घरफिचर्समायमहानगर ब्लॉगडेंग्यूच्या नावानं चांगभलं

डेंग्यूच्या नावानं चांगभलं

Subscribe

वैद्यकीय पेशा आणि डॉक्टरांची सेवा पवित्र मानली जाते. त्यामुळेच काही वर्षांपूर्वीपर्यंत समाजात डॉक्टरांबद्दल अतिशय आदर होता. खेड्यापाड्यात तर लोक मृत्यूच्या दाढेतून परत आणणारा देव, अशाच नजरेतून डॉक्टरकडे पाहत. डॉक्टरही त्याच भावनेतून जनसेवा करत असत. आता मात्र ही सेवा नव्हे ‘धंदा’ बनला आहे. आपले आर्थिक आरोग्य सुदृढ राखायचे असेल तर समाज निरोगी ठेवून चालणार नाही, अशीच काही प्रवृत्तींची मानसिकता बनलेली दिसते. डेंग्यूच्या बाबतीतदेखील काही महिन्यांपासून राज्यभर असाच अनुभव येतो आहे. ‘डेंग्यूच्या नावानं चांगभलं’ म्हणत खासगी डॉक्टर्स रुग्णाला अक्षरश: लुबाडत आहेत.

एखाद्या उंची हॉटेलला लाजवेल अशी हॉस्पिटल्स शहरांमध्ये उभी राहताहेत. त्यातून रुग्णांना ‘फाईव्ह स्टार’ सेवा मिळते यात वादच नाही; पण ही सेवा मिळवण्यापोटी खिसे रिकामे होतात, त्याची काळजी कोण घेणार? या उंची हॉस्पिटल्सपोटी आजारांची संख्याही अचानकपणे वाढलेली दिसते, हेही नाकारुन चालणार नाही. अर्थात त्याला काही अपवाद आहेत. मात्र, सर्वच डॉक्टर्स प्रामाणिकपणे रुग्णसेवा देतात असे म्हणणेही धाडसाचे ठरेल. प्रत्येक क्षेत्रात काही अपप्रवृत्तींनी शिरकाव केला आहे. त्याला वैद्यकीय क्षेत्र तरी अपवाद कसे ठरणार, असा सूर साधारणपणे डॉक्टरांचा असतो. मात्र, इतर कोणत्याही क्षेत्रावर जेवढा विश्वास ठेवला जात नाही, तितका विश्वास वैद्यकीय क्षेत्रावर सर्वसामान्यांचा असतो. मंदिरातील देवानंतर तो डॉक्टरांना देवाच्या रुपात बघतो. किंबहुना काही प्रसंगात तर देवापेक्षाही पुढचे स्थान डॉक्टरांना दिले जाते. त्यामुळे अशा देवत्व बहाल केलेल्या पेशाकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे स्वाभाविकच आहे. प्रत्यक्षात अनुभव फारसा सुकर नसतो.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात डेंग्यूच्या चर्चेने घातलेले थैमान पाहता, त्यामागे डेंग्यूच्या डासांपेक्षाही भयंकर असे काही डॉक्टर्स असल्याचे दिसते. डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास त्याची माहिती वैद्यकीय विभागाला कळवणे गरजेचे असते. मात्र, अशी ती कळवण्यास डॉक्टरांकडूनच टाळाटाळ केली जाते. दुसरीकडे हेच डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना रक्ताच्या अहवालाचा दाखला देत पेशींची संख्या कमी झाल्याने डेंग्यूची शक्यता असल्याचे ठामपणे सांगताना दिसतात हे विशेष. डेंग्यूचा डास केवळ माणसाच्या शरीरालाच चावतो. पण काही डॉक्टर्स डेंग्यूच्या नावाने माणसाच्या खिशाला आणि विश्वासालाच चावा घेत असल्याचे दुर्दुैवी चित्र राज्यात सर्वत्र दिसतेय.

- Advertisement -

अनेक ठिकाणी डेंग्यू विषाणूंची चाचणी करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. तरीही काही डॉक्टर एनएस-१ ही प्राथमिक रक्त तपासणी अवघ्या पाच मिनिटांत करून मोकळे होतात. नियमानुसार डेंग्यूबाबतच्या रक्ततपासण्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतच केल्या जातात. त्यानंतर रुग्णाला डेंग्यू झाला किंवा नाही याचे निदान होते. प्रत्यक्षात मात्र या तपासणी अहवालाची वाट न पाहताच बहुतांश डॉक्टर एनएस-१ च्या आधारेच डेंग्यूचे निदान करतात. साधा ताप आला तरी डेंग्यूच्या भीतीपोटी रुग्ण गरज नसतानाही रुग्णालयात दाखल होतात. पहिल्या पाच दिवसांत एनएस-१ चाचणी घेतली की अहवाल पॉझिटिव्ह मिळतो. त्या आधारे डेंग्यू झाल्याचे जाहीर करून उपचार केले जातात. या चाचणीसाठी पाचशे ते आठशे रुपये आकारले जातात. खरे तर, एन.एस.१ चाचणीच्या आधारे कुणी डेंग्यूचे निदान करत असेल तर तो गंभीर गुन्हा ठरू शकतो. पण रुग्णांच्या वैद्यकीय अज्ञानाचा फायदा घेत अशा चाचण्यांचे आधारे थेट निदान केले जाते. आयजीएम चाचणीत सॅम्पल पॉझिटिव्ह आल्यास आणि प्लेटलेट्स ५० हजारांपर्यंत आल्यास डेंग्यूचे निदान होऊ शकते. मात्र, डेंग्यूविषयी समाजात निर्माण झालेल्या भीतीला ‘कॅश’ करण्याचे काम अनावश्यक तपासण्यांतून होत आहे. या आजारावरील उपचाराचा या मंडळींनी अक्षरश: ‘धंदा’ मांडला आहे. पैशांचा धंदा झाला की नीतीमत्तेची गणिते कोलमडून पडतात. पैसा कमावणे हेच एक ध्येय ठरते आणि ते गाठण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब निषिद्ध ठरत नाही.

