घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकोरोनातुनी तेजाकडे...

कोरोनातुनी तेजाकडे…

Subscribe

निकालानंतर काही जण निराश होतात. त्यातून टोकाची पावलं उचलली जातात. आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणार्‍या आव्हानांची तयारी करून घेते. यानंतर सुरू होणार्‍या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली. मार्च आणि एप्रिल महिन्यात लेखी स्वरुपात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. हा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे गेल्या वर्षी कोरोनामुळे महाविद्यालय स्तरावरच हा निर्णय निकाल तयार केल्यामुळे जवळपास सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा मात्र लेखी परीक्षेच्या आधारे गुणांकन झाले तरी, मुलांपेक्षा मुलीच अधिक सरस असल्याचे निकालाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. राज्याच्या एकूण निकाल ९४.२२ टक्के लागला. त्यात मुलींचे प्रमाण ९५.३५ टक्के इतके आणि मुलांचे प्रमाण ९३.२९ टक्के इतके आहे. सरासरी दोन टक्के मुली मुलांपेक्षा दोन पाऊलं पुढे आहेत. प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे असल्याचे दिसून येते. नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात मुलीच अव्वल होत्या. एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा असो किंवा महाविद्यालयीन परीक्षा यात मुलींचीच सरशी होत असल्याने प्रत्येक क्षेत्रात मुलींचा दबदबा वाढत आहे.

गेल्या बारा वर्षांपासून मुलींनी बोर्डाच्या परीक्षेत बाजी मारल्याचे आपल्याला दिसून येईल. मुलींच्या यशामागील रहस्य शोधले असता मुलांपेक्षा मुली अभ्यास आणि करिअरविषयी जास्त गांभीर्याने विचार करत असल्याचे बोर्डाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. करिअरची दिशा निश्चित करण्यासाठी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या निकालास विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे या परीक्षांच्या निकालाकडे केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकांचेही विशेष लक्ष लागून असते. बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आणि त्यातही अपेक्षेप्रमाणे मुलींनीच बाजी मारली. याचे वैशिष्ठ्ये म्हणजे दहावीनंतरच मुली आपल्या करिअरविषयी जास्त गांभीर्याने विचार करायला लागतात. या तुलनेत मुले टाईमपास करतात किंवा इतर गोष्टींमध्ये अ‍ॅक्टिव्ह असतात. मुली सातत्याने अभ्यास करत असल्याने दहावी असेल किंवा बारावी परीक्षा यामध्ये त्यांची मेहनत दिसून येते. वरवरचा अभ्यास करुन एखादी परीक्षा उत्तीर्ण होता येऊ शकते. परंतु, सातत्य राखण्यासाठी अभ्यास प्रमाणिकपणे करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलींचा ‘फोकस’ अभ्यासावर केंद्रित राहत असल्याचे दरवर्षीच्या निकालातून स्पष्टपणे दिसून येते.

- Advertisement -

आजवर आंब्यासाठी प्रसिध्द असलेल्या कोकणातील विद्यार्थ्यांनी निकालातही गोडवा निर्माण केला आहे. शिक्षण आणि बोर्डाच्या परीक्षा म्हटले की राज्यात लातूर पॅटर्नची सर्वाधिक चर्चा होत असे. पण आता लातूरला मागे टाकत कोकण विभागाने निकालात आघाडी घेतली आहे. राज्यातील नऊ विभागांपैकी कोकण (९७.२१), नागपूर (९६.५२), अमरावती (९६.३४), लातूर (९५.२५), कोल्हापूर (९५.०७), नाशिक (९५.०३), औरंगाबाद (९४.९७), पुणे (९३.६१), मुंबई (९०.९१) असा निकाल जाहीर झाला. सर्व विभागातील १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुंबई विभागाची सर्वात शेवटच्या स्थानी घसरण झालेली दिसते. मुंबईत राज्य मंडळाच्या शाळांंकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचे चित्र यातून दिसते. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ३५ हजार ५२७ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १८ हजार ७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ५३.०२ आहे. यंदाच्या निकालाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे राज्यातील ६ हजार ३३३ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ३०१ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यांचा निकाल ९५.२४ टक्के जाहीर झाला.

राज्यातील अनेक महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याने अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासह औषधनिर्माण शाखेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा सुरू होईल. नामांकित महाविद्यालय, संस्था मिळाली पाहिजे यादृष्टीने पुन्हा स्पर्धेला सुरुवात होईल. कुठल्या क्षेत्रात आपण करिअर केले पाहिजे, याचा अंदाज घेऊन आता करिअरच्या वाटा शोधल्या जातील. स्पर्धात्मक जगातील युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. त्याचा अचूक अंदाज घेऊन आणि आपली क्षमता व मर्यादा योग्य प्रकारे ओळखून करिअरची निवड करणारे विद्यार्थी हमखास यशस्वी होतात. निकाल हा विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेली मेहनत सांगतो, पण एखाद्या विषयात कमी गुण मिळाले म्हणून निराश होण्यात काहीच अर्थ नाही. एखादा विषय म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य नसते. त्यामुळे कमी गुण का मिळाले याचे आत्मपरीक्षण करुन राहिलेल्या उणिवा दूर करुन त्यावर मात करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बरचेदा दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये मुलांना अपयश आले की, विशेषत: मुलींच्या तुलनेत मुलांच्या मनावरील ताबा सुटतो. आपण आता उपेक्षित झालो या भावनेतून ते गैरमार्गाला जाण्याची दाट शक्यता असते, अशा वेळी पालकांनी पुढाकार घेऊन मुलांना धीर देण्याची गरज असते.

- Advertisement -

निकालानंतर काही जण निराश होतात. त्यातून टोकाची पावलं उचलली जातात. आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणार्‍या आव्हानांची तयारी करून घेते. यानंतर सुरू होणार्‍या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल. बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत.

शिक्षणाच्या बरोबरीने कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. यंदा ९४.२२ टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण दोन टक्के अधिक आहे. मुली या मुलांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत. बारावीनंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारकीर्द ठरवण्याचा, भविष्यातील वाटचाल ठरवण्याचा निर्णय घ्यायचा असतो. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर भविष्यातील अडचणी कमी होतील. विद्यार्थ्यांनी स्वत:चे आयुष्य महत्वाचे आहे. गुण हे फक्त पडताळणी करत असतात याची जाणीव ठेवायला हवी. त्यामुळे यश-अपयश हा आकड्यांचा खेळ असतो. त्याचे मूल्यमापन कोरोनानंतर झालेल्या लेखी परीक्षेतून झाले. विद्यार्थ्यांना उभारी देणारा हा निकाल मुलींसाठी प्रेरणादायी ठरला आहे. तसेच कोकण विभागाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -