घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसारस्वतांची साहित्य पर्वणी!

सारस्वतांची साहित्य पर्वणी!

Subscribe

मराठी सारस्वतांच्या आनंद पर्वणीला आजपासून प्रारंभ होत आहे. नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून निघाले आहे. अर्थात संमेलनाच्या मुहूर्तावरच पाऊस आणि थंडीने हजेरी लावल्याने आयोजकांची ऐनवेळी धावपळ उडाली. परंतु बहुतांश मोठ्या सोहळ्यांच्या वेळी अशी परीक्षा बघितलीच जाते आणि जो त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो तो यशाची पताका फडकवतोच, हा आजवरचा अनुभव आहेे. त्याच धर्तीवर नाशिकमधील संमेलनही यशाची पताका फडकवेल यावर आयोजकांसह निमंत्रित साहित्यिकांचाही विश्वास आहे. खरे तर साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आजवर कुणी मिटवू शकलेले नाही. नाशिकही त्याला अपवाद ठरले नाही. संमेलन आयोजनासाठी साहित्य महामंडळाकडे नाशिकमधून दोन, सेलू येथून एक, पुण्यातून (दिल्लीसाठी) एक आणि अंमळनेरमधून एक अशी पाच आमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद्द संस्थेने फेरनिमंत्रण पाठवले होते. त्यात मे महिन्यात दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र, महामंडळाने नाशिकमधील लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले. ८ जानेवारी २०२१ ला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण अखेर निश्चित झाले. मार्च महिन्याच्या अखेरीस नाशिकमध्ये संमेलन आयोजित करण्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी घोषित केले. त्यानंतर २० जानेवारीला ठाले-पाटील यांनी नाशिककरांशी चर्चा करून २६, २७ व २८ मार्च अशा संमेलनाच्या तारखा जाहीर केल्या. कोरोना महामारीच्या प्रादूर्भावामुळे नाशिकमध्ये होणारे संमेलन काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते. राज्यातील कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर संमेलन आयोजित करण्याचे साहित्य महामंडळ आणि आयोजकांनी निश्चित केले. त्यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ हे स्वत: कोरोनाबाधित आढळून आले. विशेष म्हणजे, तेव्हा स्वागताध्यक्ष भुजबळ यांच्यासोबत बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष व आयोजक उपस्थित होते. स्वत: भुजबळ कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आयोजकांना धडकी भरली होती. आता संमेलनच नको, असे आयोजक म्हणू लागले.

- Advertisement -

कोरोनाची दुसरी लाट ऑगस्टमध्ये ओसरल्यानंतर संमेलन तारखांबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली. संमेलन ऑक्टोबरमध्ये होईल, असे आयोजकांना वाटू लागले. मात्र, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले-पाटील यांनी साहित्य महामंडळाने 19, 20 आणि 21 नोव्हेंबरला मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचे निश्चित केले. या तारखांवर नाशिकमधील संयोजन समिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे एकमत झाले होते. मात्र, संमेलन उद्घाटक डॉ. जयंत नारळीकर हे प्रकृतीच्या कारणामुळे संंमेलनास उपस्थित राहू शकत नाहीत, असे डॉ. नारळीकरांच्या पत्नी मंगलाताई यांनी सांगितल्याचे कारण देत प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी संमेलनाच्या तारखा पुन्हा बदलून देण्याची मागणी केली. त्यावेळी महामंडळाचे अध्यक्ष ठाले-पाटील यांनी स्वत: मंगलाताईंशी संपर्क साधला असता असे काहीच बोलणे झाले नसल्याचे समोर आले. त्यानंतर ठाले-पाटील यांनी प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकरांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर ठाले-पाटील यांनी साहित्य संमेलन ३, ४ व ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्याचे घोषित केले.

साहित्य संमेलनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब झाले असले तरी स्थळ निश्चित झाले नव्हते. नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीची साहित्य संमेलनस्थळ म्हणून निवड करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये कोरोना ओसरल्याने महाविद्यालये सुरू झाली. गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एम. एस. गोसावी यांनी संमेलनस्थळाच्या मैदानावर खड्डे पाडू नये, इमारतींचे नुकसान करु नये, अशा अनेक अटी आयोजकांना घातल्या. आयोजकांनी अडथळ्यांची शर्यत पार करत गोसावींकडून होकार मिळवला. गोखले सोसायटीत आयोजकांनी संमेलन कार्यालयसुद्धा सुरू केले. संमेलनाच्या तयारीसाठी ४० समित्या तयार करण्यात आल्या. त्यातही गोंधळ झाला. आयोजकांनी मर्जीतील लोकांना समिती प्रमुख व सदस्य केल्याचा आरोप सदस्यांनी केला. तसेच आयोजक समिती सदस्यांचे म्हणणे विचारातच घेत नाही, अशी ओरड समिती सदस्य करू लागले. त्यानंतर समिती समन्वयकांनी सर्व सदस्यांची नाराजी दूर केली. स्वागत समिती सदस्य होण्यासाठी आयोजकांनी देणगी शुल्क आकारणी केली. त्यावरही टीका झाली. तेव्हा आयोजकांनी संमेलनास देणगीची गरज आहे, हे शुल्क नसून देणगी आहे, असे सांगितले.

- Advertisement -

उस्मानाबादच्या संमेलनात १ हजारहून अधिक स्वागत समिती सदस्य होते. त्यानुसार नाशिकच्याही स्वागत समितीत सदस्य असतील, असे आयोजक सांंगत होते. प्रत्यक्षात शंभरच स्वागत समिती सदस्य झाले. त्यातही वाद झाला. सदस्य संख्या वाढत नसल्याने ४० सदस्यांकडून ३ हजार रुपये शुल्क तर ६० सदस्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये देणगी स्वरुपात शुल्क घेण्यात आले. सदस्य संख्या वाढत नसल्याने आजही धूसफूस सुरू आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मंत्री छगन भुजबळ यांची निवड करण्यात आली. त्यानंतर भुजबळ यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीची पाहणी केली. त्यावेळी आयोजकांच्या मर्यादा आणि संमेलनस्थळातील त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. संमेलन नाशिकला होत असल्याने कशातही कमतरता राहता कामा नये, यासाठी भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हा सारस्वतांचा मेळावा घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यास साहित्य महामंडळ आणि आयोजकांनीसुद्धा प्रतिसाद दिला. संमेलनाला येणार्‍या पाहुण्यांची राहण्याची सोय व्हावी, यासाठी संमेलनाचे ठिकाण बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले.

संमेलन होण्याआधीच लाखो रुपये खर्च केले जात होते. मात्र, देणगीदार आणि समिती सदस्यांना हिशोब दाखवला जात नव्हता. यावर समिती सदस्य श्रीकांत बेणी यांनी आक्षेप घेत थेट महामंडळाच्या अध्यक्षांकडे तक्रार केली. त्यानंतर दर महिन्याला संमेलन खर्च जाहीर केला जात होता. ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. संमेलनाआधीच इतका खर्च कसा काय होऊ शकतो, असे अनेकांचे मत झाले. संमेलन गीत करण्यात आले. त्यावरुनही वाद झाला. गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेत निषेध नोंदविला. त्यानंतर आयोजकांनी गीतामध्ये सावरकरांच्या नावाचा उल्लेख केला. त्यानंतर संमेलन गीताचा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला. गीतामध्ये नाव एकाचे आणि छायचित्र दुसर्‍याचे दिसून आले. त्यावरुनही वाद झाला.

संमेलन वातावरण निर्मितीसाठी आयोजकांनी कालिदास कलामंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या काव्यसंग्रहाचे, संविधान दिनानिमित्त माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांचा संविधान विषयक परिसंवाद आयोजित करण्यात आला. विज्ञानावर परिसंवाद, काव्योत्सव आयोजित केला गेला. त्यास रसिकांनी आयोजकांच्या अपेक्षेप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नाही. कारण संमेलनाआधी असेही कार्यक्रम होतात हेच अनेक रसिकांना आवडले नसल्याचे उपस्थितीवरुन दिसून आले. संमेलन उद्घाटनासाठी उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावू नये, अशी हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका आहे. एकूणच नियोजनापासूनच वादात असलेल्या या संमेलनात मराठी साहित्याशी संबंधित कुठलाच वाद किंवा चर्वितचर्वण झालेले दिसत नाही. अर्थात ही कमी येत्या तीन दिवसात भरुन निघेल अशी अपेक्षा आहे. या तीन दिवसांच्या काळात केवळ आणि केवळ साहित्यावरच चर्चा झडल्यास संमेलनाची प्रतिष्ठा टिकून राहील, अन्यथा अन्य सोहळ्यांप्रमाणे अशी संमेलनेही विस्मृतीत जातील, हे निश्चित!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -