डीएनए एक, मग घरवापसी कशासाठी?

सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. त्याचसोबत संघाने मुस्लीम वसाहतींमध्ये संघाच्या शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे देशाच्या विविध स्तरांतून पडसाद उमटू लागले आहेत. मुद्दा असा आहे की, सर्व भारतीयांचा डीएनए एकच वाट आहे, असे संघाला वाटत असेल तर मग इतर धर्मात गेलेल्या हिंदूंची घरवापसी कशासाठी, हा प्रश्न पडतो. कारण हिंदू धर्मातही विविधता आहे, तर मग इतर धर्मात गेलेल्यांची विविधता आपल्या भारतीय म्हणून असलेल्या एकतेत सामावून घेण्यात काय अडचण आहे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच सगळ्या भारतीयांचा डीएनए एक आहे, त्यामुळे आपण सगळे समान आहोत, असे विधान उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथे मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या एका कार्यक्रमात केले. तसेच आता यापुढे मुस्लीम वस्त्यांमध्येही संघाच्या शाखा सुरू करण्याचा निर्णय चित्रकूट येथे झालेल्या संघाच्या पाच दिवसीय चिंतन शिबिरात घेण्यात आला आहे. मॉब लिंचिंग करणारे हिंदुत्वविरोधी आहेत, असेही सरसंघचालकांनी स्पष्ट केले आहे. सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे, हे काही पहिल्यांदाचा बोलले जात आहे, अशातला भाग नाही. स्वत:ला हिंदुत्ववादी मानणार्‍या काही नेत्यांनी हे विधान या पूर्वीही केले आहे. पण यावेळी ते स्वत: सरसंघचालकांनी केले आहे, त्यामुळे त्याविषयी विशेष चर्चा होत आहे. त्यात पुन्हा पुढे उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे त्याचीही संघाकडून पूर्वतयारी केली जात आहे, अशीही एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण एकूण संघांच्या विचारधारेचा धांडोळा घेतल्यावर असे लक्षात येईल की, संघ हा राजकारणाला सहाय्यभूत म्हणून काम करत असतो.

भाजप ही संघाची राजकीय शाखा असल्यामुळे त्यांना मदत करणारी ठरेल, अशी पार्श्वभूमी संघाकडून तयार केली जाते किंवा संघाने आपल्या संघकार्यातून तयार केलेल्या पृष्ठभूमीचा भाजपला उपयोग होतो. असे हे परस्परपूरक असे कार्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, संघाचे काम हे शाखांच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन अशा स्वरुपाचे असते. ज्या कुणामध्ये नेतृत्व गुण असतील याचा संघशाखांच्या माध्यमातून विकास होत असतो, पण मुळात त्या व्यक्तीमध्ये नेतृत्व गुण असावे लागतात. म्हणजे संघांच्या काही मंडळींकडून काही वेळा असे थोड्या अभिनिवेशाने म्हटले जाते की, संघाने ठरवले तर आम्ही १० मोदी तयार करू शकतो, पण या बोलण्याला तसा अर्थ नाही. कारण जसे शिक्षक विद्यार्थ्यांना कविता शिकवू शकतात, पण ते त्यांना कवी बनवू शकत नाहीत. कविता करण्याची मूळ प्रेरणा त्या व्यक्तीमध्ये असावी लागते. तरच त्याला कविता स्फूरते. शिक्षक त्याला कविता शिकवून मार्गदर्शन करू शकतात, पण कवित्वाचा गुण त्या व्यक्तीत असायला हवा. तसेच नेतृत्व गुण हे त्या व्यक्तीमध्ये असावे लागतात, केवळ एखादा संघाच्या शाखेत गेला आाणि नेता झाला, असे होत नाही. नरेंद्र मोदी यांच्यामध्ये नेतृत्व गुण होते, त्या बळावर ते पुढे आले. त्यांनी राजकीय यश संपादन केले. म्हणूनच संघांचा त्यांना पाठिंबा मिळाला.

केवळ भारतीय नव्हे तर आता भारतात नसलेल्या पाकिस्तान, बांगलादेश, मानम्यार, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान भूतान, मालदिव असा सगळा भारतीय उपखंड पाहिला तर या सगळ्यांमध्ये एक सांस्कृतिक समानता दिसेल. आहार विहाराच्या पद्धती, धार्मिक प्रतिके, पूर्वपंरपरा यामध्ये बरेच साम्य दिसेल. हे संपूर्ण प्रदेश संस्कृतीच्या एका समान धाग्याने बांधलेले दिसून येतील. या सगळ्या भागांमध्ये रामायण आणि महाभारताचा प्रभाव दिसेल. एकूणच भारतीय उपखंड हा असा विविध महाकाव्ये, पूर्वपरंपरा यांनी जोडलेला दिसेल. अफगाणिस्तानमध्ये कंदाहार म्हणजेच गंधार हे महाभारत काळात शकुनीचे राज्य होते. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ भारतभेटीवर आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा आचारी आला होता. इकडच्या काही पत्रकारांनी त्याला विचारले की, इथे आल्यावर तुम्हाला कसे वाटते, त्यावर तो म्हणाला, ‘इथे मला काही फार वेगळे वाटत नाही, पाकिस्तानच्याच कुठल्या तरी भागात मी आलो आहे, असे मला वाटते.’ इतकी त्या दोन देशांमध्ये समानता आहे. हे विधान एका सर्वसामान्य माणसाचेे आहे, याला कुठलाही राजकीय रंग नाही.

नेपाळ आणि बांगलादेशमधील कितीतरी लोक रोजीरोटीसाठी भारतात काम करत असतात. भारत आणि सभोवतालचे देश यांच्यामध्ये असलेले साम्य लक्षात घेऊन या प्रदेशांकडून सामूहिक विकासासाठी ‘सार्क’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. केवळ भारत नव्हे तर भारतीय उपखंडात राहणार्‍या लोकांमध्ये साम्य आढळून येेते. त्यातून काही संशोधकांचा असा दावा आहे की, भारतात राहणार्‍या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा डीएनए एक आहे. त्याच संशोधनाचा धागा पकडून सरसंघचालक मोहन भागवत यांनी यासंबंधी विधान केलेले आहे. कारण सरसंघचालक हे काही मानववंशशास्त्राचे संशोधक नाहीत. त्यांनी याविषयी इतरांनी केलेल्या संशोधनाचा आधार घेऊनच हे विधान केले आहे. पण याविषयी संशोधकांमध्ये विविध विचार प्रवाह आहेत. कारण सगळ्याच संशोधकांच्या मते सगळ्या भारतीयांचा डीएनए सारखा नाही. कारण जगाच्या विविध भागातून विविध प्रकारचे लोक विविध काळी भारतात येऊन स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांचा डीएनए एक असणे शक्य नाही. त्यात पुन्हा आर्य आणि द्रविड हे प्रामुख्याने दोन भेद मानले जातात. आर्य बाहेरून भारतात आले की, भारतातून बाहेर गेले यावरही एकमत होत नाही. काहींनी तर आर्यन थिअरीच रद्दबातल ठरविल्या आहेत. त्यामुळे भारतातील सगळ्यांचा डीएनए एकच आहे का, याविषयी मतमंतातरे होेऊ शकतात. पण भारतीय उपखंडातील सगळा समाज हा सांस्कृतिक धाग्याने जोडलेला आहे. त्यांच्यात बरीच सांस्कृतिक समानता आहे, हे मात्र मान्य करावे लागेल.

अखंड भारत पुन्हा साकार करणे हे संघाचे स्वप्न आहे. तशा प्रकारच्या आशाआकांशा त्यांच्याकडून व्यक्त होत असतात. पण त्यांच्या मनात अखंड हिंदू राष्ट्र हा विचार आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि हिंदू मक्कल काची या संघटनांकडून घरवापसीची मोहीम चालविण्यात येते. घरवापसी म्हणजे जे पूर्वाश्रमीचे हिंदू अन्य धर्मांमध्ये धर्मांतरित होऊन गेले आहेत, त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे. म्हणजे त्यांना असे म्हणायचे आहे की, हिंदू धर्म हे तुमचे घर आहे, यात तुम्ही पुन्हा परत या. एका बाजूला संघ म्हणत आहे की, सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे. तर मग असा प्रश्न पडतो की, घरवापसी कशासाठी ? कारण ते त्यांच्याच तर घरात आहेत. म्हणजे देशात आहेत. त्यात पुन्हा जे पूर्वी हिंंदू धर्मातून अन्य धर्मात गेले, ते प्रामुख्याने मागासवर्गीय लोक होते. हिंदू धर्मात होत असलेल्या पिळवणुकीतून सुटका व्हावी, म्हणून त्यांनी अन्य धर्मांचा पर्याय स्वीकारला होता. हिंदू धर्मातील मागासांना सवर्णांकडून नेहमीच अपमान आणि अवहेलना सोसवी लागली आणि त्यांचे शोषण होेत राहिले. त्यातूनच त्यांना, ‘मी हिंदू धर्मात मरणार नाही,’ अशी गाणी म्हणून दुसर्‍या धर्माचा स्वीकार करावा लागला. हिंदूंनी मुस्लीम किंवा अन्य धर्मांचा स्वीकार करणे काही शतकांपूर्वीची गोष्ट आहे, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरी समाजासोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला, हे तर अगदी अलीकडचे उदाहरण आहे.

याचा अर्थ हिंदू धर्मात ज्यांना मागास समजले जाते, त्या आपल्याचा बांधवांचा हिंदूंनी इतका जाच आणि त्रास दिला की, त्यांना अन्य धर्मांचा आश्रय घ्यावा लागला. तेच आपले बांधव जेव्हा अन्य धर्मांत जातात, काही वर्षे स्थिरस्थावर होतात, तेव्हा मग त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात यावे असे संघासारख्या संघटनांना वाटते. एखादा हिंदू जेव्हा पाव खात असे, किंवा चुकून गोमांस भक्षण करत असे तेव्हा तो ख्रिस्ती किंवा मुस्लीम म्हणून बाटला जात असे. त्याच्या पुन्हा हिंदू धर्मात येण्याच्या वाटा बंद करण्यात येत असत. पण जेव्हा एखादा मुस्लीम किंवा ख्रिस्ती माणूस हिंदूकडची पुराणपोळी खात असे, तेव्हा मात्र तो हिंदू होत नसे, या एका उदाहरणातच सगळे काही आले. म्हणजे हिंदूंनी आपल्याच बांधवांना कसे दूर केले, हेच यातून दिसून आलेे. आता जेव्हा संघासारखी हिंदुत्ववादी संघटना म्हणते, आपल्या सगळ्यांचा डीएनए एकच आहे. आपण सगळे एक आहोत. मुस्लीम वस्त्यांमध्ये संघाच्या शाखा सुरू करायच्या आहेत. तेव्हा त्याला मुस्लिमांची संघ शाखा, ख्रिस्तींची संघ शाखा, असे स्वरुप तर येणार नाही ना, याचाही विचार व्हायला हवा.

संघाने आपले दोन बाहू पसरून बंधूभावाचे इतके आत्मियतेचे वातावरण तयार करावे की, आपण समान आहोत, आपला डीएनए एकच आहे, असे बोलण्याची त्यांच्यावर वेळच येऊ नये. कारण प्रेमाने जग जिंकता येते, हे सर्वमान्य तत्व आहे. आपण भारतीय उपखंडातील सगळे एका सांस्कृतिक धाग्यात गुंफलेले आहोत, हे अन्य धर्मात धर्मांतरित झालेल्यांना माहीत आहे, पण आपल्या पूर्वजांना हिंदू धर्म का सोडावा लागला किंवा आपल्यासाठी एकेकाळी हिंदू धर्माचे दरवाजे कसे बंद करण्यात आले, याची त्यांनाही कल्पना आहे. त्यामुळे डीएनए एक आहे, ही जरी लोभस कल्पना असली तरी पुन्हा आपण धार्मिक उतरंडीच्या चाकाखाली भरडले तर जाणार नाही ना, याची त्यांना भीती वाटते. ते भय दूर करण्याचे खरे आव्हान संघासमोर आहे. यासाठी संघाला केवळ शाखाविस्तार करून चालणार नाही तर आपल्या दृष्टिकोनाचाही विस्तार करावा लागेल.