घरफिचर्समायमहानगर ब्लॉगलोकप्रतिनिधींचे हास्यास्पद आणि तितकेच खेदजनक वर्तन !

लोकप्रतिनिधींचे हास्यास्पद आणि तितकेच खेदजनक वर्तन !

Subscribe

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असतात. कारण लोकप्रतिनिधी त्यावेळी सभागृहात जनतेचे प्रश्न मांडत असतात. त्यामुळे लोकांना भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण होत असते. पण सध्या सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधातील लोकप्रतिनिधींनी एकमेकांना खिजवण्यासाठी जे काही प्रकार केले, ते जितके हास्यास्पद आहेत, तितकेच खेदजनक आहेत. कारण आपण एखाद्या गल्लीत नसून लोकशाहीच्या मंदिरात आहोत, याचे त्यांना भान राहिलेले नाही. त्यामुळे ही मंडळी लोकशाही प्रक्रियेचे अवमूल्यन करत आहेत, पण हे त्यांना कोण सांगणार ?

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरवर्षी नागपूरच्या गुलाबी थंडीत होणारे हिवाळी अधिवेशन हे ओमायक्रॉनचे सावट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत होत आहे. या अधिवेशनातून जनतेला खूप अपेक्षा आहेत आणि होत्या. होत्या यासाठी की अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आणि दुसरे म्हणजे जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील की नाही याची साशंकता आहेच. कारण ज्या पद्धतीने गोंधळ, नकला, आवाज काढण्याचे प्रकार विधिमंडळात सुरू आहेत, त्यामुळे लोकशाहीच्या प्रांगणात हास्यजत्राच सुरू आहे, असे दिसते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. अपेक्षेप्रमाणे राज्यातील परीक्षा घोटाळा, शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडणे यासह विविध विषयांवर आज वादळी चर्चा झाली. मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या नकलांची!

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऊर्जा विभागांशी संबंधित विविध प्रश्नांवर विधानसभा सदस्यांकडून प्रश्न विचारण्यात येत होते. यावेळी विरोधकांकडून ‘सरकारने १०० युनिटपर्यंतचे बील माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण का झाले नाही, असा प्रश्न ऊर्जा मंत्र्यांना विचारण्यात आला. यासंदर्भात उत्तर देताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही १५ लाख देण्याचे आश्वासन दिले होते. ते अजून पूर्ण झालेले नाही, असे उत्तर दिले. यावरून विरोधकांनी आक्रमक होत उर्जा मंत्र्यांनी आपले शब्द मागे घेण्याची मागणी केली. याशिवाय, मोदींनी असे कधीही म्हटले नसून उर्जामंत्री खोटे बोलून सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.

- Advertisement -

याचदरम्यान, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी या चर्चेत उडी घेत मोदींची नक्कल करत, निवडणुकीपूर्वी काळेधन भारतात आणून शेतकर्‍यांच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू असे आश्वासन दिले होते, असे म्हटले. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री ज्येष्ठ नेते सुधीर मुंगटीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत भास्कर जाधव यांनी माफी मागावी किंवा त्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली. तसेच देशाच्या पंतप्रधानांची अशाप्रकारे नक्कल करणे हे योग्य नसून अध्यक्षांनी भास्कर जाधवांना समज द्यावी, अशीही मागणी केली. विरोधकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. विरोधकांच्या मागणीनंतर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कान टोचल्यानंतर भास्कर जाधव यांनी माफी मागितली.

या घटनेनंतर अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह आवाज काढले. आदित्य ठाकरे विधानसभेत येत असताना पायरीवर आंदोलन करत असलेल्या भाजपच्या आमदारांसोबत बसलेल्या नितेश राणे यांनी म्याव म्याव करून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. याचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहात उमटले. या प्रकारामुळे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू प्रक्षुब्ध झाले. असभ्यपणे आवाज काढल्याचा आणि असे प्रकार रोखण्याची गरज असल्याचा विषय शुक्रवारी विधानसभेत सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी नितेश राणेंविरोधात कारवाईची मागणी केली. यावर विरोधकदेखील सभागृहातील सदस्यांचा अपमान करणार्‍यांवर कारवाई करावी या मताशी सहमत झाले. मात्र, असे असताना नितेश राणे यांनी त्यांचा म्याव म्याव असा आवाज काढण्याचा पवित्रा कायमच ठेवला. त्यामुळे विधानसभेत सोमवारी महाविकास आघाडीचे नेते नितेश राणेंच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी सभागृहात करण्यात आली. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत एकमेकांची उणीदुणी काढली.

- Advertisement -

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी अद्याप एक शब्ददेखील उच्चारला नाही आहे. नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात हाच फरक असावा. नितेश राणे हे आदित्य ठाकरेंपेक्षा ९ वर्षांनी मोठे आहेत. मात्र, ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंनी त्यांच्यातली परिपक्वता दाखवली आहे ती वाखण्याजोगी आहे. राजकीय नेत्यांकडून जे अपेक्षित आहे ते आदित्य ठाकरेंकडे दिसून येते. आपल्या समाजात मोठ्या लोकांचे, आमदार-मंत्री यांचे अनुकरण केले जाते. मात्र, राजकीय नेत्यांनी विधिमंडळात हास्यजत्रा सुरू केली असून त्याचे उर्वरित भाग विधानभवनाच्या बाहरेदेखील प्रदर्शित झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विट केला होता. मलिक यांनी कोंबडीला मांजराचे तोंड असलेला फोटो ट्विट करत नितेश राणेंवर निशाणा साधला. या फोटोकडे निट पाहिले तर शरीर कोंबडीचे आणि तोंड मांजरीचे असल्याचे दिसते. तसेच हा फोटो ट्वीट करताना मलिक यांनी पेहचान कौन, असा खोचक सवालही केला होता. त्याला उत्तर म्हणून नितेश राणेंनीही डुकराचा एक फोटो ट्विट केला होता. ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण, अशा ओळी नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोसोबत लिहिल्या होत्या.

या सर्व घटनांवरुन राज्यातील राजकारणाचा स्तर किती खाली घसरत आहे हे दिसते. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा चांगली आहे. निवडणुकीत राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतात. पण त्यांची वैयक्तिक मैत्री असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जाहीर सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मैद्याचे पोते म्हणायचे. पण सभा संपल्यावर विरोध मावळायचा. मैत्री कायम राहायची. मात्र, आता वैयक्तिक द्वेष आणि तिरस्काराचे राजकारण होत आहे. तरुण राजकीय पिढीला तर बोलण्याचे भान राहिले नाही असे दिसतेय. नितेश राणे हे शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला एकेरी भाषेतच बोलतात. ते अत्यंत चुकीचे आहे. कदाचित असे खालच्या दर्जाचे बोललो तर लोकांचे मत आपल्याबद्दल चांगले होईल, जास्तीची प्रसिद्धी मिळेल असे त्यांना वाटत असावे. पण तसे नाही. मतदार हे नेत्यांना निवडणुकीत जागा दाखवत असतात. भाजपने अशा बेताल नेत्यांना आवरायला हवे. आज ते इतर पक्षांवर बोलत आहेत. उद्या ते त्यांच्याही अंगलट येऊ शकेल.

या संपूर्ण घटनांमुळे महाराष्ट्राचे कोणते प्रश्न सुटले याचे उत्तर खरे तर राज्यातील जनतेला मिळण्याची गरज आहे. संसदीय आयुधांचा वापर करून जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे असतात. मात्र, हे आता काही दिसत नाही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील ज्येष्ठश्रेष्ठ सदस्यांनी एक गौरवशाली परंपरा निर्माण केली. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे जनतेप्रती असलेले उत्तरदायित्व हा लोकनियुक्त सरकारचा प्रमुख पैलू असतो आणि हे उत्तरदायित्व केवळ निवडणुकांच्या वेळी बाहेरुन लादता येत नाही, तर ते प्रतिनिधी आणि त्यांचा मतदारसंघ यातील प्रमुख दुवा बनावयास हवे. सभागृहाचा सदस्य बनणे, हाच फार मोठा बहुमान आहे.

प्रगत लोकशाही अस्तित्वात असलेल्या देशांमध्ये हे सदस्यत्व सुवर्णसंधी समजली जाते. त्याचा उपयोग त्या सदस्याने आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो, त्यांच्या फायद्यासाठी करायला हवा. गोंधळ आणि बेशिस्त, औदासीन्य हे काही विधानसभांच्या पाचवीलाच पुजले आहेत. विरोधासाठी वापरावयाचे एक व्यासपीठ म्हणून त्याचा वापर केला जातो. लोककल्याणाचे कोणतेही नियमित कार्य तेथे घडू शकत नाही. त्यांच्या शासकीय विभागांच्या अंदाजपत्रकाची चर्चा चालू असतानाही त्यांना या विधायक कार्यामध्ये भाग घेण्यासाठी फुरसत नसते. समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण करण्याची भूमिका घेऊनच सभागृहात सदस्यांनी गेले पाहिजे.

राज्यात हजारो एसटी कामगार विलीनीकरणासाठी संपावर आहेत. लाखो प्रवाशांचे विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांचे दररोज हाल होत आहेत. यावर तोडगा निघाला पाहिजे. याशिवाय, पेपरफुटीच्या प्रकरणामुळे राज्यातील लाखो युवकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. सरकारी नोकरीची आस लावून बसलेल्या लाखो युवकांच्या जखमांवर पेपरफुटीच्या घटनांनी मीठ चोळले गेले. पेपरफूट, नोकरभरतीतील रॅकेटचा पर्दाफाश झाला. याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाच्या आणखी मुळाशी जाण्याची गरज आहे. यासर्व प्रकरणांमुळे यापुढे कोणतीही सरकारी नोकरभरती ही निर्दोष अन् पारदर्शकच होईल या दृष्टीने धोरणात्मक निर्णय अपेक्षित होता.

या अधिवेशनात शेतकर्‍यांच्या मुद्यावर, सरकारी परीक्षांमधील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेबाबत, महिला अत्याचाराबाबत, राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर चर्चा व्हायला हवी होती. यावर विरोधकांनी आक्रमक व्हायला हवे होते. राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अधिवेशनात इंधन दरवाढीतून दिलासा मिळेल, असे वाटत होते. मात्र काहीच दिलासा सरकारने दिला नाही. यावर नितेश राणेंनी आवाज उठवला असता तर बरे झाले असते. सभागृहात नकला करणारे असोत, शेरोशायरी करणारे असोत की विधान भवनात प्राण्यांचे आवाज काढणारे असोत, हे सारे सरते शेवटी राज्याचा लौकिकच कमी करत असतात.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -