वासना न ठेवता कर्म करावे

वासना भगवंताकडे वळविली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखर, वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला, तर घर जाळून टाकतो.

santvani

घरामध्ये कसे हसूनखेळून मजेत असावे. आपली वृत्ती अशी असावी की, ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरे पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे; सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. आनंद मिळविणे हे सोपे आहे, पण हे समजून, आपण सोपे झाले पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत, म्हणून आपण हलके झाले पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे, पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही.

फोड आला म्हणजे खाज सुटते, आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो, पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना, स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो. त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते. परंतु तो हाडूक काही सोडीत नाही. विषयाचा आनंद हा असाच असतो. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा आनंद, ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे.

वासना भगवंताकडे वळविली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखर, वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला, तर घर जाळून टाकतो. त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनविते; पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखविते. म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते.

वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा, हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असूनसुद्धा, वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकले, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे.