सरहद्दी नसलेला माणूस

सागर सरहदींना माणूसपणाच्या आड येणार्‍या कुठल्याही सरहद्दी मान्य नव्हत्या. देशाच्या फाळणीच्या काळात वाट्याला आलेले दुभंगलेपण त्यांना कायम वेदना देत होते. कोणाला वाटले म्हणून रेफ्यूजी बनून मी माझ्या गाव, कुटुंब, घरदार, नातेवाईक, मित्रमंडळींपासून कायमचे दूर का जावे, हा प्रश्न त्यांना अखेरपर्यंत उद्विग्न करत होता. त्यांच्या संवाद, पटकथा लेखनातही हे दुभंगलेपण झिरपलेले होते. पाकिस्तानातील एबोटाबादमध्ये सरहदींचा जन्म झाला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्यासोबतच फाळणीच्या जखमाही मिळाल्या, या जखमा सरहदींनी व्यावसायिक लेखक म्हणून मिरवल्या नाहीत, माझा भवतालच या अशा वेदनांनी भरलेला आहे, त्यापासून मी फारकत कशी घेऊ...असं ते अखेरपर्यंत विचारत राहिले.

famous writer, producer sagar sarhadi pass away

सागर सरहदींचे मूळ नाव गंगा सागर तलवार, या नावात सरहद नव्हती, ती फाळणीसोबत जन्माला आली आणि नावातली गंगा दूर गेली. ही सरहद घेऊनही सागर मुंबईत पोटापाण्यासाठी दाखल झाले. नाट्य, रंगभूमी आणि लेखनात रमलेल्या या माणसाचे डोळे मुंबईतल्या चकाकत्या सिनेजगताने कधीही दिपवले नाहीत, हिंदी पडद्यावर एकमेव चित्रपट ‘बाजार’ बनवणारे सरहदी सिने जगतातल्या बॉक्स ऑफीसच्या तिकिट बाजारात हरवले नाहीत. त्यामुळेच नटश्रेष्ठ दिलीप कुमार, दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रांनाही यशाच्या शिखरावर असतानाही मोठ्या मानधनासाठी नकार देताना सरहदींना आपल्या नकाराचा पुनर्विचार करण्याची गरज अखेरपर्यंत पडली नाही.

सरहदी पाकिस्तानात जन्मले. उर्दू शायरी, नज्म, लेखन साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. एक दिवस अचानक त्यांना त्यांचे राहते घरदार सोडून भारतात पिटाळले गेले. वरकरणी त्याला धार्मिक कारणे असल्याचे सांगितले जात असले तरी त्यामागे खरेतर त्यामागील कारणे ही राजकीयच होती. जंग, सियासत, कौम, मजहब, दो मुल्को की जमीन, दंगे, खून, मौते असे शब्द फाळणीकाळात उर्दू वर्तमानपत्रात छापली जात होती. या एकूण वातावरणाचा संवेदनशील सरहदींच्या मनावर परिणाम झाला. एक प्रकारचे उदासलेपण, तुटलेपण घेऊनच ते जगले. सरहदींनी लिहलेल्या चित्रपटातील व्यक्तीरेखांमध्ये हे तुटलेपण, परिस्थितीने आणलेली हतबलता कायम जाणवते.

सरहदींनी यश चोप्रांसाठी कभी कभी लिहिला, चोप्रांनी त्यांनी लिहलेले नाटक त्याआधी पाहिले होते. या नाटकातील संवादांनी प्रभावित झालेल्या यश चोप्रांनी त्यांना माझ्या चित्रपटातील कथानकासाठी संवाद लिहाल का, असं विचारल्यावर कभी कभी पडद्यावर साकारला. पामेला चोप्रांच्या कथानकाला सरहदींनी संवांदातून कायमचं अजरामर केलं. यश चोप्रांसाठी सरहदींनी पुढे सिलसिला लिहिला, यातून प्रेमत्रिकोणातील अजरामर संवादाचा सिलसिला हिंदी पडद्यावर सुरू झाला. ‘कभी कभी’ने प्रभावित झालेल्या दिलीप कुमारांनी सरहदींना त्यांच्या चित्रपटांसाठी लिहण्याचे सुचवले होते, मात्र सरहदींनी त्याला नकार दिला. केवळ रोमान्स म्हणजे जगणं नाही, कायम तेच पडद्यावर मी लिहीन अशी अपेक्षा माझ्याकडून करू नका, असं म्हणत सरहदींनी लाखो रुपयांचे चेक सोबत घेऊन आलेल्या निर्मात्या दिग्दर्शकांना परत पाठवलं.

कभी कभी रिलिज झाल्यावर जवळपास वीस सिनेमांच्या कोट्यवधींचे मानधन देणार्‍या ऑफर्स सरहदींजवळ होत्या, मात्र सरहदींवर समाजवादी विचारांचा प्रभाव होता, तो वाचनातून नाही, तर अनुभव जगण्यातून आला होता. एखाद्याने केवळ पैशांच्या जोरावर दुसर्‍याचं जगणं ठरवावं, हे सरहदींना मान्य नव्हतं. समोर हिंदी पडद्याचा मानमरातब आणि पैसा होताच, सुखनैव जीवनाची हमी होती. आराम आणि वाढत जाणारं नाव होतं. मात्र अशा जगण्याला नकार देणारे सरहदी विरळच होते. मी नाईलाज म्हणून या देशात आलेलो आहे, असं ते स्पष्टपणे सांगायचे, फाळणीआधी मी माझ्या गावात आनंदी होतो, इथं येणं आणि काम करणं ही माझी हतबलता आहे. राहिला प्रश्न पैसे कमावण्याचा तर…नोट कितने भी कमालूं…रोटी तो एकही खाऊंगा..असं साध सरळ जीवनाचं तत्वज्ञान सरहदींच होतं.

हे तत्वज्ञान त्यांच्यात केवळ देखलेपणाचं कौतुक आणि सांगण्यापुरतं नव्हतं. तर त्याच्याशी ते प्रमाणिक होते. मानवी जगणं एसी खोली किंवा कारमध्ये बंदीस्त करता येत नसतं. निदान माझं जगणं तरी मी असं बंदीस्त होऊ शकत नाही, असं ते म्हणत होते. हिंदी पडद्यावरची माणसं थोडसं नाव पैसा कमावल्यावर महागडी गाडी घेऊन हिंडण्याच्या काळात, सरहदी कायमच लोकल ट्रेन आणि बस, रिक्षा आणि पायी प्रवास करत होते. या साधेपणाचं त्यांनी कधी कौतुक मिळवण्यासाठी भांडवल केले नाही, हजारो लोक असेच जगतात त्यात मी एक…असं ते सांगायचे. कभी कभी सिलसिला हीट झाल्यावर त्यांच्या घराच्या दारात निर्मात्या दिग्दर्शकांची रांग लागली होती. पण सरहदींचं हे घरं जुहू, लोखंडवाला, पाली हिल अशा पॉश वस्तीत नव्हतं.

सायनच्या कोळीवाड्यात सरहदी राहत होते. याच ठिकाणी जेमतेम दोन खोल्यांच्या घरात, या खोल्याही नव्हत्याच, एखादी लायब्ररी असावी असं ते घर, सरहदींचा अभ्यास उर्दू भाषेतून झाला होता. मात्र भवताल समजण्यासाठी इंग्रजी येणं आवश्यक होतं. त्यासाठीच सरहदींनी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतानाही मुंबईतल्या एका लेखन एजन्सीतली चांगल्या पगाराची नोकरी सोडली होती. अब कैसे जिओगे…सागर…असं नोकरीतल्या मॅनेजरनं विचारल्यावर…रायटर हूँ…मै लिखता हूँ इसलिए जिंदा रहता हूँ, सिर्फ रोटी के लिए नही ..असं त्याला सुनावलं होतं. ज्यावेळी लेखकावर त्याच्यातील गरजवंत माणूस वरचढ ठरेल त्यावेळी त्या माणसातला लेखक मरून जाईल, असं सरहदींना वाटत होतं….सरहदींनी त्यांच्यातला माणूस मरू दिला नाही.

हिंदी सिनेजगतात राहूनही सरहदींनी स्वतःची कधी पब्लिसीटी केली नाही, कोणाकडे काम मागितलं नाही. कामासाठी मैत्री त्यांनी कधीच केली नाही. केवळ संधी आणि पैशांसाठी सिने इंडस्ट्रीतली नाती जपली नाहीत, आपल्या तत्वांशी ठाम असणार्‍या सरहदींना अशी कुठलीही भौतिक सरहद बांधून ठेवणारी नव्हती. पैसा कमावून इथंच कायमचं स्थायिक होऊ असं त्यांना अखेरपर्यंत वाटलं नाही, फाळणीपूर्वी बालपण आणि तारुण्य घालवलेल्या आपल्या एबोटाबादच्या गावातील आठवणी त्यांना अखेरपर्यंत अस्वस्थ करत होत्या. कोळीवाड्यातून बाहेर पडल्यावर सायन स्टेशनवर किंवा हायवेवर भीक मागणारी मुले, रस्त्याच्या कडेला खोपटात जगणारी गरीबांची कुटुंबे पाहून त्यांना अपराधी वाटत होतं. हे अपराधीपण घेऊन हिंदी पडद्याच्या रुपेरी पडद्यावर वावरताना त्यांची होणारी प्रचंड घुसमट त्यांनी कधीही दाबली नाही.

वागण्यात आणि जगण्यातही एक प्रकारची बेफिकीरी घेऊन सरहदी जगले. मात्र या बेफिकिरीचं एक ठाम तत्वज्ञान त्यांच्याजवळ होतं. दर्जा, श्रीमंती, पैसा, मान सन्मान यामुळे जर मी माणसांपासून दूर जात असेन तर या गोष्टी माझ्यासाठी साखळदंड आहेत, सर्वबाजूने माणूस माणूसच असतो, त्याचं माणूसपण हिरावणं हा गुन्हा असल्याचं त्यांचे म्हणणे होते. त्यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या एकमेव अशा बाजार चित्रपटाच्या समांतर आणि व्यावसायिक यशानंतरही सरहदींमधील माणूसपण त्यांनी त्यांच्यापासून विलग होऊ दिलं नाही. बाजारमध्ये जरठविवाहाचा विषय होता. परंपरा, घरंदाजपणाच्या नावाखाली महिलांच्या होणार्‍या सामाजिक खरेदी विक्रीविषयी त्यांना प्रचंड चीड होती. भवतालमध्ये माणूसपणाचे भेसूर विडंबन मी उघड्या डोळ्यांनी पाहात असताना माझ्यात असलेला संताप, चीड आणि राग स्वाभाविक आहे. त्याला माझा नाईलाज आहे.

असं सरहदींच म्हणणं होतं. जीवनातील चकाकती व्यावसायिक मूल्ये दाखवून मला कोणीच विकत घेऊ शकत नाही, असं ठामपणे सांगायचे, हा ठामपणा त्यांच्या जगण्याचा सहजस्वभाव होता. त्यात कुठलाही अभिनिवेश नव्हता. त्यामुळेच कभी कभी, सिलसीला, चांदनी, कहो ना प्यार है, दिवाना अशा गाजलेल्या चित्रपटांशी लेखक म्हणून जोडले गेल्यावरही सरहदींमधला साधा माणूस त्यांनी संपू दिला नाही. पाली हिल किंवा जुहूमध्ये आलिशान घर, महागड्या गाड्या, चित्रपटांच्या निर्मात्यांची रांग, असं सर्व काही सरहदींना सहज मिळवता आलं असतं. मात्र त्यासाठी आपल्यातल्या माणूसपणाशी तडजोड करणं त्यांना कधीही शक्य नव्हतं. त्यांनी त्यांच्या निखळ माणूसपणाच्या तत्वांच्या आड येणारी तडजोड कधी केलीही नाही आणि त्याची खंतही अखेरपर्यंत केली नाही, म्हणून कुठल्याही सरहद्दी सागर सरहदींना माणूस बांधून ठेवू शकल्या नाहीत.