हे दुष्टचक्र थांबणार कधी?

संपादकीय

तुझ्या घामामधून, तुझ्या कामामधून
उद्या पिकल सोन्याचं रान
चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार
तुला नव्या जगाची आण

भाग्य लिहीलेलं माझं तुझं
घाम आलेल्या भाळावरी
स्वप्न लपलेलं माझं तुझं
इथं बरड माळावरी

घेऊन कुदळ खोरं, चला जाऊ म्होरं
आता कशाची भूक तहान……

कवी प्राध्यापक वसंत बापटांनी लिहीलेली ही कविता आहे. कवीने साठसत्तर वर्षानंतर भारतात कशी सामाजिक राजकीय नेतत्वाची अवस्था असेल आणि सामान्य जनतेची किती किंमत असेल, त्याचे मोजक्या शब्दात वर्णन करून ठेवलेले नाही काय? असे म्हणतात, सूर्यालाही जे दिसत नाही, तितके पलिकडले कवीला बघता येते. वसंत बापट तितक्या प्रतिभेचे कवि नक्कीच होते, अन्यथा त्यांनी साठसत्तर वर्षापूर्वी आजच्या महाराष्ट्राचे इतके नेमके वर्णन कशाला लिहून ठेवले असते? जणू भविष्यच ना? आज अवघा महाराष्ट्र अतिवृष्टी व महापुराने बुडाला व बेजार झाला आहे. शेतकरी, सर्वसामान्याचे संपूर्ण आयुष्य आणि भविष्य उध्वस्त होऊन गेलेले आहे. गेल्यावर्षीही हिच परिस्थिती होती.

त्याअगोदरच्या वर्षीही असेच होते. हा दुर्दशेचा फेरा आजही कायम आहे. त्यातून सर्वसामान्य, शेतकर्‍याला बाहेर काढायची कोणाला फिकीर आहे काय? त्याला अन्नदाता वा जगाचा पोशिंदा म्हणून नित्यनेमाने माध्यमाच्या कॅमेर्‍यात बोलणारेच त्याची वंचना करीत आहेत. ज्यांनी मते मिळाल्यावर आपापल्या जबाबदार्‍या ओळखून सरकार स्थापन करावे, किंवा त्या सरकारला धारेवर धरून कामाला जुंपावे, असे सगळेच कोणते गीत कृतीतून गात आहेत? काय करीत आहेत? कसे वागत आहेत? उपरोक्त कवनातील शेवटची ओळ त्या दुरावस्थेतील ग्रामीण शेतकरी नागरिकाला सगळेच पक्ष ठणकावून सांगत नाहीत का? तो बिचारा अपेक्षेने पूनर्वसनाच्या भरपाईच्या प्रतीक्षेत आशाळभूत बसला आहे आणि कृतीतून सगळे पक्ष काय म्हणतात?

पावसामुळे आलेल्या पुराने लक्षावधींची शेती उध्वस्त झाली व घरेदारे उजाड झाली आहेत. महाडजवळील तळीये गावात दरड कोसळून ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या शेतीची माती झाली आहे आणि त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना कोरडा दिलासा देणारा प्रत्येकजण एकाहून एक मोठ्या रकमेची मागणी सरकारकडे करतो आहे. पण सरकार कोण आहे? सरकार कुठे आहे? सरकार कुठे असते? सरकार नावाची जादूची कांडी कुठून जन्माला येते? ज्यांना आपण निवडून देतो, त्या लोकप्रतिनिधींनीच एकत्र बसून चर्चा करून राज्याचा कारभार चालवण्याला लोकशाही असे म्हणतात. त्यातले काही एका बाजूला बसतात आणि राज्याचा कारभार हाकू लागतात, त्यांच्यापेक्षा कमी संख्या असलेले दुसर्‍या बाजूला बसून त्यांच्या कामकाजातील त्रुटी दाखवून कारभार योग्य होण्याची काळजी घेतात.

त्याला लोकशाही म्हणतात ना? सामान्य शेतकर्‍याला बांधावर येऊन कुठल्या तरी काल्पनिक सरकारकडून अमूक हजाराची भरपाई मिळाली पाहिजे म्हणून मागण्याही करीत आहेत. जणू त्यांचीच घरेदारे उध्वस्त झालीत किंवा महापुरात वाहून गेल्यासारख्या आवेशात बांधावर येऊन बोलणारे, मुंबई-पुण्यात पोहोचले, मग त्यांना बुडालेल्या शेताची वगैरे काही आठवणही होत नाही. मग त्यांना त्यांच्या भाळावरील भाग्य दिसते आणि आपापले स्वप्न आठवते. उपरोक्त ओळींनी आपल्या लोकशाहीतील खरेखुरे विभाजन केलेले आहे. जरा समजून घेतले पाहिजेत त्या ओळी.

तुझ्या कामामधून व तुझ्या घामामधून, हे सामान्य लोकांना नागरिकांना शेतकरी कष्टकर्‍याला उद्देशून म्हटलेले आहे. म्हणणारा कालपरवा आपल्या बांधावर येऊन रडून गेला तोच आहे. तो कुठल्याही पक्षाचा असेल व झेंडा घेऊन आलेला असेल. तो आपल्याला काय सांगतोय, ते समजून घ्यायला हवे मित्रांनो. तुझ्या काम वा घामातून, याचा अर्थ तो स्वत: कुठलेही काम करीत नाही आणि वातानुकुलीत दालनात बसत असल्याने त्याला घामही येणाचा विषय उद्भवत नाही. सहाजिकच या ओळी तुम्हा आम्हा सामान्य जनतेसाठी आहेत. आपण जगण्यासाठी काबाडकष्ट उपसतो. रोजच्या भुकेचा अग्नी शांत करण्यासाठी राबतो. त्यात अशा लोकप्रतिनिधी वा पक्ष व नेत्यांचा काडीमात्र सहभाग नसतो. कष्ट त्याचे नसतात, ते फक्त तुमच्या वाट्याला येत असतात. अर्थात कारखाना असो किंवा शेत असो, तिथे काम करून घाम गाळला, तर सोनंच पिकणार ना? तिथल्या कष्टाने भाग्य उजळणार ना? भाग्य कष्टानेच लिहिले जात असते. पण भाग्य हा शब्द येताच चित्र कसे पालटून जाते बघा. तिथे बांधावर भेटायला येणारा कडक इस्त्रीच्या कपड्यातला नेता म्हणतो.

‘भाग्य लिहिलेलं माझं तुझं’. म्हणजे काय? तर भाग्य किंवा पीक येण्याच्या वेळी कष्टकरी मागे पडतो. आधी बांधावरचा पर्यटकाचा हिस्सा आणि उरलंसुरलं तर तुझं. रांगेत पहिला तो आणि नंतर तुम्ही असता, मित्रांनो. म्हणून इतका मोठा महापूर येऊन किंवा अतिवृष्टी होऊन अर्धा महाराष्ट्र उद्ध्वस्त उजाड झालेला असतानाही त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत आहे.त्यात कुणालाही देशोधडीला लागलेल्या शेतकरी ग्रामीणांची आठवणही नाही. प्राधान्य आपापल्या अधिकारपदांना आहे आणि त्याकरिता उद्ध्वस्त शेतकरी जनतेने कळ काढायची आहे. ती कळ काढताना मरून गेलात तरी फिकीर नाही. कारण तुमच्या बरड बुडालेल्या माळावर स्वप्न त्यांचे लपलेले असते. आज हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. महापुराने अनेकांचे सर्वस्व हिरावून घेतले आहे. त्यांच्यापर्यंत मदत कधी पोहचणार, याकडे केवळ पूरग्रस्तच नव्हेतर सरकार नावाच्या यंत्रणेकडे डोळे लावून बसलेल्या प्रत्येकाचा हा प्रश्न आहे.

यांनी मदत करावी, त्यांनी पैसे द्यावे, हे आता अति झाले आहे. शेतकरी गेला, कष्टकरी गेला, सर्वसामान्यही या पुरात कोलमडला आहे. त्यातून त्याला कोण बाहेर काढणार? महापूर, अतिवृष्टी हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे होते, त्याला वाढती लोकसंख्या जबाबदार आहे, असे शब्द किती चांगले वाटतात ना! असे शब्द उच्चारणार्‍यांकडे लोक शहाणे म्हणूनही बघतात. पण या गोष्टी थांबवायच्या कशा याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नसते. लोकसंख्या वाढतेय तर लोकांचे बळी घ्यायचे का? त्यांना राहायला घर, खायला अन्न नको का? मग हे सर्व हवेतर महापूर आणि अतिवृष्टी होणारच असेल तर सरकार नावाची यंत्रणा का अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातील पूर वृत्तवाहिन्यांवर बघणार्‍या प्रत्येकाच्या मनात या प्रश्नाने घर केले आहे. आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरवासियांचा नंबर असेल तर भविष्यात त्या ठिकाणी आपण तर नसणार ना, या प्रश्नाने राज्यातील नागरिक भयभीत झालेले आहेत. त्यावेळीही हे सरकार केंद्रातून येणार्‍या मदतीच्या आशेवर आपले बळी तर देणार नाही ना, अशा साशंकतेने गळीत झाले आहेत.