधून बाहेर पडून ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, पण १९९९ मध्ये मात्र सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्यावरून ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला नवा पक्ष स्थापन केला. तो मात्र त्यांनी आजवर कायम ठेवला आहे. महाराष्ट्रात काँग्रेससोबत ते सोयीस्कर आघाडी करत असले तरी या दोन्ही पक्षांची एकमेकांवर कुरघोडी करून मुख्यमंत्रीपद आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरूच असतात. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंधरा वर्षे तेच दिसून आले. सगळा महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या, मी महाराष्ट्राचा विकास घडवून आणतो, असे राज ठाकरे म्हणत असतात. त्यांच्या पक्षाला सुरुवातीला चांगले यश मिळाले, पण नंतर ते टिकवता आले नाही. राज्यात रिपब्लिकन पार्टी आहे, पण त्यांचे वेगवेगळे गट आहेत. रिपब्लिकन ऐक्य घडवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांच्यातही प्रमुख नेतेपद आपल्यालाच मिळण्यासाठी स्पर्धा आहे. राज्यात आणखीही पक्ष आहेत, पण त्यांची शक्ती कमी आहे.

राज्यात २०१४ साली शिवसेना आणि भाजप यांची अनेक वर्षांची युती तुटली. यामागे सत्तेचे पद हेच मुख्य कारण होते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असल्यामुळे आता आपणच राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवायचे असा भाजपने निर्धार केला होता. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी ठाम राहिली आणि भाजपशी संबंध तोडून त्यांनी वेगळ्या विचारसरणींच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यात पुन्हा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीत खास अर्धा तास चर्चा झाली. त्यातून पुन्हा वेगळे तर्कवितर्क निघत आहेत. महाराष्ट्राचा एकूण राजकीय पट पाहिला तर असे दिसते की, सगळ्या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना सत्तेच्या राजकारणात आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्यात अधिक रुची आहे. ज्या उदात्त हेतूने आणि व्यापक दृष्टिकोनातून संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती, त्याचा अलीकडच्या राजकीय नेते मंडळींना विसर पडल्याचे दिसत आहे. त्यांचा दृष्टिकोन केवळ स्वत:च्या राजकीय हितापुरता संकुचित झालेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी महाराष्ट्र वतनदारांच्या सवत्या सुभ्यांमध्ये विभागला गेला होता. वतनदार आपल्या स्वार्थासाठी आपापसात लढत होते, त्यांना राष्ट्रहिताचे काही पडले नव्हते. तेव्हा महाराष्ट्राला एकसंध करण्यासाठी शिवाजी महाराजांनी वतनदारी मोडून काढली. आता महाराष्ट्रात अलीकडच्या काळात फोफावलेली राजकीय वतनदारी मोडून काढून पुन्हा महाराष्ट्र एकसंध करणार कोण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -