घरफिचर्समायमहानगर ब्लॉग'वस्ताद पाटील' काळाच्या पडद्याआड

‘वस्ताद पाटील’ काळाच्या पडद्याआड

Subscribe

भारदस्त व्यक्तिमत्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा, आवाजातील खास जरब यामुळे गावचा पाटील, पोलीस आयुक्त अशा भारदस्त भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री निधन झाले. रवी पटवर्धन यांनी दीडशेहून अधिक नाटके आणि २०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. सध्या लोकप्रिय असलेल्या ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत त्यांनी खाष्ट सासर्‍याची भूमिका केली होती. रवी पटवर्धन यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३७ रोजी झाला. १९४४ मध्ये झालेल्या नाट्य महोत्सवातील बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षाच्या वयात रवी पटवर्धन यांनी भूमिका केली होती़.

आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरी यांच्याबरोबर केले. त्यानंतर आता वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांनी याच नाटकात धृतराष्टाची भूमिका केली. वयपरत्वे येणारे विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले होते. आईची व्यायाम करायची आवड रवी पटवर्धन यांच्यामध्ये उतरली होती. वयाच्या ८० व्या वर्षी भगवतगीतेचे ७०० श्लोक पाठ करुन ते शृंगेरी मठाच्या परिक्षेला बसले होते. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परिक्षेत ते पहिले आले होते.

- Advertisement -

रवी पटवर्धन मुंबईच्या रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. १९६४ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत कथा कोणाची व्यथा कोणाला या नाटकात त्यांनी काम केले होते. प्रपंच करावा नेटका, ह्दयस्वामिनी, बेकेट, कौंतेय, आनंद, वीज म्हणाली धरतीला, मुद्राराक्षस, जोशी अभ्यंकर खुन खटल्यावर आधारित जबरदस्त, विषवृक्षाची छाया, मला काही सांगायचंय, तुघलक, अपराध मीच केला आदी नाटके त्यांनी केली.

आमची माती आमची माणसं या दूरदर्शनवरील कार्यक्रमात ते वस्ताद पाटील असत. त्यातील १०० भागात त्यांनी काम केले होते. भारदस्त व्यक्तिमत्वामुळे त्यांना नेहमीच पोलीस अधिकारी, न्यायाधीश किंवा खलनायकी भूमिका मिळत गेल्या होत्या. अंकुश, अशा असाव्या सुना, तेजाब, नरसिंह, प्रतिघात, सिंहासन, हमला, तक्षक, बिनकामाचा नवरा, उंबरठा अशा असंख्य हिंदी, मराठी चित्रपटात त्यांनी काम केले होते. सध्याही ते अग्गबाई सासूबाई या मालिकेत सासर्‍याची भूमिका करीत होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -