१०० कोटींची दुसरी बाजू !

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर राहिलेले परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे केलेले आरोप पाहता ही कोटी कोटीची उड्डाणे पाहून सामान्य माणूस चकीत होऊन जातो. सध्या जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी, पोलीस ठाणी ही पैसे वसुलीची केंद्र झाली आहेत, असे विधान केले आहे. गेल्या ४० वर्षांत आणि प्रामुख्याने भारतीय बाजारपेठ १९९१ साठी जगासाठी खुली झाल्यानंतर मुंबईमध्ये पैशाची प्रचंड प्रमाणात निर्मिती होऊ लागली. त्यातूनच मग पुढे सत्ताधार्‍यांकडून त्या पैशाची वसुली सुरू झाली आणि त्यासाठी पोलिसांचा वापर केला जाऊ लागला. या बदललेल्या परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला १०० कोटी रुपायांची दुसरी बाजू लक्षात येईल.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅन्टिलिया या निवासस्थानसमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी ठेवली जाणे आणि मनसुख हिरेन यांचा संशयस्पदरित्या मृत्यू होणे या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे, यातील मुख्य आरोपी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याचे एकामागून एक कारनामे उघड होत आहेत. त्याने वापरलेल्या आलिशान गाड्यांची तर मालिकाच लागलेली आहे. हे प्रकरण तापू लागल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांची बदली करून यांना गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदी पाठवण्यात आले. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाने एक वेगळे वळण घेतले आणि त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आम्हा पोलिसांना महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करून द्यायला सांगितले. त्यांच्या या लेटरबॉम्बने हाहा:कार उडाला. तरीही अनिल देशमुख आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार दमाने घेत होते. पण हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि न्यायालायाने परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपींची सीबीआय चौकशी करावी, असा आदेश दिल्याने मग मात्र अनिल देशमुख यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याशिवाय काही गत्यंतर उरले नाही.

परमबीर सिंह यांनी महिना १०० कोटी रुपये वसूल करून देण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केल्याला काही दिवस उलटत नाहीत, तोच आता सचिन वाझे याने लिहिलेले एक पत्र उघडकीस आले आहे, त्यात त्याने आपली पोलीस खात्यात पुन्हा नियुक्ती होण्यासाठी शरद पवारांचे मन वळवण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्याकडे दोन कोटी रुपये मागितले होते. त्याचसोबत त्याने अनिल परब यांनी एसबीयुटी प्रकल्पाची चौकशी थांबवण्यासाठी आपल्याकडे ५० कोटी रुपये मागितले होते. तसेच महापालिकेतील ठेकेदारांकडून २ कोटी रुपये वसूल करून देण्यास सांगितले होते. घोडावतच्या गुटाखा घोटाळ्याची चौकशी करायला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला होता.

इतकेच नव्हे तर विद्यमान पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी परमबीर सिंह यांनीच सचिन वाझेची नियुक्ती केली आणि त्याला नको तितके अधिकार दिले, असे त्यांच्या अहवालात म्हटले आहे. अर्थात, हे सर्व आरोप संबंधितांनी अगदी शपथपूर्वक फेटाळून लावले आहेत. सध्या असे हे आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात अतिशय शिस्तप्रिय आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मीरा बोरवणकर यांनी एक विधान केले आहे, पण त्या पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या असल्यामुळे त्यांच्या विधानाची फारशी चर्चा झालेली नसावी. त्यांनी असे म्हटले आहे की, काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यानंतर राज्यातील पोलीस ठाणी ही मनी कलेक्शन केंद्र बनली. याचा अर्थ शंकररावांच्या नंतर परिस्थिती बदलली आहे. शंकरराव हे अतिशय शिस्तप्रिय होते, त्यामुळेच त्यांना हेडमास्तर असेही संबोधले जात असे.

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा केलेला आरोप आणि त्याच वेळी मुंबईच्या पोलीस उपायुक्त राहिलेल्या मीरा बोरवणकर यांनी पोलीस ठाणी ही पैसे वसुलीची केंद्र बनली आहेत, असे केलेले विधान. पोलीस खात्यातील या दोन उच्च पोलीस अधिकार्‍यांनी जे आपले विचार व्यक्त केले आहेत, त्याला विशेष महत्व आहे. कारण महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली आणि त्या पाठोपाठ २ कोटी, ५० कोटी वसूल करून देण्याची केलेली मागणी, अशा गोष्टी पुढे येत आहेत. हे सर्व ऐकल्यावर सर्वसामान्य माणसाला आश्चर्याचा धक्का बसतो. त्याला वाटते की, महिन्याभरात शंभर कोटी रुपयांची वसुली कशी काय शक्य आहे. ही जी भली मोठी रक्कम बोलली जात आहे, त्यात काही वास्तव असेल का? पण एकूणच बदललेल्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर १०० कोटी ही काही फार मोठी रक्कम नाही. माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी शंकररावांच्या कालावधीचा उल्लेख केला आहे.

तो काळ सुमारे ४० वर्षांपूर्वीचा आहे. मागच्या चाळीस वर्षात झपाट्याने अनेक बदल झालेले आहेत. काही गोष्टी तर कल्पनेच्या पलीकडे बदलेल्या आहेत. ४० वर्षांपूर्वी अगदी मुंबईसारख्या शहराचा विचार केला, तो काळ ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टीव्हीचा होता, म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये टीव्हींची संख्या जास्त नसायची, पण असले तरी ते ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट असायचे, त्या टीव्हीवर एकच चॅनेल असायचा. त्यात पुन्हा एका इमारतीत एका दोघांकडेच टीव्ही असायचा. बाकीचे लोक त्यांच्याकडे टीव्ही बघायला जायचे. त्यावेळी बिल्डिंगमध्ये एखाद्याकडे फोन असायचा तोही लॅण्डलाईन. त्यावेळी मोबाईल ही कवीकल्पना होती. इमारतीत फ्रिजही एखाद दुसर्‍याकडे असायचा. असा तो काळ होता. त्यावेळी सगळ्या गोष्टी अशा मर्यादित असायच्या.

मनोरंजनाची साधनेही मर्यादित होती. त्यावेळी सगळ्या थिएटरमध्ये एकच स्क्रिन असायची. मल्टी स्क्र्रिन थिएटर्स नव्हती. अगदी लग्नाच्या प्रकारांचा विचार केला तरी पारंपरिक पद्धतीने लग्न होत असत. त्यावेळी आतासारखे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, ट्रायल मॅरेज, लिव्ह इन रिलेशनशिप असे प्रकार निदान भारतात तरी उदयाला आलेले नव्हते. माणसांकडे पैशांची होणारी आवक आणि केला जाणारा खर्च हा मर्यादित होता. काही श्रीमंत लोक याला अपवाद होते. एखाद्या निवासी कॉलनीत दोन किंवा तीन चारचाकी गाड्या दिसायच्या. आता त्याच कॉलनीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला खेटून चारचाकी कार लावलेल्या दिसतात. काही कुटुंबामध्ये तर प्रत्येक सदस्याची वेगळी कार असते. ४० वर्षांपूर्वी बहुतांश मुले सायकल भाड्याने चालवायला आणत असत. आता तशी दुकानेही दिसत नाहीत. आता पालकांना आपल्या मुलांना स्वतंत्र सायकल घेऊन द्यायला परवडते.

काळ बदलत असताना सगळ्यात मोठे बदल व्हायला लागले ते १९९१ ला जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून. त्यामुळे बंदिस्त असणारी भारताची बाजारपेठ जागतिक वस्तू आणि लाईफ स्टाईलसाठी खुली झाली. पाश्चिमात्य जगातल्या अनेक गोष्टी आपण ज्या विदेशवारी केलेल्या लोकांकडून ऐकून होतो त्या थेट इथे आल्या. त्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट हे पूर्वी सर्वांना सहज उपलब्ध नव्हते. पुढील काळात मोबाईल आले. आज तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत, बहुतेकांच्या हातात अ‍ॅण्ड्रॉईड फोन आहेत. त्यावर इंटरनेट आहे. मोबाईलवरून अनेक आर्थिक व्यवहार माणूस बसल्या जागी करू शकतो. असे हे बदल होत गेले. या सगळ्या बदलांचा परिणाम ओघानेच मुंबईच्या जनजीवनावर झाला. यामुळे अर्थनिर्मितीची अनेक साधने निर्माण झाली. अनेक खासगी कंपन्या निर्माण झाल्या. रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. संगणकाचा सर्रास वापर सुरू झाला. इंटरनेटने सगळे जग जोडले गेले. परिणाम माणूस जगभरातील कुठल्याही आर्थिक संधी बसल्या जागेवरून मिळवू लागला. त्यानंतर पैशाची मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊ लागली. या सगळ्यासोबतच मुंबई आणि परिसरात गृहनिर्माण उद्योग मोठ्या प्रमाणात वाढू लागला. त्यावेळी एकेकाळी केवळ पडीक किंवा शेतजमिनी होत्या, त्यांना सोन्याचा भाव आला. त्यामुळे लोकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला.

मुंबईत दिवसा कामाधंद्यानिमित्त माणसांची धावपळ दिसते, वाहतुकीच्या विविध साधनांमधून लोक प्रवास करताना दिसतात. मुंबईत दिवसा जशी मोठ्या उलाढालीमुळे मोठ्या प्रमाणात पैशाची निर्मिती होते, तसेच मुंबईचे दुसरे रूप आहे, ते म्हणजे रात्रीची मुंबई. याही मुंबईत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. कारण नाईट लॉईफचा आनंद घेणारी बरीच मंडळी असतात. या नाईट लाईफचेही विविध प्रकार असतात. जिथे नाईट लाईफची सेंटर्स असतात, तिथे पैशाची प्रचंड निर्मिती होत असते. कारण बरेच लोक दिवसा कामावलेले पैसे, या रात्रीच्या मुंंबईवर उधळत असतात. दिवसाच्या आणि रात्रीच्या मुंबईतून निर्माण होणार्‍या या प्रचंड पैशाची वसुली करण्याचे काम पोलीसच करू शकतात. मुंबईत अनेक अधिकृत आणि अनधिकृत धंदे आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात हप्तेबाजी आणि वसुली चालत असते. काही वेळा तर आपल्या धंद्यांना संरक्षण मिळावे, म्हणून हप्ते पोहोचवले जातात. हा जो प्रचंड पैसा आहे, त्यावर राजकीय नेत्यांची नजर असते. त्यातूनच मग त्याच्या वसुलीचे काम पोलिसांवर येऊन पडत असते. आता आपण जे कोटी कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप प्रत्यारोप पाहत आहोत. त्याच्या मुळाशी गेल्या ४० वर्षात बदललेली सामाजिक परिस्थिती आहे, हे लक्षात घेतले तर आपल्याला या कोटी कोटीच्या उड्डाणांचे आकलन होऊ शकेल.