दरोडेखोर श्रीमंतीचे ‘राज’!

संपादकीय

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आणि दरोडेखोर श्रीमंतीचे ‘राज’ समोर आले. खरेतर राज याला याआधीसुद्धा झटपट श्रीमंतीच्या प्रकरणांमध्ये अटक झाली होती. पण, प्रत्येक प्रकरणात कायद्याच्या पळवाटा शोधत बाहेर आलेल्या राजवरील आरोप पाहता हा 18 व्या वर्षी शिक्षण सोडणारा माणूस आज 2800 कोटींचा मालक कसा होऊ शकतो, याच्या एकापेक्षा एक सुरस कहाण्या समोर येतात. महिन्याला 50 कोटींची कमाई करणारा हा उद्योगपती असे कोणते कष्ट करून ‘उद्योग’ करत होता की ज्यामधून तो या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावत आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्याच्या आतापर्यंतच्या श्रीमंतीचे मार्ग बघता ते व्हाईट कॉलर दरोडेखोरीच्या दिशेने जातात हे स्पष्ट दिसत आहे.

आपल्या दुसर्‍या बायकोला म्हणजे अभिनयाच्या नावाने बोंब असलेल्या, पण आपल्या सडपातळपणाचे सतत प्रदर्शन मांडणार्‍या ‘नटी’ शिल्पा शेट्टीला 2010 मध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दुबईतील जगप्रसिद्ध बुर्ज खलीफाच्या 19 व्या फ्लोअरवर 50 कोटींचा एक फ्लॅट भेट म्हणून दिला होता. हे ऐकून मसाला हिंदी चित्रपट पाहूनसुद्धा डोके गरगरणार नाही, याहून अधिक मती गुंग होते. ही मती येथेच गुंग होऊन थांबत नाही तर काही दिवसांनी शिल्पाने तो फ्लॅट विकला. या मागचे कारण म्हणजे तो फ्लॅट लहान होता आणि त्या फ्लॅटच्या खिडक्या उघडू शकत नव्हत्या. शिल्पा आणि राज यांचा मुलगा विवानला मोकळ्या जागेत रहायला आवडतं आणि फ्लॅटच्या खिडक्या उघडू शकत नसल्याने त्याला त्रास व्हायचा, म्हणून शिल्पाने हा फ्लॅट विकला…आता बोला.

या ‘महापराक्रमी’ राजला अटक केली त्याची एक आश्चर्यकारक कथा आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राजला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. फेब्रुवारी 2021 मध्ये राजच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. अश्लील चित्रपट तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्यानंतर चौकशीदरम्यान त्याच्याविरोधात काही पुरावे आढळल्यामुळे त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. राजला ही काही पहिल्यांदाच अटक झालेली नाही. यापूर्वीही त्याला अनेकदा कोर्टाची पायरी चढावी लागली होती. मार्च 2020 मध्ये राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार मुंबईतील एनआरआय सचिन जोशी यांनी दाखल केली होती. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शूटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती.

अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणार्‍या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. आताची राजला अटक आहे ती याच प्रकरणात. राज यांच्या दरोडेखोर ‘श्रीमंती’चे प्रताप एकापेक्षा एक सरस असून ऑक्टोबर 2019 मध्ये इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात याला ईडीने समन्स बजावलं होतं. यावेळी अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडासोबत त्याने व्यावसायिक करार केल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. इक्बाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघ बिंद्रासोबत हा करार होता. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशीलांची पडताळणी करत असताना ईडीला राजची माहिती मिळाली होती. या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आलं. ही कंपनी राजच्या मालकीची असून अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक असल्याचं समोर आलं होतं. बिटकॉईन घोटाळ्यात राजला ईडीने 2018 साली समन्स बजावले होते. 2 हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा असण्याचं सांगण्यात आलेलं.

समन्स जारी केल्यानंतर 5 जून 2018 रोजी राज कुंद्रांनी ईडीचे कार्यालय गाठले होते. या कार्यालयात ईडीच्या अधिकार्‍यांकडून राज कुंद्राची कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणातला मुख्य आरोपी अमित भारतद्वाज सध्या अटकेत असून हे प्रकरण मनी लॉन्डरिंगशी संबंधित असल्यामुळे राज यांची दरोडेखोर ‘श्रीमंती’ लगेच समोर येते. या प्रकरणाच्या मुळाशी जाताना असे दिसून येते की गेट बिटकॉईन्स डॉट कॉम या नावे एका वेबसाईटची निर्मिती करण्यात आली होती. एवढेच नाही तर या वेबसाइटद्वारे हजारो लोकांची फसवणूक करण्यात आली. या योजनेत सुमारे 8 हजार लोकांचे 2 हजार कोटी रुपये बुडाले होते. कमी वेळेत श्रीमंत व्हायचे असेल तर, जुहूला समुद्रकिनारी अलिशान बंगला घ्यायचा असेल तर, त्याच बंगल्याच्या दारात दरोडेखोर ‘श्रीमंती’चा माज दाखवणार्‍या कोटी कोटींच्या गाड्या उभ्या करायच्या असतील तर असे छोटे मोठे उद्योग राज करत होता. या दरम्यान चौकशी होत होती, पण लगेच त्यामधून बाहेर पडत असल्याने ‘सापडला तो चोर आणि सुटला तो साव’, अशा थाटात पुन्हा उजळ माथ्याने फिरत होता.

राजने ‘वन टू का फोर’मध्ये हात मारण्याची एकही संधी सोडली नाही. आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते. विशेष म्हणजे या महापराक्रमी माणसाचे पराक्रम एवढे मोठे होते की, त्याला हयात असेपर्यंत क्रिकेटपासून दूर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. राज हा राजस्थान रॉयल्सचा सहमालक होता. हे प्रकरण इतके गंभीर होते की राजस्थानवर दोन वर्षांची बंदीसुद्धा घालण्यात आली होती. चौकशीत राजने सट्टेबाजी केल्याची कबुली दिल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला कायमचा बाहेरचा रस्ता दाखवला. राजच्या दरोडेखोरीची सुरस कथा येथेच थांबत नाही.

2017 मध्येही ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापार्‍याला लाखो रुपयांना गंडा घातल्याच्या प्रकरणात त्याचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव होते. याच वर्षी राजवर अभिनेता सचिन जोशीने फसवणुकीचा आरोप केला होता. राजने 2017 पोकर लीगची स्थापना केली होती. या लीगमध्ये सचिनने भाग घेतला होता. मात्र या लीगमध्ये कोणती टीम जिंकणार हे राजने आधीच ठरवले होते. यामुळे सचिनने या लीगमधून काढता पाय घेतला. देशातील नामवंत उद्योगपतींनी आपलं साम्राज्य उभं करण्यासाठी आपली हयात घालवली. यामधून या देशातील लाखो लोकांना रोजगार मिळाला. मात्र राजसारख्या या नवउद्योगपतीने मात्र कुठलेही कष्ट न घेता कोट्यवधींची कमाई केली तिचा पाया हा लबाडीचा आहे आणि हेच दरोडेखोर ‘श्रीमंती’चे राज होय…