डेंग्यूच्या बाबतीतही तसेच होत आहे. डेंग्यूची शंका येताच संबंधित वैद्यकीय व्यवस्था रुग्णाच्या प्लेटलेट्सवर लक्ष केंद्रीत करते. निरोगी व्यक्तींमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण दर प्रतिघनमिली लिटरमागे दीड ते चार लाख असते. ते घसरल्यास एक-दोन दिवसांआड तपासावे लागते. हे प्रमाण अचानक एक लाखांखाली गेले तर रोज हे प्रमाण बघावे लागते. हे प्रमाण सहसा सातव्या दिवसापासून बघावे लागते. साधारणत: सातव्या दिवसापासून प्लेटलेट्स काऊंट वाढू लागतो. गंभीर लक्षणे नसतानाही प्लेटलेट्स-काऊंट ५० हजारांपेक्षा कमी झाला तर रुग्णालयात दाखल होणे अपेेक्षित असते. प्लेटलेट्सचे प्रमाण १० हजारांखाली घसरले तर प्लेटलेट्स दिल्या जातात. हे प्रमाण महत्त्वाचे असले तरी सर्व लक्ष केवळ त्यावरच केंद्रीत करणे हेही चुकीचे आहे. मात्र, प्लेटलेट थोड्याफार घटल्या की लगेचच रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याचा सल्ला दिला जातो. गंभीर बाब म्हणजे रुग्णाचा आरोग्य विमा असला तर बहुतांश डॉक्टर्सकडून त्याला दाखल करून घेतले जाते. किंबहुना अशा रुग्णांवर डेंग्यूच्या नावाने उपचार करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अर्थात आरोग्य विमा असल्यावर रुग्णही अ‍ॅडमिट होण्यासाठी स्वत: इच्छुक असतो.

- Advertisement -

रक्त तपासणीच्या चाचणीनंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेचा अहवाल २४ ते ७२ तासांच्या विलंबाने प्राप्त होत असल्यामुळे रुग्ण अ‍ॅडमिट होऊन मोकळे होतात. हा अहवाल तातडीने प्राप्त होणे गरजेचे आहे. ई-मेलवर जरी हा अहवाल प्राप्त झाला तरी रुग्णावर त्या दिशेने उपचार सुरू करता येतात. डेंग्यूच्या अनेक रुग्णांना अशक्तपणा येतो. पण भरपूर पाणी, द्रवपदार्थ व विश्रांती यामुळे काही दिवसांनी अशक्तपणा दूर होतो.

काही डॉक्टर्स अशा रुग्णांना सलाइन लावतात. काही रुग्ण, आप्तेष्ट यांचा तसा दबाव असतो. खरे तर सलाइन म्हणजे फक्त मीठाचे निर्जंतूक पाणी असल्याने त्याने अशक्तपणा जात नाही; पण सलाइनने अशक्तपणा जातो, या गैरसमजाचा काही डॉक्टर्सही गैरफायदा घेताना दिसतात. तसेच आप्तेष्टांचा दबाव, विमा कंपन्यांचा कारभार यामुळेही काही डॉक्टर्स गरज नसताना सलाइन लावतात. रक्तदाब कमी होण्यासारखी गंभीर लक्षणे वा चिन्हे आढळली तर सलाइनची गरज असते. मात्र, रुग्णांमधील गैरसमज निघून गेल्यास आपले खिसे कसे भरतील? हाही त्यामागील विचार असतो. हे सर्व थांबण्यासाठी याबाबतची समाजाची मानसिकता बदलायला हवी. डेंग्यूत एक टक्काच रुग्ण दगावतात हे प्रत्येकानेच लक्षात घ्यावे. किंबहुना डॉक्टरांनी अशा वेळी अधिक समजदार पालकाची भूमिका बजावणे अपेक्षित असते.

वैद्यकीय पेशाला समृद्ध असा इतिहास आहे. सेवाभावी वृत्तीच्या लोकांनी या व्यवसायाला समाजात आदराचे स्थान प्राप्त करून दिले आहे. आजही सेवाभावी वृत्तीने काम करणारे काही डॉक्टर्स या पेशाची गरिमा उंचावत आहेत. त्यातूनच वैद्यकीय पेशाविषयीचा विश्वास दृढ आहे. मात्र, काही खिसेेभरू डॉक्टर्स या विश्वासाला तडा देण्याचे, रुग्णाचे शोषण करण्याचे काम पद्धतशीरपणे करत आहेत. कोणतीही व्यवस्था शोषणावर आधारित असली तर त्या व्यवस्थेचे भवितव्य कधीच उज्ज्वल असू शकत नाही. त्यामुळेच पैसा मिळवताना आपण कुणाचे अधिकार, कुणाचे हक्क अथवा कुणाला न्याय तर नाकारत नाही ना, याची काळजी घेतली जाणे आवश्यक ठरते. अन्यथा विनाश जवळ आलाच म्हणून समजा!

डेंग्यूच्या नावानं चांगभलं
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -