घरफिचर्समायमहानगर ब्लॉगइकडे युद्ध, तिकडे कुंटणखाने...युक्रेनियन महिलांची होरपळ !

इकडे युद्ध, तिकडे कुंटणखाने…युक्रेनियन महिलांची होरपळ !

Subscribe

रशियाची युक्रेनवरील पकड अधिक घट्ट होत असल्याचे या देशातील नागरिकांपासून लपून राहिलेले नाही. यामुळे येथील प्रत्येक घरात एक व्यक्ती ही देशासाठी लढताना मरण्यास तयारच असते. याचाच उपयोग झेलेन्स्की यांनी या यु्द्धात केला आहे. पण कुठलेही यु्द्ध असले तरी त्याची किंमत ही प्रत्येकाला मोजावीच लागते. तसेच काहीसे युक्रेनियन महिलांबाबतीत होताना दिसत आहे. यामुळेच सैनिकांबरोबर शत्रूचा सामना करण्यासाठी हातात रायफल घेतलेल्या युक्रेनियन महिलांवर एकीकडे जगभरातून स्तुतीसुमने उधळली जात आहेत. तिच्या शूरबाण्याचे कौतुक केले जात आहे. तर सीमेपार शरणार्थी म्हणून गेलेल्या युक्रेनियन महिलांभोवती वासनांध गिधाडे घिरट्या घालू लागली आहेत.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला तेरा दिवस उलटून गेले आहेत. पण अजूनही युद्धविरामाची कुठलीही शक्यता दिसत नाहीये. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन अर्टी शर्थींवर यु्द्ध समाप्ती करण्यास तयार आहेत. तर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना मात्र रशियाच्या अटींवर झुकण्यापेक्षा मरण पत्करणे सोपे असे म्हटले आहे. यामुळे हे युद्ध केव्हा संपणार हे अनिश्चित आहे. या युद्धाचे दूरगामी परिणाम युक्रेनियन नागरिकांबरोबरच तेथे शिक्षण किंवा नोकरीधंद्यानिमित्त स्थलांतरित झालेल्या विद्यार्थी आणि इतर नागरिकांना भोगावे लागत आहेत. पण याची सर्वाधिक झळ बसली आहे ती युक्रेनियन महिला बालकांना.

कारण जीवाच्या भीतीने शेजारील देशांमध्ये आश्रयाला जाणार्‍या या महिलांना वेश्याव्यवसायात ढकलले जात आहे. तर मानवतस्करीचा धोकाही वाढू लागला आहे. विशेष म्हणजे यात अशिक्षितच तरुणी नाही तर सुशिक्षित दोन मुलांच्या आयांचाही समावेश आहे. ही धक्कादायक बाब जरी असली तरी जगात जेव्हा जेव्हा युद्ध झाली त्यावेळी पुरुषांना लढून मरून तर महिलांना त्यांच्या स्त्री असण्याची किंमत शरीर विकून द्यावी लागल्याच्या अनेक करूण कहाण्या इतिहासात दडल्या आहेत. रशिया युक्रेन यु्द्धानेच नाही तर अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीनेदेखील पुन्हा एकदा हे अधोरेखित केले आहे.

- Advertisement -

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर तेथे भयाण स्थिती निर्माण झाली आहे. रशियाच्या क्षेपणास्त्रांनी युक्रेनमधील किव, खारकिव्ह, माकरिव्ह बेकरी, झायतोमेर, इरपिन ही महत्वाची शहरे बेचिराख केली असून अजूनही अनेक शहर आणि नागरी वस्त्यांवर रशियन सैनिकांकडून बॉम्बहल्ले सुरूच आहेत. युक्रेनचे अस्तित्वच पुसून टाकण्याच्या उद्देशाने रशिया युद्धात उतरले आहे. यामुळे युक्रेनियन नागरिक जीव वाचवण्यासाठी पोरा बाळांसह वाट दिसेल तिथे धावत सुटले आहेत. अशावेळी युक्रेनला लागून असलेल्या पोलंड, माल्डोवा, रोमानिया, स्वोलाकिया, हंगेरी अनेक देशांनी त्यांना मदतीचा हात देऊ केला असून आपल्या सीमारेषा या युद्धपीडित नागरिकांसाठी खुल्या केल्या आहेत. यामुळे युद्धात सगळंच गमावून बसलेल्या 17 लाख नागरिकांनी शेजारच्या देशात आश्रय घेतला आहे. काहीजणांचे नातेवाईक तर काहीजणांचे मित्र परिवार या देशांमध्ये आहेत. यामुळे मोठ्या आशेने हे यु्द्धपीडित तेथे जात आहेत.

पण सुरूवातीला परोपकार, माणुसकीची लेबल लावून या युक्रेनियन नागरिकांसाठी आपल्या देशाचे आणि घरांचे दरवाजे उघडणार्‍या या देशातील काहींनी आता त्यांचा खरा चेहरा दाखवायला सुरूवात केली आहे. कारण ज्या देशांमध्ये युक्रेनियन आश्रयाला जात आहेत त्यातील बहुतेक देश हे गुन्हेगारीचे अड्डे आहेत. यातील काहींनी अनेक कुटुंबांना, तरुण मुलामुलींना फुकटात शेजारील देशात प्रवेशाबरोबरच राहण्या खाण्याची नोकरी धंद्याची सोय करण्याचे आश्वासन दिले. पण जेव्हा हे सगळे पीडित त्या देशांमध्ये पोहचले तेव्हा मात्र त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. पण यातील अनेकजणांची युद्धात घरंच बेचिराख झाली असून अंगावरच्या एका कपड्यावर त्यांना देश सोडावा लागला आहे. पदरी पैसा अडका नाही, खायला अन्न नाही, डोक्यावर छप्पर नाही या अवस्थेत जीव मुठीत घेऊन या युक्रेनियन नागरिकांनी दुसर्‍या देशांची वाट धरली. पण तेथे गेल्यावर मात्र अनपेक्षित परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागत आहे.

- Advertisement -

ज्या गुन्हेगारी देशांमध्ये हे नागरिक गेले आहेत, तेथील गुन्हेगारी टोळकी सक्रीय झाली आहे. विशेष म्हणजे युक्रेन सरकारच्या आदेशानुसार तेथील प्रत्येक घरातील पुरुष आणि मुलांना नाईलाजाने लष्करात भरती व्हावे लागले आहे. तर त्यांच्या बायका आणि मुलं मात्र परदेशातील गुन्हेगारी टोळक्यांच्या हाती लागली आहेत. युक्रेनियन महिला आणि मुलांचा वापर वेश्याव्यवसायाबरोबरच तस्करीसाठी करण्यात येण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे मानवी तस्करी नीति विशेषज्ञ लॉरेन एग्न्यू यांनी म्हटले आहे. तसेच जर ही युद्धस्थिती अशीच राहिली तर 70 लाख नागरिकांना स्थलांतर करावे लागण्याची शक्यता आहे. यातील अनेकजण मानव तस्करीचे बळी ठरतील असा दावा एग्न्यू यांनी केला आहे. युएनच्या सेक्शुअल व्हायोलन्स कॉन्फ्लिक्टच्या स्पेशल रिप्रेझेंटेटीव्ह प्रमिला पाटन यांनीही तर दुसरीकडे रशिया युक्रेन यु्द्धाच्या पार्श्वभूमीवर शरणार्थी महिला व बालकांचे मूलभूत हक्क डावलले जाण्याबरोबरच त्यांचे शोषण होण्याची भीती व्यक्त केली होती. जी आज खरी ठरताना दिसत आहे.

तर दुसरीकडे ज्या देशांनी शरणार्थी महिला व बालकांची सोय करण्याचे आश्वासन युक्रेन सरकारला दिले होते, ज्यांच्या विश्वासावर प्रत्येक युक्रेनियन कुटुंबाने देश सोडला होता त्या देशांनाही आता रशियाची धास्ती वाटू लागली आहे. अमेरिकेने नामानिराळे राहत लावलेल्या या यु्द्धाचा खरा उद्देश आता युक्रेनच्या शेजारील युरोपीय राष्ट्रांना कळू लागला आहे. यामुळे युक्रेनच्या मदतीसाठी पुढे सरसावलेली राष्टे्र फक्त बोलाचीच कढी आणि बोलाचा भात या म्हणीपुरतीच राहीली आहेत. रशियाशी थेट भिडण्याची धमक अद्यापपर्यंत युक्रेनशिवाय कोणत्याही राष्ट्रांनी दाखवलेली नाही. अमेरिकाच नाही तर भारतानेही सावध पवित्रा घेत रशिया आणि युक्रेनने सामंजस्याने यु्द्धविरामाचा निर्णय घ्यावा असा सावध सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पुतिन आणि झेलेन्स्की यांना दिला आहे.

यावरूनच पुतिन यांची ताकद काय हे समजून येते. पण या अटीतटीच्या यु्द्धात युक्रेनियन महिला आणि त्यांच्या पोराबाळांमागे मात्र संकटाची मालिका वाढतच चालली आहे. काही देशांनी कोरोनाचे कारण पुढे करत या शऱणार्थींना देशात प्रवेश न देताच सीमारेषेवरच तंबूत निवारा दिला आहे. यात महिलांबरोबर काही तान्हुली मुलं आहेत तर काही म्हतारी माणसंही आहेत. पण त्यांना देशाच्या फक्त सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. देश नाही. तसेच हातातील पैसा फार काळ टीकणार नसल्याने या शरणार्थी महिला तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून या देशात तरी स्थिरस्थावर जगता येईल अशी त्यांना आशा आहे. पण या महिला असल्याने त्यांना येथे कोणीही नोकरी देण्यास तयार नाही. उलटपक्षी त्यांना वेश्याव्यवसायात सर्वाधिक फायदा असल्याचे आमिष दाखवले जात असल्याचे किंवा तशी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचे या महिला सांगत आहेत.

दरम्यान, युक्रेनमध्ये वर्षानुवर्ष राहणार्‍या आणि त्याला आपलाच देश समजणार्‍या आफ्रीकन महिलांना मात्र या देशांमध्ये वंशभेदाचा सामना करावा लागत आहे. हे आपल्यासाठी धक्कादायक असून दुजाभावामुळे आपले मानसिक खच्चीकरण होत असल्याची तक्रार या महिला करत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था या शरणार्थी महिलांच्या मदतीसाठी धावल्या असून युक्रेनियन महिला व बालकांना संरक्षण देत आहेत. मात्र तरीही जोपर्यंत रशिया-युक्रेन युद्ध थांबत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाऊ शकत नाही. कारण ज्यांना आम्ही माघारी ठेवून आलोय ते आमच्या घरातील वडील, पती, मुलगा, काका, मामा भाऊ हे पुरुष जे देशासाठी लढत आहेत ते आता जिवंत तरी आहेत की नाही हे देखील आम्हांला माहित नाही, असे या युक्रेनियन महिला सांगत आहेत. यामुळे जोपर्यंत हे युदध सुरू आहे तोपर्यंत या महिलांचासह त्यांच्या मुलांचा जीव टांगणीला लागलेला असणार हे निश्चित आहे.

एकीकडे युक्रेनमध्ये अनेक अशाही महिला आहेत ज्या हिरीरीने यु्द्धात सहभागी झाल्या आहेत. जिंकू किंवा मरू या भावनेने त्या युद्धात पुरुष सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून रणांगणात उतरल्या आहेत. पण ज्या महिलांना मुलं आहेत, कौटुबिक जबाबदार्‍यांचे अधिक ओझं आहे त्यांनी मात्र देश सोडला आहे. रशिया आपल्यावर कधीतरी आक्रमण करणार हे प्रत्येक युक्रेनियन नागरिकाला ठाऊक असते. कारण रशियाची युक्रेनवरील पकड अधिक घट्ट होत असल्याचे या देशातील नागरिकांपासून लपून राहिलेले नाही. यामुळे येथील प्रत्येक घरात एक व्यक्ती ही देशासाठी लढताना मरण्यास तयारच असते. याचाच उपयोग झेलेन्स्की यांनी या यु्द्धात केला आहे. पण कुठलेही यु्द्ध असले तरी त्याची किंमत ही प्रत्येकाला मोजावीच लागते. तसेच काहीसे युक्रेनियन महिलांबाबतीत होताना दिसत आहे. यामुळेच सैनिकांबरोबर शत्रूचा सामना करण्यासाठी हातात रायफल घेतलेल्या युक्रेनियन महिलांवर एकीकडे जगभरातून स्तुतीसुमने उधळली जात आहेत. तिच्या शूरबाण्याचे कौतुक केले जात आहे. तर सीमेपार शरणार्थी म्हणून गेलेल्या युक्रेनियन महिलांभोवती वासनांध गिधाडे घिरट्या घालू लागली आहेत.

असंच काहीसं चित्र अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यावर संपूर्ण जगाने बघितले होते. महिलांना धर्माच्या जोखडात बांधून त्यांच्यावर तालिबानी अत्याचार केले गेले. याविरोधात अफगाणी महिलांनीही मोर्चे आंदोलने केली. कधी नाही तेव्हढ्या मोठ्या संख्येने अफगाणी महिला रस्त्यावर उतरल्या. तालिबान्यांपासून आम्हांला आमच्या मुलांना वाचवा असा टाहो फोडत अनेक अफगाणी महिलांनी आपली चिल्ली पिल्ली तारेच्या कुंपणावरून पलिकडील अमेरिकन सैनिकांच्या दिशेने अक्षरश फेकली. हे चित्र अख्ख्या जगाने बघितलं. प्रत्येकाचं काळीज गलबललं… पण त्यांच्या मदतीला ना आपला देश गेला ना दुसऱा कोणी गेला. उलट अमेरिकेने अफगाणिस्तानमधला आपला गाशा गुंडाळत तालिबान्यांच्या हवाली अफगाण केला.

तेव्हाही त्या महिलांची रुदाली काही महिने सुरू होती. तालिबान्यांकडून त्यांचे लैंगिक शोषण केले गेले. नोकरी सोडून घरात बसावं असं फर्मान तालिबान्यांनी काढलं आणि अनेक वर्षं मोकळा श्वास घेणार्‍या अफगाणी महिलांनी स्वत:ला पुन्हा एकदा बुरखा आणि हिजाबखाली बंदिस्त करून टाकलं. आजच्या तारखेला पुरुषांच्या वेशभूषा करत या अफगाणी महिला घराबाहेर पडत आहेत. स्वत:च्याच देशात त्या कैद झाल्या आहेत. पण युक्रेनियन महिला जीव वाचवण्यासाठी सीमा ओलांडून गेल्या आणि दुसर्‍याच दुष्टचक्रात अडकल्या आहेत. यु्द्ध संपेल तेव्हा हे दुष्टचक्र संपेल, त्यासाठी परमेश्वर पुतीन यांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -