घरफिचर्समायमहानगर ब्लॉगदोन हिंदुत्ववाद्यांची विघातक सत्तास्पर्धा

दोन हिंदुत्ववाद्यांची विघातक सत्तास्पर्धा

Subscribe

भाजप आणि शिवेसना यांची मुख्यमंत्रीपदावरून राजकीय फाळणी झाल्यानंतर एकेकाळी हिंदुत्वाच्या हितासाठी एकत्र आलेले हे दोन जिगरी दोस्त आता जानी दुश्मन बनलेले आहेत. या दोन्ही पक्षांमधील तेढ इतके पराकोटीला पोहोचले आहे की, त्याचे पुढील काळात केवळ महाराष्ट्रात नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर समाजविघातक पडसाद उमटतील की काय, अशा प्रकाराचे संकेत अलीकडच्या काळात मिळू लागले आहेत. सत्तेसाठी हे दोन पक्ष आज कुठल्याही थराला जायला तयार आहेत. भाजपला राज्यात शिवसेनेचे नेतृत्व असलेले महाविकास आघाडी सरकार पाडून आपले सरकार आणायचे आहे तर शिवसेनेला केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे बहुमताचे सरकार पाडून तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या नेतृत्वाला पंतप्रधानपदी बसवायचे आहे. अर्थात, यात पंतप्रधानपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असे बरेच दावेदार आहेत. असे असले तरी भाजपला समांतर असा पर्याय निर्माण करण्यासाठी शिवसेना सातत्याने झटत आहे. त्यासाठी शिवसेना विविध राज्यांमध्ये उमेदवारांची डिपॉझिट्स जप्त झाली तरी केवळ भाजपची काही मते फोडण्यासाठी त्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये उतरत असते.

आमच्या उमेदवारांची डिपॉझिट्स जप्त होऊन आमचा अवमान झाला तरी चालेल, पण भाजपचे आम्ही चमचाभर जरी नुकसान केले तरी त्यात आम्ही समाधानी आहोत, असाच शिवसेनेचा पवित्रा आहे. खरे तर या दोन पक्षांची मूळ विचारधारा हिंदुत्व आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख म्हणत आहेत की, आमचा विचार हा जरी हिंदुत्वाचा असला तरी आमच्या धारा वेगळ्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दोघांच्या धारांना जी काही धार चढत आहे, त्याला दिवसेंदिवस भयंकर रुप येताना दिसत आहे. भाजपला केंद्रात बहुत मिळाले आहे, त्यांना महाराष्ट्रात बहुमत मिळवायचे होते, त्यामुळे मी पुन्हा येईन, असे आत्यंतिक आत्मविश्वासाने देवेंद्र फडणवीस यांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सांगितले होते, पण ते काही जमले नाही. उलट, मुख्यमंत्रीपदही गेले आणि सत्ताही गेली. त्यामुळे काहीही करून महाराष्ट्रासारख्या प्रमुख राज्याची सत्ता भाजपला मिळवायची आहे. त्याच्यासाठी त्यांच्या मार्गात उडथळा ठरलेल्या शिवसेनेला हटवायचे आहे किंवा वाकवायचे आहे. पण त्यांना ते सध्या शक्य होत नाही, हिच त्यांची वेदना आहे.

- Advertisement -

राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला सापळ्यात पकडण्यासाठी भाजपने आरोप आणि कोटी कोटींच्या घोटाळ्यांची मालिका चालवली आहे. त्याची चौकशी चालू आहे. इतकेच नव्हे तर सरकारमध्ये माजी गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पण तरीही सरकार अबाधित आहे हेच भाजपचे मोठे दु:ख आहे. भाजप आणि शिवसेना एकमेकांना खाली दाबण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. भाजपची राष्ट्रीय पातळीवर कशी पोलखोल होईल, तो पक्ष लोकांच्या मनातून कसा उतरेल यासाठी शिवसेना राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपला शह देण्याचा प्रयत्न करत असते. महाराष्ट्रात त्रिपुरात घडलेल्या घटनांवर अमरावती, मालेगाव, नांदेडमधील मुस्लीम आक्रमक होते, त्यांनी मोर्चे काढले. पोलिसांसोबत त्यांची चकमक उडाली. त्या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. लोकांना चिथावणी देऊन हा मोर्चा रझा अकादमीने काढला असे शिवसेनेचे म्हणणे आहे, इतकेच नव्हे रझा अकादमी हे भाजपचे पिल्लू आहे. त्यामुळे या मागील सूत्रधार कोण हे लक्षात घ्या, असा प्रत्यक्ष आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. तर त्याचे वेळी भाजपचे नेते म्हणत आहेत की, शिवसेना आपले हिंदुत्व विसरलेली आहे. त्यांनी रझा अकादमीला सूट दिलेली आहे. सरकार फक्त हिंदूंवर कारवाई करत आहे.

संजय राऊत यांनी अमरावती आणि परिसरात उसळलेल्या हिंसाचाराबद्दल एक लाक्षणिक निरीक्षण मांडले आहे, त्यांचे म्हणणे असे आहे, त्रिपुरामधील घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच मुस्लिमांचा कसा काय उद्रेक झाला, तो देशातील इतर विशेषत: भाजपशासित राज्यांमध्ये का झाला नाही. त्यामुळे या उद्रेकाला कुणाची तरी फूस आहे. पण हे विधान करताना राऊत यांनी हेही लक्षात घ्यायला हवे की, हा उद्रेक महाराष्ट्रातील काही विशिष्ट भागात झालेला आहे, तो महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्ये झालेला नाही. हा उद्रेक फक्त महाराष्ट्रातच का, हा प्रश्न विचारताना राऊत यांनी एक गोष्ट आठवायला हवी. जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी आंदोलक जीप खाली चिरडण्याचा प्रकार झाला तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. केंद्रातील मोदी सरकार आणि योगी आदित्यनाथ यांची सरकारे असंवेदनशील आहेत, त्यांच्या निषेधार्थ शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. आपलेच सरकार राज्यात असताना सरकारनेच बंद पुकारणे ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील बहुधा पहिलीच घटना असावी. उत्तर प्रदेशमधील चार शेतकर्‍यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ केवळ महाराष्ट्रातच बंद पुकारण्यात आला होता. देशातील अन्य कुठल्याही राज्यात असा बंद पुकारण्यात आला नाही. याचा अर्थ त्या राज्यांमध्ये संवेदनशीलता नाही, असे कसे म्हणता येईल.

- Advertisement -

त्रिपुरामधील मुस्लिमांविषयीच्या कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात, उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांच्या मृत्यूचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. या मालिका इथेच थांबतील असे वाटत नाही. कारण दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात सुडाच्या भावनेने पेटून उठले आहेत. त्यामुळेच पुढील काळात आपली सरशी होण्यासाठी ते कुणाचेही सहकार्य घेऊ शकतील, असे वाटू लागले आहे. हे अर्थातच महाराष्ट्र आणि एकूणच देशासाठी घातक आहे. कारण अशा प्रकारे राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण झाली की, त्याचा फायदा बाहेरील शक्ती देशात अराजक माजविण्यासाठी घेत असतात. सध्या भारताच्या सीमेवर चीन आणि पाकिस्तानकडून तणावपूर्ण स्थिती निर्माण करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे भारतीय भूमीवर असलेले नक्षलवादी अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान निर्माण करत आहेत. भारताला असा आतून आणि बाहेरून संकटांचा सामना करावा लागत आहे. पण त्याचवेळी स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यात अभिमान मानणारे दोन पक्ष मात्र सत्तेसाठी एकमेकांना चारी मुंड्या चीत करण्यासाठी आपली प्रतिष्ठा आणि शक्ती पणाला लावत आहेत.

हिंदूबहुल असलेल्या या देशात दोन हिंदुत्ववादी पक्षांमुळे उभी फूट पडताना दिसत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा गैरफायदा उद्या देशविघातक शक्तींनी घेतला आणि देशात मोठा घातपात घडवून आणला तर हे दोन पक्ष त्यावेळीही त्यासाठी जबाबदारीचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडण्यात धन्यता मानतील, असे त्यांच्यात जी पराकोटीची कटूता आणि वितुष्ट आलेले आहे त्यावरून दिसते. दोघांच्या भांडणात हिंदुत्वाचा तर बळी जाणार नाही ना, अशी शंका वाटल्यावाचून राहत नाही. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व हा विचार जोपासणार्‍या या राजकीय पक्षांनी याबाबत अंतर्मुख होण्याची गरज आहे. पण सत्ता माणसाला विवेक आणि विचार विसरायला लावते, हेच अनेक वेळा दिसून आलेले आहे. कारण भारताची फाळणी ही महमदअली जिनांच्या सत्तापिपासेतून झालेली होती, हे विसरून चालणार नाही.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -