विनोदवीराची शोकांतिका, दोस्तो, ठोको ताली!

नवज्योतसिंग सिद्धू लढाईचा आव आणून पळ काढतो आहे. ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. मग अशा कृत्यांना सिद्धूची गुगली वगैरे ठरवून बातम्या दिल्या जातात. पण वास्तव इतकेच आहे, की हा निव्वळ विनोदवीर आहे. त्याला कुठल्याही विषयाचे गांभीर्य कळत नाही, की जगातील घडमोडींवर भाष्य करत असताना वापरलेले शब्दही त्याला कळत नसावेत. नुसती पाठ केलेली वचने वा शेरोशायरीची पोपटपंची, इतकेच त्याचे कर्तृत्व असल्याची साक्ष त्यानेच दिलेली आहे. त्याच्याच भाषेत बोलायचे तर गुरू हो जा शुरू, दोस्तो, ठोको ताली, असा हा थिल्लरपणा आहे.

एकदा चूक झाली तर तिला चूकच मानावे लागते. कारण चुकांमधूनच माणूस शिकत असतो. अनुभवासारखा शिक्षक नाही. पण तरीही तीच वा तशीच चुकही पुन्हा होऊ शकते. त्याला योगायोग मानता येईल. पण माणूस वारंवार तसाच वागू लागला किंवा त्याच चुकांची पुनरावृत्ती करू लागला, तर त्याला चूक मानता येत नाही. त्याला गुन्हा म्हणावे लागते किंवा शुद्ध मुर्खपणा ठरवावे लागते. आपल्या विशिष्ट गुणवत्तेमुळे सातत्याने प्रकाशझोतात असलेला माजी क्रिकेटपटू किंवा हल्लीचा वादग्रस्त राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू याला म्हणूनच मूर्ख किंवा गुन्हेगार ठरवणे भाग आहे. अर्थात तो गुन्हेगार अन्य कुणाचा नसून स्वत:साठीच गुन्हेगार आहे. कारण प्रत्येक चमत्कारिक वागण्यातून त्याने आपली गुणवत्ता किंवा मिळालेल्या संधीला मातीमोल करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे त्याने पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

आपल्या या राजीनाम्याने खळबळ माजेल किंवा राजकीय उलथापालथ होईल, अशी त्याची अपेक्षा असेल, तर तो शुद्ध मूर्खपणा आहे. म्हणूनच राजीनाम्याचे जे नाटक सिद्धूने रंगवले, त्याला मूर्खपणाच म्हणावे लागते. कारण त्याच्या प्रामाणिकपणा व हेतूविषयी त्यानेच शंका निर्माण करून ठेवलेल्या आहेत. किंबहुना, त्याच्या क्रिकेटभाषेत याला हिटविकेट म्हणतात. जेव्हा फलंदाजाच्या बॅटचा स्पर्श होऊन स्टंप वा बेल्स पडतात, तेव्हा त्याने स्वत:लाच बाद केले, असे मानले जाते. सिद्धूच्या राजकारणाची इतिश्री त्याने स्वत:च घडवून आणलेली असेल, तर त्याला हिटविकेट म्हणावे लागेल ना? कारण हा राजीनामा वा माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी घेतलेला पंगा; यातून त्याने नेमके काय साधले तेही त्याला सांगता येणार नाही. मुख्यमंत्री होण्याची तीव्र महत्वाकांक्षा त्याला इथवर घेऊन आलेली आहे आणि त्याचे क्रिकेटही अशाच बेफ़ाम वागण्याने संपुष्टात आलेले होते.

१९९० च्या दशकात सिद्धू भारतीय कसोटी संघाचा आघाडीचा फलंदाज होता आणि तेव्हा इंग्लंडच्या दौर्‍यावरून तो असाच प्रक्षुब्ध होऊन परतला होता. तेव्हाही त्याचा खटका संघाचा कॅप्टन महंमद अझरुद्दीन याच्याशी उडाला होता. दोघांमध्ये काही शाब्दिक बाचाबाची झाली आणि सिद्धू उठून अर्धा दौरा सोडून माघारी भारतात परतला होता. त्याचा किंचीतही परिणाम अझरुद्दीनला भोगावा लागला नाही आणि तो पुढली काही वर्षे भारतासाठी खेळत होता व कर्णधारपदी कायम होता. मात्र सिद्धूचे क्रिकेट तिथेच संपून गेले. मग निवृत्ती पत्करून सिद्धू समालोचनाकडे वळला आणि आपली चुरचुरीत वक्तव्ये किंवा प्रवचनातून त्याने क्रिकेट शौकीनांची मने जिंकली. पुढे क्रिकेटच्या सोबतच त्याने टेलिव्हिजनवर होणार्‍या विनोदी व नकलाकारांच्या कार्यक्रमात परीक्षक वा समालोचकाचे काम सुरू केले. त्याचे किस्से व वचनांनी श्रोत्यांची मने जिंकली होती.

त्याचा चहाता इतका वाढला होता, की भाजपाने त्याला राजकारणात आणून लोकसभेपर्यंत पोहोचवले. तिथून सिद्धूच्या राजकीय महत्वाकांक्षा जाग्या झाल्या. त्याला पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचे वेध लागले आणि त्यासाठी तात्कालिन मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल व त्यांच्या पक्षाशी सिद्धूने वादावादी सुरू केली. वास्तवात तिथे अकाली दल आणि भाजपाची मैत्री असल्यानेच सिद्धूला सहज लोकसभा बघता आलेली होती. मात्र सिद्धूच्या महत्वाकांक्षेसाठी भाजपा दीर्घकालीन मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाशी पंगा घेण्याची शक्यता नव्हती. परिणाम इतकाच झाला, की मागल्या २०१४ च्या लोकसभेत अकाली दलाने सिद्धूला अमृतसरहून भाजपने उभे करू नये, अशी अट घातली आणि सिद्धूच्या राजकारणाला ग्रहण लागले. मग तो राजकीय पर्याय शोधत होता आणि आम आदमी पक्ष, किंवा स्वतंत्रपणे आपला पक्ष स्थापन करता करता सिद्धू काँग्रेसच्या गोटात येऊन दाखल झाला.

अर्थात, त्याची लोकप्रिय प्रतिमा काँग्रेसला हवी असली, तरी त्याच्यापेक्षाही पंजाबची सत्ता हवी होती आणि लोकप्रिय अमरिंदर सिंग यांना टाळून काँग्रेस सिद्धूला सरळ मुख्यमंत्रीपदी बसवू शकत नव्हती. पण पक्षश्रेष्ठींपेक्षाही राज्यात वरचढ असलेल्या अमरिंदरना वेसण घालण्यासाठी पक्षातच सिद्धूसारखे लोढणे राहुलना हवे होते. तिथे सिद्धूला महत्व मिळाले. पण अमरिंदर सिंग आणि अझरुद्दीन यात फरक नव्हता. राहुल गांधींच्या या मोहर्‍याला कॅप्टन अमरिंदर असे खेळवत गेले, की त्याने आपल्यालाच हिटविकेट करून बाजूला व्हावे. सिद्धूने त्यांची अजिबात निराशा केली नाही. मुख्यमंत्र्याने आक्षेप घ्यावा आणि सिद्धूने नेमके तेच करावे, असा प्रकार राजरोस सुरू झाला. कॅप्टनला दुखवायला सिद्धू पाकिस्तानात गेला आणि इमरान व बाजवा यांना मिठ्या मारून आला. परिणामी जी संतप्त प्रतिक्रीया उमटली, तिला दाद देऊन सोनी टीव्हीने कपील शर्माच्या शोमधून सिद्धूला हाकलून लावले.

त्यातून धडा घेईल तो सिद्धू कसला? तरीही पक्षाने कान उपटले नाहीत, म्हणून सिद्धू जास्त मोकाट झाला आणि ऐन लोकसभा निवडणुकीत त्याने अशी वक्तव्ये केली, की पंजाबमध्ये काँग्रेसला त्याचा फ़टका बसला. परिणामी अमरिंदर सिंग यांनी सिद्धूचे खाते बदलले आणि त्याला हटवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे लकडा लावला. तरीही सिद्धूला काही शहाणपणा आला नाही. त्याने मुख्यमंत्र्यांना शह देण्यासाठी दिल्लीत येऊन राहुल-प्रियंका यांच्यासमवेत फोटो काढला आणि पंजाबात बहाल झालेल्या मंत्रालयाचा कारभारही सुरू केला नाही. त्या फ़ोटोचा काहीही राजकीय परिणाम झाला नाही आणि महिनाभराचा काळ उलटून गेल्यावर सिद्धूने आपला जुना राजीनामा सोशल मीडियातून जगजाहीर केला. पण त्याची ना अमरिंदरनी दखल घेतली आहे, ना काँग्रेस पक्षाकडून काही हालचाल झालेली आहे. त्यामुळे हात चोळत बसण्याची नामुष्की मात्र सिद्धूवर आली. पण राहुल गांधी यांचा निकटवर्तीय असल्यामुळे सिद्धूला पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली.

राजकारणात प्रसंग व योग्य संधीला खूप निर्णायक महत्व असते. चुकीच्या वेळी केलेली मोठी खेळी धुळीस मिळवते आणि योग्यवेळी केलेली नगण्य खेळी मोठा लाभ देऊन जाणारी असते. सिद्धूने प्रत्येक मोठी खेळी चुकीच्या वेळी केलेली आहे. भाजप जोमात आला असताना त्या पक्षाचा त्याग केला आणि काँग्रेस डबघाईला आलेली असताना तिथे आसरा शोधला. पंजाबात मुसंडी मारून मुख्यमंत्री व्हायचे, तर श्रेष्ठींचा आशीर्वाद हवाच. पण राज्यातही आपले पक्षांतर्गत काही स्थान व पाठीराखे असायला हवेत. सिद्धू दोन्ही बाबतीत शून्य आहे. कारण पंजाबात पक्षश्रेष्ठींपेक्षा अमरिंदर सिंग याचा शब्द वजनदार होता. दुसरीकडे मंत्री, प्रदेशाध्यक्ष होऊनही सिद्धू पंजाब काँग्रेसमध्ये उपराच राहिलेला होता. मग त्याने नखरे करण्याला काय अर्थ उरतो? त्याच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर पंजाबच्याच काही मंत्र्यांनी उडवलेली सिद्धूची खिल्ली त्याचा सज्जड पुरावा आहे. नको त्यावेळी राजीनामा किंवा नखरे करण्यातून सिद्धू नेहमीच गोत्यात आलेला आहे. पण चुकीच्या वेळी चुकीचे निर्णय घेण्याची त्याची क्षमता अफलातून आहे. त्यातून बाहेर पडायची त्याला इच्छा नाही. खरेतर सिद्धू हा कायम स्वत:शीच लढत भांडत आलेला आहे आणि स्वत:लाच प्रत्येक लढाईत पराभूत करत आलेला आहे.

समोर कोणीतरी भासमात्र शत्रू असावा लागतो, इतकेच. त्यातून ता विनोदवीराची शोकांतिका झाली आहे. तर दोस्तो, ठोको ताली! गर्दी जमवणार्‍या व्यक्ती वा श्रोत्यांना हसवणारी व्यक्ती एका समारंभापुरती महत्वाची असते. पण संघटना किंवा सत्ता ही पूर्णवेळ जबाबदारी आहे. सिद्धूमध्ये तितका संयम नाही. असता, तर त्याने अशी धरसोड वृत्ती दाखवली नसती. यापुढे सिद्धूचे राजकीय वा सामाजिक वक्तव्यदेखील हास्यास्पद म्हणूनच बघितले जाईल. सिद्धू लढाईचा आव आणून पळ काढतो आहे. ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. मग अशा कृत्यांना सिद्धूची गुगली वगैरे ठरवून बातम्या दिल्या जातात. पण वास्तव इतकेच आहे, की हा निव्वळ विनोदवीर आहे. त्याला कुठल्याही विषयाचे गांभीर्य कळत नाही, की जगातील घडमोडींवर भाष्य करत असताना वापरलेले शब्दही त्याला कळत नसावेत. नुसती पाठ केलेली वचने वा शेरोशायरीची पोपटपंची, इतकेच त्याचे कर्तृत्व असल्याची साक्ष त्यानेच दिलेली आहे. त्याच्याच भाषेत बोलायचे तर गुरू हो जा शुरू, असा हा थिल्लरपणा आहे.