कोकणात पाऊस भरवतोय धडकी!

नियोजन नसल्याने कोकणाला पाहिजे असलेला पाऊस भविष्यात घातक ठरू शकेल हे ‘दूरदृष्टी असलेले’ अशी बिरूदावली लागलेल्या नेत्यांना कधी समजले नाही. कारखाने, निवासी वसाहतींसाठी करण्यात आलेले भराव कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीप्रमाणे ठरले आहेत. खरं तर २३ आणि २४ जुलै १९८९ रोजी रायगडच्या जांभुळपाडा, पाली, नागोठणे येथे आलेल्या महापुराकडे भविष्यातील धोक्याचा इशारा देणारा ट्रेलर म्हणून पाहिले गेले असते तर वारंवार उद्भवणारी संकटे काहीशी कमी झाली असती. १९८९ च्या महापुरात भरावांमुळे पाण्याचा धड निचरा होत नसल्याचे स्पष्ट झाले होते. आलेले संकट इष्टापत्ती समजून कोकणात पूर येणार्‍या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात त्यानंतर बोलघेवड्या नेत्यांकडून आश्वासनांचा पूर आला.

कोकण आणि पाऊस यांचे एक घट्ट नातं आहे. कोकणात सिंचन योजनांचा दुष्काळ असल्याने खरीप हंगाम संपूर्णतः पावसावर अवलंबून असतो. पर्यावरण संरक्षणाला दुय्यम महत्व दिले गेल्याने अलिकडे पावसाचे संतुलन बिघडल्यासारखे झाले आहे. यामुळे कशीबशी शेतीची कामे उरकणारा शेतकरी कायम एक प्रकारच्या तणावाखाली असतो. कोकणात पावसाचे धुमशान कायमच पहावयास मिळाले आहे. पावसाळा येत होता आणि जात होता. कुठेतरी नद्यांना पूर यायचा. लोकही नंतर सारे विसरून जायचे. आता मात्र पाऊस सुरू झाला की पुढे काय होणार, याची चिंता सर्वांना लागते. गेल्या दोन-तीन दशकात पावसामुळे कोकणात जो काही हाहा:कार उडाला त्याची भीती आजही कायम आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणूपासून सिंधुदुर्गातील बांद्यापर्यंत कोकण पसरला आहे. मुंबई हाही कोकणचाच भाग आहे. शेती, पर्यटन, गड किल्ले हे कोकणचे खरे वैभव! गेल्या काही वर्षांत कोकणात उद्योग मोठ्या प्रमाणात आले. रायगड जिल्ह्यातील तळोजे, रसायनी, तसेच रत्नागिरीच्या चिपळूणमधील लोटे माळावर उभे राहिलेले उद्योग इथपर्यंत औद्योगिकीकरणाची ओळख होती. पुढे रोहे, नागोठणे, महाड, अलिबाग या पट्ट्यात प्रचंड मोठे उद्योग उभे राहिले. उरणमध्ये बॉम्बे हायमुळे तो परिसरही कारखान्यांनी फुलून गेला. कोकणाला निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्य प्रदान केले असताना या ठिकाणी रासायनिक कारखानदारी पद्धतशीरपणे माथी मारण्यात आली. याचा परिणाम कोकणावर नक्कीच झाला आहे.

औद्योगिकीकरण झपाट्याने वाढल्यामुळे नागरीकरणानेही वेग पकडला. ग्रामीण भाग कात टाकू लागला. इमारती उभ्या राहिल्या. उद्योगांना पूरक व्यवसायही सुरू झाले. कोकणची भौगोलिक रचना हे सर्व सहन करण्यापलिकडे असल्याने ठिकठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले. डोंगर भुईसपाट होऊ लागले. तेथूनच अनेक आपत्तींना संधी मिळत गेली. कोकणात पावसाचे प्रमाण लक्षात घेतले तर सुनियोजित विकास हे शहाणपणाचे लक्षण ठरले असते. परंतु विकासाच्या नावाखाली अनेकांनी स्वतःची तुंबडी भरून घेताना कोकणाला अक्षरशः ओरबाडून काढले आहे.

नियोजन नसल्याने कोकणाला पाहिजे असलेला पाऊस भविष्यात घातक ठरू शकेल हे ‘दूरदृष्टी असलेले’ अशी बिरूदावली लागलेल्या नेत्यांना कधी समजले नाही. कारखाने, निवासी वसाहतींसाठी करण्यात आलेले भराव कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीप्रमाणे ठरले आहेत. खरं तर २३ आणि २४ जुलै १९८९ रोजी रायगडच्या जांभुळपाडा, पाली, नागोठणे येथे आलेल्या महापुराकडे भविष्यातील धोक्याचा इशारा देणारा ट्रेलर म्हणून पाहिले गेले असते तर वारंवार उद्भवणारी संकटे काहीशी कमी झाली असती. १९८९ च्या महापुरात भरावांमुळे पाण्याचा धड निचरा होत नसल्याचे स्पष्ट झाले होते. आलेले संकट इष्टापत्ती समजून कोकणात पूर येणार्‍या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे होते.

प्रत्यक्षात त्यानंतर बोलघेवड्या नेत्यांकडून आश्वासनांचा पूर आला. १९८९ च्या महापुरानंतर दिल्लीहून आलेल्या तज्ज्ञांच्या एका समितीने नद्यांतील गाळ काढून खोली वाढविणे, महाडसह नागोठणे आणि जांभुळपाडा येथे नदी किनारी योग्य उंचीच्या संरक्षक भिंती बांधणे यासारखे उपाय सुचविले. याचा पाठपुरावा न झाल्याने पुढे काहीच घडलेले नाही. गेल्या वर्षी महाड शहर आणि परिसर, तसेच चिपळूणमध्ये अभूतपूर्व असा महापूर आला. त्यावेळी पाऊस जास्त प्रमाणात पडला हे खरे असले तरी पुरासाठी पोषक ठरलेल्या अनेक बाबी पुढे आल्या. यावर अनेकांनी गळा काढला. पण मूळ दुखण्याला हात घालण्याची हिंमत अद्याप कुणाला झालेली नाही.

भराव, अवैध बांधकामे, पाणी जमिनीत मुरण्यासाठी आलेले अडथळे याची प्रकर्षाने चर्चा झाली. नाही म्हणायला महाडच्या सावित्री नदीचा गाळ उपसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नदीची खोली वाढणार असली तर पुराचे भय संपलेले नाही. महाडमध्ये दरवर्षी पूर येऊन कोट्यवधी रुपयांची हानी होत असताना तेथे आवश्यक असलेले धरणांचे प्रकल्प एकतर अर्धवट स्थितीत आहेत किंवा कागदावर आहेत. कुरघोडीच्या राजकारणात धरणे पूर्ण होत नाहीत. याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय, हे लक्षात येईल तो सुदिन ठरेल. सोयीप्रमाणे शहरे, गावांचा विस्तार होऊ द्यायचा आणि अंगलट आले की मिठाची गुळणी घेऊन गप्प बसायचे असे चालले आहे.

पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक मार्ग बुजवून टाकल्याने काही वेळ मुसळधार पाऊस पडला की पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. नालेसफाई आणि गाळ उपशानंतर मुंबईही दरवर्षी पुराचा अनुभव घेत आहे. तिकडे पुराची टांगती तलवार कायम असलेल्या चिपळुणातही भरावांचे पेव फुटल्याने एरव्ही साध्या वाटणार्‍या पुराचा महापूर होत आहे. कोकणातील प्रत्येक शहरात पूर परिस्थिती निर्माण करण्यास भराव अडथळा ठरत आहेत. २००५ मध्ये पनवेलनेही हा अनुभव घेतला आहे.

स्वाभाविक पावसाचे प्रमाण वाढले की सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो. यंदाचा पाऊस सरासरीच्या ९९ टक्के किंबहुना त्याहीपेक्षा अधिक पडेल असे भाकीत ऑस्ट्रेलियासह भारतातील हवामान अंदाज यंत्रणांनी वर्तविला आहे. त्यामुळे यावर्षी काय होणार, याची चिंता प्रत्येकाला वाटणे सहाजिक आहे. पाणी वाहून नेणारे नाले, गटारे वर्षभर प्लास्टिकसह अन्य कचर्‍यांनी तुंबवून द्यायची आणि पावसाच्या तोंडावर सफाईचा फार्स करायचा हा नित्यक्रम ठरून गेलेला आहे. मोठ्या शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत नाले, मोठी गटारे पाहिल्यानंतर त्यांचे डम्पिंग ग्राऊंड झाल्याचे लक्षात येते. कचरा उचलण्याची सोय ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत सर्वांनी केलेली असताना, तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची व्यवस्था असतानाही कचरा सरसकट नाल्यात किंवा गटारात भिरकावून देण्याची खोड काही जात नाही.

यावर वेळीच कठोर कारवाई करण्याऐवजी सफाईवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तरीही पुराचे भय संपलेले नाही. ग्रामीण भागातील नद्यांचा परिसर सर्रासपणे डम्पिंग ग्राऊंड करून टाकण्यात आलेला आहे. तसेच काही ठिकाणी अवैध भराव करण्यात येत आहेत. यात संबंधित यंत्रणांचे हात ओले होत असतात हे आता लपून राहिलेले नाही. पुराला कारणीभूत ठरणार्‍या कारणांकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांना जबाबदार धरण्याची वेळ आली आहे. तसेच अवैधरित्या भराव करणार्‍यांवर कठोर कारवाईचा बडगा उचलला पाहिजे. वारंवार उद्भवणारी पूर परिस्थिती हा विषय गंभीरपणे हाताळण्याची नितांत गरज आहे.

पुराप्रमाणेच कोकणातील काही भागात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे प्रमाण वाढले की महाकाय दरडी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत आहेत. डोंगरातील मातीची पाणी पकडून ठेवण्याची क्षमता नसल्याने दरड कोसळते हे जसे एक कारण आहे, तशी इतरही कारणे आहेत. कोकणात विकासकामांचा वेग वाढल्याने भराव करण्यासाठी, रस्त्यासाठी माती काढण्याकरिता डोंगर पोखरले जात आहेत. वेळप्रसंगी प्रचंड क्षमतेचे सुरूंग लावले जात आहेत. या सुरूंगांमुळे डोंगर खिळखिळे होत आहेत. याशिवाय वृक्षतोडही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. धनदांडग्यांनीही डोंगरात घुसखोरी केली असून, तेथे माती उत्खनन, तसेच वृक्षतोड करण्यात येत आहे. या कारणांमुळे डोंगर कोसळणार नाही तर आणखी काय होणार!

कोकणात महाड आणि पोलादपूर तालुक्यांना दरडींची भीती कायम आहे. १९९२ मध्ये महाड तालुक्यातील पारमाची येथे दरड कोसळून २० जणांचा मृत्यू झाला. सन २००५ मध्ये याच तालुक्यात जुई, कोंडवते, दासगाव येथे दरडी कोसळून १५० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी, २०२१ मध्ये, महाडपासून काही अंतरावर असलेल्या तळीये येथे मुसळधार पाऊस असताना दरड कोसळून ४० जणांचे प्राण गेले. याच दरम्यान पोलादपुरातही दरड दुर्घटना घडल्या. अतिदुर्गम भागात असलेल्या केवनाळे येथे ५, तर साखर सुतारवाडी येथे ६ जण दरडीखाली गाडले गेले. सुरूंगकामांमुळे होणारे भूस्खलन, डोंगरावर फार्महाऊस बांधण्यासाठी नियम पायदळी तुडवणे अशी काही कारणे तेथे दरडी कोसळण्यामागे असल्याचे स्थानिक सांगतात. दरडीचे भय संपलेले नसले तरी महाड, पोलादपुरात आजही धोकादायक डोंगरांवर, पायथ्यापाशी अनेकांचे वास्तव्य आहे. अर्थात, ही त्यांची चूक नाही, तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यास शासन अपयशी ठरल्याने डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन त्यांना रहावे लागते. तेथील रहिवाशांना पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर न चुकता वस्ती खाली करण्याची नोटीस धाडली जाते. ही चेष्टा आता थांबली पाहिजे.

कोकणातील मुख्य महामार्गाचे आता चौपदरीकरण होत आहे. हे काम कधी पूर्ण होईल, हे साक्षात ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही, असे म्हटले जाते. पावसाळ्यात कोकणातील रस्त्यावरून प्रवास करणे फार जिकीरीचे असते. सुमार दर्जाचे रस्ते पाऊस सुरू झाला की, १५ दिवसांतच उखडायला सुरुवात होते. कोकणातील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन रस्त्यांचा दर्जा सुधारा ही मागणी जुनी आहे. परंतु लोकप्रतिनिधींची अनास्था आणि रस्त्याच्या कामात पैसा खायला सोकावलेल्या यंत्रणांमुळे रस्त्याची चाळण ठरलेली असते. कोकणातील नागमोडी रस्त्यांवरून प्रवास करणे आनंददायी वाटते. पण रस्त्यातील खड्डे चुकविताना नागमोडी वळणे आपोआप घेतली जात आहेत. गणेशोत्सवापर्यंत रस्त्यांची पार वाताहत होते. मग नेत्यांच्या भेटीचा फार्स सुरू होऊन भर पावसात डांबरीकरण उरकून घेतले जाते. चार दिवस सरले की येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती उद्भवते.

कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या गप्पा अधूनमधून ठोकल्या जातात. दुर्दैवाने आजही दर्जेदार रस्ते, विकास कामे करताना नियोजन यातील त्रुटी ठसठशीतपणे समोर येतात. यात भरडून निघतो तो सामान्य माणूस! त्यामुळे कोकणातील पाऊस म्हटला की आता भीती वाटू लागली आहे. उद्भवणार्‍या पूर परिस्थितीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन नुकसान होत आहे. नोव्हेंबरनंतर पाणीटंचाई जाणवणार्‍या कोकणात पाऊस धडकी भरवू लागलाय हा मोठा विरोधाभास आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे यावर्षीचा पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकण व्यापून टाकेल. सुरुवातीच्या काही दिवसांतील पावसाची जी सरासरी असते ती वेळेपूर्वीच ओलांडली जाईल, असाही अंदाज आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाने आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय, याची चिंता आहे. तहान लागली की विहीर खणण्याची सवय मोडल्यानंतरच कोकणातील पाऊस सुसह्य ठरेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.