Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग कारागृह... नाही, हे तर नंदनवन!

कारागृह… नाही, हे तर नंदनवन!

Subscribe

पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दौऱ्यानिमित्ताने बुधवारी (19 एप्रिल) सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाला भेट देण्याचा योग आला आणि येथील वातावरण पाहून मन थक्क झालं. निळ्या रंगाच्या बोर्डवरील “जिल्हा कारागृह” ही पांढरी अक्षरं दरारा निर्माण करत होती. समोर भल्या मोठ्या लोखंडी दरवाजाला असलेलं भलं मोठं कुलूप उघडलं गेलं व आम्ही वाकून आत प्रवेश केला. दुसरा दरवाजाही त्याचप्रमाणे पार केल्यावर जेलर ही संकल्पना मोडीत काढणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्यांनी हसत स्वागत केल आणि समोर जे चित्र पाहात आहोत, हे खरं का? यावर माझाच विश्वास बसत नव्हता. कारण कारागृहात जाताना कसं असेल आतील जग? कैदी म्हणजे गुन्हेगार ते कसे वागत असतील? कसे रहात असतील? पोलीस त्यांना सारखे ओरडत असतील. तिथेही त्यांच्या हातात बेडया असतील वैगरे असंख्य प्रश्न होते. पण हसत मुखाने स्वागत करणारे वरिष्ठ अधिकारी रवींद्र टोनगे व त्यांच्या मागे चारही बाजूला नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवाई पाहून मन थक्क झालं.

समोर लाल गुलाबांचा ताटवा मन मोहून घेत होता. पिवळा -भगवा झेंडू वाऱ्यावर डोलत होता. शिस्तबद्ध लागवड केलेली व बहरलेली हिरव्या लाल माठची भाजी, दोड़का, वांगी, कारली, भोपळा, लोकी असे एक ना अनेक भाज्यांचे प्रकार इथे होते. कोकणची ओळख आंबा व नारळ हेही लगडून उभे होते. पौष्टिक शेवगा आपल्या नाजुक पांढऱ्या फूलं व शेंगांनी बहरला होता. जिल्हा कारागृह म्हणजे कड़क वातावरण, रुक्ष पोलीस, हिंसक कैदी… अशा कल्पनांची चौकट हे सर्व वैभव पाहून तिथल्या तिथेच गळाली.

- Advertisement -

हे कारागृह आहे की नंदनवन असा प्रश्न मला पडला. मेहनत रंग लाती है… उक्तिप्रमाणे अधिकारी, कर्मचारी व कैदी यांच्या मेहनतीला रंग आला होता. कैदी हा देखील माणूस आहे, त्याच्या हातून झालेल्या चुकीमुळे तो इथे आला आहे. चांगल्या वातावरणात त्याचा आत्मविश्वास वाढवून, कौशल्यआधारित काम व शिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन इथे होताना आम्हाला इथे दिसले. येथील कैद्यांमधील उत्साहाला योग्य मार्गदर्शन व दिशा देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, प्रशासनाला भगीरथ प्रतिष्ठान याचीही जोड मिळाली आहे.

- Advertisement -

सिंधुदुर्गनगरी येथे वर्ग 1चे कारागृह 2016पासून सुरू करण्यात आले आहे. जिल्हा कारागृह अधीक्षक, वरिष्ठ तुरुंग अधिकारी यांच्यासह एकूण 35 कर्मचारीवर्ग या ठिकाणी कार्यरत आहेत. 7 एकर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या कारागृहात सध्या एकूण 96 कैदी आहेत. नोकरी आहे म्हणून फक्त चौकटबद्ध क़ाम न करता, त्याही पलीकडे जाऊन काम करणारी माणसं इतिहास घडवतात व परमेश्वरही त्यांच्या प्रयत्नाना साथ देतो. तुरुंग अधिकारी रवींद्र टोनगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने केलेले प्रयत्न व घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे.

कारागृहात शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कित्येक वर्षं ओसाड असलेली ओबडधोबड व काट्याकुट्यांनी भरलेली जमीन सपाट करण्यापासून सुरुवात होती. यावेळी मी अधिकारी आहे म्हणून फक्त ऑर्डर न देता कैद्यांच्या बरोबरीने अधिकारी टोनगे यांनी स्वतः हातात कुदळ व फावडे घेत काम केले, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. भगीरथ प्रतिष्ठानकडून शेतीचे साहित्य व पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइनची व्यवस्था करण्यात आली. तसंच भाजीपाला लागवडीसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनीही शेतीच्या कामासाठी आवश्यक पावर टिलर तत्काळ उपलब्ध करून दिले. अशा रीतीने सर्वच बाजू जुळून आल्या आणि निसर्गानेही या सर्वांच्या मेहनतीला फळ दिले.

ऑक्टोबर 2022पासून कारागृहातील शेतीतून उत्पन्न मिळू लागले. गेल्या सहा महिन्यांत जिल्हा कारागृहाला भाजीपाल्यापासून एक लाख 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यापूर्वी कारागृहात दोन लाख वीस हजार रुपये एवढा खर्च होता व उत्पन्न फक्त 25 हजार रुपये एवढे होते; मात्र आता भाजीपाला लागवडीनंतर उत्पन्न एक लाख 90 हजार तर खर्च एक लाख आठ हजार पर्यंत कमी झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कारागृहात लागणाऱ्या भाजीपाल्यामध्ये फक्त बटाटा व टोमॅटो वगळता बाहेरून कुठलीही भाजी आणली गेली नाही. आपली गरज भागवून येथील भाजी सावंतवाडी कारागृह व जवळील आठवडा बाजारातही विक्रीसाठी पाठवली जाते. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून शासनाच्या तिजोरीतही भर टाकली जात आहे.

तुरुंग अधिकारी रवींद्र टोनगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृहाचा व येथील कैद्यांचा कायापालट झालेला दिसत आहे. येथील कैदी जे समाजाच्या दृष्टीने गुन्हेगार आहेत त्यांच्यामध्ये नम्रता व शिस्त दिसली. विशेष म्हणजे, त्यांना आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्याबद्दल पश्चाताप असल्याचेही त्यांच्या बोलण्यातून जाणवले. येथील कैदी स्वतःचा नाश्ता, जेवण, शेतीचे काम, आराम अशा सर्वच बाबतीत शिस्तीने वागत होते. त्यांना तुरुंगातील अधिकारी कर्मचाऱ्यांबद्दल आदर वाटत होता. तुरुंगातील आपली शिक्षा संपल्यावर आपण इथून बाहेर गेल्यावर येथे मिळालेल्या कौशल्यआधारित शिक्षणाचा वापर नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी करणार असल्याचा निर्धार ऐकून हे कारागृह नसून सुधारगृह असल्याचे जाणवले. आयुष्यातील एका चांगल्या अनुभवासाठी नेहमीच आपल्या चांगल्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुख्यालय पत्रकार संघाचे मनोमन आभार मानले.

  • तेजस्वी काळसेकर
कारागृह… नाही, हे तर नंदनवन!
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -