घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकर नाही तर डर कसला होता?

कर नाही तर डर कसला होता?

Subscribe

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड मौन धारण करत सार्वजनिक जीवनापासून तब्बल 15 दिवस अलिप्त होते. शेवटी 15 दिवसानंतर राठोड अखेर मंगळवारी ते जनतेच्या नजरेसमोर आले. विशेष म्हणजे त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत पूजा चव्हाण प्रकरणावर मौन सोडले. आपण या प्रकरणात निर्दोष आहोत, असे ते म्हणाले. संजय राठोड हे निर्दोष असले तर ही चांगली गोष्ट म्हणायला हवी. शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीने ही सुटकेची बाब ठरली आहे. पण, या प्रकरणात कर नव्हता, तर 15 दिवस डर कसला होता? हा एक साधा सरळ सामान्य माणसाला जो प्रश्न पडला होता, तोच माध्यमांना पडलाय. मूळची बीडची असलेली 22 वर्षीय पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती.

सोशल मीडियात विशेषत: टिकटॉकमुळे ती प्रचंड लोकप्रिय होती. 8 फेब्रुवारी रोजी तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचे बोलले गेले. त्या दिवसांपसून राठोड हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. सतत आरोप होत असूनही त्यांनी एकदाही आपली बाजू मांडलेली नाही किंवा ते माध्यमांसमोर आलेले नव्हते. मात्र, पूजा राठोड यांच्या कुटुंबियांची काहीच तक्रार नसल्याचे दिसल्यावर, आपला बंजारा समाज मोठ्या संख्येने आपल्यामागे, हे दाखवून झाल्यावर, कुटुंब कबिल्यासह कुलदेवतेचे दर्शन करून झाल्यावर, आपले समाज महाराज आपल्यासोबत असल्याचे सिद्ध केल्यानंतर आणि सत्ताधारी शिवसेना पक्ष आपल्या पाठीशी असल्याची खुंटी हलवून घट्ट केल्याची खात्री झाल्यावर मंत्रीमहोदय ‘मी निर्दोष’ असल्याचे सांगत पुढे आले आहेत. उभ्या महाराष्ट्राचा हा ‘तो मी नव्हेच’ हा प्रयोग पाहून डोळे भरून आले आहेत. त्याच्या तोंडून आता एक शब्द बाहेर पडायला तयार नाही…

- Advertisement -

मंत्री महोदयांनी माध्यमांनी आपल्यावरील आरोप हे षङ्यंत्र असल्याचे सांगत सर्व खापर माध्यमांच्या नावाने फोडण्याचा प्रयत्न केला. हे अपेक्षित होते. मात्र एक सवाल जो पुन्हा पुन्हा उभा राहतोय तो म्हणजे तुम्ही निर्दोष होता तर मग यासाठी तुम्हाला 15 दिवस का लागले. पूजा हिने आत्महत्या केल्यानंतर लगेचच तुम्हाला माझा या प्रकरणाशी काहीएक संबंध नाही. कुठल्याही चौकशीला सामोरे जायला मी तयार आहे, असे छातीठोकपणे सांगता आले असते. पण, तसे काही न करता आपण यासाठी 15 दिवस घेतलेत. हाच खरा प्रश्न आहे, बाकी काही नाही. या प्रकरणात भाजपाकडून राठोड यांच्या राजीनाम्याची सातत्याने केली जात होती. लोकशाहीत विरोधी पक्षाचे ते कामच असते. ते त्यांनी केले. एका लोकप्रतिनिधीला आपली राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी अनेक वर्षे द्यावी लागतात. मात्र एका आरोपामुळे या सर्व मेहनतीवर पाणी पडू शकते. यामुळे प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय संबंधित मंत्री, आमदार यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे बरोबर नाही, हे एकदम बरोबर. पण, एखादे प्रकरण होऊन गेल्यावर आणि 15 दिवस अज्ञातवासात गेल्यावर संजय राठोड जर म्हणत असतील, गेल्या 15 दिवसांत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मी चार वेळा निवडून आलो आहे. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. 30 वर्षांपासून काम करतोय. दहा दिवसांपासून अलिप्त होतो. या काळात मी माझे आईवडिल, माझी पत्नी आणि मुलांना सांभाळण्याचं काम करत होतो. तसेच शासकीय काम सुद्धा मुंबईतील फ्लॅटवरून सुरू होतं. माझं काम थांबलेलं नव्हतं. आज इथं दर्शन घेऊन पुन्हा एकदा कामाला सुरूवात करणार आहे, तर यावर पटकन कसा काय विश्वास ठेवायचा. संजय राठोड हे मुंबईतील फ्लॅटवरून काम करत होते, तर त्यांनी या काळात काय सरकारी काम केले, कोणत्या फायली हातावेगळ्या केल्या, कोणत्या सरकारी अधिकारी यांना भेटले हे एकदा त्यांनी सांगावे. खरेतर पूजा राठोड या आत्महत्या प्रकरणात अनेक शंका आहेत. त्याची उत्तरे अजूनही मिळालेली नाही.

- Advertisement -

तिच्याबरोबर राहणारा अरुण राठोड याचे या प्रकरणाशी काय संबंध आहेत यावर आणखी प्रकाश पडायला हवा. कारण पूजाच्या मृत्यूप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल का नाही? पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाल्यानंतर वानवडी पोलिसांनी नक्की काय तपास केला? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणात दुसरा सवाल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ज्या दोन तरुणांसोबत पूजा वानवडीतल्या फ्लॅटवर राहात होती त्या दोघांची थांगपत्ता कुणालाच नाही. पोलिसांनी या दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. पण त्यांनी नक्की काय जबाब दिला आहे, ते मात्र समोर आलेलं नाही. तसेच पूजा राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? पूजाच्या आत्महत्येनंतर दहाव्या दिवशी यवतमाळमधून महत्त्वाची माहिती समोर आली. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पूजा अरुण राठोड या महिलेची कागदपत्रं समोर आली आहेत.

पूजा अरुण राठोड नावाच्या महिलेचा गर्भपात झाल्याचा रिपोर्ट आला आहे. ही महिला नक्की कोण आहे हे अद्याप कळलेलं नाही. 6 फेब्रुवारीला पूजा अरुण राठोड नावाने कागदपत्र समोर आली आहेत. पूजाच्या मृत्यूनंतर तिच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टकडे सर्वाचं लक्ष होतं. 13 फेब्रुवारीला तिचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला. त्यामध्ये डोक्याला आणि मणक्याला जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं नमूद केले होतं. घटना घडली, त्या रात्री पूजाने मद्यप्राशन केलं होतं, असा उल्लेख जबाबात होता. मात्र पोस्टमॉर्टेममध्ये त्याचा खुलासा का केला नाही? पूजाचा मृत्यू झाला आणि सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. सोशल मीडियात फिरत असलेल्या ऑडिओ क्लिप खर्‍या आहेत की बनावट आहेत? याबाबत अजूनही कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. या क्लिपद्वारे मृत तरुणी आणि एका मंत्र्याचं नाव जोडलं जातं आहे.

शिवाय या क्लिपमधली तिसरी व्यक्ती ही अरुण राठोड असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या क्लिपची सत्य-असत्यता पडताळणं जास्त गरजेचं आहे. पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल कुठे आहे? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पूजाच्या लॅपटॉप आणि मोबाईलबद्दल कुणाला काहीही माहिती नाही. पूजाच्या मृत्यूनंतर तिचा मोबाईल आणि लॅपटॉप हे तपासामध्ये सर्वात महत्त्वाचा दुवा ठरले असते. पण तपास करण्यासाठी तो दुवाच पोलिसांकडे आहे की नाही याची माहिती नाही. याशिवाय आधी पूजा चव्हाणचा मृत्यू होतो, मग तिचा लॅपटॉप गायब होतो. मग तिच्यासोबतचे अरुण आणि विलास गायब होतात आणि आता अरुणच्या घरी चोरी होते. पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पण फक्त चोरीची चौकशी करुन भागणार नाही. या चोरीमागे काही वेगळे उद्देश होते का? याचाही तपास गरजेचा आहे. धारावती तांडा येथील अरुण राठोडच्या घरातून अनेक गोष्टींची चोरी झाली आहे. या सार्‍यांची उत्तरे अजून मिळायची आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -