नाच रे मोरा…!

Subscribe

“बाबा बाबा, मला गाणं म्हणून दाखव ना…” रम्य संध्याकाळी छोट्या आदीनं टेरेसवर पेंग्वीनबरोबर खेळताना लाडिक हट्ट केला.

“नाही रे, बेटा… मला नाही येत गाणं” आपल्या चेहऱ्यावरचा N95 मास्क सावरत बाबाने उत्तर दिलं.

- Advertisement -

गेले अनेक दिवस कोरोनामुळे बाबा घरातून बाहेरच पडत नाहीये. त्यामुळे आयता दोन बाळांच्या आणि त्यांच्या आईच्या हातात अलगदच सापडलाय, बाबा…फुटकळ कामं वगळली तर कोरोना-बिरोना मरोना…अशीच सध्या बाबांची स्थिती झालीये. लाडका आदी खट्टू झालाय हे आईच्या लक्षात आलं. तिनं हल्केच बाबाकडे पाहून डोळे वटारले…सध्या ‘झुकी नजरेचा’ ट्रेंड सोशल मिडियावर सुरु आहे. पण त्या झुकी नजरेनं कामं थोडीचं होतात. त्यासाठी तर डोळे वटारावेच लागतात. तसे ते आईने वटारले.

तरी गाण्याची कटकट टाळावी म्हणून बाबा म्हणाला, आदी बेटा मला गाणं-बिणं येत नाही रे, तुझा छान फोटो काढून देऊ नव्या कोऱ्या कॅमेरानं? बघ तुला आवडेल!’

- Advertisement -

बाळ काही हट्टीपणा सोडत नाही हे लक्षात घेऊन बाबा म्हणाले, अरे, बेटा कोणतं गाणं बोलू?

त्यावर दोन्ही बाळांनी गलका केला. बाबा नॅशनल बर्डचं… नॅशनल बर्डचं…
बाबाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांचा गोंधळ होतोय असं लक्षात येताच आई म्हणाली, अरे तो मोरांचं गाणं म्हणायला सांगतोय. पुन्हा दोघे एकाच सुरात जवळपास कोकललेच… हा हा बाबा, मोराचं गाणं…

आकाशात काहीसे काळे ढग दाटले होते. मावळतीला गेलेल्या सूर्याच्या छटा त्यात मिसळल्यानं एक वेगळाच काळसर गडद लालसर रंग आकाशात जमा झाला होता.

खरं तर मोरानं पिसारा फुलवून नाचायला हा छान माहौल. पण ही ढगांची काजळी मंत्रालयावर उतरायला नको म्हणून पण बाबांना लक्ष ठेवायचं होतं… त्यासाठी बाबाने इतरांना कामं वाटून दिली होती आणि स्वत: मात्र फेबुसाठी नामानिराळा राहिला होता. या संकटकाळात हेही कौतुकास्पदच… नाही का?

… म्हणून त्यांनी बिरबलाला हाक मारली. तो जवळ येताच त्यांनी सवयीप्रमाणे तोंडावर हात ठेवत पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्षी’ कुठे आहे याची माहिती घ्यायला सांगितली. त्यांना वाटलं, नागु सयाजीच्या अंगणात नाचत असेल, पण नंतर कळलं तो नेपियन्सी रोडवरच्या ओक वृक्षाच्या बनात नाचतोय. तिथे तो जास्त मन लावून नाचणार म्हंजे साहजिकच यात वेळ जातोय पाहून पोरं पुन्हा बोंबलली, बाssssबाsss मोराचं गाणं… नाईलाजानं बाबा सावरुन गायला लागतो…

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच…
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, नाच…
काळा काळा कापूस पिंजला रे
कमळाशी बाण झुंजला रे,
आता तुझी पाळी,मीच देतो टाळी…
फुलव पिसारा नाच…नाच रे मोरा नाच…

बाबा, मुलांना गाणं ऐकवत असतानाच बिरबलाने पुन्हा फोन आणून दिला. पलीकडे सद्गुरु राउटर्स लाईनवर होते. तसा बाबाच्या पक्षाचा म्हणा, राष्ट्रीय पक्षीच तो… उगाच का त्यानं फुकटात दिल्लीत जायची हॅटट्रिक केलीय. हा ही पक्षातला एक रेकॉर्डच आहे…त्यानं फोनवर बाबांच्या तोंडून ‘फुलव पिसारा नाच’ इतकं ऐकलं. त्याला वाटलं हाच आपला आदेश… पोरांना बाबानं ऐकवलेल्या बालगीताच्याच ओळी ‘आदेश’ समजून सद्गुरू राउटर्स कामाला लागले…

त्यांनी लगोलग गाजभवनवर कुशाभाऊ भगतसिंहांना फोन लावला. ते आधीच या मोरावर बऱ्याच दिवसांपासून उखडलेले होते. पण एकाच वेळेला अनेक अंगणात पिसारा फुलवून नाचायचा सराव असलेला हा प्रभादेवीचा मोर तस्सा गेल्या काही वर्षांत कमालीचा तयार झालाय.

मोर तसा देखणा पक्षी… निसर्गाच्या मुक्तहस्ते केलेल्या रंग उधळणीचा हकदार. रुबाब दाखवावा तर मोरानं…स्टाईल मारावी तीही मोरानंच. उगाच का रोज भल्या सकाळीच अग्रलेखाच्या डहाळीवर बसून त्याचं केकाटणं गल्ली ते दिल्ली सगळे एकत असतात? पण त्यालाही एक शाप आहेच. नाचणारा मोर समोरुन दिसतो तर छान, विलोभनीय…पण मागून दिसला तर? नको ते मयूरदर्शन…!

फुलव पिसारा छान, हे शब्द कानात पडताच बाबांचा शब्दमयूर मलबार हिलवर पोचला. तिथंही जाऊन कुशाभाऊंचं मन रिझवण्यापलिकडे करण्यासारखं काहीच शिल्लक नव्हतंच. कारणं? कारण काय विचारता? आदल्या दिवशी बादशहाचा निरोप घेऊन बिरबल गेला होताच ना…मग त्यानं तिथे बसून काही बाही फोनाफोनी करुन घेतली… दोन-तीन फोनांवर बादशहाही बोलला…सगळं ‘सेट’ झालं…तिथं काही करण्यासारखं उरलं नव्हतं…मग फुकाचंच प्रेक्षणीय स्थळी पोचलेल्या शब्दमयूराला तिथं दिसला सूर्याची किरणं पडून चमचमणारा अरबी समुद्र.. पुरातत्व विभागानं जपलेली शैलीदारं बांधकाम… छान हिरवीगार झाडी…हिरवळ आणि झुळुझुळू वाहणारा खारा वारा…दोन चार खर्रेखुर्रे मोर पण आपल्या लांडोरींना घेऊन मस्त फेरफटका मारत होते.

हे मोर थुईथुई नाचताना बघतच बादशहाचा शब्दमयूर भान हरखून कुशाभाऊ भगतसिंहाच्या भेटीला पोचला…त्याच्या डोक्यात मोरांचा नाच होताच…मग तसंच आपल्याला जुन्या जाणत्या कुशाभाऊंसमोर नाचता येतं का बघणाऱ्या शब्दमयूरांनी कंबरेत छानसं वाकत एक पोझ कुशाभाऊंच्या समोर दिली… मयूर वाकला खरा पण माध्यमातून जे काही दिसलं आणि हो विशेषत: सर्वभाषिक पार राजधानी पर्यंतच्या पेपर्रातून… ते फारच डोळे झाकायला लावणारं होतं…पण म्हणतात ना, मोर नाचताना समोरच्या बाजूचा विचार करतो, मागे काय उघडं पडलंय याचं थोडीच त्याला भान असतं…? या मोराचंही तसंच झालं…मग बाहेर फार काही ताटकळ वाट्याला न आलेल्या च्यॅनैलवाल्यांना शुभेच्छा आणि बरंच काही ऐकवून मोर माघारी फिरला…

पण मोर नाचला, ओणवला म्हणजे पावसाची वर्दी मिळाली…आणि बारामतीच्या काटेवाडीचा जुना जाणता बळीराजा गोंदियाच्या शेठला घेऊन प्रेक्षणीय स्थळी पोहोचला…त्यानंही अंदाज घेतला…पावसाची वेळ तर झालीय…प्रभावदेवीचा मोरही बिनकामाचा का असेना पण नाचून गेलाय…कुणी सांगावं, पाऊस कोसळला तर या उतारवयातही भिजायला बारामतीचा बळीराजा तयार आहेच ना…! भिजल्याशिवाय उगाच का सत्तेचं पीकपाणी हाताला लागतं… बळीराजा भिजायला तयार हाय आणि मोर नाचायला…!

@बातमीवाला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -