राहुल गांधींना हिंदू साक्षात्कार

संपादकीय

काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार राहुल गांधी यांनी राजस्थानमधील जयपूर येथे पक्षाच्या रॅलीसमोर प्रथमच मी हिंदू आहे, पण मी हिंदुत्ववादी नाही, असे जाहीर केले. जे हिंदुत्ववादी सत्तेवर आहेत, त्यांना खाली खेचून आपण हिंदूंची सत्ता आणायला हवी. हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातील भेद स्पष्ट करताना ते म्हणाले की, महात्मा गांधी हे हिंदू होते आणि ज्यांनी त्यांची हत्या केली ते हिंदुत्ववादी आहेत. हिंदू हे सत्याग्रह करतात, तर हिंदुत्ववादी हे सत्ताग्रही असतात. ते सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जातात. आपल्या भाषणात राहुल गांधींनी रामायण, भगवद्गीतेचा उल्लेख करून त्यातील अनेक उदाहरणे आपल्या भाषणातून दिली.

यावेळी राहुल यांच्या भगिनी प्रियांका गांधी वडेरा यांनीही त्यांना साथ दिली. काँग्रेसच्या नव्या पिढीतील या दोन्ही नेत्यांचा सगळा रोख नरेंद्र मोदी यांच्यावर आणि त्यांच्या नेतृत्वाखील केंद्रात आलेल्या सरकारवर होता. पुढील महिन्यात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत, त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील विजय हा केंद्रीय राजकारणातील विजयासाठी महत्वाचा मानला जातो. राहुल गांधी यांनी आपण हिंदू आहोत, हे इतक्या जाहीरपणे, त्यातील अनेक पैलू विस्ताराने सांगणे यातून एकच गोष्ट उघड होत आहे की, काँग्रेसला पुन्हा देशाच्या राजकारणात पुनरुज्जीवित करायचे असेल तर हिंदू या घटकाला उचलून धरायला हवे. त्याशिवाय लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही.

कारण २०१४ पूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसचे नवे नेते म्हणून पुढे आणले. राहुल गांधी यांनी बराच प्रयत्न केला, पण त्यांच्या नेतृत्वाखाली विविध राज्यांमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात काँग्रेसचा पराभव झाला होता. महात्मा गांधी हे हिंदू होते, असे राहुल गांधी आज म्हणत आहेत. पण काँग्रेसने देशाला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर लोकांना आपण सर्वधर्मसमभाव मानणारे आहोत, असे ठासून सांगितले. त्याला रुढार्थाने सेक्युलॅरिझम असे म्हटले जाते. काँग्रेसचे नेते देशाला स्वांतत्र्य मिळाल्यापासून स्वत:ला सेक्युलर मानत आलेले आहेत. त्यांच्यातील बरेच नेते धर्माने हिंदू असले तरी त्यांनी हिंदू हा शब्द निषिद्ध मानल्याचेच दिसून येईल. कारण हिंदू म्हटले की, आपण धर्मवादी आणि जातीयवादी ठरू, आपली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा कमी होईल, देशातील आपल्याला एकगठ्ठा मतदान करणारे समाज गट आपल्यापासून दुरावतील, अशी भीती त्यांना वाटत राहिली. कारण निवडणुकीचे राजकारण मतांभोवती फिरत असते.

स्वतंत्र भारताचा इतिहास पाहिला तर असे दिसेल की, काँग्रेसने एकगठ्ठा मतांवर आपला रोख ठेवलेला होता आणि हिंदूंना त्यांनी गृहितच धरलेले होते. कारण हिंदूंना अन्य कुठला पर्याय नसल्यामुळे ते आपल्यालाच मते देणार हे काँग्रेस नेत्यांना माहीत होते. लढ के लेंगे पाकिस्तान असा नारा देऊन महमदअली जीना यांनी भारताची फाळणी करायला भाग पाडले. त्यावेळी काँग्रेसचे नेते काहीही करू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या मनात मुस्लीम कट्टरवाद्यांविषयी प्रचंड भीती आहे. परिणामी मुस्लिमांविषयीच्या तिहेरी तलाक आणि अशा इतर कुठल्याही गोष्टींना काँग्रेसने कधीच हात घालण्याची हिंमत केली नाही. उलट, तलाक दिलेल्या मुस्लीम महिलेला नवर्‍याने पोटगी द्यावी, हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय तत्कालीन पंतप्रधान आणि राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी बहुमताच्या आधारावर संसदेत कायदा मंजूर करून निकामी केला.

राजीव गांधी यांनी काँग्रेसविरोधात मुस्लीम मुल्ला मौलवी आणि पुरुष वर्ग यांच्याकडून होणारा उद्रेक लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. पण त्याचवेळी त्यांच्या असे लक्षात आले की, यातून आपण मुस्लिमांना शांत करण्यात यशस्वी ठरलो हे खरे असले तरी हिंदूंना खूश करण्यासाठी काही तरी करावे लागेल. त्यामुळेच त्यांनी सल्लागारांसोबत चर्चा केल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराचे बंद दरवाजे हिंदूंसाठी खुले केले. अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद हा खूप जुना विषय आहे, या देशातील बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावनेशी तो निगडित आहे. भारताच्या बाहेरून आलेल्या आक्रमक बाबराने अयोध्येतील राम मंदिरावर बाबरी मशीद बांधली, हा आमच्यावर झालेला धार्मिक अन्याय आहे, त्या ठिकाणी रामाचे मंदिर व्हायला हवे, असे म्हणत हा विषय अनेक शतके हिंदूंनी लावून धरलेला होता. पण भारतावर मुस्लीम शासकांचे प्रभुत्व असल्यामुळे कुणाचे काही चालत नव्हते.

त्यात पुन्हा त्याही काळात भारतातील सगळे हिंदू संघटित नव्हते, काही हिंदू राजे मुस्लिमांच्या बाजूने होते, त्यामुळे बाबरी मशीद आणि राम मंदिराचा विषय तसाच पडून राहिला. खरे तर बाबर हा बाहेरून आलेला आक्रमक होता, त्याचा तसा थेट इथल्या मुस्लिमांशी काही संबंध नव्हता. कारण भारतीय उपखंडातील आज जे मुस्लीम आहेत, त्यातील अगदी तुरळक अपवाद वगळले तर सगळे धर्मांतरित आहेत, म्हणजे पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत. राहुल गांधी यांनी आपले भाषण करताना हिंदू या शब्दाची व्याख्या अतिशय व्यापक करून सांगितली आहे. त्यामुळे पुढील काळात ते त्यात कुणाकुणाला सामावून घेतात, ते पहावे लागेल. बाबरी पतनानंतर ज्या हिंदू-मुस्लीम दंगली उसळल्या आणि त्यात अनेकांना जीव गमवावे लागले, समाजातील वातावरण कलुषित झाले, याचे समर्थन करता येणार नाही. पण राम मंदिर हा इथल्या बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक आस्थेचा विषय आहे हेही नाकारून चालणार नाही.

राजीव गांधी यांनी राम मंदिराचे दरवाजे उघडून त्यावेळी लोकसभेत केवळ दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पार्टीला राजकीय अवकाश मोकळा करून दिला. पुढे भाजपने मंदिर वही बनायेंगेचा नारा देशभर दिला. मित्र पक्षांना सोबत घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सत्ता प्रथम काबीज केली. भाजपने त्यावेळी जनतेला राम मंदिर, काश्मीरमधील ३७० कलम आणि समान नागरी कायदा ही वचने दिली, ती पूर्ण झालेली नव्हती. पण २०१४ साली जेव्हा काँग्रेसमुक्त भारताचा नारा देऊन नरेंद्र मोदी केंद्रीय सत्तेत बहुमताने पंतप्रधान म्हणून स्थानापन्न झाले तेव्हा त्यांनी नव्या दमाने या तीन अभिवचनांच्या पूर्ततेच्या दिशेने पावले उचलली. राम मंंदिर आणि बाबरी मशिदीचा मुद्दा न्यायालयात असताना काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल त्याविरोधात खटला लढवत होते.

राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी यांनी तर रामाच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली होती. पण त्याचा आपल्याला निवडणुकीत फटका बसेल हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या वक्तव्यात सुधारणा केली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कारकिर्दीत राम मंदिराच्या निर्माणाचे काम सुरू केले, काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले, तिहेरी तलाक रद्द करून मुस्लीम महिलांना दिलासा दिला. मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याइतक्याही जागा मिळालेल्या नाहीत, त्यामुळे आता हिंदुंबहुल देशात आपण हिंदू आहोत, हे सांगण्याशिवाय राहुल गांधी यांना पर्याय उरलेला नाही, असेच दिसते. हो मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही हा त्यांचा जाहीर एल्गार त्यांना किती यश देतो, हे येणारा काळच सांगू शकेल.